पुण्यात सध्या अभिवाचनाचा एक प्रयोग तुफान चालतोय. तरुणाईची गर्दी होतेय. तरुणाईसोबतच आता पालकही या प्रयोगाला आवर्जून जातेय. ‘वाफाळलेले दिवस’च्या प्रयोगांची सोशल मीडियावरही चर्चा सुरू आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातही हे अभिवाचनाचे प्रयोग आयोजित केले जाताहेत. यानिमित्ताने वाफाळलेले दिवस प्रयोगाबद्दल.
आजकाल सगळीच माहिती इंटरनेटवर उपलब्ध असते. मोबाईलवर एका क्लिकमधे कोणत्याही आणि कुठल्याही विषयाची माहिती सहजपणे मिळते. वयात येणाऱ्या मुलामुलींच्या समस्या, त्यांची लैंगिकता हा विषयही याला अपवाद नाही. त्यामुळे या किशोरवयीन मुलांना पालकांपेक्षाही जास्त माहिती असते असा एकूण समज असतो.
पण हे खरंच तसं आहे का याचा शोध घेताना मात्र तसं काही असल्याचं जाणवत नाही. उलट माहितीचा दुरुपयोग कसा होऊ शकतो हेच यातून बाहेर येतं. याच प्रश्नांचा अधिक शोध घेत असताना लेखक प्रतिक पुरी यांच्या ‘वाफाळलेले दिवस’ या कादंबरीच्या अभिवाचनाचा प्रयोग पाहण्याचा योग आला. आरोग्यदायी लैंगिक प्रबोधन काय आणि कसं असू शकतं हे त्यातून जाणवलं.
इंटरनेट युगाच्या आधीच्या काळात लैंगिक शिक्षणाचं केंद्र हे शिक्षक, मित्रमंडळी आणि जमल्यास पालक असं होतं. आता हे चित्र बदललंय. आता केवळ चोरून पिवळी पुस्तकं वाचणं आणि त्याबद्दल चोरूनच गप्पा मारणं असे प्रबोधनाचे सोप्या मार्ग हाताळले जात नाहीत. त्यामुळेच इंटरनेटच्या सेन्सॉरशिप नसलेल्या काळात थेट मिळणारी माहिती आणि त्यातून निर्माण होणारे धोके, त्याचा लैंगिक वर्तनावर होणारा परिणाम, यातून निर्माण होणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी पुन्हा इंटरनेटचाच आधार घेणं, या दुष्टचक्रातून मुलांना बाहेर काढणं खूप गरजेचं आहे.
यासाठी या कादंबरीच्या अभिवाचनाचा हा प्रयोग अत्यंत महत्त्वाचा आहे. शारिरीक भूक नैसर्गिक असली तरीही, ती ‘जबाबदार’ असणं हे सध्याच्या इंटरनेटकालीन समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे.
हेही वाचाः महाराष्ट्राला सेक्स शिकवणाऱ्या पुस्तकाची गोष्ट
पौगंडावस्थेत पोचताच मुलांच्या शरीरातील बदलामुळे मनावर आणि विचार करण्याच्या प्रक्रियेवर तसंच भावनांवर झपाट्याने परिणाम होऊ लागतो. खूप जोरात वादळ येऊन पुढे काही दिसेनासं होतं, अशी काहीशी अवस्था असते ही. याच ठिकाणी आपले पालकलोक आणि शिक्षक, मुलांना अधिकृतपणे आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे, सहजतेने, या विषयाची माहिती किंवा पूर्वकल्पना या मुलांना देण्यास असमर्थ ठरतात.
प्रेम आणि शारिरीक संबंध या दोन वेगवेगळ्या गोष्टी असताना मनुष्य प्राण्याच्या आयुष्यात त्या बरोबर कोणत्या ठिकाणी एकमेकांना छेदून जातात किंवा एकमेकांत मिसळतात, याचे हळूवार विश्लेषण आपला समाज करू शकत नाही. कारण आपल्याकडे लैंगिकता ही कायमच नैतिकतेशी जोडलेली आहे. अशा वेळी लेखक कामाला येऊ शकतो. ‘वाफाळलेले दिवस’ याला अपवाद नाही.
हेही वाचाः टीम इंडियाला यशाचा टीळा लावणारे रवी शास्त्री मैदानावर आल्यावर गो बॅकचे नारे लागायचे
समाजात सेक्सविषयी भयानक कुतुहल असतं. हे कुतुहल दाबून ठेवण्याची प्रवृत्ती, कुटुंबव्यवस्था, सामाजिक नीतिनियम यामागे दडलेला खोटेपणा आणि दांभिकता, दुटप्पीपणा, श्लील-अश्लिल यांचे कृत्रिम मुखवटे आणि यामधे हरवून जाणारं प्रत्येकाच्या आयुष्यातील हे नवं स्थित्यंतर यावर निखळ विनोदी भाष्य करत त्याचवेळी काही गंभीर प्रश्न उपस्थित करणारा एक नायक आणि शाळेतली त्याची मैत्रीण या दोघांभोवती कादंबरीचं कथानक फिरत राहतं.
हा आठवीतला नायक मुलगा, आपल्या इतर मित्रांसोबत स्वतःच्या भावनिक स्थित्यंतराबद्दल बोलण्याचा प्रयत्न करतो. याच संवादांतून एक विनोदी नाट्य फुलत राहतं. गंभीर पण हास्य फुलवणारा हा प्रयोग प्रेक्षकाला अंतर्मुख करून जातो.
इंटरनेटवरील सगळ्या प्रकारची सहजपणे उपलब्ध होणारी माहिती ही वयात येणाऱ्या अपरिपक्व तरुण मनांना सवंग करण्यात मोठा हातभार लावते. त्यामुळेच ‘वाफाळलेले दिवस’ सारखी नाट्यकृती इथे उपयोगाची ठरते. हा प्रयोग वेळोवेळी उफाळणाऱ्या लैंगिक विचार आणि भावनांचा निचरा योग्य पद्धतीने कसा करता येईल याविषयी मार्गदर्शन करतो. त्यामुळे संयम आणि धीरानं या अस्थिर वादळी स्थित्यंतराला मुले सहजतेने पार करू शकतील.
समाजात सध्या वेबसिरीज, इंटरनेटवरील पॉर्न फिल्म्स यातून मिळणाऱ्या माहितीमुळे मुलं मोठ्या प्रमाणावर गैरवर्तनाला बळी पडताहेत. या बेजबाबदार लैंगिक वर्तनाची जबाबदारी ना पालक घेत ना शिक्षक ना समाज. शारिरीक भूक, वासना आणि प्रेम या गोष्टींमधला फरक समजावून न घेता संपूर्ण लैंगिकतेवरच नकाराची फूली मारायची किंवा त्याला वाईट ठरवून त्याचा नैतिकतेशी आणि चारित्र्याशी सतत संबंध जोडायचा. यातून हे नैसर्गिक प्रकरण अकारण चिघळतं.
या सगळ्यांनी आधीच बेजबाबदार असलेलं मुलांचं लैंगिक वर्तन विकृत होत जातं. ज्यांतून अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण होतात. अशा काळात हलक्याफुलक्या विनोदांतून सत्य परिस्थिती नैसर्गिकपणे कशी हाताळायची याचं एक सहजसोपं लैंगिक शिक्षण देण्याचं कामच ही नाट्यकृती करतेय. म्हणूनच प्रत्येक पालकाने आपल्या पाल्यांबरोबर आणि शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्यांसोबत हा प्रयोग जरूर पहायला पाहिजे.
राहुल लामखडे या तरुण दिग्दर्शकाने त्याच्या सहकारी कलाकारांसोबत अत्यंत समर्थपणे हा प्रयोग रंगमंचावर उभारलाय. लेखकाने धाडसानं हा विषय मांडलाय. त्याच धाडसानं आणि सहजतेनं राहुलनेही हा विषय रंगमंचावर जिवंत केलाय. त्याचा प्रत्यक्ष अनुभव हा प्रत्येकाने एकदातरी घ्यावंच.
हेही वाचाः
चला, आज तरी मासिक पाळीवर चर्चा करूया
लिंगभेदापलीकडची प्रेमाची वर्च्युअल पायवाट
बॉटलबंद फ्रूट ज्यूस पिणं खरंच हेल्दी आहे की तब्येतीची वाट लागते?