पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवून देणारा विराट कोहली पुन्हा त्याच्या मूळ भूमिकेत परतलाय. जवळपास तीन वर्षं तो अपयशाची घेऊन वावरत होता. मनासारखं काहीच घडत नव्हतं. पण या खेळीनंतर त्या जखमेचा मागमूसही राहिला नव्हता. विराटच्या यशाची ऊर्जा ही स्वयंप्रेरणेची आहे. तो हिंमत न हरता अखेरच्या चेंडूपर्यंत लढतो. आपली सकारात्मकता तो कायम ठेवतो.
दोन महिन्यांपूर्वी विराट कोहली अपयशाच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी अभिमन्यूप्रमाणे प्रयत्न करत होता. नोव्हेंबर २०१९मधे कारकिर्दीतलं ७०वं शतक झळकल्यानंतर पावणेतीन वर्षांचा काळ लोटला. लढवय्या फलंदाज म्हणूनही त्याची उपयुक्तता संपुष्टात येत चालली होती. धावांसाठी झगडताना आढळत असल्यानं त्याचं संघातलं स्थान धोक्यात आलं होतं. तो संपला, अशी ओरड जाणकार आणि चाहत्यांकडून होऊ लागलेली.
कारकिर्दीचा उंचावलेला आलेख घसरत जाऊन त्यापुढे पूर्णविराम दिला जाणार, अशीच चिन्हे दिसत होती. पण तो खचला नाही! आपल्या समर्थ इच्छाशक्तीच्या बळावर पुन्हा पाय रोवून उभा राहिला. आशिया कप स्पर्धेत त्याला सूर गवसला. अफगाणिस्तानविरुद्ध शतकाची प्रतीक्षाही संपुष्टात आणली. ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमधे भारताच्या सलामीच्या पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत क्रिकेट जगतानं प्रेरणादायी ‘विश्वविराटरूपम’ अनुभवलं.
भारताची ४ बाद ३१ अशी स्थिती असतानाही विजयाच्या आशा कायम टिकवत अखेरीस ऐतिहासिक विजय मिळवून देणारा विराट कोहली पुन्हा त्याच्या मूळ भूमिकेत परतलाय. गेली जवळपास तीन वर्षं तो अपयशाची जखम घेऊन वावरत होता. ती बरी होत नव्हती. मनासारखं काहीच घडत नव्हतं. पण या खेळीनंतर त्या जखमेचा मागमूसही राहिला नव्हता.
राखेतून पुन्हा उभ्या राहणार्या फिनिक्सप्रमाणे विराटची ही यशोगाथा झाली. आशिया कपआधी एका पत्रकार परिषदेत विराट म्हणाला की, दहा वर्षांत पहिल्यांदाच मी माझ्या बॅटला महिनाभर हात लावलेला नाही. इच्छाशक्ती प्रबळ असल्याचं मी स्वतःलाच सांगत होतो. पण माझं शरीर मला थांबण्याचे संकेत देत होतं. काही काळ थांब आणि विश्रांती घे, असं माझं मन मला सांगत होतं.
या कठीण काळातून जात असताना माजी कर्णधार कपिल देव यांनी कोहलीच्या कामगिरीवर शरसंधान साधलं होतं. ‘जर जगातला दुसर्या क्रमांकाचा कसोटी बॉलर रविचंद्रन अश्विनला कसोटी टीममधून वगळता येत असेल, तर ट्वेन्टी-२०मधल्या अग्रस्थानावरच्या बॅट्समनलाही वगळलं पाहिजे.’ अशा शब्दांत कपिल यांनी ताशेरे ओढले होते. पण या टीकेनं विराट खचला नाही.
हेही वाचा: त्यांच्या वर्णद्वेषाचा धिक्कार, आपल्या वर्णद्वेषाचा उदो उदो
गेल्यावर्षी संयुक्त अरब अमिरातीत झालेल्या ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमधल्या भारताच्या कामगिरीची जबाबदारी घेत विराटनं बॅटींगकडे अधिक लक्ष केंद्रित करता यावं म्हणून कर्णधारपद सोडलं. पण, बीसीसीआयने मर्यादित षटकांच्या दोन्ही प्रकारांसाठी एकच कर्णधार असावा म्हणून एकदिवसीय कर्णधारपदसुद्धा त्याच्याकडून काढून रोहित शर्माकडे सोपवलं.
मग चालू वर्षाच्या पूर्वार्धात झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत १-२ अशी भारतानं हार पत्करल्यामुळे विराटनं कसोटीचं कर्णधारपदसुद्धा सोडलं. तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमधलं कर्णधारपद सोडणार्या कोहलीचा बॅटींगचा सूरही हरवला. गेल्या ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमधल्या अपयशानंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी बरेच प्रयोग केले. या प्रकारात ३० खेळाडू त्यांनी आजमावले.
नवे पर्याय उपलब्ध झाल्यामुळे ऑस्ट्रेलियात होणार्या ट्वेन्टी-२० वर्ल्डकपसाठी कोहलीच्या निवडीबद्दल शंका निर्माण झाली. पण या ‘शंका’सुराचा वध विराटनं केला. आयुष्यातल्या सर्वात कठीण कालखंडातून जातानाच माणसाची खरी ओळख पटते, तर सर्वात आव्हानात्मक प्रतिस्पर्ध्याविरुद्ध खेळतानाच खेळाडूचा दर्जा खर्या अर्थानं सिद्ध होतो.
२०१६ च्या ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमधल्या पाकिस्तानविरुद्धच्या सर्वात आव्हानात्मक लढतीनंतर विराटकडे पाहण्याचा क्रिकेट जगताचा दृष्टिकोनच बदलला. जणू सचिनचा वारसदार गवसल्याचाच आनंद भारतीय क्रिकेटला झाला. काही वर्षांपूर्वीच भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनीही ग्वाही दिली होती. सचिनचा जागतिक क्रिकेटमधला विश्वविक्रम एखादा भारतीयच मोडेल आणि तो विराटच असेल, अशी भविष्यवाणी गावस्कर यांनी केली होती.
विराटचे वडील प्रेम कोहली यांनी आपल्या मुलांनी क्रिकेटपटू व्हावं, असंच स्वप्न पाहिलं होतं. मे १९९७मधे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी दिल्लीच्या पश्चिम विहार भागात नवी अकादमी काढली. तेव्हा विराटच्या वडिलांनी पाच वर्षीय विकास आणि आठ वर्षीय विराट यांना या अकादमीत दाखल केलं.
काही महिन्यांनी जेव्हा शर्मा कोहलींना भेटले, तेव्हा ते म्हणाले, ‘तुमचा छोटा मुलगा विकास छान खेळतो.’ पण काही महिन्यांतच विकासनं अकादमीला अलविदा केला. पण विराटचा खेळ मात्र नजर लागण्यागत बहरत गेला, तो आजपर्यंत.
हेही वाचा: भारताकडे वेगवान गोलंदाज येण्याचं कारण काय?
१९९९च्या वर्ल्डकपमधे सचिनच्या वडलांचं निधन झालं. पण अंत्यविधीसाठी मुंबईत येऊन गेल्यानंतर सचिननं पुन्हा इंग्लंडला जाऊन वर्ल्डकपमधे आपला करिष्मा दाखवला आणि ती शतकी खेळी वडिलांना अर्पण केली होती. तसाच एक प्रसंग विराटच्या जीवनात घडला.
२००६-०७ ला रणजी क्रिकेट हंगामात दिल्लीची टीम अडचणीत असताना रात्री विराटच्या वडलांचं निधन झालं. कुटुंबावर जणू आभाळच कोसळलं होतं. पण, सकाळी धीरोदात्तपणे विराटनं प्रशिक्षक राजकुमार यांना फोन केला आणि ठामपणे टीमला गरज असल्यामुळे मी मैदानावर जाऊन अर्धवट राहिलेली नाबाद खेळी पूर्ण करणार, असं सांगितलं.
वडलांचा मृत्यू हा आयुष्यातला सर्वात कठीण प्रसंग. मनानं खंबीर माणसंही यावेळी खचून जातात. पण हा खचला नाही, तर आपली क्रिकेटवरची निस्सीम भक्ती आणि बांधिलकी जपत आपल्याकडे करुणा भाकतोय. शर्मा यांनी मनोमनी विराटला ‘हॅट्स ऑफ’ केलं. विराट शब्दाला जागला. टीमला सावरल्यानंतरच तो घरी परतला. प्रतिस्पर्धी कर्नाटकच्या टीमलाही त्याच्या या मनसामर्थ्याचं अप्रूप वाटलं.
त्यानंतर विराटनं मजल-दरमजल करीत भारतीय युवा टीममधे स्थान मिळवलं. विराटच्याच नेतृत्वाखाली भारतानं २००८मधे युवा वर्ल्डकपला गवसणी घातली. मग अब्जावधी क्रिकेट रसिकांच्या आशा-आकांक्षांचं ओझं असलेल्या भारतीय संघात विराटनं आपलं स्थान निर्माण केलं. विराटचे सध्याचे दिवस हे त्याच्या गेल्या १६ वर्षांतल्या मेहनतीचं फळ आहे. एका रात्रीत हे मुळीच घडलेलं नाही.
एक काळ असा होता की, सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवाग बाद झाल्यावर सामना पाहण्याचं कवित्वच हरपून जायचं. नैराश्याच्या भरात टीवी बंद केले जायचे, काही क्रिकेटचाहते तर चक्क मैदान सोडायचे. सचिनचा हा कित्ता गिरवण्याचं कार्य सध्या विराट करतोय.
हेही वाचा: मानसिक आरोग्य नीट राहिलं तरच खेळाडू यश मिळवतील
विराटच्या आयुष्यात क्रिकेट म्हणजेच सर्वकाही आहे. सकाळी बिछान्यातून उठल्यापासून रात्री पुन्हा डोळे मिटेपर्यंत क्रिकेट हा एक प्राणवायू त्याला जगण्याची प्रेरणा देतो. ‘आक्रमकता म्हणजे सकारात्मकता’ हे त्याचं ब्रीदवाक्य. मैदानावर याच आक्रमकतेच्या वेगवेगळ्या रूपांमधे विराट दिसतो.
त्यामुळेच त्याचे मैदानावरचे आणि बाहेरचे अनेक पंगे त्याला ‘सभ्य गृहस्थांचा खेळ’ असं बिरुद मिरवणार्या खेळामधल्या आदर्श क्रिकेटपासून थोडेसे दूर नेतात. ऑस्ट्रेलियामधल्या चाहत्यांशी अशाच प्रकारे त्याचा वाद झाला होता आणि त्यानं प्रेक्षकांना उद्देशून मधलं बोट दाखवलं होतं. याबद्दल त्याला शिक्षाही झाली होती.
ऐंशीच्या दशकात ‘ये बेचारा काम के बोझ का मारा, इसे चाहिए सिंकारा’ अशी एक जावेद जाफ्रीची जाहिरात लोकप्रिय झाली होती. सकारात्मकतेची ऊर्जा त्या जाहिरातीत होती. पण विराटच्या यशाची ऊर्जा ही स्वयंप्रेरणेची आहे.
कधीही हार न मानण्याची वृत्ती हे विराटच्या यशाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. तो हिंमत न हरता अखेरच्या चेंडूपर्यंत लढतो. तो सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेत, आघाडी सांभाळतो. आपली सकारात्मकता तो कायम ठेवतो.
मानवी आयुष्य म्हणजे जन्म आणि मृत्यू या दोन टोकांमधला प्रवास. सुख आणि दु:ख या एकाच नाण्याच्या दोन अपरिहार्य बाजू. ‘शोले’तल्या अमिताभ बच्चनकडे असलेल्या नाण्याप्रमाणे दुहेरी छापा असलेलं नाणे आयुष्यात नसतं. कोरोनाच्या कालखंडानंतर तर जगण्याच्या व्याख्या मोठ्या प्रमाणात बदलल्यायत. अनेकांच्या वाट्याला कठीण परिस्थिती आली.
अगदी महाभारत युद्धाआधी महारथी अर्जुनही निराश, हताश, निष्क्रिय झाला होता. समोर युद्धासाठी उभे असलेले आपले नातलग आहेत. त्यांच्याविरुद्ध मी कसं लढणार? युद्ध नको, या भूमिकेपर्यंत आलेल्या अर्जुनाला श्रीकृष्णानं गीता ऐकवली आणि युद्धासाठी सज्ज केलं आणि पुढे त्यानं ते गाजवलं.
अपयशावर मात करण्यासाठी बळ देणारा हा श्रीकृष्ण प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो. पण विराटनं अपयशावर मात करण्याची दीक्षा आपल्याला दिलीय. लेखक व. पु. काळे म्हणतात, ‘आकाशाकडे पाहायचे, ते आकाश होऊन पाहावे म्हणजे ते जवळचे वाटते. ‘विराट’ या शब्दाचा अर्थ तेव्हा समजतो.’
हेही वाचा:
पुरुषांनी रडायला हवं असं सचिन तेंडूलकर का म्हणाला?
कांगारुंच्या धूर्त खेळीनं भारताला वन डे सिरीजमधे चितपट केलं
विराट कोहलीच्या माथ्यावर ‘३६’चा शिक्का लावणारी टेस्ट सिरीज
जगातल्या सगळ्यात मोठ्या दुर्गुणाविरुद्ध क्रिकेटनं एका हत्यारासारखं काम केलं
महात्मा गांधींचं क्रिकेटशी नातं सांगणारे हे किस्से आपल्याला माहीत आहेत का?