महिला दिन विशेष: महिलांचं महायुद्ध जगण्याशीच

०८ मार्च २०२२

वाचन वेळ : ७ मिनिटं


रशियाच्या युक्रेनवरच्या हल्ल्यामुळे सगळ्यात जास्त झळ पोचलीय ती महिलांना. युक्रेनियन सरकारने पुरुषांना देश सोडण्याची परवानगी दिलेली नाही. हजारो महिला आणि मुलं शेजारी देशांमधे आसरा शोधण्यासाठी गेलेत. युद्धस्थितीत स्त्रियांवर अत्याचार केले जातात. त्यांची अवहेलना केली जाते. युद्ध संपल्यानंतर, उद्ध्वस्त झालेलं घर पुन्हा उभारण्याची जबाबदारीही तिच्यावरच येऊन पडते.

‘मिस्टर जॉन्सन, तुम्ही कीवला का येत नाही? तुम्हाला कीवला येण्याची भीती वाटते का? ‘नाटो’ही सुरक्षेसाठी तयार नाही. ‘नाटो’ तिसर्‍या महायुद्धाला घाबरून आहे. युक्रेनचे लोक युद्धाच्या झळा सहन करतायत. पण कोणाला त्याचं काहीच पडलेलं नाही.’ ब्रिटिश पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्यावर महिला पत्रकार डारिया कालेनियुक हिने प्रश्नांचा माराच केला. रशियाकडून खार्कोव शहरावर हल्ले होतायत, पण ‘नाटो’ कोणतीही मदत न करता स्वस्थ बसलंय, असं सांगताना डारियाला अश्रू आवरले नाहीत.

युद्धामुळे बायकामुलांची ताटातूट

रशियाच्या युक्रेनवरच्या पाशवी हल्ल्यामुळे सगळ्यात जास्त झळ पोचलीय, ती महिलांना. युक्रेनियन सरकारने पुरुषांना देश सोडण्याची परवानगी दिलेली नाही. हजारो महिला आणि मुलं शेजारी देशांमधे आसरा शोधण्यासाठी गेलेत. कित्येक महिला आपल्या पोटच्या मुलांना घेऊन सुरक्षित आसरा शोधत रस्त्यावर फिरत आहेत. शेजारच्या रुमानियातही रस्त्यावर स्त्रिया कुठे ना कुठे छत मिळेल, या आशेपोटी भटकत आहेत.

युक्रेनमधे सक्तीने पुरुषांना सेनेत भरती केलं जातंय. अनेक ठिकाणी बायकामुलांची ताटातूट होतेय. आपल्या कुटुंबाला बसस्टॉपवर सोडण्यासाठी आलेला एक बाप पोटच्या मुलीला शेवटचा निरोप देताना भावुक झाला. तिला गुडबाय करताना तो बाप ढसाढसा रडला आणि हा वीडियो सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाला. त्याचं हे आक्रंदन म्हणजे युद्धाचे कोणकोणते परिणाम होऊ शकतात, याचं वास्तव चित्रच आहे.

आपल्या बायकामुलांना परत आपण भेटू शकू की नाही, अशी स्थिती युक्रेनमधल्या अनेक कुटुंबांची झालीय. कारण महिला आणि मुलांना ताबडतोब देश सोडून जाण्याचं आवाहन युक्रेनच्या सरकारनेच केलं आहे. युक्रेनमधल्या १५ लहान मुलांचा यापूर्वीच युद्धाच्या तडाख्यामुळे मृत्यू झालाय.

हेही वाचा: महिला दिन विशेष : आईंना हमे देखके हैरान सा क्यूँ हैं?

युद्ध काळातलं विदारक चित्र

रशिया-युक्रेन संघर्षाच्या परिस्थितीने जगभरातच एक अस्वस्थता निर्माण झालीय. या घटनेचे दूरगामी परिणाम होणार आहेत, हे तर स्पष्टच आहे. त्यातही युद्धाचे स्त्रीजीवनावर होणारे परिणाम हे अधिक गहिरे असतात. तीस वर्षांपूर्वी जे आखाती युद्ध झालं, त्यात महिला सैनिकांचे आपल्या लहान मुलांना निरोप देतानाचे फोटो गाजले होते.

काही महिन्यांपूर्वी अफगाणिस्तानातल्या विमानतळावर येऊन, तिथल्या महिलांनी मनावर दगड ठेवून आपल्या लहान मुलांना अमेरिकन सैनिकांच्या हवाली करताना सर्वांनीच पाहिलंय. युद्ध कुणाला काय करायला भाग पाडेल, कोणत्या विदारक अनुभवांमधून जायला लावेल, याची अशी कल्पना याआधी कोणी कधी केली नसेल.

विस्थापितांमधे मुली-महिला

युद्धस्थितीत स्त्रियांवर अत्याचार केले जातात. त्यांची अवहेलना केली जाते. हेच युद्ध संपल्यानंतर, उद्ध्वस्त झालेलं घर पुन्हा उभारण्याची जबाबदारीही तिच्यावरच येऊन पडते. बोस्नियन महिलांवर झालेल्या अत्याचाराचे वीडियो दाखवून फुशारकी मारली जात होती, असाही इतिहास आहे. रवांडामधे वांशिक वर्चस्ववादी प्रवृत्तीतून शेकडो स्त्रियांवर बलात्कार झाले.

सुमारे चौदा वर्षांपूर्वी बलात्कार हा युद्धगुन्हा म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यासाठी निरंतर चळवळ उभारावी लागली. युद्धातल्या लैंगिक अत्याचाराविरोधी स्त्रियांची जागतिक परिषद २०१४ला भरली होती. शत्रूराष्ट्राविरुद्ध अंगात वीरश्री संचारावी म्हणून अमेरिकी लष्करातले जवान पोर्नोग्राफिक फिल्म बघत असल्याचे पुरावे पूर्वी समोर आले होते. संयुक्त राष्ट्रसंघाच्या पाहणीनुसार, १९९७ला १ कोटी ७० लाख स्त्री-पुरुष आपापल्या देशांत विस्थापित झाले होते आणि २००९ पर्यंत तर ही संख्या अडीच कोटींवर गेली.

यादवी युद्धं आणि अंतर्गत संघर्षांमुळे विस्थापितांची संख्या फुगली. पाकिस्तानात २००९ला ३० लाख लोक विस्थापित झाले आणि यात अर्थातच स्त्रियांची संख्या लक्षणीय होती. ३१ ऑक्टोबर २०००ला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीने युद्ध आणि सशस्त्र संघर्षांमुळे मुली-महिलांना हिंसेची झळ सोसावी लागते, या वस्तुस्थितीची दखल घेतली.

हेही वाचा: गोझी ओकोन्जो : आर्थिक सत्तेच्या चाव्यांनी विकासाची दारं उघडणाऱ्या ‘आजीबाई’

युनोच्या शांतता प्रयत्नांचं काय?

देशोदेशीच्या समाजात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित व्हावी म्हणून काही ठराव संमत करण्यात आले. २०१०ला १९२ सदस्य असलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या फक्त १८ देशांनी महिला संरक्षणासाठी आणि त्यांना युद्ध संपवून शांतता निर्माण करण्याच्या प्रक्रियेत सामील करून घेण्याची बांधिलकी मान्य केली.

या १८ देशांमधे ऑस्ट्रिया, बेल्जियम, चिली, डेन्मार्क, नॉर्वे, फिलिपाइन, स्पेन, स्वीडन, स्वित्झर्लंड, युगांडा, पोर्तुगाल, ब्रिटन यांचा समावेश आहे. पण प्रत्यक्षात युनोच्या या प्रयत्नांचा उपयोग काय झाला? युक्रेनची राखरांगोळी होत असताना, तिथल्या महिला आणि मुलांची होरपळ होत असताना, युरोपीय महासंघ आणि अमेरिकेने टाळ्या वाजवण्याशिवाय दुसरं काय केलं?

युक्रेनियन महिलांची युद्धविरोधी आघाडी

सध्याच्या परिस्थितीत युक्रेनमधल्या स्त्रियांनाही युद्धात उतरावं लागतंय. २०१५ला मिस ग्रँड युक्रेनचा किताब पटकावणारी ब्यूटीक्विन अनास्तासिया लेना हिने देशासाठी बंदूक हातात घेतली आहे. आमच्या भूमीवर कब्जा करण्याच्या इराद्याने घुसखोरी कराल, तर जीवानिशी जाल, असा इशारा तिने आपल्या पोस्टमधून दिला आहे. तिच्याप्रमाणेच युक्रेनमधल्या इतरही महिलांनी शस्त्र हाती घेतलं असून, त्यात युक्रेनच्या काही महिला खासदारांचाही समावेश आहे.

युक्रेनमधली एक महिला रशियन सैनिकांसमोर उभी आहे आणि ती त्यांना सूर्यफुलाच्या बिया देत आहे, असा वीडियो वायरल झालाय. ‘या बिया तुमच्या खिशात ठेवा म्हणजे तुम्ही मराल तेव्हा त्या युक्रेनमधे फूल बनून उगवतील’, असं ती महिला सैनिकांना सांगत असल्याचा दावा केला जात आहे. ‘तू आमच्या देशावर कब्जा करणारा फॅसिस्ट आहेस,’ असं ही जिगरबाज स्त्री म्हणते आणि जाता जाता त्याला शापही देते.

युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी देशासाठी सर्वस्वाचा होम करण्याची तयारी दर्शवली असून, यामुळे असंख्य युक्रेनियन स्त्री-पुरुषांना प्रेरणा मिळालीय. युक्रेनमधल्या एका जोडप्याला तर लग्नाच्या दुसर्‍याच दिवशी हातात बंदूक घ्यावी लागली. परस्परांसाठी जगण्या-मरण्याची शपथ घेणारे प्रेमिक असतात. पण या युक्रेनियन जोडप्याने रशियन सैनिकांशी लढता लढता मृत्यू स्वीकारण्याचीही तयारी दाखवलीय. इथल्या महिला शस्त्र चालवण्याचं प्रशिक्षण घेत असून, स्वसंरक्षणाचे धडेही गिरवत होत्या.

हेही वाचा: प्रिया रमानी खटला : बाईचा सन्मान जपणारं कोर्टाचं जजमेंट

महिलांचं लैंगिक शोषण

‘युद्धस्य कथा रम्या’ हे एक लोकप्रिय वचन आहे. मात्र राष्ट्रवादाच्या अतिरेकातून युद्धखोरी जन्माला घातली जाते. युद्धखोरीतून साम्राज्यवाद वाढतो. युद्ध आणि पौरुष्य, मर्दानगीचे जाणीवपूर्वक भरणपोषण करून वर्चस्ववादाला एक समर्थन पुरवलं जातं. यात मग स्त्रीवर अत्याचार करण्याला एक मान्यताच मिळते. 

महिनोन महिने किंवा वर्षानुवर्षे युद्धं सुरू राहतात. ती लढण्यासाठी घरदार सोडून रणभूमीवर जाणार्‍या सैनिकांची लैंगिक भूक भागवण्यासाठी मग वेश्या पुरवल्या जातात. युद्धग्रस्त भागातल्या स्त्रिया अत्याचाराच्या, शोषणाच्या लक्ष्य ठरतात.

दक्षिण कोरियातल्या एका बेटावरच्या दोनेकशे स्त्रियांना जबरदस्तीने सैनिकांची भूक भागवण्यासाठी नेलं गेलं, अशी बातमी जपानमधल्या ‘असाही सिंबून’ या जगद्विख्यात न्यूजपेपरमधे १९९२ला प्रसिद्ध झाली होती. या शोषणग्रस्त स्त्रियांचं वर्णन ‘कम्फर्ट विमेन’ असं करण्यात आलं होतं. ८० हजार ते दोन लाख महिलांचं लैंगिक शोषण झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती आणि त्यामुळे जपान आणि कोरिया या दोन्ही देशांत परस्परांवर आरोप-प्रत्यारोप केले गेले.

सैन्याच्या मदतीला सर्वसामान्य महिला

युद्धाच्या काळात स्त्रियांनी पराक्रम गाजवल्याचीही उदाहरणं आहेतच. १९७१ला भारत आणि पाकिस्तान दरम्यान झालेल्या युद्धात आपल्या वायुदलाला मदत करून कच्छच्या स्त्रियांनी इतिहासात आपलं नाव कोरलं. त्यावेळी पाकिस्तानच्या सेबर जेट विमानांनी कच्छवर नापामसारखे अत्यंत ज्वलनशील पदार्थ असलेले बॉम्ब टाकायला सुरवात केली. भूज विमानतळावर बॉम्बिंग करून धावपट्टी उद्ध्वस्त केली गेली. ही धावपट्टी दुरुस्त केल्याशिवाय विमानांचं उड्डाण होऊ शकलं नसतं.

ही धावपट्टी दुरुस्त करण्याची जबाबदारी कच्छमधल्या महिलांना देण्यात आली. माधापर गावच्या बांधकामकुशल अशा तीनशे महिलांनी ती स्वीकारली. हे काम करणं जोखमीचं होतं. पाककडून हवाई तळावर हल्ले होण्याचा धोका टळला नव्हता. त्यामुळे ठराविक अंतराने धोक्याचा इशारा देणारे भोंगे वाजवले जायचे. काम सुरू असताना दरवेळी भोंगे वाजले की, त्या स्त्रिया जवळच्या बाभळीच्या झाडाखाली लपत आणि भोंगे वाजणं थांबलं की, पुन्हा काम सुरू करत. युद्धाच्या छायेत त्या स्त्रियांनी तीन दिवसांत ती धावपट्टी दुरुस्त केली.

भारतीय हवाई दलाचे भूज विमानतळ प्रमुख विजय कर्णिक यांनी मागितलेल्या मदतीला भूजच्या स्त्रियांनी अशा प्रकारे कृतिशील प्रतिसाद देऊन, हवाई दलाला अनमोल मदत केली. या घटनाक्रमावर ‘भूज : द प्राऊड ऑफ इंडिया’, हा अजय देवगण, सोनाक्षी सिन्हा, संजय दत्त हे कलाकार असलेला सिनेमा गेल्याच वर्षी प्रदर्शित झाला होता.

हेही वाचा: बायकांच्या सणात पुरुषी विचारांची लुडबूड कशाला?

शौर्यवीर 'कारगिल गर्ल’

मला इथं आठवण होते, ती कारगिल युद्धाच्या वेळी पराक्रम गाजवणार्‍या गुंजन सक्सेना आणि श्रीदिव्या राजन या दोन महिला फायटर पायलटांची. त्या काळी महिलांना वायुसेनेत प्रवेश देण्याबद्दल आक्षेप घेतला जायचा. प्रचंड शारीरिक आणि मानसिक त्रास स्त्रिया सहन करू शकणार नाहीत, असं मानलं जायचं.

लाईट लेफ्टनंट गुंजन आणि श्रीदिव्या यांनी पाक सैन्याचा हल्ला सुरू होता, अशा ठिकाणी विमान, हेलिकॉप्टर चालवलं. तसंच सप्लाय ड्रॉप आणि युद्धाच्या ठिकाणी पाक सैनिक कुठे आहेत, ते शोधण्याची जबाबदारी त्यांना देण्यात आली.

गुंजन आणि श्रीदिव्या यांचं ‘चीता’ हे हेलिकॉप्टर निःशस्त्र होतं. या दोन वीरांगनांनी उत्तर काश्मीरच्या धोकादायक क्षेत्रात हेलिकॉप्टर उडवलं. पाकने या विमानाच्या दिशेने रॉकेट डागलं. मृत्यू जवळून पाहणार्‍या गुंजन आणि श्रीदिव्या यांना ‘कारगिल गर्ल’ म्हणून ओळखलं जातं. असामान्य शौर्यासाठी त्यांना शौर्यवीर पुरस्कारही मिळाला. युद्ध आणि महिला यांच्यातल्या संबंधाची हीसुद्धा एक बाजू आहेच.

युद्धाच्या आगीतली महिला

दुसर्‍या महायुद्धात दोस्त राष्ट्रांनी जेव्हा जर्मनीत प्रवेश केला, तेव्हा तिथे सामूहिक बलात्कार करण्यात आले. बहुसंख्य बलात्कार हे सोवियत रशियाच्या फौजांनी केले होते, यावर इतिहासकारांचं एकमत आहे. ‘८ ते ८० वर्षांच्या असंख्य जर्मन मुली-महिलांवर त्यावेळी अत्याचार झाले’, असं ‘फॉल ऑफ बर्लिन’ या आपल्या पुस्तकात अँटनी बीवर यांनी लिहून ठेवलंय.

गेल्या वर्षी अफगाणिस्तानात तालिबान्यांच्या क्रूर राजवटीला विरोध करणार्‍या एका तीस वर्षीय स्त्रीला गोळ्या घालण्यात आल्या. तेव्हा तिच्या कुशीत सहा महिन्यांचं बाळ होतं, हे अस्वस्थ करणारं द़ृश्य मला अजूनही आठवतं. युद्ध काळात स्त्रियांचे हाल होतातच. पण युद्धोत्तर काळाचे परिणामही महिलांना अधिक थेटपणे सोसावे लागतात. जीवनाची लढाई ही तिला नेहमीच अटीतटीने लढावी लागते.

‘जागतिक महिला दिन’ साजरा करताना, पोलिस, लष्कर अशा सर्व क्षेत्रांत कर्तृत्व गाजवणार्‍या स्त्रियांचा आपण गौरव करतो. पण त्याचवेळी हे लक्षात घेतलं पाहिजे की, युद्धाच्या आगीत प्रथम भक्ष्यस्थानी पडते, ती स्त्री. म्हणूनच या युद्धखोरीविरुद्ध रशियातल्या स्त्रियाही पुतीन यांच्या विरोधात आपला आवाज बुलंद करत आहेत.

हेही वाचा:

अपर्णाताई, आता दिवस स्त्री पुरूष समतेचे आहेत!

कोरोनाचं युद्ध लढणाऱ्या आणि जिंकणाऱ्या महिला लीडर

नवऱ्याची बायको कुटणाऱ्या राधिकापेक्षा अरुंधती वेगळी का ठरते?

चला, समतेच्या सॅनिटायझरनं पुरुषी वर्चस्वाचा वायरस मारून टाकूया

बायका आंदोलक बनून रस्त्यावर उतरतात, त्याचा अर्थ पुरुष कसा लावणार?

(दैनिक पुढारीच्या बहार पुरवणीतून साभार)