व्यंकटेश माडगूळकर :  लिहिणं कमी, सांगणं जास्त

०६ जुलै २०२१

वाचन वेळ : ८ मिनिटं


आज ६ जुलै. व्यंकटेश माडगूळकर यांचा जन्मदिवस. २०-२२ वर्षांचे असतानाच नियतकालिकात प्रसिद्ध होणाऱ्या व्यक्तिचरित्रातून त्यांनी वाचकांचं लक्षं वेधून घेतलं. स्वातंत्र्यपूर्व काळातल्या मराठी लेखकांच्या पिढ्यांनी दिल्या त्यापेक्षा त्यांच्या कथा कितीतरी वेगळ्या होत्या. त्यांच्या संपूर्ण साहित्यातच कथेचं प्राबल्य आहे. या कथा पाच प्रकारात समाविष्ट करता येऊ शकतात.

मराठीत नवकथा सुरू करणाऱ्या आघाडीच्या लेखकांपैकी एक म्हणजे व्यंकटेश माडगूळकर. त्याचं ‘माणदेशी माणसं’ हे पुस्तक १९४९ मधे प्रकाशित झालं. त्याआधी त्यातली व्यक्तिचित्रं नियतकालिकात प्रसिद्ध झाली होती. ‘माणदेशी’ मधली ही माणसं एकामागून एक प्रसिद्ध होऊ लागली, तेव्हा तमाम मराठी वाचकांचं लक्ष त्यांनी वेधून घेतलं.

व्यंकटेश माडगूळकर तेव्हा २०-२२ वर्षांचे होते. माणदेशी मातीचा अस्सल गाभा घेऊन, तिचा गंध घेऊन ही व्यक्तिचित्रं वाचकांना भेटली. स्वातंत्र्यपूर्व काळातल्या मराठी लेखकांच्या पिढ्यांनी दिल्या त्यापेक्षा या कथा कितीतरी वेगळ्या होत्या. 

व्यक्तिचित्रं किंवा माडगूळकरांच्या भाषेत ही शब्दचित्रं असली, तरी त्यांचा आकृतीबंध हा कथेचा आहे. व्यक्तीच्या वाढदिवशी किंवा श्रद्धांजलीला जसे परिचय पेपरमधे छापून येतात, तसलं हे प्रासंगिक लेखन नव्हतं. ही व्यक्तिचित्रं माणदेशी माणसांच्या सगळ्या अस्सल वैशिष्टयांसह जिवंत होऊन येतात. यातलं एकही व्यक्तिचित्र सुटं किंवा एकटं नाही. त्या व्यक्तीबरोबर तिचा सगळा गोतावळा येतो, परिसर येतो, समाज येतो. दगड, माती, गवताच्या पातीही येतात.

हेही वाचा : गाथासप्तशती: प्रत्येक घरात असावा असा मराठीतला आद्यग्रंथ

कथात्म लेखन

प्रवासवर्णन वगळता व्यंकटेश माडगूळकर यांचं समग्र साहित्य हे कथात्मक स्वरूपाचं आहे. त्यांच्या गावाकडच्या कथा तर आहेतच. पण व्यक्तिचित्रं, कादंबरी, ललित लेख, जंगलांची वर्णनं या सगळ्यातही कथा आहे. माडगूळकरांनी तारुण्यात कविताही लिहिल्या होत्या. पण मोठे भाऊ ग. दि. माडगूळकर यांचा वारसा चालवणं वगैरे गोष्टींच्या भरीस न पडता स्वतःची पाऊलवाट चोखाळली. 

त्यांचं लेखन हे लिहिणं कमी आणि सांगणं जास्त. गावातल्या पिंपळाच्या पारावर बसून ऐकणाऱ्या लोकांना रंगवून गोष्टी सांगणारा एखादा शहाणा वृद्ध माणूस असतो. त्याप्रमाणे माडगूळकर मस्त रंगवत कथा सांगत असतात. म्हणून त्यांचं कोणतंही लेखन वाचताना वाचक तल्लीन होऊन जातो. कथन करणं हे कथा या वाङ्मयप्रकाराचं वैशिष्ट्य आहे. हे वैशिष्ट्य माडगूळकर यांच्या एकूणच लेखनात पानोपानी आढळून येतं.

चित्रकार आणि कथनकाराची अभिव्यक्ती

‘माणदेशी माणसं’ या पुस्तकाव्यतिरिक्त व्यंकटेश माडगूळकरांच्या इतर कथासंग्रहामधे अनेक व्यक्तिचित्रं विखुरलीयत. ‘माणदेशी माणसं’ प्रकाशित झाल्यानंतर ती व्यक्तिचित्रं लिहिली गेलीयत. चित्रांच्या सोबतीनं कथन करणं हे चित्रकथकाचं कौशल्य माडगूळकरांच्यात ‘माणदेशी माणसं’मधल्या पहिल्या व्यक्तिचित्रापासूनच उमटलेले दिसते. ही शब्दांनी रंगवलेली चित्रं आहेत.

उदाहरणार्थ कोंडीबा गायकवाड. त्याचं वर्णन पहा. ‘तो आपल्या घराच्या जात्यावर बसून तुटलेला आसूड नीट करीत होता. उघडाच. आपली काळी कातडी उन्हात तापवीत बसला होता. एकाद्या भाजलेल्या रेड्यासारखा. सांध्यात गाठाळालेल्या जाड बोटांनी आसूड नीट करताना त्याच्या दंडावरच्या बेडक्या मागेपुढे हलत होत्या. गळ्यात पेटी, रुंद छाताडावर केसांचं जाळं. पिंडर्‍यांचे गोळेही तसेच, वरवंट्यासारखे कठीण. कोंडीबा अंगापिंडानं भलताच थोराड, उग्र.’

या वर्णनातील ‘भाजलेला रेडा,’ ‘दंडावरच्या बेडकुळ्या,’ ‘रुंद छाताडावर केसांचं जाळं’ अशा शब्दप्रयोगातून कोंडीबा गायकवाडचं नेमकं चित्र डोळ्यांपुढे उभं राहतं. या चित्रनिर्मितीत  कथनही आहे आणि चित्रनिर्मितीही आहे. माडगूळकर हे चित्रकारही होते. त्यांच्यातला चित्रकार आणि कथाकथनकार हे दोघंही त्यांच्या लेखनात अभिव्यक्त होतात.

हेही वाचा : पुस्तक माणसाला कसं घडवतं?

कातकऱ्यांचा नायक गोविंदा

‘ओझं’ या कथासंग्रहातलं एक व्यक्तिचित्र पहा. हा आहे ‘गोविंदा कातकरी.’ तो जंगलात राहणार्‍या कातकरी जमातीतला आहे. गोविंदा कातकर्‍याला उठाव देणारं दुसरं एक पात्र आहे ते म्हणजे ‘भाऊसाहेब चव्हाण’. यांना शहरात राहून शिकारीची हौस. त्यांचा शिकारीतला हुकमी एक्का म्हणजे गोविंदा.

गोविंदा हा कातकर्‍यांचा नायक आहे. त्याचं चित्र रेखाटताना मांडगूळकर लिहितात, ‘माणसाच्या जीवनात शिकारीपरते आणखी काही जरुरीचे, महत्त्वाचे असते यावर गोविंदाचा विश्‍वास नाही,’ या एका ओळीत ते गोविंदाचं जीवन उभं करतात.

गोविंदाच्या व्यक्तिमत्त्वाचं वर्णन ते करतात. ‘सारा जन्म जंगलात काढलेल्या गोविंदापाशी वाघाची नजर आहे, पिसोर्‍याची चपळाई आहे आणि डुकराचे बळ आहे. जंगलात, सावजाच्या मागावर फिरताना तर च्या अनवाणी पायाखाली कधी पाचोळा वाजत नाही, का दगड ठोकरला जात नाही. धक्का लागून झाडांच्या फांद्या हलत नाहीत का अभावितपणे घशातून आवाज निघत नाही. सावली जावी, तसा गोविंदा जंगलातून जातो... त्याची सारी हुशारी सारे कसब त्यापाशी आहे, क्रौर्य तेवढे नाही, माणसावर झडप घालणे तेवढे नाही!’

व्यक्तिचित्रांची भाषा

गोविंदा कातकरी जंगलात वावरतो. त्याचं वर्णन ते नेमकेपणाने करतात. त्यांच्या बारीकसारीक तपशिलासह त्याचं चित्र रेखाटतात. बहिरंग आणि अंतरंग या दोन्हींचा वेध माडगूळकर एकाच वेळी करतात आणि त्याचवेळी त्या व्यक्तीचा परिसरही ते चैतन्यमय करतात.

व्यक्तिचित्रांची भाषा कशी आहे? तर त्या व्यक्तिचित्राची जी असते तशीच आहे. ना. सी. फडके यांनी काही ग्रामीण कथा लिहिण्याचा प्रयत्न केलाय. ग्रामीण कथा आणि फडके यांचा काहीही संबंध नाही. ग्रामीण भागातली लोक कशा प्रकारची भाषा बोलत असतील, याची कल्पना करून फडके संवाद लिहितात.  ते साहजिकच हास्यास्पद ठरतात. याउलट ज्या मातीमधून माडगूळकरांची पात्रं जन्म घेतात त्या मातीतली बोली ती स्वाभाविकपणे बोलतात. या बोलीचं सूक्ष्मातिसूक्ष्म स्तरही दर्शवतात.

रामा मैलकुली म्हणतो, ‘आपलं करम दादा! ती होती सांगलीच्या बाजूची. रूपानं दहा जनीत उठून दिसावी अशी. माज्या खोपटात कसं र्‍हावं तिनं? मी ह्यो असा येडाबागडा माणूस. संसारही आपला नाचते नाचरगती. तेल हाय तर मीठ नाही, मीठ हाय तर मिरची नाही, असं सदुनिक...’ 

बिटाकाका म्हणतो, ‘घे रे, बग पिठले कसे केले आहे फर्मास श्रीखंडासारखे’.

हेही वाचा : वाचकानं सजगपणे वाचन संस्कृती कशी घडवावी?

पात्राच्या गाभ्याला स्पर्श

व्यक्तिचित्रं म्हणजे त्या एकट्या व्यक्तीचं शब्दचित्र नसतं याचं भान व्यंकटेश माडगूळकर बाळगतात. त्यांची जडणघडण झाली, तो परिसरही ते मांडतात. बाबाखान दरवेशी, गोविंदा कातकरी, बिटाकाका, रामा मैलकुली, कोंडीबा गायकवाड हे सगळेजण वेगवेगळ्या जातीचे आहेत. त्यांची सामाजिक पार्श्‍वभूमी एकच असली तरी प्रत्येकाची कौटुंबिक परिस्थिती वेगवेगळी आहे.

एका बाजूला पार वाकून गेलेला ब्राह्मण बिटाकाका आहे. तर दुसर्‍या बाजूला तुरुंगात जातानाही ज्याची गुर्मी उतरलेली नाही, असा कोंडीबा गायकवाड आहे. त्या त्या प्रत्येकाचं खास वेगळेपण माडगूळकरांनी टिपलंय. प्रत्येकाच्या अस्सल गाभ्याला स्पर्श केलाय. प्रत्येकाच्या भाषेची लकब अचूकपणे पकडलीय.

या कथांमधून समूहाचंही चित्रण आहे.  गावातल्या प्रथा, परंपरा, रूढी, जत्रा- यात्रा, या सार्‍यांचं प्रतिबिंब गावाकडच्या कथांमधे पडतं. गावाकडच्या चालीरिती आणि भानगडी, व्यभिचार याचंही वर्णन माडगूळकर करतात. अलुतेदार बलुतेदार आणि गावातले उच्चवर्णीय ब्राह्मण मराठा यांच्यातले अनुबंध, त्यांच्यातला संघर्ष हेही येतं. माणदेशाचा पाचवीला पुजलेला दुष्काळ हाही एक पात्र म्हणूनच या कथांमधे वावरतो. दुष्काळी परिस्थितीत हलाखीचं जीणं जगणारा भूमीपुत्र या कथांमधून भेटत राहतो.

शेत जमिनीची अवकळा

‘आमचा पाव’ ही कथा नुसत्या माणसांची नाही, तर एका शेत जमिनीचीही आहे. या शेताला ‘पाव’ असं नाव का पडलं असावं याची चर्चा करत लेखक आपल्याला या शेतात घेऊन जातो. यात मूळ मालक आणि कुळं यांचे संबंध, पाखरांची अंडी गोळा करणारी पोरं, रानभाज्या, रामोशांच्या पोरांचा डोळा असलेली पाखरं, विविध प्रकारची पिकं, विहिरीची खुदाई, लागलेलं पाणी असे सगळे तपशील येतात. नंतर जमिनीला आलेल्या अवकाळीचे वर्णन लेखकाने जे केलेली आहे ते वाचून वाचकही खिन्न होतो.

माडगूळकर यांच्यातला संवेदनशील लेखक या आणि यासारख्या वर्णनातून प्रकर्षाने दिसतो. माणसाप्रमाणे आणि कुटुंबाप्रमाणे एखाद्या शेत जमिनीलाही कशी अवकळा येते याचं हे प्रभावी चित्रण आहे.

हेही वाचा : पाचवीला पुजलेल्या प्लेग लॉकडाऊनमुळेच जगाला शेक्सपिअर मिळाला!

दलित जीवनाचं निरीक्षण

गावातल्या कथांशी निगडित असलेला एक महत्त्वाचा भाग म्हणजे गावकुसाबाहेरील लोकांच्या जगण्याची कथा. महार, मांग, ढोर, चांभार अशा गावकुसाबाहेरच्या दलित-शोषितांच्या कथा माडगूळकरांनी त्यांच्या जीवनाशी तादात्म्यता पावून लिहिल्यात. व्यंकटेश माडगूळकरांचा जन्म ब्राह्मण कुटुंबात झालेला पण सगळं लहानपण म्हारा-पोरांच्या सहवासात गेलं. 

त्यांनी लहानपासून दलितांचं आयुष्य पाहिलं होतं. अर्थात एक गोष्ट खरी, स्वतः दलित कुटुंबात जन्म घेऊन त्या दाहक अनुभवांचे चटके सोसून लिहिलेल्या साहित्याच्या श्रेणीत माडगूळकरांच्या कथा बसवता येणार नाहीत. पण, माडगूळकरांनी सह-अनुभूतीने शोषित दलित वर्गाची दुःखं समजावून घेण्याचा आणि मांडण्याचा जो प्रयत्न केला आहे, तो निश्‍चितच प्रामाणिक आहे.

वस्तुतः व्यक्तिचित्रांमधे समाविष्ट झालेली ‘देवा सटवा महार’ ही कथा दलित जीवनकथा आहे. देवा सटवा महार नावाचा एक सज्जन महार बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या स्वाभिमानाच्या स्फूर्तीने जागा होतो. आपल्याला विनाकारण शिव्या देणार्‍या डॉक्टरला उलट बोलतो. पण त्याला न्याय मिळत नाही. तुरुंगवास होतो; ही दलितांची होरपळ माडगूळकरांनी प्रभावीपणे व्यक्त केलेली आहे. दलितेतर लेखक असूनही सह-अनुभूतीने त्यांनी दलितांच्या वेदना मांडल्यात.

लालित्यपूर्ण जंगलकथा

जंगलविषयक लेखन हे व्यंकटेश माडगूळकरांचं महत्त्वाचं वैशिष्ट्य. बालपणापासून त्यांना रानावनात फिरण्याचा नाद होता. गावातल्या मुसलमान तसंच इतर जातींच्या मुलांबरोबर ओढ्याच्या काठाला, रानोमाळ भटकून पक्ष्यांची अंडी गोळा करणं इत्यादींचा मोठा नाद त्यांना होता. या रानाच्या शाळेत ते अनेक गोष्टी शिकले. मोठेपणी त्यांचा हा नाद वाढत गेला. ते स्वतः बंदूक बाळगू लागले, शिकार करू लागले. त्यातून त्यांच्या जंगलविषयक लेखनाचं पोषण झालं.

जंगलाचा सांगोपांग अभ्यास करून त्यावर लेखन करणार्‍या मारुती चितमपल्ली, सुरेशचंद्र वारघडे, अतुल धामनकर, कृष्णमेघ कुंटे यांच्या लेखनात वैज्ञानिक माहिती मिळते आणि लालित्यही मिळतं. पण, माडगूळकरांनी पाहिलेलं, अनुभवलेलं जंगल कथा होऊन येतं. जंगल, जंगलातले प्राणी, जंगलातली माणसं, शिकारी, फासेपारधी हे माडगूळकरांच्या लेखनात आपल्याला भेटतात. जंगल हाच त्यांच्या कथांचा नायक असतो.

या कथापंचकात माडगूळकरांच्या ‘सत्तांतर’ या कादंबरीतला एका प्रसंगाचा तुकडा घेतलेला आहे. या कादंबरीत एक सत्तांतर आहे. वानराच्या टोळ्यांचं. अर्थातच रूढ अर्थाने ज्याला संवाद असं म्हटलं जातं, ते नाहीय. पण या कादंबरीत जंगल बोलतं, वानरं बोलतात. संवादाची उणीव जाणवत नाही. या कथानकातल्या वानरांची वैशिष्ट्यं लक्षात घेऊन माडगूळकरांनी त्यांना नावं दिली आहेत. मुडा, थोटी, लेकुरवाळी, मोगा अशी.

‘नवेगाव बांध : पाऊलखुणा’ या लेखातही ‘कथा’आहे. यात विविध प्राणी, पक्षी, मासे, किटक त्यांच्या सहजीवनाचा शोध घेण्यात आलाय. तनमोर, चकोतक्षर्‍या, रानकोंबडे, गवे, तरस, मासे, हुदाळे, तनसांबर असे विविध जीव त्यांच्या वैशिष्ट्यांसह या कथेत आपल्याला भेटतात. शिकार न साधल्याच्या आपल्या फजितीबद्दल माडगूळकर लिहितात, ‘एका नवशिक्या पोराची फजिती बघून तो कोंबडा पोट धरधरून हसला असेल.’ 

हेही वाचा : ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ने मराठी कादंबरीला साचलेपणातून बाहेर काढलं

माडगुळकरी शब्दकळा

दोन गव्यांची शक्ती आजमावण्याची रीत माडगूळकरांनी सांगितलीय. दोन अनोळखी गवे समोरासमोर येतात तेव्हा वर्चस्व सिद्ध करण्यासाठी मारामारी करत नाहीत. एक गवा बॉडी बिल्डरसारखा आपल्या ताकदीचं प्रदर्शन करतो. दुसरा गवा त्याला गोल फिरून न्याहाळतो. त्याला त्याची ताकद जास्त आहे असं वाटलं, तर तो नमते घेऊन चालता होतो. 

हा गवा निघून जाताना नेमका काय विचार करत दूर जाईल, असा अंदाज करुन माडगूळकर लिहितात, ‘शेवटी दोघांपैकी एक जण ‘बरं बाबा, तू मोठ्या बापाचा’, असं म्हणून लहानपण पत्करून चालता होतो. प्राण्यांची भाषा वेगळी असली तरी त्यांचा भावना माणसांपेक्षा वेगळ्या नसतात, हे माडगूळकर सहजी सूचित करतात. 

ही शब्दकळा खास माडगुळकरी म्हणता येईल. ते ज्या जंगलात भटकून आले, त्या जंगलातली जैवविविधता त्यातल्या बारकाव्यांनिशी ते व्यक्त करतात. या सर्वांसह कथा जितीजागती होऊन उभी जाते.

माणसाच्या भाषेत प्राण्यांच्या भावना

जंगलामधे आढळणार्‍या प्राण्यांप्रमाणेच गावातल्या प्राण्यांविषयी सुद्धा माडगूळकर यांना आस्था वाटते. या प्राण्यांच्या भावभावना जाणून, त्यांना कथेचं ‘नायकत्व’ बहाल करून ज्या कथा माडगूळकरांनी लिहिल्या, तो एका स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. प्राण्यांना स्वतःचं असं एक आयुष्य लाभलं असतं. ते त्यांना जगायचं असतं. पण त्यांच्याही आयुष्यावर माणूस ताबा मिळवतो, त्यांना हतबल करून टाकतो.

माणसाची घुसमट होते, तशी प्राण्यांचीही होते. पण माणूस त्यांच्या जगण्याची दखल घेत नाही. घुसमटीची तर मुळीच घेत नाही. या प्राण्यांना मानवी भाषा बोलता येत नसली तरी त्यांना ती समजते आणि त्यांना सगळ्या भावना व्यक्त करायला त्यांची स्वतःची भाषा असते. ही भाषा आणि त्या प्राण्यांच्या भावभावना जाणून घेऊन माडगूळकर कथा लिहितात.

एकूण, मराठीतील थोर लेखक व्यंकटेश माडगूळकर यांच्या कथात्म साहित्याचं अवलोकन करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांच्या साहित्यात कथेचं प्राबल्य आहे आणि या कथा पाच प्रकारात समाविष्ट होतात, एवढंच सांगायचंय.

हेही वाचा : 

आगळ ही कादंबरी गाव आणि शहर यांच्यातला संवादसेतू

युगानुयुगे तूच : महामानवाच्या जीवनाचा ठाव घेणारी दीर्घकविता

एक शून्य प्रतिक्रियाः जगणं आणि लिहिण्यातल्या शून्य अंतराची कविता

स्लामविषयी साध्यासोप्या मराठीत ए टू झेड माहिती देणारं पुस्तक बाजारात