हमीद मीर हे पाकिस्तानातले एक महत्त्वाचे पत्रकार. जियो टीवी या पाकिस्तानातल्या आघाडीच्या चॅनलमसाठी ते काम करतात. भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राईक केला, त्या बालाकोटमधल्या जब्बा गावाला त्यांनी भेट दिली. त्या निमित्ताने त्यांनी मांडलेलं हे चिंतन महत्त्वाचं आहे. द वीक या इंग्रजी साप्ताहिकाचा हा रिपोर्ट म्हणूनच मराठीत अनुवादित केलाय.
बालाकोटच्या एअर स्ट्राईकमधे भारताने पाकिस्तानच्या भूमीत घुसून दहशतवादी तळावर हल्ला केला. यात किती दहशतवादी मारले गेले यावर सध्या बरंच राजकारण रंगतंय. दोन्ही देशातंला मीडिया आणि राजकारणी मंडळी भडका कसा उडेल यासाठी पद्धतशीर प्रयत्न करताहेत. पण त्यातून नेमकं काय साध्य होणार? बालाकोटमधे जिथे हवाई हल्ला झालाय तिथला एक ग्राउंड रिपोर्ट केलाय पाकिस्तानच्या जियो टीवी या आघाडीच्या न्यूज चॅनलचे पत्रकार हमीद मीर यांनी.
या शोधमोहिमेत त्यांना नेमक काय दिसलं. त्यांचा हा रिपोतार्ज ‘द वीक’ मॅगजीनच्या ताज्या अंकात आलाय. ‘द फॉग ऑफ वॉर’नावाने आलेल्या मीर यांच्या या कवर स्टोरीचा एक भाग म्हणून प्रसिद्ध झालीय. त्याचा हा अनुवाद.
कुठल्याही युद्धात बळी जातो तो सत्याचा. पाकिस्तानातल्या डोंगराळ खैबर पख्तूनख्वा भागात मी सत्याच्या डेडबॉडी बघितल्यात. बालाकोटपासून अगदीच २५ किलोमीटर अंतरावर जब्बा हे गाव आहे. २६ फेब्रुवारीला पहाटे भारतीय हवाई दलाने केलेल्या बॉम्बहल्ल्यानंतर हे गाव लक्षवेधक ठरलंय. या प्रकरणात भारत सरकारचा दावा आहे की इथे जैश ए मोहम्मदची ट्रेनिंग सेंटर आणि मोठ्या प्रमाणात दहशतवादी होते. ट्रेनिंग कॅम्प उद्धवस्त करून दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं.
त्या दिवशी हवामान खूपच खराब होतं. त्यामुळे बॉम्बहल्लाच्या ठिकाणापर्यंत पोचणंही कठीण होतं. तिथल्या जब्बा टॉपपर्यंत जायलाही धड रस्ताही नव्हता. दुसऱ्या दिवशी मी सकाळी तीन किलोमीटर पायी चालत तिथे पोचलो. काही दिसतंय का ते शोधत होतो. काही कोलमडून पडलेली झाड पाहिली. मी नष्ट झालेल्या इमारतींचा शोध घेत होतो. एका स्थानिक व्यक्तीनं मला सांगितलं की इथे फक्त एका घराचं नुकसान झालंय.
घराचे मालक नूरन शहा हे थोडे जखमी झालेत. मी पुढं जावून शाह यांना भेटलो. शाह यांना हल्यात मेलेल्या माणसांविषयी विचारलं. तर त्याने एका मेलेल्या कावळ्याकडे बोट केलं आणि म्हणाला, ‘मेलेला केवळ एकच पक्षी आहे. एकही माणूस मेलेला नाही. मी एकटाच जखमी झालोय. पण माझ्या घराचं नुकसान झालंय.’
शाह एक गरीब माणूस. तो म्हणाला, ‘मी काही दहशतवादी नाही. मग मला का टार्गेट करण्यात आलं?’ लवकरच काही स्थानिक लोक आले. चहापाण्याची विचारणा झाली. मी हल्ल्यात झालेल्या नुकसानीविषयी विचारलं. त्यांनी मला चार मोठे खड्डे दाखवले. एक मक्याच्या शेतात होता. बाकी जवळच्याच टेकडीवर होते. मी टेकडीवरून खाली आलो आणि शाह यांना निरोप दिला. त्याच क्षणी ते मला म्हणाले, ‘तुम्ही या मेलेल्या कावळ्याला जगासमोर न्याल का आणि जगाला सांगू शकाल का पंतप्रधान मोदींनी हे मिळवलंय.’ मी त्या मेलेल्या कावळ्याचा फोटो काढला. हीच ती सत्याची डेडबॉडी होती.
अचानक माझा फोन वाजला. एका सहकाऱ्याने मला सांगितलं, पाकिस्तानच्या हवाई दलाने भारताच्या दोन लष्करी जेट्सना पाडलंय. आणि एका भारतीय पायलटला ताब्यात घेतलंय.
बहुतेक पाकिस्तानी आणि भारतीय नागरीकांना युद्ध नकोय. पण या बहुसंख्यांकांचं संख्येने कमी असलेल्यांसमोर काही चालत नाही. ते आपल्या ताकदीच्या बळावर तोंड बंद करतोय. देशभक्तीचा ठेका आपणच घेतलाय आणि आपणच देशभक्त आहोत असं ते वागत असतात. खरंतर त्यांची देशभक्ती हे खोटेपणाच्या तकलादू पायावर उभी असते. आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण एकमेकांना गोळीबारानं जरूर हरवू शकतो. पण सत्य कधीच हरू शकत नाही.
आजकाल मीडियाकडून सत्य मांडलं जाईल, अशी अपेक्षा करणं कठीणच आहे. मीडियाला सांगावं लागेलं, युद्ध हाच भारत-पाकिस्तानचा शत्रू आहे. मला माहितीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाकिस्तानसोबतचा तणाव कमी करू शकत नाहीत. कारण भारतात लोकसभेच्या निवडणुका जवळ येताहेत. पाकिस्तानच त्यांना विजयाचा मार्ग सुकर करून देतोय.
आता आपण दहशतवादाबद्दल बोलुया. अफगाणिस्तानात तालिबान आणि अमेरिका एकमेकांविरोधात लढताहेत. पण त्याचवेळी त्यांच्या कतारमधे चर्चाही सुरू आहे. मग भारत पाकिस्तानशी बोलू शकत नाही. काश्मीरमधल्या हुर्रियतच्या नेत्यांशीही बोलू शकत नाही. आम्हाला माहितीय की निवडणुकीआधी अशा प्रचारची चर्चा करणं खूपच कठीण आहे. चर्चेआधी आपल्याला तणाव कमी करावा लागेल. दोन्हीकडचे राजकारणी वातावरण निवळावं, म्हणून कुठलीच पॉझिटिव कृती करताना दिसत नाहीत. मग तणाव कमी करण्यासाठी आपण क्रिकेटपटू, गायक, कलावंत आणि शिक्षणतज्ञ यांची मदत घेऊ शकतो. अनेक पाकिस्तानी नागरिकांनी भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेची मागणी केलीय.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी २८ फेब्रुवारीला सांगितलं की १ मार्च रोजी अभिनंदनला परत पाठवण्यात येईल. पाकिस्तानच्या या कृतीमुळे शांततेसाठी मोदींवर दबाव आला. आम्ही एकमेकांशी चर्चा केली नाही तरी तणाव कमी होईल, हे तरी बघितलं पाहिजे. जम्मू आणि काश्मीरची राजधानी श्रीनगर आणि पाकव्याप्त काश्मीरची राजधानी मुजफ्फराबाद इथले लोक परस्परांच्या संपर्कात आले पाहिजेत. जम्मू आणि सियालकोट तसंच कारगिल आणि स्किर्द यादरम्यानची बॉर्डर खुली करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
हुर्रियतच्या सय्यद अली शाह गिलानी, मिरवैज उमर फारुख आणि यासीन मलिक यासारख्या नेत्यांनी विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांच्या वापसीसाठी सक्रिय काम केलं पाहिजे. पाकव्याप्त काश्मीरमधे राहणाऱ्या भारत नियंत्रित क्षेत्रातल्या काश्मिरी शरणार्थींनाही परत येण्याची परवानगी दिली पाहिजे. मी १९९० नंतर बारामुल्ला, कुपरवाडा, उरी, पुंच आणि इतर भागातून प्रवास करणाऱ्या शरणार्थींबद्दल बोलतोय. ते ३५,००० च्या आसपास आहेत. मुजफ्फराबाद, मिरपूर आणि कोटली इथल्या २६ निर्वासित शिबिरांत ते राहताहेत.
श्रीनगर आणि मुजफ्फराबाद इथल्या सरकारांनी विस्थापित काश्मिरी पंडित आणि मुस्लिमांसाठी एक संयुक्त धोरण आणलं पाहिजे. मुस्लीम, हिंदू, शीख आणि बौद्ध यांच्यासोबतच जम्मू कश्मीरमधल्या दोन्ही भागांतल्या काश्मिरी लोकांचा एक संयुक्त गट तयार करण्याची गरज आहे. हे गट श्रीनगर आणि मुजफ्फराबाद इथे नियमितपणे भेटत राहिले पाहिजेत. त्यातूनच एकमेकांबद्दल सौहार्द निर्माण होईल. दोघांनाही दोन्ही बाजूंच्या मानवाधिकारांच्या उल्लंघनाबद्दल बोलण्याची परवानगी दिली पाहिजे. त्यातून अधिकचा संवाद वाढेल.
दोन्ही बाजूच्या काश्मिरी नेत्यांना श्रीनगर आणि मुजफ्फराबादमधे स्वतंत्रपणे फिरण्याची परवानगी द्यायला हवी. शांततेसाठी त्यांनीच संयुक्तपणे काहीतरी करण्याची गरज आहे. एक तिसरा पक्ष म्हणून तेच भारत-पाकिस्तानमधे चर्चा घडवून आणू शकतात. आणि ते गरजेच आहे. पण यासाठी गिलानी, उमर फारुख, मलिक, मेहबुबा मुफ्ती, ओमर अब्दुल्ला, राजा फारुख हैदर, सरदार अतीक अहमद खान, सुल्तान महमूद आणि अब्दुल रशीद तुरबी ही सगळी मंडळी सहमत होतील?
आणि तसं झालं तर ते त्यांच्या अटी आणि शर्तीनुसार भारत-पाककडे तसा प्रस्ताव देतील. तसं झालं नाही तर मात्र काश्मिरी लोकांना त्यांचे हक्क मिळवणं कठीण होऊन बसेल. मग आयुष्यभऱ आतासारखाच दहशतवाद त्यांच्या आयुष्याचा, दैनंदिन जीवनाचा भाग बनून जाईल. आणि मग समस्या अधिक किचकट होईल.
भारत आणि पाकिस्तानने अफगाण शांतता चर्चेतून काहीतरी शिकण्याची गरज आहे. पुढच्या काळात भारत आणि पाकिस्तान निश्चितच एकमेकांशी बोलतील. दोघंही एकमेकांच्या संपर्कात असलं पाहिजे. यासाठी सौदी अरबचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या मध्य़स्तीची गरज पडू नये. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातला तणाव कमी करण्यासाठीसौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्र्यांना भेटण्याची शक्यता बोलून दाखवलीय.
मोदी निवडणुकीनंतर चर्चा सुरू करणार असतील, तर ते आधी शक्य नाही का? किमान भारतीय क्रिकेट संघाला पाकिस्तानला जाण्याची, पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांना दिल्ली किंवा चेन्नईला येण्याची परवानगी द्यायला हवी. पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतीय मीडियाला जब्बा भागात आणि मुजफ्फराबादला भेट देण्यासाठी आमंत्रण दिलं पाहिजे. त्यांना पाकिस्तानात मुक्तपणे येण्याची परवानगी द्यावी आणि पाकिस्तानात दहशतवादी शिबिरं आहेत का, ते तपासू द्यावं. मग मोदींनीही पाकिस्तानी मीडियाला अशीच ऑफर द्यायला काय हरकत आहे?
(या लेखाचा अनुवाद अक्षय शारदा शरद यांनी केलाय. )