धर्मस्थळाच्या भोंग्यांनी एकदा संत कबीरांचं उत्तरही ऐकावं

०१ मे २०२२

वाचन वेळ : ५ मिनिटं


ध्वनिप्रदूषक 'लाऊडस्पीकर' हा मशिदींपुरता मर्यादित विषय नाही. बाबरी मशिदीच्या पतनानंतर देशात ठिकठिकाणी 'बडा नमाज' होऊ लागले. त्याला उत्तर म्हणून महाआरत्या सुरू झाल्या. या आवाजांनी मशिदीवरच्या भोग्यांना घंटा फरक पडला नाही. त्यामुळेच मशिदीवरचे भोंगे उतरवण्यासाठी मशिदीच्यापुढे भोंग्यावरून 'हनुमान चालिसा’चे पठण करण्याचा कार्यक्रम सुरू करण्याचं राज ठाकरे यांनी जाहीर केलं.

'चार मुलं जन्माला घाला आणि त्यातली दोन मुलं 'संघ परिवारला द्या,' असा उपदेश स्वामी सत्यदेवानंद आणि साध्वी ऋतंभरा यांनी हिंदूंना केलाय. महाभारतमधे महायुद्ध होऊ घातलं, तेव्हा कौरवांनी श्रीकृष्णाकडे यादव सेनेसाठी आग्रह धरला. तर पांडवांनी साक्षात श्रीकृष्णाची साथीदारी मागितली आणि संख्येपेक्षा पांडवांनी गुण कौशल्याला महत्त्व दिलं.

'रामायण-महाभारत' ही काल्पनिक कथानकं आहेत. पण त्यातून बोध घेण्यासारखं खूप काही आहे, हे काही त्यातल्या पात्रांसारखं जगू पाहाणार्‍यांच्या लक्षात येत नाही! म्हणूनच ते हिंदूंचं कौरवीकरण करण्याचा आंधळा धृतराष्ट्री उपदेश करत असतात.

गर्व-पर्वाच्या मोहिमा

हिंदूंची ही वाढीव दोन मुलं संघ परिवाराला कशासाठी पाहिजेत? २०१४ पूर्वी देशात काहीच निर्माण झालं नाही; त्याचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी का? गेल्या आठ वर्षातल्या मोदी सरकारच्या काळात घरवापसी, लवजिहाद, गोहत्या बंदी, राम जन्मभूमी निर्माण, दलित हत्याकांड या गर्व-पर्वाच्या मोहिमा  हिंदू-जनजागरण करत फत्ते झाल्यात. आता ही मोहीम 'हिजाब हटाव, हनुमान चालिसा बजाव'पर्यंत पोचलीय.

हे दोन्ही गर्दीचे विषय आहेत. महाराष्ट्रात गर्दीचा विषय मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरच्या भोंग्याचा सोक्षमोक्ष लावायचा, या निश्चयाने हाती घेतल्याने सुटलाय. त्यांच्याकडे रामाच्या पळवलेल्या बायकोच्या सुटकेसाठी आपल्या शेपट्यांना आगी लावून घेणाऱ्या बजरंगींची कमतरता नाही.

मनसेला भाजप-संघ परिवाराशी जोडून घेण्याच्या प्रक्रियेसाठी सुरू झालेलं धार्मिक भावनांवरचं हिंदूजागरण बहुजन जातीतल्या लोकांच्या जागरूक होण्याचा प्रक्रियेवरचा घाला आहे; त्यांना सामाजिक विषमता आणि जाती बंधनात कोंडून ठेवण्याचा डाव आहे, हे नव-बजरंगींच्या लक्षात येण्याची शक्यता नाही. कारण नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणे राज ठाकरे यांचेही अंधभक्त मोठ्या संख्येने आहेत.

राज ठाकरेंचा अल्टिमेटम

ध्वनिप्रदूषक 'लाऊडस्पीकर' हा मशिदींपुरता मर्यादित विषय नाही. बाबरी मशिदीच्या पतनानंतर देशात ठिकठिकाणी 'बडा नमाज' होऊ लागले. त्याला उत्तर म्हणून महाआरत्या सुरू झाल्या. तेव्हापासून मशिदींवरच्या भोग्यांना मंदिरातल्या काकडआरत्या ते शेजारत्यांच्या घंटा लाऊडस्पीकरवरून वाजू लागल्या. पण ती मंदिराभोवतीच्या हिंदूंची डोकेदुखी ठरल्यामुळे लाऊडस्पीकरचे आवाज कमी झाले.

या आवाजांनी मशिदीवरच्या भोग्यांना घंटा फरक पडला नाही. त्यामुळेच मशिदीवरचे भोंगे उतरवण्यासाठी मशिदीच्यापुढे भोंग्यावरून 'हनुमान चालिसा’चे पठण करण्याचा कार्यक्रम सुरू करण्याचं राज ठाकरे यांनी जाहीर केलंय. त्यासाठी त्यांनी राज्य सरकारला ३ मेपर्यंत मशिदीवरचे भोंगे उतरवण्याचा 'अल्टिमेटम’ दिला आहे.

हा प्रकार 'जशास तसं' सारखा असला तरी तो शहाणपणाचा नाही. तो सामाजिक सलोखा बिघडवणारा आहे. महात्मा गांधी म्हणायचे 'डोळ्यासाठी डोळाच घ्यायचा तर सर्व जगच अंध होईल!' असो.

हेही वाचा: बेगमपूर : संत रविदासांचं दु:ख नसलेलं शहर

नमाजला लाऊडस्पीकरची गरज काय? 

मशिदीवरचे भोंगे हा जुना विषय आहे. तो अधूनमधून डोकं वर काढतो. हा विषय सामाजिक आहे असं सांगितलं, तरी या मशिदींच्या भोंग्यांच्या आडून 'हिंदुत्वाचा अजेंडा' रेटण्याचा आणि संविधानातला सेक्युलरपणा फोल ठरवण्याचा डाव सुरू झाल्याचं ठळकपणे दिसतंय.

या राजकीय खेळात नटमंडळीही आपला चक्रम-विक्रम शो अधेमधे करतात. पाच वर्षांपूर्वी- एप्रिल २०१७मधे स्टार गायक सोनू निगम याने अजान विरोधात बांग ठोकली होती. तेव्हाही आजच्यासारखेच मुस्लिमांचे महिनाभराचे रमजान उपवास सुरू होते. या काळात धार्मिकतेचं पालन करणारे मुस्लीम दिवसातले पाच वेळा नमाज चुकवत नाहीत. या नमाजची वेळ झाल्याचं सांगण्यासाठी मुल्ला मशिदीच्या लाऊडस्पीकरवरून अजान देतो.

खरं तर, तुम्ही कट्टर धार्मिक असाल, तर नमाज पढण्यासाठी वेळेवर तयारीत राहाल! त्यासाठी अजानची गरज लागणार नाही. सामूहिक नमाजसाठी अजान अनिवार्य आहे. पण नमाजसाठी वेळेवर हजर राहाण्याची सवय लावल्यास अजान होईल; पण त्यासाठी लाऊडस्पीकरची गरज लागणार नाही, हे समजून घेऊन मुस्लीम कधी वागणार?

विज्ञानाचा असाही गैरवापर

पहाटे पाच-साडेपाचला कोकलणारे हे भोंगे इतरांची झोपमोड करतात, हे खरंच आहे. पण इतर वेळीही अवचितपणे अजानसाठी भोंगे वाजतात, तेव्हाही ते डोक्यात जातात. त्यासाठी मुस्लीम नसण्याची गरज नाही; इतका तो आवाज भयानक मोठा असतो.

सोनू निगमची तक्रार वेगळी होती. त्याचं म्हणणं, 'मी मुस्लीम नसूनही मला अजानच्या आवाजाने सकाळी जाग येते. झोपमोड होते. भारतात बळजबरीने चालणाऱ्या या धार्मिक रूढी कधी थांबणार?' सोनू निगमची तक्रार बरोबर होती. ती त्याच्या हिंदू असण्याशी संबंधित आहे. नाहीतर त्याने पहाटेच्या वेळी वाजणार्‍या काकडआरतीच्या घंटा बडवण्याविरोधातही आवाज उठवला असता.

लाऊडस्पीकरचा शोध हा १००-१२५ वर्षांपूर्वीचा आहे. त्याआधी एडिसनने विजेवर पेटणार्‍या बल्बचा शोध लावला. त्यानंतर विजेचा वापर वेगवेगळ्या प्रकारे होत ; लाऊडस्पीकरवरून एकाचा आवाज जसाच्या तसा लाखो लोकांपर्यंत पोचू लागला. त्याचा संदर्भ देत सोनू निगम म्हणाला होता, 'महंमद पैगंबर यांनी इस्लाम धर्माची स्थापना केली, तेव्हा विजेची सोय नव्हती. मग एडिसनच्या विजेच्या संशोधनानंतर हे चोचले कशासाठी हवेत? जणू काही अजानसाठीच विजेचं शोधकार्य केलं असावं.' विज्ञानाचा असा गैरवापर हा सर्वधर्मीय विषय झाला आहे.

हेही वाचा: संत नामदेवांच्या अभंगवाणीत भारतीय संविधानातल्या मूल्यांचा जागर

तेरो साहब बेहरो है?

लाऊडस्पीकरवरून हिंदू देवळातल्या घंटांबरोबर सर्व धार्मिक विधीचे कार्यक्रम भट-भिक्षुकांच्या भसाड्या आवाजात वाजतात. तसाच बौद्ध विहाराच्या माथ्यावरून त्रिशरणचा धम्मडोस आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांचे डोके उठवू लागला आहे. संत कबीर ८०० वर्षांपूर्वी संतकार्य करून गेलेत. तेव्हा लाऊडस्पीकर नव्हता. तरीही त्यांनी अजान ठोकणाऱ्यांना सुनावलं होतं - 

मुल्ला मस्जिद बांग पुकारे।
क्या तेरो साहब बेहरो है?
चिटी के पैर नुपुर बाजे।
वो भी साहब सुनता है।

अर्थात, 'अरे मुल्ला, मशिदीतून तू इतक्या मोठ्या आवाजात अजान का देतोस? तुझा अल्ला बहिरा आहे का? अरे, मुंगीच्या पायातल्या पैंजणाचाही आवाज त्याला ऐकू येतो!' यातून संत कबीरांनी भक्ती, प्रार्थना किती शांतपणे करावी, याचं मार्गदर्शन केलंय.

सर्व धर्मीयांचा सार्वजनिक उद्योग

सर्वच धर्म संस्थापकांनी-संतांनी प्रार्थना कशासाठी करावी; ते आपल्या विचार-कृतीतून सांगितलंय. त्याविषयी संत तुकडोजी महाराज आपल्या ग्रामगीतामधे लिहितात - 

येशू ख्रिस्ताने प्रार्थना केली।
सर्वांसाठी शांती मागितली॥
सहनशक्ती देवता पावली।
तया लागी॥१॥

महंमदाने केली प्रार्थना। 
विखुरलेला इस्लाम कराया शहाणा॥
संघटित केले स्वजना।
तया काळी॥२॥

पावित्र्य शिकविले झरतुष्ट्राने।
संयम शिकवला महावीराने॥
अहिंसक संघ वाढविला बुद्धाने।
प्रार्थने द्वारे॥३॥

संतांचे ते नामसंकीर्तन।
सामुदायिक प्रार्थनेचे रूप जाण॥
सर्व देव- स्मरणे केले संघटन।
दिले ज्ञान सर्वजना॥४॥

या उलट सर्व धर्मीयांचा सार्वजनिक प्रार्थना-भक्ती उद्योग जोरात सुरू आहे. हा सत्ता लोभी-लाभी धर्मवादी राजकारणाचा परिपाक आहे. मनसेचा 'हनुमान चालिसा' हा त्यातलाच एक भाग आहे.

हेही वाचा: 

संत ज्ञानेश्वरांची ‘कोपर्निकसन’ क्रांती

सगळे वारकरी संत पितृश्राद्ध का नाकारतात?

बरा झाला. नायतर माझ्या विठूक कोरोना जायत

संत चळवळ म्हणजे जगणं सुंदर करण्याचा मनोमन प्रयत्न

ग्लोबलायझेशनच्या काळात तरुणाईची भाषा बोलणारं 'रिंगण'

(लेखक साप्ताहिक चित्रलेखाचे संपादक असून हा लेख चित्रलेखाच्या ताज्या अंकातील संपादकीय आहे)