आपले पूर्वज नॉनव्हेज खायचे, दारू प्यायचे का?

१३ डिसेंबर २०२०

वाचन वेळ : १० मिनिटं


आपण जगतो खाण्यासाठी आणि खातो जगण्यासाठी. माणूस पृथ्वीवर अस्तित्वात आला तेव्हापासून अन्नासाठी झटतोय. आपल्या पूर्वजांचं अन्न काय होतं, ते कोणती धान्य वापरत होते, ते कसं शिजवत होते, मांसाहार करत होते का, दारू पित होते का असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतात. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणाऱ्या प्रा. प्रदीप आपटे यांच्या या भाषणाचं हे शब्दांकन.

कार्यक्रम : आपली संस्कृती, आपला इतिहास
ठिकाण : युट्यूब
वेळ : ५ डिसेंबर, संध्याकाळी ७ वाजता
वक्ते : प्रा. प्रदीप आपटे
विषय : प्राचीन इतिहास अन्नाचा.

माणूस इतिहासात रमतो. आपल्या आधीची माणसं काय करत होती, कुठे राहत होती, काय कपडे घालत होती हा तर आजच्या माणसाचा आवडता संशोधनाचा विषय. याचबरोबर ही माणसं काय खात होती याचीही उत्सुकता आपल्याला असते. विशेषतः ती मांसाहार करत होती का, करत असतील तर कोणते प्राणी खात होती आणि दारू पित होती का या विषयात आपल्याला फार रस असतो.

खरंतर, माणूस आज आहे तसा तो तयार होण्यात त्याने खालेल्या अन्नाचं योगदान फार मोठं आहे. नुसतं मांसाहार आणि दारूच नाही तर ते खात असलेली धान्य, डाळी, फळं हेही आजच्यापेक्षा फार वेगळं होतं. माणसाच्या इतिहासातल्या या पैलूवर  प्रा. प्रदीप आपटे गेल्या अनेक वर्षांपासून संशोधन करतायत.  

मुळात अर्थशास्त्रात पीएचडी केलेले आपटे गेली 30 वर्ष पुण्यातल्या फर्गुसन कॉलेजमधे आणि गोखले इन्स्टिट्यूटमधे शिकवतायत. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर नियामक मंडळ सदस्य असलेल्या आपटे यांचा मोडी लिपी, संस्कृत, बंगाली, फारसी, फ्रेंच भाषांचा अभ्यास आहे. त्यातूनच भारतीय खाद्यसंस्कृती आणि भारतीय भाषांवर ते संशोधन करतात. रायगड स्मारक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या ई व्याख्यानमालेत ते अन्नाच्या इतिहासाबद्दल बोलत होते. त्या भाषणातल्या निवडक भागाचं रेणुका कल्पना यांनी केलेलं शब्दांकन इथं देत आहोत.

एरवी इतिहास हा उल्लेख केला तरी आपल्या डोळ्यासमोर येतं ते राजे, रजवाडे, युद्ध, सनावळ्या कोण हारलं, कोण जिकलं. पण इतिहासाची व्याप्ती यापेक्षा खूप मोठी आहे. पृथ्वी अस्तित्वात आल्यापासून इथं जे जे काही घडलं त्या सगळ्या घडामोडींचा इतिहास आहे. या जाणीवेतून आपण पाहिलं तर प्रत्येक इतिहासाला, तो शोधण्याला, तो मांडण्याला एक वेगळ्या प्रकारची शिस्त लागते, अध्ययन लागतं, हे आपल्या लक्षात येईल.

अनेक प्रकारच्या इतिहासांमधे फार निराळी साधनं हाताळावी लागतात. त्याचंच एक उदाहरण म्हणजे अन्नाचा इतिहास. आपल्याला विचारलं की, २०० ३०० वर्षांपूर्वी लोकं काय जेवायचे, काय खायचे?  ते जे काही जेवायचे, खायचे त्याची पैदास कशी व्हायची तर त्याचं उत्तर मिळवण्यासाठी आपल्याकडे वाड्मय आहेत. सर्वात जुन्या वाड्मयातही कोणत्या ना कोणत्या अन्नाचा संदर्भ आलेला असतो. त्याआधारावून कशा प्रकारचं अन्न असेल याचा काही एक कयास आपण बांधू शकतो.

पण त्यापलिकडेही जायचं म्हटलं तर ही साधनं पुरेशी ठरत नाही. भारतात सगळ्यात जुनं वाड्मय म्हटलं जातं त्या वैदिक वाड्मयात कोणती धान्य आहेत, कोणते पदार्थ आहेत याचा आपण आढावा आपण घेऊ शकतो. पण  वेदांच्या आधीदेखील समाज अस्तित्वात होता. वेदातला समाज हा तुलनेने खूपच प्रगत समाज आहे. त्याआगोदरची लोकं काय जेवत असतील, खात असतील? याचा उलगडा करायचा असेल तर आपल्याला अन्य काही गोष्टींचा साकल्याने विचार करावा लागतो.

हेही वाचा : म्हणून आता आपण पारशी वाचवा मोहिम राबवायला हवी!

गवतासारखं उगवतं धान्य

अन्नाची गरज असणारा मनुष्य हा एकमेव प्राणी नाही. जवळपास सर्वच प्राण्यांना अन्नाची गरज असते. बऱ्याचशा प्राण्यांचं दुसरे प्राणी हेच अन्न असतं. वनस्पती हाही एक सृष्टीचा वेगळा भाग आहे. पण त्यांनाही जगण्यासाठी अन्न लागतंच. पण विशेष म्हणजे, वनस्पती स्वतःचं अन्न स्वतःच तयार करतो. महत्त्वाचं म्हणजे, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जायची क्षमता नसताना त्या हे अन्न तयार करतात. त्यांनी तयार केलेलं हे अन्न माणसासकट इतर प्राणी मोठ्या प्रमाणावर वापरतात. वनस्पतींप्रमाणेच प्राणी हाही आपल्या अन्नाचा एक मोठा भाग आहे. 

आता आपलं प्राचीन अन्न शोधायचं म्हणजे १० हजार वर्षांपूर्वी ही सृष्टी आज आहे तशीच होती का याचा शोध घ्यावा लागेल. त्यामुळेच अन्नाच्या इतिहासात उत्क्रांती विज्ञानाचा वाटा मोठा आहे. लाखो वर्षांपूर्वी वनस्पती, प्राणी आणि इतर सजीवांचे अनेक प्रकार होते. त्यातले काही प्रकार तगले तर काही प्रकार काळाच्या ओघात नष्ट झाले. तगलेल्या सजीवांमधे आजही तगून राहण्याची स्पर्धा दिसते. त्यातल्या काही विशिष्ट प्राणी आणि वनस्पतींमधे एकमेकांवरचं अवलंबित्वही दिसतं. हे अवलंबित्व स्पर्धेइतकंच मोठं आहे. या साखळीमधे स्पर्धा आहे, परस्परावलंबित्व आहे आणि सहकार्यही आहे. आणि या संपूर्ण साखळीतला फार थोडा भाग माणसासाठी अन्न म्हणून उपलब्ध आहे.

आज पाऊस पडल्यावर काही गवतं भराभर उगवून येतात. कुणी पेरली नाही, कुणी बिया टाकल्या नाहीत तरी उगवतात. ही गवतं पूर्वी खूप मोठ्या प्रमाणावर उगवायची. त्यातलीच काही गवतं माणसाने निवडली आणि त्याचे दाणे तो धान्य म्हणून खाऊ लागला. आज गवतं उगवतात तसाच कधीकाळी तांदूळ उगवत होता, गहू होता, ज्वारी होती, बाजरी होती, ओट्स बार्ली होते. 

माणसामुळे बदलला निसर्ग

या भराभर उगवणाऱ्या गवतांपैकीच काही बिया माणसाने निवडल्या. त्या थोड्या पुन्हा पेरल्या तर त्यातून जास्त धान्य मिळतं ही गोष्ट त्याच्या लक्षात आली. असं करत करत माणसाने काही ठरविक प्रकारच्या गवताचं इतकं चांगलं संगोपन केलं की त्या गवतांनी आज पृथ्वीचा फार मोठा लागवडयोग्य जमिनीचा भाग व्यापलेलाय. माणसाच्या हस्तक्षेपामुळे, माणसाच्या कतृत्वामुळे ही तगण्याची क्षमता या गवतांना उद्भवली.

उत्क्रांती शास्त्राच्या भाषेत याला कृत्रीम निवड असं म्हणतात. माणूस नसता तर काही प्राण्यांचा, काही वनस्पतींचा आज मोठ्या प्रमाणात आढळ दिसतो तो दिसला नसता. १०० वर्षांपूर्वी कोंबडीचं मास आज जितकं मुबलक प्रमाणात उपलब्ध नव्हतं. तेव्हा फक्त विशेष, आनंदाच्या कार्यक्रमांना दुर्मिळ असं कोंबडीचं मास मिळत होतं. आज माणसाच्या प्रयत्नामुळे ते भरपूर प्रमाणात मिळतं.

यामुळे निसर्गात दोन गट पडलेले दिसतात. एक निसर्गतःच तगण्याची क्षमता जास्त असेलले आणि दुसरे माणसाच्या हस्तक्षेपामुळे तगण्याची क्षमता अधिक बळकट झालेले. यातल्या दुसऱ्या प्रकारात मोडणाऱ्या वनस्पती आणि प्राण्यांचा आपण आज अन्न म्हणून विचार करतो. कदाचित, आज आपण ज्याकडे अन्न म्हणून फारसं लक्ष देत नाही त्याबाबत उद्या काही महत्त्वाचे शोध होतील आणि त्या आपण खाऊ लागू.

तात्पर्य, या अन्नाच्या इतिहासात इतक्या वेगवेगळ्या गोष्टी मिसळलेल्या आहेत. वनस्पती आणि प्राणी सृष्टीचा, त्यांच्यात असलेली स्पर्धा आणि परस्परावलंबन, सहचर्य आणि सहकार्य याच्या आधाराने माणसाच्या अन्नाची जडणघडण होते. त्यामुळे अन्नाचा इतिहास लिहायचा तर त्यांचं जडणं आणि तगणं कसं बदलत गेलं, कोणत्या गोष्टी ज्या पूर्वी अस्तित्वात नव्हत्या त्या नव्याने आल्या, ज्या आत्ता पूर्वी अन्न म्हणून वापरल्या जात होत्या पण आता दुर्मिळ झाल्यात, कोणती फळं, वनस्पती, प्राणी स्थलांतरित झाले, कोणाची जनुकीय रचना बदलली या सगळ्याचा विचार करावा लागेल.

हेही वाचा : ईश्वरी अवतारापलीकडे माणूस म्हणून कृष्णचरित्र समजून घेऊया

सगळ्यात महत्त्वाचा अग्नी

आपल्याला प्राचीन अन्न शोधायचं आहे. मात्र, प्राचीन म्हणजे फार फार तर आपण पाच ते सहा हजार वर्षांपूर्वीच्याच अन्नाचे पुरावे आपल्या हाती लागू शकतात. याचं कारण की कित्तीतरी वर्षांपूर्वी दगडात कोरलेली मुर्ती, देऊळ किंवा धातूची मुर्ती सापडते तसं अन्न टिकू शकत नाही. फार फार तर पुरातत्त्व संशोधनात जळून गेलेल, अर्धवट राहिलेले असे काही दाणे सापडू शकतात. त्यामुळे जुन्या लोकांचं अन्न कसं होतं, कोणतं होतं याचा फार मोठा पुरावा मौखिक किंवा लिखीत वाड्मयातच मिळतो. त्याच्यावरून कयास बांधावा लागतो.

ऋग्वेदामधे फार मोठ्या प्रमाणात यव म्हणजे ज्याला बार्ली म्हणतात त्याचा उल्लेख सापडतो. यज्ञ करण्यासाठी तूप लागतं. त्यामुळे तूप आणि त्याचे पर्यायवाचक शब्दही  ऋग्वेदात मोठ्या प्रमाणावर सापडतात. तूप आहे त्याअर्थी तिथे दूधाचाही उल्लेख मोठ्या प्रमाणावर होतो. तूप, दूध यांचा वापर आहे त्याअर्थी हे देणारे प्राणी पाळणं आणि त्यांच्याकडून ते मिळवणं याचं चांगलं विकसित तंत्रज्ञान म्हणून त्या समाजात रूढ झालेलं असलं पाहिजे. 

यज्ञामधे अग्नी असतो. म्हणजे, त्या समाजातल्या लोकांची अग्नीवर हुकूमत असली पाहिजे. अग्नी टिकवून कसा धरायचा याचे अनेक उपाय त्यांना माहीत असणार. कारण, अग्नीचा शोध हा माणसाच्या सांस्कृतिक इतिहासाबरोबर चअन्नाच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचाय. कारण जितक्या प्रमाणात अग्नी वापरण्याची क्षमता समजाचीं अधिक असेल तितक्या प्रमाणात त्या अग्नीचं स्वरूप, त्याची तीव्रता, त्याचं प्रमाण सांभाळून तीच वनस्पती, तेच प्राणी वापरून त्याचं वेगवेगळे पदार्थ करता येतील.

आपण ज्याला स्वयंपाकशास्त्र म्हणतो त्याला प्राचीन संस्कृतीत सूपशास्त्र असा शब्द आहे. सूप हा इंग्रजी शब्द नाही. तो प्राचीन संस्कृत शब्द आहे. सूप म्हणजे पाककला आणि शास्त्र म्हणजे काय किती प्रमाणात वापरायचं. उदाहरणार्थ अग्नीची आच किती ठेवायची, त्या अग्नीचा वापर पदार्थाचं रूप बदलण्यासाठी कसा करायचा इत्यादी.

बहुतेक सगळ्या पाकशास्त्रांत पदार्थामधे अंगभूत असलेलं पाणी काढून टाकायचं किंवा पदार्थामधे अंगभूत नसलेलं पाणी घुसवायचं . उदाहर्णार्थ, भात शिजवणे. एकेकाळी पाणी असणारा तांदूळ आपण घेतो आणि त्याच्यात पुन्हा पाणी भरतो. आता या तांदूळाच्या तयार झालेल्या दाण्यामधे पुन्हा पाणी कसं भरणार तर वाफेच्या स्वरूपात भरायचं. एखाद्या वस्तूमधे असणारी पाण्यासारखी, तेलासारखी गोष्ट आत घुसवणं किंवा बाहेर काढणं हे पाककलेचं फार महत्त्वाचं लक्षण आहे. अग्नीच्या वापराबाबत कौशल्य असेल त्या समाजातली पाककला ही अधिक विकसित होत असते.

जगातलं सगळ्यात वैविध्यपूर्ण अन्न

भारतातल्या जुन्या ग्रंथांमधे भरपूर प्रमाणात सापडणारं दुसरं एक धान्य म्हणजे तांदूळ. तांदूळ हा एक गवताचाच प्रकार. हा प्रकार आशियाई आणि आफ्रिकी खंडांमधे भरपूर प्रमाणात उपलब्ध असे. अर्थातच तो आज आहे तसा त्या काळी नव्हता. त्याचं स्वरूप जंगली किंवा वाइल्ड होतं असं म्हणता येईल.

आयुर्वेदातही भारतातल्या वेगवेगळ्या अन्नाची भरपूर माहिती दिलेलीय. चरक नावाचा आयुर्वेद ऋषी होता. त्याने लिहिलेला ग्रंथ चरक संहिता म्हणून प्रसिद्ध आहे. त्यात अन्नपानविधी नावाचं स्वतंत्र प्रकरण आहे. त्यात अन्न म्हटल्यावर काय काय येतं याची इतकी मोठी समृद्ध यादी आहे की आपले पूर्वज जगातलं सगळ्यात वैविध्यपूर्ण अन्न खात असावेत असा अंदाज लावता येतो.

आता आपले पूर्वज म्हणजे नेमक्या कोणत्या भूभागावरचे असा प्रश्न येतो. त्याचंही उत्तर चरक संहितेत आहे. त्यात तीन प्रकारच्या भूभागांचा उल्लेख केलाय. एक अनुप, दुसरं साधारण आणि तिसऱ्याला म्हटलं जातं जांगला. चरखानं नोंदवलेल्या या तीन भागातला फरक हा तिथे असणाऱ्या पाण्याच्या उपलब्धतेवर अवलंबून आहे. अनुप म्हणजे जिथे पाणी भरपूर आहे असा प्रदेश. मध्यम पातळीचं पाणी असणारा प्रदेश म्हणजे साधारण. तर पाण्याचा पूर्णपणे तुटवडा असणाऱ्या प्रदेशाला जांगलं म्हटलं गेलंय.

हेही वाचा : गणपती अथर्वशीर्ष १: हा तर मिनी संस्कृतीकोशच

प्राचीन लोक कशाचं दूध प्यायचे?

अन्नपानविधीमधे काय काय येतं ? चरक संहितेत तृणधान्यला शूकधान्य आणि डाळींना शमीधान्य म्हटलं गेलंय. असे अनेक प्रकार, उपप्रकारही चरक संहितेत सांगितलंय. मांसवर्गाचाही उपलब्ध येतो. आपले पूर्वज मांस खायचे का असा एक प्रश्न नेहमी येतो. त्याचं उत्तर चरक संहितेत मिळतं. यात कित्तीतरी वेगवेगळ्या पक्षांचा, प्राण्यांचा उल्लेख केलेला आढळेल.

मांसवर्गाप्रमाणेच क्षीरवर्गही आहे. क्षीर म्हणजे दूध. यात फक्त गाय, म्हैस, बकरी या गोष्टींचा उल्लेख नाही. तर त्यासोबत उंटिण, गाढविण, वाघिण या सगळ्या प्रकारच्या दूधांचा उल्लेख सापडलो. तसंच शाकवर्ग म्हणजे फळभाज्या म्हणतो त्याचा एक वर्ग आहे. भाज्यांमधे अजून एका वेगळ्या वर्गाचही उल्लेख चरक संहितेत आहे. हिरव्या पालेभाज्यांचा हरितवर्ग. इतकंच काय तर जलवर्ग म्हणजे कोणत्या पाण्याचं पाणी शुद्ध अशुद्ध, जड हलकं आणि कोणत्या पाण्यामुळे कोणते आजार उद्भवण्याचा प्रभाव आपल्याला वेगवेगळ्या भूबांगावर दिसतो तेही यात सांगितलंय.

तैलवर्ग म्हणजे तेलांचीही यादी केलीय. स्गिन्ध पदार्थांचा वापर यात सांगितलाय. तेलाचा सगळ्यात महत्त्वाचा गुण असा की एक मसल्यांचा विशिष्ट प्रकारचा वास अन्नाला देणं. मसाल्यांचा वास अन्नाला देणं हे पाण्याला जमत नाही. तेलाला जमतं. त्यामुळे फोडणी हा प्रकार आपल्याकडे प्रसिद्ध आहे.

ऊसावरून सुरू झाली गुलामगिरी

भारतातल्या लोकांमधे गोड चवीचं फार वैशिष्ट आहे. कोणती चव आवडते आणि कोणती चव आवडत नाही या दोन्ही प्रश्नांचं उत्तर हे गोड चव असं असू शकतं. गोड खाल्ल्यावर जिभेकडून मेंदूकडे ज्या संवेदना जातात त्या सुखकारक असतात. अशी गोड चव देणारी एक वनस्पती भारतात उपलब्ध असणं हे विशेष आहे. ही वनस्पती म्हणजे ऊस. आणि चरक संहितेत त्याला ईक्षु असं म्हटलं जातं. त्याचा एक वर्गही त्यांना समाविष्ट केलाय. 

हा ईक्षु इतका दुर्मिळ होता. ऍलेक्झांडर भारतात आला तेव्हा त्याने भारताविषयी करून ठेवलेल्या वर्णनांमधे या ऊसाचा उल्लेख केलाय. भारतात एक मध भरलेला बांबू आहे असं त्यांनी लिहिलंय. असा हा ऊस चीन आणि भारताच्या सीमेवर आणि भारतीय उपखंडात जास्त प्रमाणात उपलब्ध असे. या ऊसावरून भरपूर रामायण झालंय. आफ्रिकन लोकांच्या गुलामगिरीला अमेरिकेतली या ऊसाची शेतीच कारणीभूत आहे.

याशिवाय आणखी एका वर्गाचा उल्लेख चरकात आहे आणि तो म्हणजे कृतान्न वर्ग. निसर्गात उपलब्ध असणाऱ्या गोष्टींवर प्रक्रिया केल्यावर जो पदार्थ तयार होतो त्याला कृतान्न वर्गात स्थान देण्यात आलंय. चरक हा आयुर्वेदाचा ग्रंथ असल्यने त्यात कोणत्या पदार्थाचा माणसाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो ते तर सांगितलं आहेच पण वेगवेगळ्या चवींचाही उल्लेख केलाय.

हेही वाचा : संत रविदासांसारख्या महामानवांचा युटोपिया कशासाठी अभ्यासायचा?

चवींचं एकत्रीकरण

जगभरात सहा प्राथमिक चवींना मान्यता दिलंय. चरक संहितेत याचा उल्लेख आहे. आम्लं,मधूर, कशाय म्हणजे तुरट, कटू, तिख्त आणि लवण. आता मराठी, हिंदी भाषांमधे कटू म्हणजे कडू आणि तिख्त म्हणजे तिखट मानलं जातं. पण संस्कृतमधे कटू म्हणजे तिखट आणि तिख्त म्हणजे कडू असा अर्थ असतो. संस्कृतमधून वर आलेल्या भाषांमधे मात्र हे एकदम उलटं मानलं गेलंय.

तर या सहा प्राथमिक चवींचं आपण कशाप्रकारे एकत्रीकरण करू शकतो? आता एकावेळी किती चवींचं एकत्रीकरण करता येईल? समजा, सहाही चवी एकमेकांत मिसळल्या तर? गणिताच्या पद्धती वापरून याचं उत्तर येतं ६४. याचा उल्लेख आपल्याला चरकात दिसतो.

आपले पूर्वज दारू प्यायचे का अशीही एक उत्सुकता आपल्या मनात असते. या दारूला सुरा, मदिरा, वारूणी असे अनेक संस्कृत शब्द आहेत. आज आपण ज्या प्रकारची दारू पितो ती ही दारू नव्हती. अनेक प्रकारचे मद्यप्रकार आपल्याला चरकात सापडतील. एवढंच नाही तर या मद्यांचं सेवन किती प्रमाणात केलं तर अल्हाददायक असतं, कितीप्रमाणात केलं तर ते आरोग्याला चांगलं असतं, हितकारक असतं आणि अतिप्रमाणात केलं तर त्यातून आरोग्याला होणारे दुष्परिणाम कोणते, आजच्या भाषेत आपला हँगओवर उतरवण्यासाठीचे उपाय कोणते हेही सांगितलंय.

रामायणातला मांसाचा उल्लेख

चकरामधे तांदूळाच्याही इतक्या पद्धतीं दिसतात! शाली म्हणजेच मराठीत साळी असं म्हटलं जातं तो तांदूळ त्यात सांगितलाय. पावसाळ्यात उगवतो तो शाली आणि पावसाळ्यानंतर उगवतो तो व्रुही. या व्रुहीचंच इराण अफगणिस्तानमधलं रूप बिरिंच. आणि यातून उद्भवली ती बिर्याणी.

बिर्याणी म्हणजे भातात मांस घालून खाण्याची पद्धत आपल्याकडे मुघलांनी आणली असं काहींचं म्हणणं असतं. ते खरं नाही. रामायणामधेच मांसोदन नावाचा एक प्रकार आहे. याची संधी मांस आणि उदन अशी होते. उदन म्हणजे भात. मांस घातलेला भात म्हणजे मांसोदन. हे फार प्राचीन आहे. यासारखाच भाताचा एक प्राचीन पदार्थ ज्याला इराण, अरेबिकमधे किशार, किशारी असं म्हटलं जातं. भारतात आज हा पदार्थ खिचडी, खिचारा या नावाने प्रसिद्ध आहे.

तामशाळ म्हणजे ताम्रशाली, काळशाळ काळशाली, साठशाळ म्हणजे साठ दिवसांत तयार होणारं पीक असे अनेक पदार्थ आपल्याला वाड्मयात सापडतात. मूळ पदार्थ सापडतात. त्यावर प्रक्रिया करण्याच्या रेसिपी सापडतात.

हेही वाचा : घटस्थापना : भारतातल्या कृषीप्रधान संस्कृतीचं दर्शन घडवणारा सण

कानामागून आले आणि तिखट झाले

असं सगळं आपलं प्राचीन अन्न होतं. वनस्पती, फळं, भाज्या, पक्षी, प्राणी, मद्य, पाणी हे आणि या सगळ्यापासून तयार होत गेलेले पदार्थ आपल्या अन्नात होते. आपले पूर्वज खात असलेले बहुतेक अन्न स्थलांतरित होऊन आलंय. आज जेवढं अन्नाचं उत्पादन होतंय तेवढं उत्पादन ६०-७० वर्षांपूर्वीही होत नव्हतं.

आपण कृष्णधवल सिनेमांत शेतातून पळणारे हिरो हिरॉईन पाहिले तर त्यांच्या डोक्यावर तुरा लोंबणारा दिसतो. इतक्या उंचीचं गव्हाचं पीक तेव्हा होतं. आज अशा प्रकारचा गहु पंजाब हरिणायामधेही औषधालाही सापडणार नाही. कारण आज आपण या गव्हाचं रुपांतरित म्हणजे हायब्रिड स्वरूप वापरतोय. हा इतिहास पदार्थांची उपलब्धता बदलते तसा बदलत जातो.

उदाहणार्थ, ५०० वर्षांपूर्वी आपल्याकडे मिरची हा प्रकार नव्हता. तो लॅटिन अमेरिकेतून आपल्याकडे आला. मग तिखटपणा कशातून आणला जायचा तर मिरी आणि सुंठातून.  हे प्राचीन काळात तिखटाचे पदार्थ म्हटले जातात. त्यानंतर खरोखरच मिरची कानामागून आली आणि तिखट झाली. ५०० वर्षांपूर्वी भारतात आलेल्या मिरची, टोमॅटो आणि बटाटा या तीन पदार्थांमुळे इथलं अन्न पुरतं बदलून गेलं. आज या तीन पदार्थांशिवाय भारतातल्या बहुतेक ठिकाणचा स्वयंपाक पूर्ण होत नाही.

एखाद्या धान्याचं मूळ, जंगली स्वरूप कुठं होतं, त्याचं रूपांतर कसं झालं, त्याचं स्थलांतर कसं झालं, ते कसं आणि किती पसरलं, पसरलं तर लोकप्रिय झालं का यावरून त्या त्या टप्प्यावर घडणाऱ्या अन्नाचा इतिहास आपल्याला काढता येतो.

हेही वाचा : 

खरंच, वामनाने बळीला पाताळात पाठवलं होतं?

बाहेरच्या झगमगाटात काळजात कँडल पेटवते ग्लुकची कविता

मोफत पॅड देऊन स्कॉटलँडनं मासिक पाळीची गरिबीच दूर केलीय

जोतिबाच्या नावानं चांगभलं ही संपूर्ण मानवजातीच्या भल्याची मागणी