'ती'ला हवंय तिरंग्याचं पोषण

१० सप्टेंबर २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


कुटुंबातल्या सगळ्यांच्याच पोषणाची जबाबदारी घरातल्या स्त्रीची असते. मात्र, तिच्या पोषणाकडे आपण सतत कानाडोळाच करत आलो आहोत. भारतातल्या निम्म्याहून जास्त महिला कुपोषित आहेत. सध्या राष्ट्रीय पोषण आठवडा चालू आहे. त्यानिमित्ताने स्त्रियांच्या पोषणाची गरज समजून घ्यायला हवी.

शेतीचा शोध बाईने लावला असं म्हणतात. सगळ्या मानवजातीच्या पोषणाची जबाबदारी कुणी न देताच स्त्रियांनी पार पाडली. आईच्या पोटात असतानाच गर्भाशयाच्या वारेतून बाळाला हवं ते सगळं पोषण मिळत असतं. जन्माल्या आल्यानंतरही लगेचच निसर्गाने आईकडे बाळाच्या पोषणाची व्यवस्था करून ठेवलेली असते. आईचं दूध आपली रोगप्रतिकारक शक्ती बनतं. मूल मोठं होतानाही त्याच्या वाढीसाठी त्याला खायला प्यायला काय द्यायचं हे आईच ठरवत असते. फक्त मुलाचीच नाही तर नवरा, सासू सासरे आणि कुटुंबातल्या प्रत्येक माणसाच्या पोषणाची जबाबदारी घरातल्या स्त्रीनंच उचलेली असते.

पण त्या स्त्रीच्या पोषणाचं काय? सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात नॅशनल न्युट्रीशन वीक म्हणजेच राष्ट्रीय पोषण आठवडा साजरा केला जातो. भारतातली प्रत्येक दुसऱ्या महिलेला ऍनिमिया असतो. दर तीन स्त्रियांचं वजन त्यांच्या उंची आणि वयाच्या तुलनेत अत्यंत कमी असतं आणि या सगळ्याचा परिणाम स्त्रीच्या बाळंतपणावर आणि नवजात बाळावरही होतो. भारतातल्या कुपोषितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कारण, स्त्रीच्या पोषणाकडे फारसं लक्षं देण्याची गरज आपल्याला वाटत नाही.

हेही वाचा : चला, समतेच्या सॅनिटायझरनं पुरुषीपणाचा वायरस मारून टाकूया

कुपोषणाचं दुष्टचक्र

आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याकडून साधारण दर १० वर्षांनी राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण घेण्यात येतं. लोकसंख्या आणि आरोग्य या विषयाबद्दलची अनेक महत्त्वाची माहिती या सर्वेक्षणातून हाती लागते. २००५ मधे झालेल्या सर्वेक्षणापेक्षा ऍनिमिया असणाऱ्या महिलांमधे फक्त २ टक्के सुधारणा झाल्याचं २०१५ मधे झालेल्या चौथ्या सर्वेक्षणात समोर आलं. ही गोष्ट काळजी करण्यासारखीच आहे.

या चौथ्या सर्वेक्षणानुसार भारतातल्या जवळजवळ ५३ टक्के महिला ऍनिमियाने ग्रस्त आहेत. त्यातल्या ४० टक्के महिलांना अगदी सौम्य, १२ टक्के महिलांना माफक प्रमाणात तर १ टक्के महिलांना अतिशय तीव्र ऍनिमियाची लक्षणं दिसून येतात. स्तनपान करणाऱ्या ५८ टक्के महिलांनाची अवस्थाही ऍनिमिया होण्याइतकी वाईट असते. याच सर्वेक्षणानुसार, बाळांत होणाऱ्या एक चर्तुथांश महिला कुपोषित असतात. १८.५ केजी/एम इतका कमी बॉडी मास इन्डेक्स असतानाही त्या रोजची कामं, बाळंतपण सहन करतात. साहजिकच अशा महिलांची मुलंही जन्मतःच अशक्त, कुपोषित जन्मतात. यातूनच कुपोषणाचं दुष्टचक्र सुरू राहतं.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोरोनाचे पेशंट या देशांत सापडले नाहीत की काही झोल आहे?

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?

आरोग्यापेक्षा कुटुंबाचा आनंद महत्त्वाचा

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून पुढे आलेली ही माहिती हे फक्त आहाराचा आणि खाण्यापिण्यापुरतं मर्यादित आहे का हाच प्रश्न विचारत आहे. भारतात नैसर्गिक साधनसंपत्तीची कमी नाही. फळं, कंदमुळं, रानभाज्या अशा त्या त्या भागात मिळणाऱ्या अनेक गोष्टी पोषणासाठी उपलब्ध आहेत. पण त्यामागचं अर्थकारण आणि अज्ञान स्त्रियांच्या कुपोषणाला कारणीभूत ठरतं. एवढंच नाही तर परंपरेने स्त्रियांसाठी घालून दिलेले नियम, पुरूषसत्तेत जगताना होणारी त्यांची घुसमट हे देखील कुपोषणाला तितकेच कारणीभूत आहेत.

भारतात आजही घरातल्या सगळ्यांचं जेवण झाल्यावर घरातली स्त्री जेवते. सगळ्यांना पुरून तिच्यासाठी जे थोडंथोडकं उरेल तेवढंच खाते. घरातलं शिळं अन्न संपवण्याची जबाबदारीही त्यांचीच असते. अगदी शहारतल्या घरांमधेही कमी अधिक प्रमाणात हेच चित्रं दिसतं. आपल्या आरोग्यापेक्षा जास्त कुटुंबातल्या सगळ्या लोकांच्या आवडीनिवडी आणि मर्जी संभाळणं गरजेचं आहे, हेच आपण आपल्या मुलींना शिकवत आलोत. 

भारतातलं बालविवाहांचं प्रमाण पाहिलं तरी कुपोषणाचं कारण लगेच लक्षात येईल. लहान वयात, व्यवस्थित वाढ झालेली नसताना त्यांची लग्न होतात. सासरच्या घरात होणारी हेळसांड, नवऱ्याकडून होणारी मारहाण, सध्याच्या स्त्रियांवर लादलेली घर आणि ऑफिस दोन्ही सांभाळण्याची जबाबदारी  हे सगळं  त्यांच्या कुपोषणाला हातभार लावणारंय.

हेही वाचा : आजच्या किती लेखिका आजूबाजूच्या घटनांवर भूमिका घेतात? : अरुणा सबाने

तिरंग्याचं पोषण

आता हे कुपोषण टाळण्यासाठी सरकारकडून अनेकदा वेगवेगळ्या योजना, धोरणं राबवली जायता. अंगणवाडी आणि शाळांमधे गर्भवती स्त्रिया, लहान मुलांना मिळणाऱ्या पौष्टिक आहारापासून ते १९९३ मधे आलेल्या राष्ट्रीय पोषण धोरणापर्यंत भरपूर प्रयत्न सरकार करत आहे.  दोन वर्षांपूर्वीच ८ मार्च महिला दिनाच्या दिवशी पोषण अभियान नावाने नवीन योजना सुरू झालीय. मात्र या योजनांमधून मिळणाऱ्या विकासाची गाडी फारच संथपणे चाललेली आहे. त्यामुळे त्याआधी आपण आपल्या पातळीवर काही गोष्टी करायला हव्यात. घरच्या घरी, कुठलाही खर्च न करता आपण महिलांचं पोषण कसं सुधारू शकतो यासाठी प्रयत्न करायला हवेत.

स्थानिक पातळीवर आपापल्या गावात, शहरात अगदी स्वस्त दरात काय पोषक अन्न मिळू शकतं हे शोधून त्याचा वापर वाढवावा लागेल. यासाठी थोडासा अन्नाचा अभ्यास करावा लागेल. बाळंतपण, मासिक पाळी यामधे शरीरातून बाहेर पडणाऱ्या रक्ताची भरपाई आपल्याला करायची आहे. ती केली नाही तर ऍनिमिया होऊ शकतो. यासाठी गावात अगदी स्वस्त दरात उपलब्ध असणाऱ्या हिरव्या भाज्या जास्तीत जास्त खाल्ल्या गेल्या पाहिजेत.

हिरवं खाऊन रक्त लाल होतं हा मंत्र लक्षात ठेवावा लागेल. अगदी भाज्या विकत घेणं शक्य नसेल तर हळीव हा खूप स्वस्तात मिळणारा पदार्थ खाऊन आपण ऍनिमियाला दूर पळवू शकतो. तसंच बीट, गाजर यासारखी केशरी, लाल कंदमुळं, भात, दूध यासारखे पांढरे पदार्थ, हिरव्या पालेभाज्या अशा तिंरग्याच्या रंगातलं पोषण आपल्याला हवंय, एवढं लक्षात ठेवायला हवं.

स्त्रियांचं आरोग्य त्यांच्या राहणीमानावर मोठा प्रभाव टाकतं. पण पोषण ही गोष्ट फक्त खाण्यापिण्यापुरती मर्यादित नाही. पोटातल्या बाळाला पोषण देताना गर्भाशयात उबदार, सुरक्षित वातावरणही तयार असतं. अशाच, चांगल्या वातावरणाची गरज स्त्रीलाही आहे. घरात भेदभाव आणि शारीरिक किंवा शाब्दिक हिंसा सहन करणाऱ्या स्त्रीनं कितीही चांगलंचुंगलं खाल्लं तरी ते कधीही अंगी लागणार नाही. पोषक आहारासोबत पोषक वातावरणंही स्त्रियांना मिळायला हवं. मुलींना शिक्षण देणं, स्वतःच्या पायावर उभं राहतील इतकं आत्मविश्वासी बनवणं, घरात सन्मानाची वागणूक देणं, बाळंतपणात आणि इतर वेळीही घरातल्या कामांचं ओझं वाटून घेणं या गोष्टी चांगलं वातावरण तयार करतात.

हेही वाचा : 

कोरोनाचं युद्ध लढणाऱ्या आणि जिंकणाऱ्या महिला लीडर

‘थप्पड’च्या आरशात दिसणारा पुरुष आपण पाहिलाय का?

क्रिकेट म्हणजे पुरुषांचा खेळ, हा समज खोटं ठरवणाऱ्या बायका

पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्र्यांनी देशातल्या महिलांना काय दिलं?

गणेश देवी सांगतायत, भारतातल्या जातव्यवस्थेच्या निर्मितीची कुळकथा

बायका आंदोलक बनून रस्त्यावर उतरतात, त्याचा अर्थ पुरुष कसा लावणार?