आपण अमेरिका, इटली, इंग्लंड वगैरे देशातल्या कोरोना मृतांच्या आकड्यांमधे आपला सुखांत शोधतोय. आपल्याला भारतातल्या कोरोना बाधितांची संख्या दररोज वाढतीय याची नाही तर पाकिस्तानचा आकडा आपल्यापेक्षा कमी असल्याची चिंता जास्त भेडसावतेय. कोरोनाच्या युद्धातही हिंदू-मुस्लिम ब्लेमगेमचा धंदा जोरात सुरू आहे.
कोरोना या जगाला हादरवणाऱ्या साथरोगानं रौद्र रूप धारण केलंय. जगभरातल्या दोनशेहून जास्त देशांना आपला तडाखा दिलाय. आधुनिक जीवनशैली आणि वैज्ञानिक प्रगतीपासून दूर असलेल्या अमेझॉन जंगलापर्यंत हा वायरस जाऊन पोचलाय. तिथल्या योनोमामी या मूलनिवासी जमातीलाही त्यानं बाधित केलंय. आजच्या घडीला जगभरात ५ लाखांहून जास्त लोक कोरोनाबाधित झालेत. भारतात ही आकडेवारी १६ हजारांच्या घरात गेलीय.
असं असलं तरी हा लेख लिहिताना भारतातल्या साडेतीनशे जिल्ह्यांमधे अजूनही कोरोनाचा शिरकाव झालेला नव्हता. ही खऱ्या अर्थानं कोरोनाची पॉजिटिव गुड न्यूज आहे. कोरोनाने आपल्यासोबत निर्माण केलेल्या विश्वव्यापी संशयाच्या वातावरणात दुसऱ्यांच्या आनंदात आपलं सुख शोधण्याच्या संस्काराचं आपल्याला विस्मरण झालंय. आपण अमेरिका, इटली, इंग्लंड वगैरे देशातल्या कोरोना मृत्यूंच्या आकड्यांमधे आपला सुखांत शोधतोय. आपल्याला भारतातल्या कोरोना बाधितांची संख्या दररोज वाढतीय याची नाही तर पाकिस्तानचा आकडा आपल्यापेक्षा कमी असल्याची चिंता जास्त भेडसावतेय.
हेही वाचा : हमीद पर उम्मीद : कोरोनाचं औषध सिप्ला शोधेल असं जगाला का वाटतं?
अमेरिकेतंही हेच चालूय. अमेरिकन पब्लिक मीडिया म्हणजे एपीएमने अमेरिकेतल्या महत्त्वाच्या २० राज्यांत ‘द कलर ऑफ कोरोना वायरस’ असं एक संशोधन केलंय. अमेरिकेत कृष्णवर्णीयांची संख्या आहे लोकसंख्येच्या १३ टक्के. पण कोरोना बळींमधे ३२ टक्के लोक कृष्णवर्णीय आहेत, अशी धक्कादायक माहिती या संशोधनातून समोर आलीय.
सिनेटर एलिझाबेथ वॉरेन आणि रिप्रेझेंटेटिव अथाना प्रेसले यांनीही आरोग्यमंत्री अलेक्स अझर यांना पत्र एक लिहिलंय. त्यामधे कृष्णवर्णीयांबाबतीत वैद्यकीय सेवांमधे होत असलेल्या भेदभावासंदर्भात खुलासा मागितलाय. ५ एप्रिलला द न्यूयॉर्क टाइम्समधे सोशल डिस्टसिंग इन प्रिविलेज या हेडिंगखाली चार्ल्स एम.ब्लो यांचा एक लेख छापून आलाय. त्यात कृष्णवर्णियांना हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे कोरोनाच्या झळा मोठ्या प्रमाणात बसत असल्याचं वर्णन त्यांनी केलंय.
इतर न्यूज चॅनेलवरच्या बातम्यांनुसार कृष्णवर्णीयांच्या मृत्यूचं प्रमाण ४० टक्क्यांपर्यंत असून शिकागो, लुसियाना आणि मिसिसिपी प्रांतांमधे हे प्रमाण ७० टक्के तर मिशिगनमधे ५२ टक्क्यांपर्यंत आहे. मिशिगनची राजधानी असलेल्या लॅनसिंग इथं तर लॉकडाऊन मोडून हजारो लोक आंदोलनासाठी रस्त्यावर उतरलेत.
युरोपात वेगळीच गोष्ट चालूय. ५ जी तंत्रज्ञानाच्या रेडिओ लहरींमुळे कोरोना विषाणूंची वाढ जलद गतीने होते, असा मेसेज इंग्लंडच्या बर्मिंगहॅम, लिवरपूल आणि आयर्लंडच्या बेलफास्ट भागात वायरल झालाय. त्यामुळे लोकांनी संतापाच्या भरात ३० मोबाईल टॉवर पेटवले. ८० टेक्निशियनला याची झळ बसली.
भारतातही तबलीगी मरकजच्या अक्षम्य बेपर्वाईमुळे कोरोनाचे पॉजिटीव पेशंट पसरले. पण त्यानंतर कित्येक वर्षांपासून चालणाऱ्या हिंदू मुस्लिम भेदाचा ब्लेमगेम यावेळीही पहायला मिळाला. फेक न्यूज वायरल व्हायला फार वेळ लागत नाही. म्हणून कोरोनाविरोधातल्या युद्धाला सामाजिक, धार्मिक भेदभाव आणि सोशल मीडियावरच्या फेक न्यूजची मोठी झळ बसली.
देशात अनेक ठिकाणी वैद्यकीय पथक आणि पोलिसांवर हल्ले करण्यात आले. कोरोना बाधितांसोबतच संशयितांना आणि कोरोनाची लागण झालेली नसणाऱ्यांनाही समाजानं वाळीत टाकण्याचे प्रकार घडले. डॉक्टर आणि नर्सेस या जीवनदूतांना ड्यूटीनंतर घरी येण्याला त्यांच्या शेजारच्यांनी विरोध केला. समाजमनाने सद्भावना आणि माणुसकी यांनाच क्वारंटाइन केल्याची अशी अनेक उदाहरणं आहेत.
हे कोरोना स्पेशलही वाचा :
लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?
कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?
बाहेरून आणलेलं सामानं वायरस फ्री कसं करावं?
कोरोनाचा पेशंट वेंटिलेटरवर किती काळ जिवंत राहतो?
ग्लोव्ज घातल्याने कोरोनापासून आपलं संपूर्ण संरक्षण होतं?
कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?
एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?
मरणाचं भय संपून जगण्याची चिंता भेडसावणारे अभिनेते आणि राजकारणी कमल हसन यांनी स्थलांतरीत मजुरांना चक्क मानवी बॉम्ब म्हणून घोषित केलं. या लाखो मजुरांची डेथविश मागत विध्वंसक आंदोलनं भारतभर चालू आहेत.
या सगळ्या समाजद्रोही घटनांना ‘वॉर अगेन्स्ट कोरोना वॉरिअर्स’ असंच समाज विघातक स्वरूप प्राप्त झालं. कोरोनाच्या सामाजिक युद्धात धार्मिक आणि सामाजिक मतभेदाची 'आयसोलेटेड मेंटॅलिटी' सांगणारी अदृश्य पण अभेद्य भिंत उभी राहिलीय.
अहमदाबादच्या सिविल हॉस्पीटलमधे कोरोनाग्रस्तांसाठीही हिंदू-मुस्लिम असे स्पेशल वॉर्ड केल्याची बातमी आली. यामुळे तर सोशल डिस्टसिंगचं रूपांतर सोशल डिस्टर्बिंगमधे झाल्याचा सोशल माइंडसेट आपण अगदी मूर्त स्वरूपात साकार केलाय.
या सगळ्या घटनांसोबतच अनेक आदर्शही घातले जातायत. विशाखापट्टणमच्या मॅटर्निटी लिव म्हणजे मातृत्व रजेवर असणाऱ्या पालिका आयुक्त जी. सृजना २२ दिवसांच्या बाळासह कामावर हजर झाल्या. कोलकात्यात डॉ. कौशिक रॉय चौधरी यांनी अडलेल्या गर्भवतीची विनाशुल्क प्रसुती केली. त्या बाळाचं कोरोनाश म्हणजे कोरोनाचा नाश करणारा असं नाव ठेवलं गेलं.
सोशल मीडियामुळे प्रसिद्ध झालेल्या बेळगावच्या नर्सचं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं. अंबाजोगाईत विहिरीत पडलेल्या २ वर्षाच्या जहीद सय्यदला अथर्व जहागीरदारनं वाचवलं. औरंगाबादेत सुनिल राजपूत यांच्या अंत्यसंस्काराला नातेवाईक नव्हते तर मोहम्मद फरहद खान आणि मोहम्मद रियाज धावून आले. तुळजापूर तालुक्यातल्या मसला खुर्दचे शेतकरी चंद्रकांत नरवडे यांनी द्राक्ष पिकाला भाव आला नाही तरी मुख्यमंत्री निधीला १ लाखाची भरभरून मदत केली.
या समाजातील दरी सांधणाऱ्या आणि कर्तव्यनिष्ठेचा आणि दातृत्वाचा मूर्तिमंत आदर्श उभ्या करणाऱ्या अनेक घटनांकडे मीडियाचं म्हणावं तसं लक्ष गेलं नाही. उलट दुर्लक्षच झालं. कानाडोळा केला गेला. कदाचित त्या वेळी आपण एक किलो गहू आणि तांदळातले दाणे मोजत पाकिस्तानचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री फवाद चौधरींच्या ‘इंडिया आणि लॉक डाऊन’च्या चुकलेल्या स्पेलिंगची खिल्ली उडवत होतो.
पाकिस्तानला 'हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन पाहिजे, पण त्यांना त्याचं साधं स्पेलिंग नीट लिहिता येत नाही, याचे मीम शेअर करण्यात आपण खूप बिझी होतो. इटली आणि अमेरिकेत भारतापेक्षा कैक पटीने अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा असूनही त्यांची परिस्थिती हाताबाहेर कशी गेली आणि चीन कसा वैश्विक विलन आहे किंवा डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याच्यावर कोणती मोठी कारवाई करावी या आंतरराष्ट्रीय वादग्रस्त विषयांवर अगदी हमरीतुमरीवर येऊन वाद घालत होतो.
हेही वाचा : क्वारंटाईनमधेही लोकांना जातीची माती खाण्याची अक्कल कुठून येते?
आता लॉकडाऊनचा दुसरा टप्पा तरी आपण गांभीर्याने घ्यायला हवा. न्यूज चॅनेलच्या टीआरपी हव्यासापोटी कोरोना ब्रेकिंगचा जोरदार मारा होतोय. त्यासोबतच सोशल मीडियावरचे कोरोनाग्रस्तांचे तडफडून होणाऱ्या मृत्यूचे फेक वीडिओ काळजात धडकी भरवतात. फॅक्ट क्रेसेंडोच्या हेल्पलाइनवर हजारो धास्तावलेले जीव आपली भीती व्यक्त करत होते.
बिथरलेल्या मानसिकतेतूनच नाशिकला कोरोना झाल्याचे सेल्फ कन्फर्मेशन करत एका युवकाने स्वत:ला या 'कोरोना'मयी निष्ठूर जगातून कायमचंच आयसोलेट केलं. अकोल्याच्या सर्वोपचार रुग्णालयातल्या भेदरलेल्या कोरोना बाधिताने काऊंन्सलरचे सगळं मार्गदर्शन नाकारत अंतिम मार्ग निवडला. शेतमाल विक्रीच्या चिंतेतून औरंगाबादला एका शेतकऱ्याने आपलं आयुष्यच कायमचं लॉकडाऊन केलं. मानासिक आधारासाठी आम्हाला हजारो कॉल येत असल्याची माहिती राष्ट्रीय मानासिक स्वास्थ संस्थेचे संचालक बी. एन. गंगाधर यांनी दिलीय.
ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली खात्री न करता चुकीची बातमी देऊन वांद्रे मधल्या मजूरांच्या गर्दीस कारणीभूत ठरल्याबददल एका खासगी वाहिनीच्या बातमीदारास अटक झाली. पण नॅशनल ब्रॉडकास्टींग असोशिएशनने त्याच्यावरचे गुन्हे मागे घेण्याची मागणी केलीय. सगळ्या न्यूज चॅनेलना कळकळीची विनंती आहे की त्यांनी बघणाऱ्याला धडकी भरवणारं नाही तर लोकांना माहिती देणाऱ्या बातम्या दाखवाव्यात.
सगळ्या मीडियानं सगळ्यात आधी कोरोना बळींची संख्या न सांगता कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या सांगावी. या छोट्याशा सुधारणेने कोरोना बळींची संख्या कमी होणार नाही. पण किमान कोरोनाच्या मानसिक बळींची संख्या निश्चितच कमी होईल.
हेही वाचा :
हात धुताना साबण वापरायचा की सॅनिटायझर?
अमेरिकेत ट्रम्प निवडून येणं हीच असेल जगासाठी मोठी दुःखद बातमी
बेरोजगारीतही भारतातल्या मध्यमवर्गानं सांप्रदायिकतेला रोजगार बनवलं
ग्रेट लॉकडाऊन: आत्ताची आर्थिक मंदी १९३०च्या जागतिक महामंदीहून वाईट
(लेखक अमोल भांडवलदार हे शिक्षक असून औरंगाबादचे रहिवाशी आहेत.)