आजच्या काळात प्रेम हे कुठेतरी हरवलेलं दिसतंय. तरुणाईला आकर्षण आणि प्रेम यामधला फरक समजत नाही. आजच्या तरुणाईला स्पेस हवी असते. पण ही स्पेस घेताघेता ते एकमेकांपासून कधी दुरावतात, ते समजतही नाही. ग्लोबल जगासोबत वेगाने दौडणाऱ्या या तरुणाईने तितकीच वेगवान स्वरूपात आपल्या प्रेमाची व्याख्या केलेली दिसते.
काळानुसार माणसाच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शारीरिक, भावनिक गरजा बदलत जातात. त्यात अनेक स्थित्यंतरं घडून येतात. तशीच ती प्रेमातही दिसू लागलीयत.
ग्लोबल जगात प्रेमाची व्याख्या झपाट्याने बदलतीय. कबुतर इतिहास जमा होऊन बराच काळ लोटलाय. त्याजागी पत्रं आली. आता त्याचीही जागा इन्स्टाग्राम, फेसबूक, वॉट्सअॅप, इमेल वगैरेंनी बळकावलीय.
इंटरनेटचं जग आभासी आहे. जगाला कवेत घेणाऱ्या या माध्यमांनी भावनांनाही तितकंच आर्टीफीशीयल स्वरुप दिलंय. सौंदर्यातून आकर्षण आणि त्यातून वाढीस लागलेल्या कुतुहलाला, प्रितीची जोड मिळाली की तरुणांना प्रेमाची जाणीव होतेय.
पूर्वी सेक्शुअॅलीटी हा प्रेमाचा आधार नव्हता. प्रेमवृध्दीची ती साधना होती. अलिकडे प्रेमाची जागा सेक्स सेलिब्रेशन किंवा त्यातून आलेल्या सेक्शुअल फस्ट्रेशनसारख्या टोकाच्या मानसिक विक्षिप्ततेने घेतलीय. हा वेडेपणा प्रेमातून आलाय की त्याला फास्ट फूड कल्चरच्या विकृत अवताराने आपल्या कवेत घेतलंय, हे शोधावं लागेल.
हेही वाचा : आमच्या प्रेमाचा एक तर सैराट होतो नाहीतर काकण!
आजच्या काळात प्रेम हे कुठेतरी हरवलेलं दिसतंय. तरुणाईला आकर्षण आणि प्रेम यामधला फरक समजत नाही. आजच्या तरुणाईला स्पेस हवी असते. पण ही स्पेस घेताघेता ते एकमेकांपासून कधी दुरावतात, हे समजतही नाही. ग्लोबल जगासोबत वेगाने दौडणाऱ्या या तरुणाईने तितकीच वेगवान स्वरूपात आपल्या प्रेमाची व्याख्या केलेली दिसते.
पॉर्न फिल्म, त्याला जोड देऊन आलेल्या नव्या कन्सेप्ट प्रेमाला वेगळ्या टप्प्यावर आणताहेत. कँपसमधल्या डिस्कशनमधे प्रेमाच्या गॉसिपची जागा सेक्शुअल कमेंट्सनी घेतलीय. या कमेंट्स म्हणजे प्रेमभावना नाही. त्यातली नैसर्गिकता बाजूला ठेवली तर आलेला अतिरेक हा दुर्लक्ष करण्यासारखा नाही.
आमच्या मागच्या पिढीचं प्रेम लैंगिक अभिव्यक्तीला घाबरत होतं, हे एकवेळ खरं. पण त्याने मर्यादा ओलांडून प्रेमाला वासनेच्या चौकटीवर रेटलं नव्हतं. मुलांचे वॉट्सअॅप ग्रुप्स कँपसच्या गॉसिपपेक्षा नको त्या कमेंट्सनी भरलेले असतात.
सेक्शुअल गोंधळातल्या प्रेमाच्या अभिव्यक्तीला आलेलं हे स्वरुप हे फक्त मुलांपर्यंत मर्यादीत राहिलेलं नाही. त्याने मुलींनाही कवेत घेतलंय. मुलींनी लैंगिक अभिव्यक्ती स्वीकारलीय हे स्वागतार्ह आहे. पण लैंगिक स्वैराचाराला प्रेमाचं आणि निवडीला अनेकानेक ब्रेकअपचे पर्याय देणं हे थोडंसं पटणारं नाही.
मागच्या पिढीच्या प्रेमाला कुठलीही परिभाषा नसायची. मागच्या पिढीच्या प्रेमाची व्याख्या, प्रेमाचं स्वरूप हे खूप वेगळं होतं. त्यामधे भावना दडलेल्या होत्या. त्यामधे सुखदुःख, काळजी, एकमेकांच्या हिताची जाणीव, एक दुसऱ्याविषयी विश्वास-आदर, आपुलकी, समजूतदारपणा असायचा.
हेही वाचा : हो, आमच्या प्रेमाचा रंग करडा आहे
आज कँटीनवरच्या भांडणालाही ब्रेकअपचे ऑप्शन देऊन हाताळलं जातं. ज्या पिढीच्या खांद्यावर बसून हे स्वातंत्र्य मिळवलंय त्या पिढीच्या नैतिकता आणि निरागसतेला आम्ही कुठेतरी काळीमा फासतोय, असं म्हणायला बराच वाव आहे.
पूर्वी प्रेम सरळ आणि पारदर्शक असायचं कारण चिठ्ठी पाठवण्याकरता मध्यस्थ तर बोलण्याकरता टेलीफोन तेही मर्यादित आणि भेटण्याकरता चोरट्या वेळा असायच्या. त्यातून आकर्षण, एकमेकांविषयीचं कुतूहल आणि स्वप्नं अबाधित राहायची. आज कुतूहल, आकर्षण संपलंय. वेळेआधी स्वप्नांना ओरबाडून आम्ही मोकळे होतोय.
पूर्वी कँपसने अनेक कलाकार दिले. कवी, साहित्यिक लेखक दिलेत. कँपस आज त्या नैसर्गिक सर्जनाला मुकलाय. पोरं स्वतःला आणि स्वतःसोबत इतरांना घडण्याघडवण्याचा वेळ द्यायला तयार नाहीत. एकमेकांना आणि एकमेकांसोबत जोडलेल्या व्यक्तींना वेळ देण्याचं टाळणारी आमची पिढी आमच्या मागच्या पिढीसमोरच त्यांच्यापेक्षाही अधिक वयात आल्याच्या अविर्भावात वावरतेय.
हेही वाचा : आमच्या प्रेमाचा एक तर सैराट होतो नाहीतर काकण!
इंटरनेटचं युग आणि तारुण्यांच्या सानिध्यात तरुण पिढी झपाटल्यागत खोट्या प्रेमाच्या नावावर नवनवीन प्रयोगाला चालना देण्याचं काम जोमात करतेय. खरं प्रेम, खोटं प्रेम,लिव इन, ब्रेकअप,पॅचअप नवनवीन शब्द आपल्याला एका निराळ्या भावविश्वाची अनुभूती देतायत.
प्रेम ही सौंदर्यासंबंधीची कल्पना की कामवासनेची अतिरेकी भावना या असंख्य न सुटणाऱ्या प्रश्नांचा गुंता कधीतरी आपल्या समोर समस्येचं विक्राळ स्वरुप घेऊन येईल हे मात्र नक्की. केवळ शारीरिक सुख किंवा इतर काही स्वार्थ मनात ठेऊन प्रेम करणं चुकीचं आहे. त्यामुळे प्रेमात धोका मिळाल्यास किंवा अपयश आल्यास केवळ विकृती जन्माला येते.
अशा भावनेला प्रेम म्हणता येणार नाही. प्रेमात स्वार्थ नसावा. प्रेमात काहीच नाही मिळालं तरी चालेल. पण समोरच्या व्यक्तीपर्यंत फक्त आपल्या भावना पोचल्या, तरी पुष्कळ असतं. त्यात समर्पण असतं. या समर्पणाची भावना नव्या पिढीने जपायला हवी.
हेही वाचा :
लव ऍट फर्स्ट साईट सिनेमातच बरं!
प्रेमाची नाती तोडतंय सोशल मीडिया
(लेखक लातूरमधून इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतायत.)