विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र कुणाला कौल देणार?

२० ऑक्टोबर २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


कॉग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी पश्चिम महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या मनात नेहमीच एक सॉफ्ट कॉर्नर राहिला आहे. मागच्या निवडणुकीत सगळ्या देशभर मोदी लाट असतानाही राष्ट्रवादीनं पश्चिम महाराष्ट्रात आपल्या जागा शाबूत ठेवल्या होत्या. आता पुन्हा लढत अटीतटीची असताना निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र कोणाच्या बाजुनं कौल देईल हे पाहिलं पाहिजे.

विधानसभेच्या निवडणुकीत राज्यातील वजनदार नेत्यांचा भाग म्हणून पश्चिम महाराष्ट्राकडे पाहिलं जातं. या भागात नेहमीच काँग्रेसला मतदारांनी झुकतं माप दिल्याचं दिसून आलंय. पण गेल्या दोन निवडणुकीत या भागात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मागे-मागे फेकली जात असल्याचे निकाल पाहायला मिळाले.

एक तर मोदी लाट, काँग्रेसचे निष्क्रिय झालेले सुस्त राजकारण, गटातटाची फंदफितुरी याचाच प्रभाव निकालामधे दिसला. परिणामी काँग्रेस राष्ट्रवादीच्या जागा कमी झाल्या. आता तशी परिस्थिती राहिली आहे का, असा प्रश्न नक्कीच मनात येऊ शकतो.

या निवडणुकीत एकीकडे सत्ताधारी आपल्यापुढे विरोधकच नाही असा प्रचार करत आहेत. तर दुसरीकडे जर विरोधकच नाहीत, तर सत्ताधारी पंतप्रधानांनाही घेऊन प्रचारात कसे उतरत आहेत अशी विचारणा होताना दिसत आहे. म्हणजेच सत्ताधारी पक्ष ही निवडणूक जेवढी सोपी आहे असं दाखवतंय तशी ती नाहीये.

काँग्रेसला राष्ट्रवादीनं सावरलं

विरोधीपक्ष नेता असलेले विरोधी पक्षातील नेतेच सत्ताधाऱ्यांनी पळवून नेलं. इतरही काही नेत्यांनी भाजप-शिवसेनेच्या वळचणीला हजेरी लावली. काँग्रेसने तर यातून जणू मानच टाकल्याची वक्तव्ये ऐकायला मिळू लागली.

काँग्रेस थकली आहे असं काँग्रेसचेच नेते म्हणतायत. कुणाचा कुणाला पायपोस नाही अशी परिस्थिती काँग्रेसमधे दिसत असताना प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेसनं जान फुंकल्याचं दिसतंय. 

काँग्रेसचे नेते गलितगात्र आणि सैरभैर झालेले दिसत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी 'ईडी'च्या निमित्तानं सत्ताधाऱ्यांच्या विरोधात डरकाळी फोडली. राजकारणाच्या आखाड्यातील अनुभवी पैलवानाची झलक त्यांनी दाखवली. 

हेही वाचा : शरद पवार पावसात भिजल्यानं भाजपचे डोळे ओले होणार?

राष्ट्रवादीच्या गर्दीचं मतांमधे परिवर्तन होणार?

एखाद्या तेल लावलेल्या पैलवानावर पकड मिळवताना प्रतिस्पर्ध्याची जशी अवस्था होते तशी सत्ताधाऱ्यांची झाली असेच यानिमित्तानं म्हणावं लागेल. ईडीच्या कचाट्यातून पवार असे काही सटकले की प्रचारात त्यांनी मोठी आघाडी घेतली. 

पवारांची हीच संजीवनी आधीच राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील उमेदवार आणि कार्यकर्त्यांना मिळाली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभांना तरुणांची गर्दी होताना दिसली आणि अजूनही दिसतेय. आता या गर्दीचे मतांमधे किती परिवर्तन होतं ते पाहावं लागेल.

शरद पवारांसारखं नेतृत्व झंझावाती दौरे करत आहे. त्यापाठीमागं राष्ट्रवादीचा बालेकिल्ला वाचवण्याचं आव्हान आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तसंच राज्याच्या इतर भागातील राजकारणावरची निसटत चाललेली पकड मजबूत करण्याचा पुरेपूर प्रयत्न या निवडणुकीच्या निमित्तानं होतोय. 

शिवसेनेला कमी जागा मिळ्याल्यानं बंडखोरी

दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रात मागच्यावेळेप्रमाणे यावेळीही काँग्रेस-राष्ट्रवादीची वाट लावण्याची जय्यत तयारी भाजप-शिवसेना महायुतीने केली आहे. त्यांच्यातही सर्वकाही अलबेल आहे असं समजणं धाडसाचंच ठरेल.

कारण शिवसेनेला कमी जागा मिळाल्यानं काही ठिकाणी बंडखोरी झाल्याचं चित्र दिसतं. तसंच भाजपमधेही इच्छुकांची गर्दी झाल्यानं नाराजांना शमवण्यात भाजपला कितपत यश आलं हे ही पाहावं लागेल.

हेही वाचा : आपण तरुणांनी मतदान करताना काय विचार करायला पाहिजे?

राष्ट्रवादीची मतदारांची बांधणी महत्वाची

पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसनं १९९९ च्या निवडणुकीत काँग्रेसपासून वेगळं होऊन समांतर संघटना बांधली. तसेच काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादीला बरोबर घ्यावं लागलं. त्यावेळी ही किमया राष्ट्रवादी काँग्रेसला पश्चिम महाराष्ट्राच्या जीवावरच साधली होती हे ही विसरुन चालणार नाही. 

यामधे शरद पवारांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेली साखर उद्योग, सुतगिरणी, खरेदी विक्री संघ, डेअरी उद्योग, शैक्षणिक संस्था, सहकारी सोसायट्या यांमुळे केलेली मतदारांची बांधणी महत्वाची ठरली. 

ही बांधणीच राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येक निवडणुकीत तारक ठरत आलीय. याहीवेळी त्याचाच उपयोग राष्ट्रवादी काँग्रेसला होईल असं म्हणता येईल. 

उदयनराजेंनी दिल्ली महासत्तेलाच झुकवलं

एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभांना गर्दी होताना दिसत असली तरी ऐन निवडणुकीच्या तोंडावर पश्चिम महाराष्ट्रात पक्षाला पडलेली खिंडारे निवडणुकीत पक्ष आणखी क्षीण करताना दिसतायत.

त्यामधे प्रामुख्यानं साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचे नाव घ्यावं लागेल. त्यांनी तर खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपची कास धरली. एवढेच नाही तर लोकसभेची निवडणूकही नाही-नाही म्हणता विधानसभेबरोबरच लावून घेण्याची किमया करुन दाखवली. 

एका अर्थाने दिल्लीतील महासत्तेला झुकवण्याचे कामच त्यांनी यातून केले असेच म्हणावे लागेल. त्यांची ही मुत्सद्देगिरी शिवाजी महाराज यांचे थेट तेरावे वंशज या बिरुदावलीला शोभेल अशीच आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. 

हेही वाचा : पाली भाषा आणि साहित्याचे थोर विद्वान मो. गो. धडफळे

पाटलांबरोबर रंगतदार लढत

असं असलं तरी ही निवडणूक त्यांना भाजपकडून लढवताना म्हणवी तेवढी सोपी नाही याचीही जाणीव राजेंना असल्याचं दिसतं. भाजपच्या चिन्हाखाली प्रचाराची धुरा त्यांनी बंधु शिवेंद्रराजे यांच्यासोबत घेऊन नुकतीच राष्ट्रवादीच्या नावाखाली घेतलेली मते कमळावर आणणं सोपं नाही. त्यामुळेच प्रचाराचा धडाकाच त्यांनी लावलाय. 

नुकतीच पंतप्रधानांची विक्रमी मोठी सभा सातारामधे झाली त्यामुळे त्यांचं नैतिक बळ वाढले आहे असेच म्हणावे लागेल. पण त्यानंतर भर पावसात झालेल्या शरद पवार यांच्या सभाला मिळालेला प्रतिसाद पाहता उदयनराजेंची श्रीनिवास पाटील यांच्यासोबतची ही लढत अधिक रंगतदार होईल हे निश्चित.

पुण्यातला प्रचार राष्ट्रवादीला बळ देणारा

साताऱ्यामधे उदयनराजे यांची फूट ताजी असतानाच सोलापूरमधेही माजी उपमुख्यमंत्री मोहिते पाटील यांच्या घराण्यानं राष्ट्रवादीची साथ सोडली. उस्मानाबादमधे पद्मसिंह पाटील यांनीही राष्ट्रवादीला तिलांजली दिली. त्याचाही परिणाम मते आणि जागांवर होण्याची शक्यता आहे. 

पुण्यातही भाजपने एकीकडे राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना कोथरुडमधून उमेदवारी दिली आहे. सुरक्षित मतदारसंघ म्हणून पाटील कोल्हापूरचे असूनही त्यांना कोथरुडमधून रिंगणात उतरवले जात आहे. त्यातच पुण्यातील एकही जागा शिवसेनेला सोडलेली नाही. सर्वच जागा भाजपचे उमेदवार लढवत आहेत.

अशा परिस्थितीत राष्ट्रवादीला याचा फायदा होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. पवारांचा प्रचार, शिवसेनेतील नाराजी, तसंच कोथरुडसारख्या मतदारसंघात बाहेरचा उमेदवार दिल्याने जर दगाफटका झाला तर भाजपला ही रणनिती चुकल्याचा प्रत्यय येण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंनीही पुण्यात प्रचाराचा जोर लावला होता. याचा एकत्रित परिणाम एका अर्थाने राष्ट्रवादी तसेच काँग्रेसला बळ देणारा ठरल्यास आश्चर्य वाटू नये.

हेही वाचा : नरेंद्र मोदींची शेवटची प्रचारसभा रंगली नाहीच

उदयनराजे गेल्यानं राष्ट्रवादीच्या जागा कमी होणार?

पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार यांना मानणारे मतदार आहेत याचा प्रत्यय २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीतही आला होता. संपूर्ण देशात मोदी लाट असूनही पश्चम महाराष्ट्र त्याला अपवाद ठरला. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या सर्वच्या सर्व ४ जागा या पश्चिम महाराष्ट्रातीलच होत्या हे विसरुन चालणार नाही.

आता यातील उदयनराजे भोसले हे भाजपमधे गेलेत. त्याचा किती फटका बसतो ते पाहावं लागेल. लोकसभा निवडणुकीनंतर पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. भर पावसात शरद पवारांनी लढवलेली पश्चिम महाराष्ट्राची खिंड पाहता त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला होईल अशीच चर्चा आहे. 

पश्चिम महाराष्ट्रातलं चित्र तर बदललं आहे अशी सोशल मीडियावरही हवा आहे. कधी नव्हे तेवढा तरुणांचा प्रतिसाद राष्ट्रवादीला मिळताना दिसतोय. तो तारणार का भाजपचे कमळ पश्चिम महाराष्ट्रातही फुलणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

राष्ट्रवादीचे २४ आमदार फितूर

उदयनराजे भोसले, धनंजय महाडिक, शिवेंद्रराजे भोसले मोहिते-पाटील, मधुकरराव पिचड यांच्यासारखी मंडळी पश्चिम महाराष्ट्रातून सत्तेमधे गेली आहेत. त्यांनाच पवारांनी जोरदार आव्हान देण्याचा एकहाती प्रयत्न केला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि काँग्रेसचे जवळजवळ २४ आमदार आणि माजी आमदार सत्ताधारी पक्षामधे गेलेत. असं असलं तरी ते निवडणूक झाल्यानंतर जसे निकाल येतील तसे फिरतील अशी शक्यता विरोधक वर्तवतायत.

अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनीच ही शक्यता वर्तवली आहे. राजकारणात शेवटी खोबरे तिकडे गुलाल ही परंपरा आहे. त्यामुळे बाहेर पडलेले आपल्याकडे येतील अशी आशा त्यांना आहे. 

पवारांचा करिश्मा दिसणार का? 

पश्चिम महाराष्ट्रातील जागांचा विचार केल्यास एकूण ७० विधानसभा मतदारसंघ यामधे येतात. यात मागच्या निवडणुकीत सर्वात जास्त २४ जागा भाजपला तर दुसऱ्या क्रमांकावर १९ जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या होत्या. शिवसेनेला १३ तर १० जागा मिळाल्या होत्या. अपक्ष ४ निवडून आले होते. 

आता या निवडणुकीत पुन्हा भाजप बाजी मारणार की राष्ट्रवादीची लॉटरी लागणार हे २४ तारखेला स्पष्ट होईल. मात्र राष्ट्रवादीच्या जागा वाढल्या तर शरद पवारांचा करिश्मा आजही आहे असेच म्हणावे लागेल.

हेही वाचा : 

या तीन लेखिका जग गाजवत आहेत

यंदाच्या विधानसभा निवडणुकीचं वेगळेपण काय?

विदर्भातील दहा हाय व्होल्टेज लढतीकडे राज्याचं लक्ष

आश्चर्यच, मुंबईत काँग्रेसच्या आमदारांची संख्या वाढू शकेल