चला आपणही साजरी करूया गुगलपौर्णिमा

०५ जुलै २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


आज इंटरनेट कोण वापरत नाही? आणि इंटरनेटवरच्या माहितीवर कोणा एकाचा अधिकार नाही. ही माहिती अगदी सगळ्यांसाठी उपलब्ध आहे. आपल्या प्रत्येक प्रश्नावर गुगलकडे उत्तर आहे. म्हणजे एक प्रकारे गुगल आपल्याला ज्ञान देत मग तो आपला गुरु झाला. त्याला थँक्स बोलण्यासाठी गुरूपौर्णिमेच्या दिवशी गुगलपौर्णिमा साजरी केली होती.

कांदिवली हे मुंबईचं उपनगर तसं अगदीच दुर्लक्षित. कुणी दखल घ्यावी असं तिथे सहसा काही घडत नाही. मात्र दोन वर्षांपूर्वी झालेला एक कार्यक्रम अपवाद ठरला. म्हटलं तर दुर्लक्ष करावं, म्हटलं तर लक्षवेधी ठरावी, अशी गूगलपौर्णिमा तिथे गुरुपौर्णिमेच्या दिवशी साजरी झाली.

कांदिवली पूर्वेच्या हनुमाननगर परिसर आहे. त्याला बाहेरचे लोक झोपडपट्टी म्हणतात. तिथे प्रशांत पेडणेकर हा तरुण गेली वीस वर्षं दृष्टी नावाचा एक ट्युशन क्लास चालवतो. शाळा कॉलेजात शिक्षकाची नोकरी मिळवण्याची संधी असूनही तो क्लासच चालवत राहिला. या क्लासमधे नेहमीच वेगवेगळे प्रयोग सुरू असतात. मुलं अभ्यासक्रमाच्या बाहेरचंही खूप शिकतात. त्यातलाच एक प्रयोग होता, गूगलपौर्णिमा.

संतविचारांचा गुगलपौर्णिमेशी संबंध

कुठेही अडलो की गुगल मदतीला येतं, याचा सतत अनुभव प्रशांत घेत होता. त्याने ज्येष्ठ संपादक संजय आवटेंच्या एका भाषणात गुगल हाच आजचा गुरू असल्याचं ऐकलं. ते त्याला एकदम पटलं. त्याने ते भाषणातलं वाक्य त्याच्या परिसरात राहणाऱ्या मुलांपर्यंत पोचवायचं ठरवलं. आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी गूगलपौर्णिमा पहिल्यांदाच साजरी झाली. गूगलपौर्णिमा हा शब्द त्याचाच. गुगलला गुरूशी अनेकांनी जोडलं होतं. पण गुगलला पौर्णिमेशी त्यानेच जोडलं. कार्यक्रमावेळी तो म्हणाला होता, मला गुगल गुरू वाटतो. मला त्याला थँक्स म्हणायचंय. म्हणून ही गूगलपौर्णिमा आहे. इतर कुणाला दुसरा कोण गुरू वाटत असेल तर त्याने त्याची गुरूपौर्णिमा करावी.

दोन वर्षांपूर्वी गुरुपौर्णिमेच्या दिवशी समतानगर विद्यामंदिर शाळेचा हॉल मुलांनी भरला होता. साधारणपणे चारशेक मुलं होती. आठवी ते बारावीपर्यंतची. पहिल्या सत्रात पत्रकार, कवी, कीर्तनकार शामसुंदर सोन्नर यांचं कीर्तन होतं. कीर्तन माहीतच नसणारी मुलं कितीवेळ ऐकतील असा प्रश्न होता. पण कीर्तन अडीच तास रंगलं. महाराजांबरोबर मुलांनी नुसत्या टाळ्याच वाजवल्या आणि गजरच केला नाही, तर ती `तुकाराम तुकाराम`च्या गजरावर फेर धरून नाचलीदेखील.

`असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे`, असा साधाच अभंग महाराजांनी कीर्तनात घेतला होता. त्यात अभ्यासाचं महत्त्व वगैरे सांगताना त्यांनी संतांची बंडखोरी सहज सोपी करून सांगितली. सातशे वर्षांपूर्वी कोंडलेलं ज्ञान वारकरी संतांनी सर्वांसाठी उघडं करून दिलं, याचे दाखले दिले. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणप्रसाराच्या कार्याची संतांच्या विचारांशी असलेला सांधा त्यांनी उलगडून सांगितला. संतांनी ज्ञानाच्या अधिकारावर असलेली जात, धर्म, वय, लिंग यांची बंधनं दूर केली. आता गुगलसारख्या तंत्रज्ञानामुळे तेच काम अधिक विस्तारीत स्वरूपात होतंय, असं सांगत त्यांनी संतविचारांचा गुगलपौर्णिमेशी असलेलं नातं सांगितलं.

हेही वाचा : उपासना करणाऱ्या भक्तांसाठी देव म्हणून अवतरलेली पहिली मूर्ती म्हणजे गुरू

इंटरनेट ज्ञानाचा मोठा साठा

दुसऱ्या सत्रासाठी प्रसाद शिरगावकर खास पुण्याहून आले. आयटीवाल्यांना ट्रेनिंग देत जगभर फिरणाऱ्या शिरगावकर यांनी आपले अनुभव या मुलांशी शेअर केले. गुगलचा अधिकाधिक चांगला वापर कसा करून घेता येईल, असा त्यांचा विषय होता. त्यासाठी त्यांनी आकर्षक माहिती पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन बनवलं होतं. त्यांचं कॉलेजचं शिक्षण हे कॉमर्समधलं. तरीही ते आयटीमधल्या तज्ज्ञांचे प्रशिक्षक बनू शकले. कारण त्यांचा गुरू गुगल होता. त्यांनी सांगितलं, गुगल हे केवळ माहितीसाठी सर्च करणारं सर्च इंजिन नाही, त्याही पलीकडे खूप काही आहे.

कार्यक्रमातलं शेवटचं सत्र विद्यार्थ्यांशी गप्पांचं होतं. झी चोवीस तासच्या वेबसाइटचे संपादक प्रशांत जाधव आणि सायबर गुन्हे या विषयातील तज्ज्ञ निखिल महाडेश्वर हे दोघे मंचावर होते. मुलांकडे प्रश्न खूप होते. दोघे छान सोप्या भाषेत उत्तरं देत होते. इंटरनेट वापरताना भाषेमुळे येणाऱ्या अडचणी, सोशल नेटवर्किंगवरील वादग्रस्त विषयांचे परिणाम, सायबर गुन्ह्यांचा शोध, इंटरनेटमधील करियर, सोशल मीडियामधून कमाईचे मार्ग, मोबाईलचं व्यसन अशा विषयांवर मुलांनी प्रश्न विचारले. फेसबूक आणि व्हॉट्सअप म्हणजे इंटरनेट नाही. त्यापलीकडे इंटरनेटवर ज्ञानाचा मोठा साठा आहे, हे कळणं मुलांसाठी महत्त्वाचं ठरत होतं.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?

कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?

हात धुण्यासाठी साबण वापरायचा की सॅनिटायझर?

साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं

आपल्याला घरात थांबायचं इतकं टेन्शन का आलंय?

कोरोनाचा पेशंट वेंटिलेटरवर किती काळ जिवंत राहतो?

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

शिक्षकांचं योगदान मोठं

मुंबईत मोठमोठे कार्यक्रम होत असतात. त्या तुलनेत गुगलपौर्णिम छोटी होती. एका कोपऱ्यात शांतपणे हा कार्यक्रम झाला. दर गुरुपौर्णिमेला मुलांकडून गुलाबाची फुलं घेणाऱ्या एका शिक्षकाला गुरुविषयी नव्याने विचार करावासा वाटतो आणि तो विचार त्याचे विद्यार्थीही स्वीकारतात, यात त्या कार्यक्रमाचं यश होतं. शिकवताना कळतं, शिकवणं असं नसतंच काही. शिक्षकाने मुलांसाठी शिकण्यासाठी अनुकूल वातावरण उभं करणं हे शिक्षकाचं काम असतं. गुगलमुळे ज्ञान मुलांच्या खिशात उपलब्ध आहे. ते मिळवण्याचं भान गुगलपौर्णिमेमुळे मिळालं, तर ते शिक्षकाचं कामच आहे.

शिक्षक तर कुणीही असतो. गुरू महत्त्वाचा. सद्गुरू महत्त्वाचा. माहिती देतो तो शिक्षक. ज्ञान देतो तो गुरू. असं खूप काही सांगत शिक्षकांमधे न्यूनगंड तयार केला जातो आणि माहितीला दुय्यम ठरवण्यात येतं. कोणतीही गुरुपौर्णिमा या तुलनेशिवाय जात नाही. याच विचारांतून गुरूला अवाजवी मोठं करून त्याला शरण जाणं, सर्वस्व अर्पण करणं येतं. श्रद्धेकडून अंधश्रद्धेकडे, विचारांकडून व्यक्तिपूजेकडे वाटचाल होत जाते.

बहुसंख्य वेळा त्यातून शोषणाशिवाय काही घडत नाही. या अशा गुरुंपणामुळे किमान आपल्या देशाने तरी खूप भोगलंय. डोकी बंद आणि रिकामी करण्याची कामंच गुरुपणाच्या स्तोमामुळे होतात. त्यातून विचार शिकवणाऱ्यांचे खून करण्यापर्यंत अधःपतन होतं. त्या तुलनेत शिक्षकांनी आपल्या देशाला खूप काही दिलंय. अनेक पिढ्या घडवल्यात. शिक्षकांचं योगदान धार्मिक, आध्यात्मिक गुरुमंडळींपेक्षा खूप मोठं आहे.

हेही वाचा : गुरुपंरपरेला फाटा दिला म्हणूनच वारकरी संप्रदाय सगळीकडे पोचला

गूगलपौर्णिमा एक छोटंसं बंड

माहिती आचरणात किंवा जीवनात उतरते तेव्हा ते ज्ञान बनतं. माहिती ते ज्ञान हे ट्रान्फॉर्मेशन प्रत्येकाला स्वतःचं स्वतःच करावं लागतं. माहिती नसेल तर ज्ञान संभव नाही. माहिती हा विचारांचा कच्चा माल आहे. त्याचं मोल खूप मोठं आहे. त्याला दुय्यम ठरवणं हा मूर्खपणा आहे. टेक्नॉलॉजीमुळे माहितीवरची, पर्यायाने ज्ञानावरची मूठभरांची मक्तेदारी संपलीय. गुगल अत्यंत साधं आणि सोपं आहे. ते अगदी सहजपणे उपलब्धही आहे. गुगलने टेक्नॉलॉजीवरचीही मक्तेदारीही मोडून काढलीय. त्यामुळे ज्ञानाचे दरवाजे सगळ्यांसाठी उघडे झालेत. या अर्थाने गुगल गुरू आहेच.

गुरूने ज्ञानाचं भांडार सगळ्यांसाठी उघडं करायला पाहिजे. ढग जमीन सुपीक आहे की नापीक याचा विचार न करता सर्वत्र समान वर्षाव करतो, तसं गुरूने करायला हवं असं संत तुकाराम सांगतात. तसं होत नाही. उलट ते ज्ञानाच्या तिजोरीवर नागोबासारखे वेटोळे घालून बसतात. तसे गुरू हे गुरगुर करणारे चार पाय आणि शेपटी नसणारे कुत्रेच आहेत, असंही तुकाराम महाराज म्हणतात. या गुरुपणाच्या निर्बुद्ध अवडंबराविरुद्ध संतांनी बंड केलंय, समाजसुधारकांनी बंड केलंय आणि विचारवंतांनीही बंड केलंय. या बंडांमुळेच जगाचा गाडा अंधाराकडून प्रकाशाच्या दिशेने पुढे गेलाय. गूगलपौर्णिमा हेदेखील असंच एक अगदी छोटंसं बंड आहे, म्हणून महत्त्वाचं आहे.

हेही वाचा : 

कंदील बलुच: पाकिस्तानी महिलांची प्रेरणा

बुवाबाबा, साधू, महाराजांनाही संत म्हणावं का?

इंग्लंड जगजेत्ता आणि न्यूझीलंडला चौक्यांचा चकवा

क्रिकेटची पिढी घडवणाऱ्या आचरेकर स्कूलची स्टोरी

वर्ल्ड कप फायनलमधे जिंकला तो क्रिकेट हा जेण्टलमन्स गेम

महात्मा बसवण्णाः ९०० वर्षांपूर्वी पाळीचा विटाळ झुगारणारा महापुरूष

कोरोनाच्या R0 नंबरवर आपलं, लॉकडाऊनचं भवितव्य अवलंबून आहे?

कोरोना काळात आपल्याला पेशंटचे १७ अधिकार माहीत असायला हवेत!