कोरोनाकाळात सोशल डिस्टन्सिंग पाळून वारकऱ्यांनी आदर्शच घातलाय

१२ एप्रिल २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


`वारी चुकू नेदी हरी`, हे मागणं वारकरी रोजच पांडुरंगाच्या चरणी मागतो. पण यंदा कोरोनानं वारकऱ्यांची चैत्री वारी चुकलीच. सरकारी आवाहनानुसार वारकऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंग चोख सांभाळलं. बाकी देशभर समाजाच्या भल्याचा विचार न करता धार्मिकतेच्या नावावर दुराग्रहाच्या घटना करत असताना वारकरी परंपरेने मात्र सामूहिक शहाणपणाचं दर्शन घडवलं. हा वारकरी विचारांचा वारसा आपण जपायला हवा.

यावर्षी ४ एप्रिलला आलेल्या चैत्री वारीविषयी अनेकांच्या मनात उत्सुकता होती. कारण आषाढी - कार्तिकीच्या पाठोपाठ चैत्री आणि माघी वारी वारकरी संप्रदायात विशेष मानली जाते. दरवर्षी लाखो वारकरी या वारीसाठी पंढरीत येत असतात. यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे प्रशासनाने वारीसाठी गर्दी न करण्याचं आवाहन केलं होतं.

संविधानाशी सुसंगत वारकऱ्यांचं आचरण

सरकारी आदेशाचं पालन करत वारकरी भाविकांनी पंढरपुरात गर्दी केली नाही. पोलिसांशी वाद घातले नाहीत. सामूहिक वारीचा आग्रह धरला नाही. स्थानिक फडकरी महाराज मंडळीनी प्रातिनिधिक स्वरूपात वारीचे विधी केले. फडकरी महाराज मंडळीनी रामनवमी, दशमी, एकादशी आणि द्वादशीचे पारंपारिक विधी सुरक्षित अंतर ठेवून पार पाडले. रामजन्माचं गुलालाचं कीर्तन, काकडारती, नगरप्रदक्षिणा आणि इतर नैमित्तिक कार्यक्रम सरकारच्या नियमांच्या अनुसार झाले.

शासनाचे नियम न डावलता वारकरी परंपरेने सामूहिक शहाणपणाचा आविष्कार घडवला. वारकऱ्यांनी दाखवलेला सार्वजनिक सुजाणपणा वाखाणण्यासारखाच आहे. भारतीय संविधानाने धर्मपालनाच्या स्वातंत्र्याचा हक्क दिलाय. पण हा हक्क सार्वजनिक सुव्यवस्था, नितिमत्ता आणि आरोग्य यांचं नुकसान करून करणं अपेक्षित नाही. वारकरी परंपरेचा हा समंजसपणा भारतीय संविधानाच्या चौकटीशी सुसंगतच आहे.

हेही वाचा : कोरोनाशी धर्माचा संबंध लावणाऱ्यांचं काय करायचं बरं?

तुकोबारायांचीही वारी तापामुळे चुकली होती

संतांचं जीवन प्रत्येक प्रसंगात मार्गदर्शक असतं, अशी वारकऱ्यांची खात्री आहे. संतश्रेष्ठ तुकोबारायांनाही एकदा ताप आला होता. त्यामुळे त्यांची वारी चुकली होती. त्यावेळी त्यांनी पांडुरंगाला निरोप पाठवणारे अभंग लिहले होते. हे अभंग वारकरी आजही नगरप्रदक्षिणेच्या वेळी म्हणतात. स्वतःच्या शारिरीक आरोग्यासाठी वारी चुकली तर तो वारकरी संप्रदायात दोष मानला जात नाही.

खरं तर वारीला वारकऱ्यांच्या जीवनात खूपच महत्व आहे. नातलगांचा मृत्यू, शेताभातातली कामं, भौतिक असुविधा अशा कितीतरी अडचणींवर मात करून वारकरी वारी करण्यासाठी धडपडतात. नवऱ्याचा विरोध सहन करत वारीला येणाऱ्या अनेक महिला भेटतात. पण यावेळी कोरोनाच्या संकटामुळं वारी करणं कुणालाच शक्य नव्हतं.

पण इतर ठिकाणी आपल्या श्रद्धेसाठी स्वतःसह इतरांचं आरोग्य धोक्यात घालत असलेले लोक आपण पाहत आहोत. पण वारकऱ्यांनी तसं केलं नाही. त्यांनी आपला विवेक त्यांनी जागा ठेवला. या विवेकानं त्यांना कोरोनाच्या काळात वारीसाठी गर्दी करू दिली नाही. धर्मश्रद्ध लोकांनी वारकरी परंपरेचा आदर्श घ्यायला हवा. मोजक्या लोकांच्या सामूहिक उपासनेच्या दुराग्रहामुळे सगळेच धर्मबांधव बदनाम होतात, हे लक्षात घेऊन आपल्या धर्माची, संप्रदायाची बदनामी रोखण्यासाठी आपला विवेक शाबूत ठेवायला हवा.

वारकऱ्यांचं वेगळेपण उजळून निघालं

भारतासह जगभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक कार्यक्रमांना रोखताना शासनाला त्रास होतोय. तबलिगींचा भयंकर प्रकार आपण पाहतोच आहोत. त्यांच्यामुळे फक्त भारतातच नाही, तर जगभरातल्या अनेक देशांत कोरोनाबाधितांची संख्या वाढलीय. दक्षिण कोरियात आटोक्यात आलेला कोरोना एका बाईच्या चर्चमधल्या हजेरीमुळे पुन्हा पसरला. पंजाबातील कोरोना झाल्यानंतरही प्रवचनं देत फिरणारा एका परदेशी शीख धर्मगुरू स्वतः मेलाच. पण अनेकांना हा जीवघेणा आजार देऊन गेला.

घराच्या टेरेसवर नमाजासाठी गर्दी करणारे महाभाग काही केल्या ऐकत नसल्याचा बातम्या आपण बघतो आहोतच. पश्चिम बंगाल, बिहारसह काही राज्यांत रामनवमीला देवीच्या दर्शनासाठी शेकडो जणांनी गर्दी केली होती. अक्कलकोटमधल्या वागदरीत जत्रा भरवायला विरोध करणाऱ्या पोलिसांना मारहाण करण्यात आली. या सगळ्या धार्मिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर वारकरी परंपरेतलं वेगळेपण उजळून निघालं आहे.

धार्मिक कार्यक्रमाबरोबरच इतर अनेक ठिकाणी अतिउत्साही लोक अनुचित गोष्टी करतायत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टाळ्या वाजवायला सांगितल्या. तर लोकांनी वाजंत्री वाजवत मिरवणुका काढल्या. त्यांनी दिवे लावण्याचं आवाहन केल्यानंतर फटाके वाजवले. होळ्या पेटवल्या. सोलापुरात त्यामुळे विमानतळावर आग लागली. जग कोरोनाच्या संकटात सापडलंय, माणसं मरतायत अशा वेळी आपल्या उत्सवीपणाला यांनी आवर का घातला नाही?

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

कोरोनाः मुस्लिम माऊली कुछ तो सोचोना, बोलोना

साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं

युद्धात जिंकणाऱ्या अमेरिकेला कोरोना का हरवतोय?

एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे? 

ट्रम्प यांच्या धमकीला घाबरून भारतानं औषधावरची निर्यातबंदी उठवली?

गर्दी राजकारणासाठी लागते, भक्तीसाठी नाही

अशावेळी वारकरी संप्रदायाचं मोठेपण अधोरेखित होतं. वारकरी परंपरेत भक्ती केली जाते ती दिखाव्यासाठी नाही. भक्तीच्या माध्यमातून लोकप्रियता मिळवणं वारकरी संतांना मंजूर नाही. त्यामुळे नुसते नेम पार पाडणं वारकऱ्यांसाठी पुरेसं असतं. एका बाजूला योगी आदित्यनाथांसारखे मुख्यमंत्री अयोध्येत गर्दी करून रामनवमीची पूजा करतात. याउलट वारकरी मात्र सुरक्षित अंतर ठेवून रामनवमीचं कीर्तन करतात.

वारकरी परंपरेला धार्मिक उन्माद वाढवून राजकीय सत्तेची समीकरणं जुळवायची नाहीत. तर त्यांना फक्त खरी भक्ती करायची असते. त्यामुळे त्यांना गर्दीचा देखावा करण्याची गरज भासत नाही. म्हणूनच वारकरी सहजपणे आपल्या उत्सवाला आवर घालून चार-पाच लोक असतानादेखील कीर्तनाचा नेम करतात. मोठा समुदाय असावा आणि आपली प्रतिष्ठा वाढावी असा वारकऱ्यांचा हेतू नसतो.

वारी ही समूहप्रधान भक्ती

वारकरी परंपरेत असलेल्या या समजूतदारपणाचं रहस्य संतविचारातच दडलेलं आहे. वारकरी संप्रदाय समूहप्रधान भक्तीतत्वाचा पुरस्कर्ता आहे. योग, जप, तप, यज्ञ अशा साधना व्यक्तिगत स्वरूपाच्या असतात. पण वारी समूहप्रधान आहे. वारकरी परंपरेने सामूहिकता स्वीकारली, तीच मुळी परमार्थात सहकारिता आणण्यासाठी.

संत नामदेवांचे वंशज नामदास महाराजांनी यामागचा वारकरी विचार स्पष्ट केलाय. ते सांगतात, `एकाने वारी केली तरी त्याचा लाभ त्याच्या अवघ्या कुटुंबाला होतो, अशी परंपरेची धारणा आहे. वारीत येता आलं नसलं तरी फडावरील विधी महाराज मंडळींनी पार पडल्याने त्याचं फळ फडावरच्या सर्वांना मिळतं. त्यामुळे कोणीही खेद वाटून घेऊ नये.`

इतर साधना व्यक्तिगत स्वरूपाच्या असल्याने त्या स्वतःच कराव्या लागतात मात्र वारी फडप्रमुख अथवा कुटुंबातील एखाद्याने केली तरी चालते,  असा वारकऱ्यांचा मानस आहे. इतर धर्ममार्तंड आग्रह करून धार्मिक उपासनेसाठी बोलवत असताना वारकरी परंपरेतील फडकरी मात्र प्रातिनिधिक स्वरूपात वारी करून त्याचा लाभ सर्वांना मिळत असल्याचं सांगतायत. याचं रहस्य वारकरी संप्रदायाच्या सहकारप्रधान भक्तीतत्वात आहे.

हेही वाचा : आपापल्या प्रबोधनाची एकादशी

आमचा देव कोपणारा नाही

वारकरी परंपरेचा उपास्य दैवताकडे बघण्याचा दृष्टिकोनही या विषयात महत्वाचा ठरतो. विठ्ठल हा देव कधीही भक्तांवर कोपत नाही. शाप देत नाही. वारी चुकली तरी रागावत नाही. संतांचा विठ्ठल मोकळाढाकळा आहे. तो लोकसखा आहे. भक्तांवर तो कधीही अवकृपा करत नाही.

इतर काही देवता व्रत केलं नाही तर विनाश घडवतात. अशा कामिक देवांची संतांनी रेवडी उडवली आहे. वेदमंत्र चुकले तर विपरीत फळ मिळतं. पण या देवाच्या नाममंत्राचा उलटा जप केला तरी वाल्याचा वाल्मिकी होतो, असा संतांचा भाव आहे. थोडक्यात विठ्ठलाच्या वारकरी उपासनेचा मार्ग सोपा आणि निर्धोक आहे. त्यामुळे वारी चुकली तरी काही हरकत नाही, असा समजूतदारपणा वारकऱ्यांमध्ये सहज येतो.

देवळातला विठ्ठल घरी आणला

वारकरी परंपरेची वारीमागची भूमिका अशीच आहे. वारकरी मोक्षासाठी वारी करत नाहीत. नवस तर ते करत नाहीत. वारकरी वारीला जातात ते चित्तशुद्धीसाठी. पंढरीत खळालाही रोकडे पाझर फुटतात. वर्णाभिमान उठाउठी निघून जातो. काशीला आणि वाराणसीला हे घडत नाही. त्यामुळे संतांना पंढरीसमोर इतर तीर्थं फिकी वाटतात.

तीर्थयात्रा आणि वारीत मोठा फरक आहे. वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नाही, तर ही स्वतःच्या चित्ताचं शुद्धीकरण घडवून आणण्याची प्रक्रिया आहे. पंढरीत जाणं, हे वारीचं प्रतीक आहे, तर चित्तशुद्धी हा वारीचा उद्देश आहे. त्यामुळे प्रत्यक्ष पंढरीला जाता आलं नाही, तरी घरातच आपण वारीचा चित्तशुद्धीचा उद्देश पूर्ण करू शकतो, याची जाणीव वारकऱ्यांना असतेच.

परिस्थिती कितीही अडचणीची असली तरी वारकरी त्यातून मार्ग काढतात. जातीपातीच्या रोगाच्या काळात आमच्या चोखोबारायांना देवळात जाता आलं नाही. आता कोरोनाच्या साथीत आपल्यालाही देवळात जाता येत नाही. पण चोखोबारायांनी मंदिराचा आग्रह धरला नाही. उलट देवळातला विठ्ठल आपल्या घरात आणला. तसंच आता वारकऱ्यांनी देवळातला विठ्ठल आपल्या अंतःकरणात आणलाय.

हेही वाचा : वारकरी संप्रदायाची सहिष्णुता आजच्या काळात महत्त्वाची

आमचा विवेक शाबूत आहे

कोरोनाच्या काळात अनेक अफवा पसरल्या. बाळूमामाच्या भाकणुकीची अशीच एक अफवा कोल्हापूर, सांगली, सोलापूर परिसरात पसरली. रात्री कोरा चहा आणि भंडारा प्यायला की कोरोना येणार नाही, असं अनेकांनी फोनवर सांगितलं. अनेकजण या फालतू उपायाला बळी पडले. अनेकांनी कणकेचे दिवे कडुनिंबाखाली लावले. पण असले उपाय वारकरी परंपरेने सांगितले नाहीत. कारण वारकरी परंपरेला रोगनिवारणासारख्या ऐहिक लाभासाठी भक्ती करणं पसंत नाही. 

रानामाळातली ही साधी साधी माणसं शेकडो वर्षं वारी करतायत. ज्ञानोबा-तुकोबांचा विचार जागवतायत. संरक्षणाचं आमिष दाखवत आपला द्वेषमूलक विचार रेटणाऱ्यांना ते वारीत शिरू देत नाहीत. अस्पृश्यांच्या मंदिरप्रवेशामुळे विठ्ठल बाटला आहे, म्हणून दर्शनाला जाऊ नका असं सांगणारांना ते भीक घालत नाहीत.

आमचा विवेक शाबूत आहे हे वारकरी वेळोवेळी दाखवून देत असतात. कोरोनाच्या संकटातही वारकरी परंपरेने संतविचारांच्या प्रकाशात आपली पंढरीची वाट नीट शोधलीय, असंच म्हणावं लागेल. आता कोरोनाचं संकट लांबलं तर आषाढी वारीच्या वेळेस वारकऱ्यांची खरी परीक्षा होणार आहे. त्यातून संतविचार त्यांना त्यात यशस्वी ठरवणार आहे.

हेही वाचा : 

प्रा. यशवंत सुमंत: कृतिशील समन्वयी विचारवंत

वारी म्हणजे मनुष्य जन्माचा महोत्सव, सेलिब्रेशन

वाचकाचा लेखः किशोरीताई आमोणकर भिन्न षड्ज

वारी परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेली पाहिजे

देवदासी समाजातून गानसरस्वती घडण्याचा इतिहास प्रेरणा देतो

महात्मा जोतीराव फुलेच पहिले शिवचरित्रकार आणि शिवजयंतीचे उद्गातेही

(लेखक हे तरुण वारकरी कीर्तनकार आहेत.)