नागराजची ‘झुंड’ आपल्याला काय सांगते?

१५ मार्च २०२२

वाचन वेळ : ६ मिनिटं


‘फँड्री’मधून जातव्यवस्था आणि ‘सैराट’मधून ऑनर किलिंगचं भयाण वास्तव मांडणारा नागराज आता ‘झुंड’ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. यातली कथा झोपडपट्टीतल्या फुटबॉल टीमभोवती फिरत असली, तरी हा ‘चक दे इंडिया’ किंवा ‘८३’सारखा साधारण स्पोर्ट्स ड्रामा नाहीय. यातून नागराज मांडत असलेला आवाज बॉक्स ऑफीस कमाईच्या खुळखुळाटापेक्षा कितीतरी पट मोठा आहे.

‘फँड्री’ आणि ‘सैराट’नंतर नागराज ‘झुंड’च्या निमित्ताने पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर आलाय. तीनेक वर्षांपूर्वी यातलं बरंचसं शूटिंग पुणे युनिवर्सिटीत होणार असल्याचं कळल्यापासून बरीच उत्सुकता वाढली होती. त्यात हा नागराजचा पहिलाच हिंदी सिनेमा आणि तोही चक्क भारतीय सिनेसृष्टीच्या महानायकासोबत असल्याने ही उत्सुकता शिगेला पोचली होती. त्यानंतर ‘झुंड’ सत्य परिस्थितीवर आधारित असल्याचं कळलं आणि गुगलवर स्लम सॉकर, विजय बारसे सर्च केल्याशिवाय राहवलं नाही.

विजय बारसेंची ‘झुंड’

विजय बारसे हे मूळचे भंडारा जिल्ह्यातले. शिक्षणासाठी नागपूर शहरात आल्यावर त्यांना शहरी आणि ग्रामीण गरीबीची प्रकर्षाने जाणीव झाली. नागपूरच्या हिस्लॉप कॉलेजमधे क्रीडाशिक्षक म्हणून काम करत असताना त्यांचा कॉलेजजवळच्या वस्तीशी जवळून संबंध आला. २००१च्या पावसाळ्यात त्यांनी तिथल्या मुलांना प्लास्टिकच्या डब्याला फुटबॉल समजून खेळताना पाहिलं.

त्यानंतर बारसे सरांनी आपल्या कॉलेजमधून फुटबॉल मिळवून त्या मुलांना खेळायला दिला. आधी त्या मुलांनी बारसे सरांकडं दुर्लक्ष केलं; पण बारसे सरांनी पैसे देण्याचं आमिष दाखवल्यावर मुलं खेळू लागली. रोज एक तास फुटबॉल खेळल्यावर त्या मुलांना ५ रुपये मिळायचे. हळूहळू मुलांना पैशापेक्षाही फुटबॉल महत्त्वाचा वाटू लागला. बारसे सरांनी या खेळाची नशा त्या मुलांमधे इतकी जबरदस्त भिनवली होती की इतर नशापाण्यावरून, चोऱ्यामाऱ्या करण्यावरून पोरांचं मन उडालं.

या मुलांना सोबत घेऊन बारसे सरांनी स्लम सॉकर क्लबची स्थापना केली. २००३मधे बारसे सरांनी नागपूरमधे पहिली राज्यस्तरीय झोपडपट्टी फुटबॉल स्पर्धा भरवली. नंतर त्याच वर्षी ही स्पर्धा नागपूरमधेच राष्ट्रीय स्तरावर खेळवली गेली. यात बारा राज्यांचा सहभाग होता. पुढे अशा स्पर्धांमधून निवडक खेळाडूंची एक टीम बनवून ‘होमलेस वर्ल्डकप’ या फुटबॉल स्पर्धेत पाठवली गेली. या स्पर्धेत प्रत्येक देशातून बेघर, गरीब फुटबॉलपटूंची टीम पाठवली जाते.

आमीर खानच्या ‘सत्यमेव जयते’मधे आपल्या अनुभवाबद्दल बोलताना बारसे सर सांगतात, ‘ही मुलं नशापाणी करायची, चोरी करायची. मारामारी करायची. पण फुटबॉल खेळताना मात्र तल्लीन होऊन जायची. त्यामुळे समाजाचं काही नुकसान व्हायचं नाही आणि मुलंही काही काळापुरती चुकीच्या गोष्टींपासून लांब राहायची. एका शिक्षकाला आणखी काय हवं असतं?’

हेही वाचा : अजय देवगण बड्डे स्पेशलः नैंटीजची लवइष्टोरी

जगण्याच्या गोष्टी सांगणारी पोरं

नागराजने ‘झुंड’च्या निमित्ताने हीच कथा मोठ्या पडद्यावर आणलीय. महानायक अमिताभ बच्चन यांनी या सिनेमात बारसे सरांची भूमिका साकारलीय. ‘झुंड नही, टीम कहिये’ म्हणत आलेल्या नागराजने कथेचा फोकस बच्चनऐवजी फुटबॉलपटूंची भूमिका साकारणाऱ्या वस्तीच्या पोरांवर ठेवलाय. प्रत्येकाची स्वतंत्र गोष्ट मांडायचा प्रयत्न केलाय. इंटर्वलपूर्वी या पोरांचं काय म्हणणं आहे हे आपल्याला नागराज ऐकवतो.

या पोरांच्या गोष्टी ऐकताना मला माझीच वस्ती पडद्यावर दिसत होती. चौकात बसणारी पोरं दिसत होती. पुण्यातल्या बऱ्याचशा झोपडपट्ट्या, तिथली गरिबी, गुन्हेगारी, मजबुरी लहानपणापासून जवळून बघत, अनुभवत आलोय. एकवेळचं जेवणही ज्यांना मिळत नाही, अशांना ‘तुम्हाला पोलिसांची भीती नाही वाटत का?’ हा प्रश्न विचारणाऱ्या बऱ्याच जणांना पाहिलंय. पण त्यांना यामागचं खरं उत्तर, वर्गसंघर्ष कधीच जाणून घ्यायचा नसतो. नागराज हे सगळं ऐकवत राहतो.

गुन्हेगारीचा शिक्का पुसणार कधी?

यातला बाबू नावाचा मुलगा साधारण सोळा वर्षांचा आहे. त्याला भाई बनायचंय आणि ते कसं बनायचं हेही त्याला माहितीय. हाच करियर प्लॅन डोक्यात असलेली बाबूच्या वयाची बरीच पोरं तुम्हाला कुठल्याही वस्तीत सापडतील. इथं होणाऱ्या दादा-भाईंच्या वादात ही पोरं प्यादी म्हणून वापरली जातात. केस दाखल झाली की या पोरांची ‘नंबरकारी’ म्हणून नोंद होते. नंबरकारी म्हणजे गुन्ह्यातला साथीदार. संघटित गुन्हेगारी क्षेत्रात प्रवेश करायची ही या पोरांची पहिली पायरी.

एकदा ‘नंबरकारी’ असा शिक्का बसला की पोरांच्या डोक्यात हवा जाते. ‘मुळशी पॅटर्न’मधे शिर्केच्या खुनानंतर ऱ्हावल्यासोबत गण्याही जेलमधे जातो. त्यानंतर त्यांची नन्याभाईशी भेट होते. नन्याभाईच्या गळ्यातलं सोनं बघून चमकलेले गण्याचे डोळे हे तमाम नंबरकारी पोरांचे डोळे आहेत. त्यांना हे ग्लॅमर खुणावत असतं. मजबुरी म्हणून पहिला गुन्हा करणारी पोरं नंतर या ग्लॅमरपायी वाहवतच जातात. अशावेळी कायदा नेमका काय करतो?

बालसुधारगृहात मोबाईल दुरुस्तीसारखे कोर्स शिकवले जातात, ज्यांच्या जोरावर वाट चुकलेली ही पोरं नव्या वाटेवर नंदनवन फुलवू शकतील. पण सुधारगृहातून बाहेर पडलेल्या पोरांना सुधारण्याची संधी कितपत मिळते? वस्तीत कधी गडबड झाली, तर पोलिसांचे हात आधी याच पोरांची कॉलर धरतात. या पोरांना गुन्हेगारीशिवाय दुसरं काही जमणार नाही, हे कायद्याच्या आणि इतरांच्याही डोक्यात फिट बसलंय. डॉन पासपोर्टसाठी पोलीस वेरीफिकेशन मिळवायला चौकीत जातो, तो प्रसंग आवर्जून बघण्यासारखा आहे.

वस्तीतल्या वाट चुकलेल्या पोरांची काय गत होणार, हे कायद्याला आणि समाजालाही चांगलंच ठाऊक आहे. पण त्या पोरांचा वेळीच हात धरून नव्या वाटेवर चालायची संधी यातले कितीजण देतात? नंबरकारी ठरलेल्या पोरांनाही बोर्डात, स्पर्धांमधे पहिला-दुसरा नंबर मिळवायचा हक्क आहे. पण तो नंबरकारीचा शिक्का पुसणारा फुटबॉल कुणी या पोरांच्या हातात द्यायला धजत नाही, हे इथलं दुर्दैव आहे.

हेही वाचा : सैरंध्री : पहिल्या मेड इन इंडिया सिनेमाची शंभरी

नागराजने आरसा दाखवला

नागराजच्या सिनेमांशी जवळचं नातं असण्याचं कारण तो सिनेमातून सांगत असलेल्या कथांमधे दडलंय. आयुष्यात निर्णायक टप्पा ज्याला म्हणता येईल, अशा टप्प्यांवर असताना नागराजचे सिनेमे आले होते. दहावीच्या बोर्डाचे पेपर तोंडावर असताना ‘फँड्री’ आला. जब्याला जातीयतेचे जे चटके बसले, ते मला कधी बसण्याचा प्रश्नच नव्हता. कारण चटके देणारी जात आमची होती. नागराजने जब्याच्या चटक्यांवर फुंकर घालताना अपराधीपणाचं वादळही शोषकांच्या मनात उठवलं, हे नक्की.

बारावीच्या बोर्डाची तयारी करत असतानाच ‘सैराट’ येणार म्हणून ‘याड लागलं’ होतं. पेपर झाल्यावर ‘झिंगाट’ स्पीडने सिनेमा बघायला गेलो खरा, पण थिएटरबाहेर येताना पुरता सुन्न झाल्याचं अजूनही आठवतं. जवळपास घडणाऱ्या ऑनर किलिंगच्या अनेक घटना ऐकून, वाचून होतो पण पडद्यावर बघायचा तो पहिलाच प्रसंग. जातीची बिनकामी प्रतिष्ठा जपणाऱ्या चिखलातून उमटत जाणाऱ्या त्या निरागस पावलांचा डाग अजूनही पुसला गेला नाहीय.

‘झुंड’मधे शेवटच्या प्रसंगात एअरपोर्टवर डॉनच्या खिशात कटर सापडतो. हा कटर त्याच्या वस्तीची देण आहे, जो त्याच्या प्रगतीसाठी अडथळा ठरतो. आम्हा वस्तीतल्या पोरांसोबत न मागता वस्तीतून हे अडथळे आलेले असतात, ज्याची आम्हाला जाणीवही नसते. आमच्यातल्या एखाद्यालाच हा अडथळा दूर करण्याची संधी मिळते. त्या प्रसंगात डॉनच्या भरून आलेल्या डोळ्यांमधे मला आजवर मी मागे सोडत आलेले अडथळे दाटी करताना दिसले होते.

‘झुंड’ने मला काय दिलं?

‘झुंड’मधे दाखवलीय, तशीच वस्ती आहे माझी. रुपेरी पडद्यावर गाजलेल्या ‘मुळशी पॅटर्न’चं काळंकुट्ट वास्तव आमच्या या वस्त्यांमधलं आहे. इथली पोरं भाईगिरीच करणार हे आधीपासूनच ठरलंय. या वस्तीतलं पोरगं म्हणून हिणवला जाण्याचे अनेक प्रसंग बाहेर अनुभवलेत. कुणाच्याही घरी जाताना आपण याला आपल्या वस्तीत बोलवू शकत नाही याचा न्यूनगंड कितीतरी मोठाय. हे सगळं पचवण्याची आणि लढण्याची क्षमता ‘झुंड’मुळे निर्माण होतेय.

फेसबुकवर चेष्टेत एकमेकांना सर किंवा मॅडम म्हणलं जातं. पण ही हाक जेव्हा आम्हा वस्तीवाल्यांच्या कानावर पडते, तेव्हा खरंच लय भारी वाटतं. कारण इतरांच्या नजरेत भाई, डॉन अशा पदव्या आम्हाला नकळत चिकटलेल्या असतात. या नकोशा झालेल्या पदव्यांचं ओझं ‘सर’ या हाकेने एका झटक्यात गळून पडतं. आम्हाला बारसे सर मिळाले नाहीत पण या वस्तीत शिक्षण हाच आमचा एकमेव फुटबॉल आहे. वस्तीला घाणीतून बाहेर काढण्यासाठी आता आम्ही शिक्षण नावाचा फुटबॉल खेळू. चांगल्या नोकऱ्या मिळवत गोल करू आणि सर, मॅडम अशी हाकही मारून घेऊ.

‘झुंड’ सेलिब्रेट करण्याचं कारणही हेच आहे. तो आमचा सिनेमा आहे. त्यातला छाती दडपवणारा, जबाबदारीची जाणीव करून देणारा ट्रेनचा आवाजही आमचाय आणि बेभान होऊन ठोकलेल्या भीमजयंतीच्या आरोळ्याही आमच्याच आहेत. वस्तीत राहण्याचा न्यूनगंड मोडून काढायला माझ्यासारख्या बऱ्याच जणांना हा सिनेमा मदत करतोय. ‘ही भिंत ओलांडायची नाही’ असा तोरा मिरवणारी, वर्गभेद शिकवणारी अभेद्य भिंत पाडायचं बळ हा सिनेमा देतोय. ‘हमारी बस्ती गटरमे है पर तुम्हारे दिल मे गंद है’ असं ठणकावून सांगण्याची ताकद हा सिनेमा देतोय.

हेही वाचा : 

#बॉयकॉटदीपिका हॅशटॅगने छपाकचा गल्ला खाल्ला?

ओटीटीची मजल सुखवस्तू प्रेक्षकांपर्यंतच : नितीन वैद्य

हिंदी सिनेमांच्या नव्या हिंदुस्तानला फेक राष्ट्रवादाचा तडका

जलिकट्टू : माणसाच्या अंतरंगात लपलेल्या हिंस्र जनावराचं दर्शन देणारा सिनेमा