हिंदुत्ववाद बहुसंख्य हिंदूंना फक्त अल्पसंख्यगंड देतो

२२ एप्रिल २०२२

वाचन वेळ : ६ मिनिटं


हिंदुत्ववादी विचारसणीच्या अंमलबजावणीमुळे अल्पकालीन पातळीवर भारतीय मुस्लिम गंभीररीत्या दुखावले जातील. याची सुरवात झालीच आहे. पण, दीर्घकालीन पातळीवर हिंदूंनाही ही गोष्ट त्रस्त करत राहील. प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांच्या लेखाचा साधना साप्ताहिकात प्रकाशित झालेला अनुवादित अंश इथं देत आहोत.

श्रीलंकेतले मानवशास्त्रज्ञ एस. जे. ताम्बिय्यांनी १९८०च्या दशकात त्यांच्या देशात सुरु असलेल्या वांशिक संघर्षासंदर्भात लिहताना सिंहली समूहाचं वर्णन ‘अल्पसंख्यगंड असणारा बहुसंख्याक’ असं केलं होतं. श्रीलंकेतली ७० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या सिंहली होती. देशातल्या राजकारणावर त्यांचं नियंत्रण होतं. नोकरशाहीवर आणि सैन्यावर त्यांचं वर्चस्व होतं.

त्यांचा बौद्ध धर्म देशाचा अधिकृत धर्म होता. त्यांची सिंहली भाषा इतर भाषांहून वरचढ अधिकृत स्थान उपभोगत होती, तरीही सिंहली लोकांना आपण पीडित असल्याची भावना ग्रासून राहिली होती. अल्पसंख्याक तमिळींकडून आपल्याला धोका आहे, असं त्यांना वाटत होतं.

श्रीलंका बेट ब्रिटिश राजवटीखाली असताना तमिळींना झुकतं माप दिलं जात होतं. त्यामुळे ते अधिक शिक्षित आहेत, त्यांना भारताकडून म्हणजेच श्रीलंकेपेक्षा अधिक मोठ्या आणि सैनिकीदृष्ट्या अधिक शक्तिशाली देशाकडून पाठबळ मिळत असल्यामुळे ते स्वतःचं मत ठामपणं मांडू शकतात, आणि त्यांच्या आक्रमकतेला आळा घातला नाही तर आपण आपल्या मायभूमीत दडपले जाऊ, असं सिंहलींना वाटत होतं.

कर्नाटकातल्या उडुपी शहरात काही नागरिक आणि पेजावर मठाचे स्वामी यांच्यात झालेल्या बैठकीच्या बातम्या वाचल्यावर मला ताम्बिया यांचं श्रीलंकेसंबंधीचं वरील विधान आठवलं. उडुपीमधल्या सुप्रसिद्ध कृष्णमंदिराचं व्यवस्थापन एकत्रितरीत्या पाहणाऱ्या आठ धार्मिक संस्थांपैकी पेजावर मठ ही एक संस्था आहे.

पेजावर मठाची वादात उडी

अलीकडच्या वर्षांमधे उडुपी शहर आणि जिल्हा कट्टर हिंदुत्ववादाची ‘कर्नाटकातली प्रयोगशाळा’ म्हणून पुढं आलाय. या शहरातल्या एका स्थानिक महाविद्यालयानं भाजप आमदाराच्या प्रोत्साहनानंतर हिजाबवर बंदी घातली, त्यानंतर राज्यभर आणि देशभर वाद उसळला. या वादानं सांप्रदायिक शांततेची हानी केली.

हिजाबवर यशस्वीरीत्या बंदी घातल्यावर म्हणजेच आणि पर्यायानं अनेक तरुण मुलींना त्यांचा शिक्षणाचा अधिकार नाकारल्यावर उडुपीच्या कट्टर हिंदुत्ववाद्यांना आता आणखी एक मुद्दा मिळालाय. हिंदू मंदिरं किंवा सणांशी संबंधित जत्रांमधे मुस्लिम दुकानदारांच्या सहभागावर बंदी घालावी, असा आदेश या कट्टरतावाद्यांनी कणाहीन प्रशासनाद्वारे लागू केला.

गेली अनेक वर्षं मुस्लिम विक्रेते या जत्रांमधे सहभागी होत आलेत आणि त्याचा सर्वच धर्मांमधल्या हजारो ग्राहकांना लाभ होत आलाय. या अडचणीबद्दल आपल्याला राज्य सरकार किंवा न्यायालयांकडून काही मदत होण्यासारखी नाही, हे कळल्यावर नागरिकांचा एक गट, ज्यात काही मुस्लिमही होते, शेवटचा उपाय म्हणून पेजावर मठाच्या प्रमुखांना भेटला.

मुस्लिम विक्रेत्यांवर टाकलेल्या बंदीविरोधात हस्तक्षेप करावा आणि सांप्रदायिक सौहार्दाला चालना देण्यासाठी मदत करावी, असं आवाहन या नागरिकांनी मठाधिपतींना केलं. ‘हिंदू समाज भूतकाळात बरंच काही सहन करत आलाय,’ असं स्वामींनी या नागरिकांना सांगितलं. ‘एखाद्या समाजघटकाला किंवा समूहाला सातत्यानं अन्यायाला सामोरं जावं लागतं, तेव्हा त्याची विफलता आणि रोष बाहेर पडतो. हिंदू समाजाला अन्यायाचा उबग आलाय,’ असंही ते म्हणाले.

हेही वाचाः तुमचं जळकं हिंदुराष्ट्र नको, असं प्रबोधनकारांचा वारसदार का म्हणतोय?

सोयीस्कर इतिहासाचा दाखला

हिंदूंनी ‘भूतकाळात बरंच काही सहन केलंय,’ असा दावा करताना स्वामींनी इतिहासाचा दाखला द्यायला सुरवात केली. आज भारत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बहुतांश भूभागावर मध्ययुगीन कालखंडात मुस्लिम राजे राज्य करत होते, त्याचा संदर्भ बहुतेक त्यांना द्यायचा असावा. हिंदुत्ववादी वक्तव्यांमधे असे संदर्भ सगळीकडेच दिसतात. अलीकडच्या काळात उत्तर प्रदेशात पंतप्रधानांनी, केंद्रीय गृहमंत्र्यांनी आणि त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेली भाषणंही हाच सूर लावणारी होती.

लखनौ किंवा उडुपीमधे राहणाऱ्या २०२२च्या कष्टकरी वर्गातल्या मुस्लिमांचा भूतकाळातल्या मुस्लिम राज्यकर्त्यांशी दूरदूरपर्यंत काही संबंध नाही. तरीही, अपघातानं समान धर्म असल्याचा वापर करून या विक्रेत्यांना धमकावलं जातं आणि त्यांची मानहानी केली जाते. काही शतकांपूर्वी मुघलांनी किंवा अगदी टिपू सुलतानानं काही केलं असेल किंवा नसेल, तर त्यासाठी आजच्या भारतीय मुस्लिमांना अपराधी ठरवणं, ही घातक प्रथा आहे.

बहुसंख्याकवाद्यांचा अल्पसंख्यगंड

विशेष म्हणजे पेजावर स्वामी स्वतःही अगदी सहजपणे वर्तमानात आले आणि हिंदू ‘सतत अन्याय सहन करतात,’ असं बोलून गेले. हिंदू कोणाकडून अन्याय सहन करतायत आणि यात कसला अन्याय होतोय? लोकसंख्येच्या संदर्भात विचार करता, श्रीलंकेत सिंहली कधीच जेवढे प्रभुत्वशाली झाले नाहीत, तेवढे हिंदू भारतात वर्चस्वशाली आहेत. राजकीय प्रक्रियांवर आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रशासनावर त्यांची प्रभुत्वसत्ता जवळपास संपूर्ण पातळीवरची आहे.

कर्नाटकातले मुस्लिम राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या निव्वळ दुर्बल आहेत. विधिमंडळात, नागरी सेवांमधे, पोलिसदलात, न्यायव्यवस्थेमधे आणि व्यवसायांमधे त्यांचं प्रतिनिधित्व खूपच कमी आहे. त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे. शिवाय, कर्नाटकात आणि एकंदरच भारतात हिंदू वर्चस्वाला वाहिलेला पक्ष सत्तेत आहे. पण तरीही हिंदू भेदभावाला आणि अन्यायाला बळी पडल्याचं प्रतिपादन पेजावरचे स्वामी करतात.

एका प्राचीन, सुबत्ता असणाऱ्या, मान मिळणाऱ्या आणि प्रचंड प्रभावशाली धार्मिक संस्थेचा प्रमुख अशा रीतीनं बोलतो, तेव्हा आपल्या देशातल्या बहुसंख्याकांना अल्पसंख्याकगंड झाल्याचं स्पष्ट होतं. हिंदुत्ववादी राजवटीमधलं हिंदूंचं हे वाटणं अल्पसंख्याकगंड झालेल्या बहुसंख्याकांशी साधर्म्य सांगणारं आहे. अशा स्थितीत भयगंड आणि स्वतःचा छळ होत असल्याची भीती मनाला ग्रासून टाकते.

संख्याबळाचा वापर आणि राज्यसंस्था, प्रशासन, प्रसारमाध्यमं आणि न्यायव्यवस्थेतल्या काही घटकांवर असलेल्या नियंत्रणाद्वारे ही मंडळी हिंदू नसलेल्यांवर स्वतःची इच्छा निष्ठुरपणे लादतायत. हिजाब, हलाल मांस आणि अजानवर बंदी घालण्याचे हिंदुत्ववादी संघटनांनी केलेले प्रयत्न याच पाशवी बहुसंख्याकवादाचे अलीकडचे दाखले होते. अर्थात, भारतीय मुस्लिमांना अंकित करण्याची आणि त्यांच्या मानखंडनेची प्रक्रिया इतरही अनेक रूपांमधे समोर येतं.

हेही वाचाः ऐन निवडणुकीत राष्ट्रवादाचा मुद्दा पेटवणं कुणाच्या हिताचं?

हिंदुत्ववादी आक्रमकतेचे आयाम

भारतीय मुस्लिमांविरोधातल्या हिंदुत्ववादी आक्रमकतेचे दोन वेगळे पण परस्परसंबंधित आयाम आहेत. पहिला आयाम राजकीय स्वरूपाचा आहे. दलित आणि ओबीसी समूहांमधल्या बऱ्याच मोठ्या घटकाला हिंदुत्ववादी छावणीत आणणं, मुस्लिमांहून आपण सांस्कृतिक आणि सामाजिक पातळ्यांवर श्रेष्ठ असल्याची भावना त्यांच्यात जोपासणं आणि त्यातून विजयासाठी आवश्यक ‘हिंदू’ मतपेढी तयार करणं, हा यशस्वी ठरलेला दुष्ट प्रयत्न राजकीय आयामाशी संबंधित आहे.

बहुतांश राज्यांमधे सुमारे ८० टक्के मतदारवर्ग हिंदू आहे. त्यामुळे हिंदूंना प्राधान्य आणि मुस्लिमांची वगळणूक या धोरणाद्वारे यातल्या सुमारे ६० टक्के मतदारांची मतं मिळवण्यात जरी भाजपला यश आलं तरी त्यांचं उद्दिष्ट साध्य होईल. म्हणजेच या बाबतीत भाजपच्या विरोधात केवळ एकच मोठा राजकीय पक्ष आहे. ज्या राज्यांमधे अनेक पक्षांचे हितसंबंध अशाच प्रकारचे आहेत, तिथं हिंदू मतांचा ५० टक्के वाटा मिळाला तरी भाजपला विजय मिळवणं शक्य होईल.

अल्पसंख्याकांच्या विरोधातल्या हिंदुत्ववादी हल्ल्याचा दुसरा आयाम विचारसरणीय स्वरूपाचा आहे. केवळ हिंदूच या देशातले खरे, अस्सल आणि विश्वसनीय नागरिक आहेत आणि भारतीय मुस्लिम आणि काही प्रमाणात भारतीय ख्रिस्तीही कमअस्सल आणि अविश्वसनीय आहेत, कारण म्हणजेच सावरकरांच्या कुविख्यात मांडणीनुसार त्यांची ‘पुण्यभूमी’ त्यांच्या ‘पितृभूमी’पेक्षा वेगळी आहे.

या देशाचे आपणच खरे मालक आहोत, अशा भावनेमुळे चिथावून हिंदुत्ववादी कार्यकर्ते भारतीय मुस्लिमांना त्यांच्या कपड्यांवरून, खाद्यपदार्थांवरून, त्यांच्या रूढींवरून, त्यांच्या आर्थिक उपजीविकेच्या साधनांवरून टोमणे मारतात.

द्वेष आणि भयगंडाचं साधन

अलीकडे म्हैसूरमधे धाडसी आणि आदरणीय कन्नड लेखक देवनूर महादेव यांनी हिंदुत्ववादी गुंडांनी लादलेली बंदी धुडकावून लावत हलाल मांस खरेदी केलं. या कृतीनंतर ते म्हणाले, ‘उजव्या गटांसाठी द्वेष ऊर्जादायी पेयासारखा असतो.’ ही अगदीच मार्मिक टिप्पणी आहे. मला फक्त त्याला थोडी जोड द्यायचीय. या ‘ऊर्जादायी पेया’तल्या द्वेषामधे भयगंडही मिसळलेला असतो.

हिंदुत्ववादाच्या प्रभावाखाली आलेल्या हिंदूंना त्यांच्या मुस्लिम सहनागरिकांविषयी भयंकर असुरक्षित वाटू लागलंय आणि मुस्लिमांबाबतच्या अविचारी द्वेषामधे ते बुडून गेलेत. या विचारसणीच्या अंमलबजावणीमुळे अल्पकालीन पातळीवर भारतीय मुस्लिम गंभीररीत्या दुखावले जातील. याची सुरवात झालीच आहे. पण, दीर्घकालीन पातळीवर हिंदूंनाही ही गोष्ट त्रस्त करत राहील.

श्रीलंकेतल्या सिंहली लोकांनी तमिळींवर लादलेला कलंक; पाकिस्तानात हिंदू, ख्रिस्ती, अहमदिया आणि शिया यांच्यावर सुन्नी लोकांकडून लादला जाणारा कलंक; आणि म्यानमारमधल्या रोहिंग्यांवर बौद्धांकडून लादला जाणारा कलंक अशा गोष्टी या संदर्भात सावधानता बाळगण्याची सूचना करणाऱ्या आहेत.

हे तीनही देश धार्मिक बहुसंख्याकवादाच्या विचारसरणीचं बंदी झाले नसते, तर आज त्यांची अवस्था चांगली राहिली असती. द्वेष आणि भयगंड या साधनांद्वारे शांततापूर्ण आणि संपन्न समाज घडवता येत नाहीत.

हेही वाचाः 

चला आता आपण राज ठाकरेंना प्रश्न विचारुया

कॅनडातला इराणी म्हणतो, जॉर्ज फर्नांडिस माझा बाप!

मोदींचा नवा भारत आणि आमचा नवा भारत वेगळा, कारण

महात्मा बसवण्णाः ९०० वर्षांपूर्वी पाळीचा विटाळ झुगारणारा महापुरूष

 

(अनुवाद: प्रभाकर पानवलकर)