सोन्याचांदीहून महाग असते व्हेल माशाची उलटी

११ फेब्रुवारी २०२३

वाचन वेळ : ५ मिनिटं


सोनं साधारण ५८ लाख रुपये किलो, चांदी साधारण ७० हजार रुपये किलो. पण व्हेल माशाच्या उलटीचा दर आहे साधारण एका किलोला तब्बल एक कोटी रुपये. हे वाचून कितीही विचित्र वाटत असलं तरी हे खरंय. अशी जवळपास १८.६ किलो वजनाच्या व्हेलच्या उलटीची तस्करी नुकतीच मालवणात पकडली गेलीय.

कोकणात सध्या व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीची प्रकरणं वाढू लागलीत. तुफान समुद्रातून ही उलटी शोधून आणायची, ती ओळखायची, ती लपवून ठेवायची आणि ती योग्य ठिकाणी पोचवायची हे सगळंच जोखमीचं काम आहे. पण तरीही झटपट श्रीमंत करणाऱ्या या धंद्यात आज अनेकजण आहेत. नुकतीच मालवणमधल्या तळाशीय इथं वाळूमधे लपवून ठेवलेली तब्बल १८.६०० किलो वजनाची व्हेल माशाची उलटी पोलिसांनी जप्त केली.

व्हेल माशाच्या या उलटीला अम्बरग्रीस असंही म्हटलं जातं. ही उलटी मौल्यवान असल्यानं तिला जगभरात तुफान मागणी आहे. अत्तर आणि औषधनिर्मिती क्षेत्रात ही उटली खूप दूर्मीळ अशी मानली जाते. विशेषतः सेक्ससंबधीच्या समस्यांसाठी बनवल्या जाणाऱ्या औषधात हिचा वापर होत असल्यानं तिला करोडोंची किंमत मिळते.

नक्की कशी मिळते ही उलटी

आपण अन्न खातो ते पचतं. जे पचत नाही, तेव्हा त्याची उटली होते. तसंच व्हेल मासा समुद्रात अनेक प्रकारचं अन्न खातो. काहीवेळा त्याला एखाद्या प्रकारचं अन्न पचत नाही, तेव्हा तो उलटी करतो. त्यालाच अम्बरग्रीस म्हटलं जातं. व्हेलच्या आतड्यांमधून अम्बरग्रीस बाहेर पडतं.  समुद्राच्या खाऱ्या पाण्यामुळे आणि सूर्यकिरणांमुळे व्हेलची उलटी चिकट बनते. ती मेणासारखी दिसते.

या उलटीचं वजन १५ ग्रॅमपासून १०० किलोपर्यंत असू शकतं. व्हेलच्या आतड्यातून बाहेर पडणाऱ्या या उलटीला गोडसर वास येतो. या उलटीचा वापर परफ्युम तयार करताना होतो. तसंच सुगंधित धूप आणि अगरबत्तीमधेही होतो. अम्बरग्रिसचा तुकडा सोबत ठेवल्यास प्लेग रोखण्यात मदत होते, अशीही एक युरोपियन मान्यता होती.

औषधांमधेही व्हेलच्या माशाचा उलटीचा वापर केला जातो. सेक्सशी संबंधित आजारांवरच्या उपचारांतही वापर करण्यात येतो. खरं तर त्यामुळेच व्हेलच्या उलटीला बाजारात कोटींचा भाव मिळतो. व्हेल मासे समुद्र किनाऱ्यांपासून फार लांब असतात. त्यामुळे त्यांची उलटी किनाऱ्यांवर येण्यासाठी बराच कालावधी लागतो. व्हेल माशाच्या उलटीला असलेली किंमत खूप असल्यानं तिला 'तरंगतं सोनं' असंही म्हटलं जातं.

हेही वाचा: शुद्ध हवेसाठी, हॅशटॅग ‘शुद्ध हवा हक हमारा’ कॅम्पेन

हे सोनं सापडलं तरी 'महाग' पडू शकतं

भारतात इतर किनारपट्टीप्रमाणे कोकण किनारपट्टीवर काही काळापासून व्हेल मासा आढळत आहे. व्हेल माशामधे दात नसलेले आणि दात असलेले अशा दोन प्रकारच्या प्रजाती आहेत. उलटी उपयुक्त असलेला ‘स्पर्म व्हेल’ हा दात असलेल्या प्रजातीतला आहे. साधारणत: व्हेल हा समुद्र किनार्‍यापासून खूप दूर असतो. उलटीसारखा हा भाग किनार्‍यावर येण्यासाठी एका वर्षाचा कालावधी लागतो.

व्हेल प्रजातीचे अनेक मासे समुद्रात आढळत असले तरीही ‘स्पर्म व्हेल' या प्रजातीच्या व्हेल माशाच्या उलटीलाच किंमत मिळते. या उलटीपासून बनवलेल्या परफ्युमचा वास दीर्घकाळ दरवळत राहतो. तसाच त्याचा कोणताही साइड इफेक्टही होत नाही. अत्तरात उलटीचा वापर हा स्थिरीकरण द्रव्य म्हणजे फिक्सेटीव म्हणून वापरलं जातं. हे परफ्युम कपड्यावर किंवा शरीरावर मारल्यानंतर ते बराच काळ टिकावं यासाठी हे फिक्सेटीव उपयुक्त असतं.

ही उलटी सापडावी अशी अनेकांची इच्छा असते. पण भारतात ही इच्छा पूर्ण झाली तरी त्याचा काहीच फायदा नाही. कारण स्पर्म व्हेल मासा हा भारतात नष्ट होणाऱ्या चित्ता, माळढोक या प्राण्यापैकी एक आहे. त्यामुळे खोल समुद्रात सापडणारा ‘स्पर्म’ व्हेल हा संरक्षित जीव आहे. या माशाची हत्या करणं आणि त्यासंदर्भात कोणत्याही घटकाची विक्री करणं हा वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार दंडनीय गुन्हा आहे. त्यामुळे भारतात या उलटीचा साठा करणं, विक्री करणं हा दंडनीय गुन्हा आहे.

उलटी ओळखणंही अवघड आहे

स्पर्म व्हेलच्या शरीरातून निघणारा हा पदार्थ काळ्या रंगाचा असतो. हा पदार्थ ज्वलनशील असतो. त्यामुळे तो साठवतानाही जपून साठवावा लागतो. कोकणात नुकतीच पकडलेली ही उलटी मोठ्या प्रमाणात वाळूखाली लपवून ठेवली होती. तिथं आगीचा संपर्क आला असता तर, मोठी दुर्घटनाही घडू शकली असती, असं काहींचं म्हणणं आहे.

व्हेलचं आवडतं खाद्य म्हणजे, म्हाकुळ हा मासा. म्हाकुळचा तोंडाचा भाग पोपटाच्या चोचीसारखा असतो. तो पचन नाही. तसंच व्हेल कोळंबी खातो. ज्याचा भाग कडक असल्यामुळे तो पचत नाही. न पचलेला भाग व्हेल उलटून टाकतो. त्यात विविध प्रकारची रसायनंही असतात. उलटी लाटांवर तरगंत राहिल्यामुळे आपसूक त्यावर प्रक्रिया होते आणि ती मेणासारखी बनते. समुद्राच्या लाटांबरोबर ती तरंगत किनार्‍याला लागते.

स्पर्म व्हेलच्या उलटी ओळखण्यासाठी काही प्राथमिक गोष्टी सांगितल्या जातात. उलटीतल्या न पचलेल्या भागात म्हाकुळच्या दातासारखे किंवा कडक कवचासारखे भाग आढळतात. गरम सुई उलटीच्या गोळ्यात खुपसली तर तो वितळतो आणि त्यातून काळा धूर येतो. त्याचा रंग काळपट असतो. तसंच काहीवेळा जहाजाचं तेल किंवा त्यातल्या बाहेर टाकलेल्या घटकांचा गोळाही तयार होतो. त्यामुळे उलटी म्हणून सापडलेला मेणासारखा गोळा जहाजाचं तेल असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा: ‘संवर्धन राखीव वनक्षेत्र’ सगळ्यांसाठी फायद्याची का ठरतात?

या उलटीची तस्करी वाढतेय

तळाशील इथं सापडलेला तो पदार्थ व्हेल माशाची उलटी आहे का हे तपासण्यासाठी वाइल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असल्याचं वन विभागाकडून सांगण्यात आलं. या चाचणीमधे सापडलेले तुकडे व्हेल मासा उलटी आहे की नाहीत याचीही याद्वारे तपासणी होणार आहे.

दरम्यान बुधवारी सांगली इथं पावणे सहा कोटी रुपये किंमतीची व्हेलची उलटी पोलिसांनी जप्त केली असून या कारवाईत सिंधुदुर्गातल्या एकाला अटक करण्यात आली आहे. बर्‍याचदा व्हेलच्या उलटीची तस्करी करणारे सांगली, पुणे, नाशिक या भागात सापडून आल्याची मागच्या दोन वर्षात अनेक प्रकरणं समोर आली आहेत. या तस्करीचं किनारपट्टीवरचं कनेक्शन अद्यापही समोर आलेलं नाही.

गेल्या काही वर्षात ही प्रकरणं वाढली असून, डिसेंबर २०२२ मधे पुण्यात पाच किलो उलटी पकडण्यात आली होती. तसंच जुलै २०२१ मधे रायगडमधल्या लोणेरेत इथं व्हेलची उलटी घेऊन जाणार्‍या दापोलीतल्या एकाला पोलिसांनी अटक केली. या सगळ्या प्रकरणांमुळे या उलटीच्या तस्करीची प्रकरणं वाढतायत, एवढं स्पष्ट होतं आहे. ही उलटी ओळखता यावी यासाठी काही जणांनी कुत्र्यांना विशेष प्रशिक्षण दिलं आहे.

एका किलो उलटीला एक कोटी

या उलटीची नक्की किंमत किती याची माहिती कोणाकडेच नाही. भारतात ही उलटी विकणं कायद्यानं गुन्हा असल्यानं त्याचा भाव कळणं अवघड आहे. तसंच ही उलटी कुठे आणि कशी विकली जाते, याबद्दलही जाहीरपणे कोणीच काही सांगत नाही. तरीही तस्करीच्या बाजारात या उलटीची किंमत एका किलोला एक कोटी रुपयाच्या आसपास आहे, असं सांगितलं जातं.

आता ही उलटी शोधण्यासाठी देशातल्या किनारपट्टीवर अनेकजण कार्यरत आहेत. पण त्यातल्या काहींची टिप पोचते आणि त्यांना अटक होते. त्याच्या बातम्या होतात. पण हा धंदा बेकायदेशीपणे सुरूच आहे, असं आजवर सापडलेल्या अनेक उदाहरणांवरून तरी दिसतं.

हा धंदा आजचा नाही. इतिहासातही याचे काही दाखले सापडतात. अगदी इजिप्तमधे प्राचीन काळापासून अम्बरग्रीसचा वापर होतोय. काही देशांमधे त्याचा वापर हा कायद्यानेही मंजूर आहे. आता भारतात नाही, हे जरी सत्य असलं तरी एका फटक्यात कोट्यवधी देणारा हा धंदा भल्याभल्यांना मोहात पाडू शकेल, याबद्दल शंका नाही.

हेही वाचा: 

अमेझॉनचं जंगल कसं आहे? आणि तिथले आदिवासी कसे राहतात?

पाऊस तर जगभर पडतो, पण भारतातला मान्सून जगावेगळा आहे!

नव्या वर्षात यूएनने ‘झाडं जगवा, जीव वाचवा’ असा नारा का दिलाय?

आरेतल्या वृक्षतोडीचा झाडं लावून निषेध करणाऱ्या चिंचणीची भन्नाट गोष्ट!