स्वतःला सनातनी वगैरे म्हणवणारे विठोबा आमचा म्हणतात. पुरोगाम्यांसाठी तर तो चळवळीचा नेताच असतो. अगदी स्वतःला नास्तिक म्हणवणरेही, विठोबा म्हटलं की थोडं समजून घेण्याच्या झोनमधे असतात. विठोबात असं नक्की काय आहे, जे सर्वांना आपलं म्हणावंसं वाटतं? याचं उत्तर म्हटलं तर सोपं आहे म्हटलं तर अवघड आहे. सोपं उत्तर हेच की, विठोबा कट्टरता नाकारणाऱ्या समतेचा पुतळा आहे.
आज आषाढी एकादशी. एकीकडे उपासाच्या पदार्थांच्या मेजवान्या चालल्या आहेत, तर दुसरीकडे तुळशीचे हार विकणाऱ्यांचे धंदे जोरात आहेत. दररोज तुरळक गर्दी असणाऱ्या विठोबाच्या देवळात रांगा लागलेल्या आहेत आणि सोशल मीडियावर तर भक्तीचा महापूर आलेला आहे. स्टेटस, रिल्स, स्टोरीज, विडिओ, मेसेज यांची संख्या तर वारीला गेलेल्यांपेक्षा जास्त भरेल.
हे सगळं करणारी तरुण पोरं आहेत. त्यांनाही हा विठोबा आपला वाटतोय. ते कोणत्याही फॉरमॅटमधे विठोबाला बसवू शकताहेत, कारण तो तसाच आहे. त्याला तुम्ही कसाही मांडला तरी तो तुमच्यावर रागवत नाही. कारण विठोबा हा सगळ्यांचा फ्रेंड असतो. त्याला कोणी कसला नवस करत नाही, त्याचा कोणावर कोप होत नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याला कसलंच सोवळंओवळं लागत नाही.
विठोबाचा मूळ, त्याचा इतिहास यावर आजवर प्रचंड लेखन झालेलं आहे. त्यामुळे तो आजचा विषय नाही. पण मूळात हा गोपाळांचा देव आहे अशी अनेकांची समजूत आहे. त्यामुळे हा गोपाळांचा देव त्यांच्यासारखाच मोकळाढाकळा असणार. आज त्याला विष्णूसहस्त्रनामाच्या घोषात तुळशीपत्रांचा अभिषेक केला तरी काही अडचण नसते आणि 'कांदामुळाभाजी अवघी विठाई माझी' म्हटलं तरी काहीच आक्षेप नसतो.
स्वतःला वैष्णव म्हणवणारे कांदामुळा खात नाहीत. पण तरीही संत सावता माळी यांना हा विठोबा असाच दिसतो. त्यांचा अधिकार एवढा मोठा आहे, त्याला प्रतिवाद करण्याची हिंमत साक्षात विठोबालाही नाही. त्यामुळे उगी सोवळ्याओवळ्याच्या गोष्टी विठोबाला हव्यातच, असं काहीही नसतं. त्यामुळे तो जनाईकडे जाऊन उष्टेही खातो, हे विसरायचं नाही.
आज नाही म्हणायला अनेकांनी त्याच्या नावाने अनेक धंदे सुरू केले आहेत. कुणी विठोबाच्या नैवेद्याला हे चालत नाही वगैरे सांगतात. कुणी धोतरच नेसून दर्शनाला जा, वगैरेचे फतवे काढतात. या सगळ्यांना या सगळ्या संतांचे दाखले द्यायचे आणि सांगायचं की, गप गुमान आपल्या वाटेला लागा. तुमच्या या असल्या अनेक फतव्यांना पुरून तो वर्षानुवर्षे उभा आहे आणि आरतीत म्हटल्याप्रमाणे अठ्ठावीस युगे अजून व्हायची आहेत.
पंढरीचा विठोबा देवळात आहे का हो? याचं उत्तर कोणताही सच्चा वारकरी नाही कशाला देईल. आहे की तिथं विटेवर उभा. पण तो तिथं विटेवर उभा आहे, त्यापेक्षा कैकपटीनं अधिक तो चंद्रभागेच्या वाळवंटात आहे. त्यामुळेच अनेक वारकरी उगीच दर्शनबारीत तासंतास वाया घालवत नाहीत, ते चंद्रभागेच्या काठावरून कळसाचं दर्शन घेतात आणि त्यांना विठोबा भेटतोही.
मूळात अपेक्षाच संपल्या की देव भेटतो असं सगळ्या तत्वज्ञानाचं सार आहे. त्यामुळे विठोबाच्या मूर्तीवर डोकं टेकवायलाच पाहिजे किंवा किमान मुखदर्शन तरी व्हायलाच पाहिजे ही अपेक्षाच उरलेली नाही. त्यामुळे दर्शन झालं तरी ठिक, नाही झालं तरी ठिक. जिथे अपेक्षाच संपल्या तिथं देव भेटलाच की. वारकऱ्यांच्या या बिनतोड जवाबाला काउंटर करायची आहे कुणाची हिंमत?
ज्ञानोबा, नामदेवराय, जनाबाई, चोखोबा, नाथबाबा, तुकोबा, शेख महंमद बाबा यांच्यासारख्या किती संतांची नावं घ्यावी, त्यांच्या वाटेवर चालणं म्हणजेच वारकऱ्याची साधना आहे. ही साधना पंढरपूरच्या देवळापेक्षाही अधिक होते ते चंद्रभागेच्या वाळवंटात. जिथे या अभंगांची भजनं होतात आणि संतविचारांची प्रवचनं होतात तिथंच खरा कल्ला होतो. तो कल्ला अनुभवण्यासाठीच तर पंढरीला जायचं असतं.
तुम्ही कुणालाही विचारा. पंढरपूरच्या विठोबासाठी सर्वात मोठा दिवस कोणता? सगळ्यांचं उत्तर असेल आषाढी एकादशी. का? तर त्यादिवशी पंढरपूरात फक्त विठोबा नसतो तर त्यासोबत सगळे संत असतात. महाराष्ट्रातून आणि राज्याबाहेरूनही संताच्या पालख्या पंढरपूरात येतात. या संतांनी मांडलेल्या विचारांचा गजर पंढरपूरातील गल्ल्यागल्ल्यांमधे होत असतो.
या सर्व संताचे विचार आज ज्याला अक्षरओळखही नाही, अशाच्या तोंडी आहेत. ही किमया पंढरपूरच्या विठोबाची आहे. त्याच्या भोवती उभ्या राहिलेल्या या संत परंपरेने शेवटच्या थरातील माणसापर्यंत ज्ञान कसं पोहचवायचं त्याचा सिलॅबस पंढरपूरात तयार केला. त्यामुळेच पंढरपूर हे या संतविचारांचं विद्यापीठ आहे.
जोपर्यंत हा संतविचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दुमदुमत राहील, तोपर्यंत कट्टरतेला प्रेमाचं उत्तर येत राहील. कारण कट्टरता नाकारणारं प्रेम हाच संतविचाराचा पाया आहे. त्यामुळेच कोणत्याही पद्धतीची कट्टरता संतविचारांनी जाणाऱ्या माणासाला मान्य नाही. जर ती मान्य असेल, तो संतविचारांच्या विद्यापीठात पास झालेला विद्यार्थी नाही.
पंढरपूरचा विठोबा आणि पंढरीची वारी आपल्या मुठीत ठेवण्याचा प्रयत्न कट्टरतावाद्यांनी कायमच केलाय. कधीकधी सत्तेचा दुरुपयोग करून त्यांनी विठोबालाही अडकवायचा प्रयत्न त्यांनी केलाय. शेकडो वर्षांचा इतिहास त्याला साक्षी आहे. पण सच्च्या वारकऱ्याला त्या विठोबाच्या मूर्तीपेक्षापेक्षा प्रत्यक्ष संतविचारात नाचणारा विठ्ठल जास्त महत्त्वाचा आहे.
त्यामुळेच चोखोबांसारखे आमचे संत, जातीहीन म्हणून विठोबाच्या देवळात जाऊ न देणाऱ्या कट्टरतावाद्यांना थेट सांगतात की, माझा विठ्ठल देवळात नाही, तर ‘नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग'. तुम्ही तिथल्या नैवेद्याच्या ताटावरची दक्षिणा उचला किंवा रखुमाईच्या साड्यांचा लिलाव करा. माझी विठोबारखुमाई महाराच्या घरी जेऊनही गेली.
कोणत्याही पद्धतीने अतिरेकीपण न करता केलेलं हे बंड आहे. छोटी रेषा पुसण्यापेक्षा स्वतःची रेषा मोठी करण्याचं हे प्रॅक्टिकल आहे. त्यामुळेच विठोबाच्या मूर्तीवर हारफुलं घालण्यापेक्षा 'एक तरी ओवी अनुभवावी' हा माऊलींचा संदेश हाच खरा प्रसाद आहे. वाईट विचार करणाऱ्याला नको तर तर त्याच्या ‘दुरितांचे तिमिर जावो' असं पसायदान मागणाऱ्या माऊलींचा वारकरी कट्टर कसा असू शकेल?
पंढरपूरचा ज्ञात इतिहास हा सातशे-आठशे वर्षांचा आहे. या इतिहासात जशी जातीअंताची लढाई लढणाऱ्या चोखोबासारखी उदाहरणं सापडतात, तशीच एकल महिला असलेल्या जनाबाईंना विठोबाला घातलेल्या शिव्याही साक्षी आहेत. या सगळ्या शिव्या विठोबाला खाव्या लागल्या कारण इथली व्यवस्था तेव्हा या कट्टरतावाद्यांनी आपल्या हातात ठेवली होती.
पंढरपूरात कायमच कट्टरता आणि समता एकत्रच नांदलेली आहे. जसा मध्ययुगात चोखोबांनी आणि जनाईनं केलेला संघर्ष पंढरपूरानं अनुभवलाय, तसाच संघर्ष आधुनिक काळात इथली पुरोहित व्यवस्था आणि साने गुरुजींमधेही झालाय. इथल्या तनपुरे मठात साने गुरुजी मंदिरप्रवेशासाठी सत्याग्रह धरत होते, तेव्हा विठोबाचं तेज घागरीत उतरवण्याचा कार्यक्रमही याच पंढरपूरानं पाहिलाय.
विठोबाचे पुजारी म्हणवणाऱ्यांचे नकोनको ते संघर्षही याच पंढरपूरानं पाहिलेत आणि गाडगेबाबांच्या धर्मशाळेत सर्वांनी एकोप्य़ानं केलेला देवकीनंदन गोपालाचा गजरही याच पंढरपूरानं ऐकलाय. त्यामुळे कट्टरता आणि समता यांच्यात युगानयुगे चालणारी ही स्पर्धा पंढरपूरात सतत होत आलीय. यापुढेही होत राहील. पण अंती विजय सत्याचा आणि प्रेमाचाच होतो, हे कुणी विसरू नये.
पंढरीच्या गर्दीत सगळेच असतात. त्यातील काहींना विठोबा खरंच हवा असतो तर काहींना त्याच्या नावे धंदा करायचा असतो. हे असे पोटभरू गेली कित्येक वर्षे पंढरपूरात आणि सर्वच देवस्थानामधे ठाण मांडून आहेत. खरा वारकरी त्यापासून लांबच राहतो. पण ज्याला अद्याप कळत नाही, त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न संतांनी सोप्या भाषेत केला आहे. ते सातत्याने समून घ्यायला हवं.
खरा वारकरी तोच, जो आपल्या जगण्यावागण्यात जात, धर्म, पंथ अशी कोणत्याही प्रकारची कट्टरता मान्य करत नाही. त्यामुळे आज पेटवली जाणारी हिंदूमुस्लिम, जातीपातींची भांडणं विठोबाच्या दारात संपायला हवीत. विठोबा हा जसा एकनाथांचा आहे, तसाच शेख महंमदांचाही आहे. तो जसा सोयराबाईचा आहे तसाच तो कबीराचाही आहे.
संतविचार वेगळे करून विठोबा, हा विठोबाच उरत नाही. त्यामुळे संतविचारांचा अभ्यास करणं म्हणजेच विठोबा समजून घेणं आहे. हा संतविचारांचा अभ्यास आपल्याला सतत करत राहायचा आहे. त्यासाठी मोठमोठी पुस्तकं वाचली तर उत्तम. पण वाचायलाच हवीत असेही काही नाही. आज संतांच्या जगभरातील गायकांनी गायलेल्या हजारो रचना युट्यूब, स्पॉटिफायसह सगळीकडे उपलब्ध आहेत. त्या समजून घेतल्या तरी संत कळतील, विठोबा भेटेल.
तुम्हाला सुटी असेल तर एक दिवस वारी केलीत आणि इन्स्टाग्रामवर स्टेटस ठेवलंत तर उत्तमच आहे. पण त्याही पेक्षा 'बुडती हे जन पाहवे न डोळा' म्हणणाऱ्या संताच्या विचारांचा थोडा तरी सराव आपल्या जगण्यात झाला, तर खरा वारकरी कसा कट्टरतेच्या पासंगलाही पुरत नाही ते स्पष्टपणे कळेल. संताचे विचार कळले की कळून चुकते की, हे असे कितीही कट्टरतावादी आले आणि गेले तरीही त्या पंढरीच्या काळ्याची जादू त्यांना कधीच साध्य होणार नाही.