६ डिसेंबर १९९२ला नेमकं काय झालं?

०६ डिसेंबर २०१८

वाचन वेळ : १७ मिनिटं


६ डिसेंबर १९९२ला अयोध्येत बाबरी मशीद पाडली तेव्हा ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे अयोध्येत होते. याची चौकशी करणाऱ्या लिबरहॅन आयोगासमोरही त्यांची साक्ष झाली होती. अयोध्या दौऱ्याचं त्यांनी महाराष्ट्र टाइम्ससाठी केलेलं वृत्तांकन हा ऐतिहासिक दस्तावेज आहे. ते आज नव्या वाचकांसाठी. 

२ डिसेंबर १९९२, लखनौ
अयोध्येच्या वाटेवर चर्चा ठाकरे यांचीच

कारसेवकांच्या गर्दीने खचाखच भरलेले लखनौ रेल्वे स्थानक. त्यात महाराष्ट्रातील किमान तीन ते चार हजार कारसेवक. तरुणांपासून म्हातारे-कोतारे सर्वजणच डोक्याला भगवे पट्टे लावून फिरताना दिसत होते. 'मंदिर वही बनाएंगे' अशा घोषणा. महाराष्ट्रातील महिला कारसेविकाही जागोजाग नजरेस पडत होत्या. बहुतेक ग्रामीण भागातल्या. वारीला निघावं तश्या तयारीनं कारसेवेला निघालेल्या. 'राम लल्ला हम आयेंगे. मंदिर वही बनायेंगे'. या त्यांच्या घोषणेने सर्वांचं लक्ष आकर्षित करून घेत होत्या. महिलांनी आपल्या दंडाला भगव्या पट्ट्या बांधल्या होत्या. तर खेडुतांच्या छातीवर नाव, गाव, पत्ता लिहिलेले बिल्ले अडकवलेले होते.

पुणे जिल्ह्यातील सातशे कारसेवकांचा जथ्था लखनौत दाखल झाला होता. रा. स्व. संघाचे कार्यवाह पुणे जिल्हा विनायकराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ प्रत्येक तालुक्यातून लोक आले होते. मावळ तालुक्यातून १२० लोक आले आहेत. तळेगाव-दाभाडे येथील विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय विष्णू खोल्लम भेटले. साठीचा हा गृहस्थ 'मंदिर वही बनायेंगे' अशा घोषणा तितक्याच उत्साहाने देत होता.

झुळझुळीत भगवे कपडे घातलेला एक तरुण पुढे आला. थोरातांनी ओळख करून दिली. हे गुरू श्री महंत रामगिरीचे महाराज. पंचविशीतील त्या तरुणाला नाव विचारले तर म्हणाला सुरेश गिरी. गाव कुठलं असे विचारता बारामती म्हणाला. आपल्या प्रचारानं बारामती हादरून टाकली, असे त्यानं सांगितलं.

त्यात बजरंग दलाचे तरुण उठून दिसत होते. खांद्यावरून कमरेपर्यंत भगवे पट्टे आणि जय श्रीराम या घोषणा. यात साताऱ्याचा दिलीप जोशी दिसत होता. साताऱ्याहून १२ तरुण आले होते, तर धुळ्याहून ११, नागपूरहून असेच पाचएकशे आले होते.

थोडक्यात लखनौ स्थानक मराठी माणसांनी फुलून गेलं होतं. हे सगळे 'सियाल्डा एक्स्प्रेस'ने अयोध्येला निघाले होते. रेल्वे स्थानकातील पोलिस सहाय्यता केंद्र विहिंपच्या लोकांनी ताब्यात घेतले होते. तिथं चार पुऱ्या आणि लोणचं यांची पाकिटं वाटण्यात येत होती. तिथं मोठ्ठा बॅनर लावला होता. 'संतोका अब फिर आव्हान. चलो अयोध्या. चलो अयोध्या'.

गर्दीमधे पेपरवाल्या पोरांची चलती होती. 'बाल ठाकरे बंबईसे अयोध्या जाएंगे'. असे मोठमोठ्याने ओरडून सांगत होते आणि त्यामुळे पहिल्या तासात पेपर खल्लास. मराठी पोरं मोठ्या चवीने 'चेतना' या सायंदैनिकातील ती बातमी वाचत होती.

ठाकरे हत्यारं आणि बॉम्बच्या लडी घेऊन अयोध्येला जाणार, असं छापलं होतं. याबाबत दिल्लीत मोरेश्वर सावे आणि मोहन रावले या खासदारांनी माहिती दिल्याचे नमूद केले होते. ठाकरे यांच्या बातमीमुळे मराठी मुलांना फारसं आश्चर्य वाटत नव्हतं. पण उत्तर प्रदेशातील विहिंप कार्यकर्ते मात्र मोठ्या थाटात इतरांना सांगताना दिसत होते.

एक उत्तर भारतीय कार्यकर्ता दुसऱ्याला सांगत होता. अरे बाल ठाकरे को क्या समझे? नयी समझे. अरे वह तो चंबलल के डकैतोसे बढकर है. नही समझे. अब तो नरसिम्हा रावकी छुट्टी हो जाएगी. बम फुटा तो मामलाही खतम. नही समझे? असे सांगून त्याने टाळी घेतली.

ठाकरे येणार आणि हत्यारांसह येणार या बातमीनं सगळं वातावरण भारावून गेलं होतं. मराठी कारसेवकांत चौकशी केली की किती शिवसैनिक आहेत तर, लोक तोंड फिरवायचे. एकजण म्हणाला, 'ते मोठे लोक आहेत, स्पेशल बस करून येतील.'

'सियाल्डा एक्स्प्रेस' येण्याची वेळ झाली तसे मराठी कारसेवक घोषणा देत फलाटावर गोळा झाले. बहुजन समाजाच्या या घोळक्यात एखादाच चित्पावन संघीय दिसत होता. दिमाखात.

 

३ डिसेंबर १९९२, अयोध्या
राम रंगी रंगले

अयोध्या शहरात प्रवेश करतानाच वादग्रस्त विभागाकडे जाणारा राम रस्ता. या रस्त्यावर हजारो कारसेवकांची गर्दी आजुबाजूला उभारण्यात आलेले शेकडो तंबू, सामूहिक स्नान, स्त्री-पुरुष सगळे एका ठिकाणी. सामूहिक भोजन..जागा मिळेल तिथे बसून..ठिकठिकाणी शिधा वाटप केंद्रे. जेवण्याची पाकिटे घेण्यासाठी लागलेली रांग. सर्वांना जेवण मिळेल याची खात्री नाही. तरीही रांगा हटत नाही.

राम मार्गावर कारसेवकांची गर्दी. पुरुष बायका, मध्यमवयीन, तरुण, उतार वयाकडे झुकलेले सगळेच त्या गर्दीत. जय सियाराम च्या घोषणा. भगवी जाकिटे, भगव्या टोप्या, भगव्या रिबीनी, भगवी मुंडासी, भगव्या ओढण्या, भगवे झेंडे यांनी सगळा परिसर भगवा बनलेला. गर्दीत महाराष्ट्रीय, आंध्रचे, तामिळनाडूचे, गुजराथेतील, राजस्थानमधील सगळे चेहरे ओळखायला येतात.

गर्दीतच चार-पाचशे तरुणांचा घोळका राम नाम सत्य है ही घोषणा देत पुढे येतो. पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा निघालेली असते. काठीला चपला अडकवून त्या दाखविल्या जातात. मागच्या बाजूला चौघांच्या खांद्यावर ताटी आणि त्यावर मढ्याची प्रतिकृती. घोषणा, राम नाम सत्य है. नरसिंह राव मुर्दाबाद इत्यादी-इत्यादी.

राम चबुतऱ्यापुढं सभा. तेथे प्रचंड गर्दी. राम कथा कुंजमधे स्वागत कक्ष. धावपळ. गडबड. आणि गोंधळ. राम चौथऱ्यापुढे चाललेल्या सभेचे ध्वनिक्षेपक पार रस्त्यापर्यंत शेकडो कर्णे आणि भाषणाच्या आवाजाने सगळ्या परिसरात नुसता गोंगाट. खासदार उमा भारती यांच भाषण. मंदिर तो जरुर बनेगा. मगर कलंकका यह ढाचा खत्म होना चाहिए. टाळ्या. शिट्या. आणि जय श्रीरामाच्या घोषणा. सौगंध राम की खाते है, मंदिर वही बनाएंगे. नुस्ता जल्लोश. पुन्हा त्या सांगतात. जोश पर होश रखो. समजावणीचा स्वर. सभा संपते.

पुन्हा गर्दी पुरासारखी वाढू लागते. त्याच घोषणा. तोच गोंधळ. तोच जोश आणि तोच उत्साह. राम चबुतऱ्याकडे जाताना एक मोठा बॅनर. दुनियाकी कोई भी ताकद राम मंदिर को रोक नहीं सकती. पुढे आणखी एक मोठा बॅनर बंदुकों से हम न डरेंगे, मौत हमारी हमजोली, जान हथेली पर ले देंगे. प्राण देंगे, मंदिर का निर्माण करेंगे. राम का दरबारी हमारा कोर्ट और धर्मसंसद हमारी सरकार.

विवाद्य बाबरी मशिदीभोवती भरभक्कम कुंपण. कुंपणाभोवती राज्य राखीव पोलिसांचा पहारा.त्या पहाऱ्यापुढे तरुणांचा भांगडा. परत निघताना एक चित्रविचित्र तरुण भेटला. सगळे डोके वस्तऱ्याने तासलेले. फक्त राम ही अक्षरे डोक्यावर कोरलेली. तेवढेच केस. हा तरुण पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्याचा. माजी गृहराज्यमंत्री बापूसाहेब थिटे यांच्या गावचा. नाव संभाजी पराड.

अयोध्या गावात घराघरात मंदिर. प्रत्येक मंदिरावर माकडांच्या टोळ्या. रस्त्यावर ही माणसं. जागोजाग लाऊड स्पीकर. रामाची गाणी. राम जी का मंदिर बनानेवाला आया है. रामा रामा, रामा रामा, रामा रामा, रामा रामा. पुढे कुठे जय राम जन्मभूमी हे गाणे. त्या गाणाच्या तालावर नाचणारी पोरं आणि फेर धरलेल्या पोरी.

प्रत्येक दुकानात भगवे स्कार्फ, भगव्या रिबीनी, ओढण्या बाहेर अडकवलेल्या. त्यांची विक्रीही जोरात. कुणाचा धंदा दहापट तर कुणाचा वीसपट. दुकानात पंढरपूरसारखे कुंकू, गुलाल, भस्म, माळा, देवादिकांच्या तसबीरी. उदबत्त्या. रामाच्या कॅसेट आणि कॅलेंडर्स. जिकडे पाहावे तिकडे राम.

टुटेगी, झुकेगी दिल्ली सरकार झुकेगी, ही घोषणा देणाऱ्या विद्यार्थी परिषदेच्या मुली. मधेच बोला पुंडलिक वरदा हारी विठ्ठल. जिकडे तिकडे महाराष्ट्रातील आणि त्याहीपेक्षा आंध्रातील लोक जास्त. पंतप्रधान आंध्रचे म्हणून भाजपने ताकद लावून आंध्रातून आणलेले लोक दिसतात. पुल्ला रेड्डी नावाचे आंध्रातील विहिंपचे अध्यक्ष. मिठाईवाले. त्यांची मिठाई आंध्रातील मशहूर आहे. पंतप्रधानाच्या नंद्याल या मतदारसंघातून एक हजार कारसेवक. आंध्रातून एकूण १५ हजार. महाराष्ट्रातून १० हजार. तामिळनाडू, केरळ या राज्यांतील थोडेबहुत पण कारसेवकात दाक्षिणात्यांचं वर्चस्व दिसून येतं. उत्तर प्रदेशातील कारसेवक जवळजवळ दिसत नव्हते, हेही विशेष.

कारसेवकांची गर्दी दरदिवस वाढते आहे. जेवणखाण, आंघोळ, संडास यांची आबाळ होताना दिसत असतानाही उत्साहात कोठेही कमी नाही. शिवाजीनगर, राणी लक्ष्मीबाईनगर, गुरुगोविंदनगर, कारसेवापुरम ही तंबूची नगरं वसलेली. त्यात हजारो तंबू, त्यात कारसेवकांच्या वस्त्या. अंगाला राख फासलेले साधू संत महंत निर्मोचन घाट, वाल्मिकी आश्रम, भगोदाचार आश्रम येथे वसती करुन आहेत. तर विष्णू हरी दालमिया, बद्रीप्रसाद तोष्णीवाल या विहिंप नेत्यांचा मुक्काम जानकी महल ट्रस्टच्या आलिशान वास्तूत.

४ डिसेंबर १९९२, अयोध्या
कारसेवा होती हैं, करानेवाला चाहिए

कचेहरी मैदान फैजाबाद, काँग्रेसचा तिरंगी झेंडा लावलेल्या मोटारी निघालेल्या असतात. ‘जय सीयाराम’च्या घोषणा सुरू असताना मधेच या मोटारी पाहून अनेकांच्या चेहऱ्यावर कुतुहल. अयोध्येत कारसेवकांना जागा न उरल्याने आता अनेकजण फैजाबादेत मिळेल तेथे आश्रय धुंडाळताना दिसत आहेत. त्यामुळे फैजाबादेत रस्तोरस्ती आता गर्दी झाली आहे. तमाम हॉटेलांबाहेर ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड.

काँग्रेसने आज ‘शांतता मार्च’ जाहीर केलेला असतो. कचेहरी मैदानाकडे वाहने निघालेली असतात. कचेहरी म्हणजे कचेरी. जिल्हाधिका-यांची, जिल्हा न्यायाधीशांची. आवारात फैजाबाद बार असोसिएशन. कुठल्याही मंडईत जसे कट्टे असतात तसे कट्टे. वर पत्र्याची शेड. या कट्ट्यावर वकिलांचे बाकडे. बाकड्यावर पेटी. पेटीशेजारी वकील. भाजीवाले बसतात तसे फैजाबादेत वकील बसतात.

तर या कचेरीच्या मैदानात काँग्रेसवाले जमत असतात. गोगलगाईच्या गतीने त्यांची संख्या वाढत असते. मैदानात रामधून लावलेली असते. ‘रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम’, ‘सीताराम सीताराम भज प्यारे तू सीताराम’. भाजप आणि रा. स्व. संघ यांनी कब्जा न केल्यामुळे हे एक गाणे काँग्रेसवाल्यांकरिता उरलं आहे. ‘जय श्रीराम’ आणि ‘रामा रामा हो रामा रामा’ यांच्या पार्श्वभूमीवर हे गाणं काही वेगळ्याच भावना जागवून जाते. शांतता मार्चसाठी खास दिल्लीतून नेतेमंडळी येणार म्हणून स्थानिक नेते तयारीत असतात. लोक जमविण्यासाठी आटापिटा चाललेला दिसतो. मार्च निघाला तरी मैदानाबाहेरच तो अडविण्याचा निर्णय झालेला असतो.

मैदानात बॅनर्स ‘धर्म संसदसे यही इच्छा, संविधान न्यायालय की करे रक्षा’, ‘सारे जहाँसे अच्छा’ वगैरे वगैरे. फैजाबाद म्हणजे आचार्य नरेंद्र देव यांचं गाव. त्यांच्या जवळच्या नात्यातले एक निर्मल खत्री इथले खासदार. त्यांनी एक मोठा फलक लावलेला असतो. ‘राम के मर्यादाकी यह भूमी, लोहिया - नरेंद्र देवकी यह नगरी, अमन चैनकी हैं यह नगरी.’

अयोध्या आणि फैजाबादेतील या वातावरणात काँग्रेसचा मार्च धर्मसंसदेवर जाणार असतो. पोलिसांनी परवानगी नाकारली. नाकारणे भाग होते. ‘दर्या में खसखस’ अशी त्यांची अवस्था होती.

तिकडे अयोध्येत रस्तोरस्ती ‘रामा रामा हो रामा रामा’ तर इकडे मंदिर वही बनायेंगेच्या ठेक्यात, बजरंग दलाची पितळी त्रिशूळ, गिरगावातल्या मुलांची स्टीलची फरशी, कुणाचा धनुष्यबाण मिरवणुकीत नाचत असतो. त्याच गराड्यात सोलापूरचे वसंत पतंगे आणि जालन्याचे वारकरी कारसेवक दिसतात. सोबत बाया बापड्या सोलापूर, परभणी, जळगाव, जालना, पुणे, परळी अशी कित्येक मराठी माणसं. त्यात आमगाचे प्राध्यापक विवेक जोशी विद्यार्थ्याना घेऊन आलेले दिसतात. ‘श्रीरामाचे नाव घेता, नरसिंह लागला पळायला, रामा रामा हो रामा रामा’, ‘जाग उठे जब राणा शिवाजी, भाग पडे मुल्ला काझी’, ‘वी. पी. सिंग मर गया, जलानेवाला चाहिए’, ‘कारसेवा होती है, करानेवाला चाहिए’, असे प्रकार अखंडपणे रस्तोरस्ती चालू आहेत. दुसरं कामच नाही. दशरथ महल, राम भरत मिलाप मंदिर, हनुमान गढी, सगळीकडे तुफानी रांगा.

शिवसैनिकांचा एक जथ्था अयोध्येत दाखल झाला आहे. बहुतेक मराठवाड्यातील. शिवसैनिकांबद्धल इथे प्रचंड कुतुहल आहे. ते काहीतरी गडबड करणार, अशी चर्चा कारसेवकांत आहे. शिवसैनिक इथं काही करणार नाहीत, असं सांगूनही खरं वाटत नाही. लोकांच्या मते संघवाल्यांनीच ही कंडी पिकवली आहे. बजरंग दलाच्या लोकांनी करायचे आणि शिवसैनिकांवर घालायचे, असा डाव असल्याचं सांगतात.

तर अशोक सिंघल, यांची वार्ताहर बैठक, खासदार उमा भारती भगव्या वैशात. डोक्यावरचे केस पार कापलेले. सिंघल कारसेवेचा तपशील सांगत नाहीत. कारसेवकांकडे चौकशी केली तर मधेच एखादा संघवाला तंबी देतो. किसी को कुछ बताना नही. लगेच सगळे पांगतात. संघाची पकड जबरदस्त. त्यामुळे जे होईल ते ठरवूनच!

आतल्या गोटातील बातमीनुसार कारसेवकांचा पहिला जथ्था आंध्र प्रदेशातील असेल. आंध्रातील लोक इतरांच्या मानाने शांत, भोळेभाबडे. सगळ्यात आक्रमक महाराष्ट्रातील कारसेवक. खास पठडीत तयार झाल्यामुळे. रामाच्या भक्तीपोटी मोठ्या संख्येने आलेले आंध्रातील कारसेवक आघाडीला ठेवण्याचे कारण उघड आहे. संघाच्या डावपेचाचा हा खास नमुना.

कारसेवा ६ तारखेला आहे. तूर्तास नुस्ती जत्रा, हुर्रेहूर पंढरपूर.

५ डिसेंबर १९९२, अयोध्या
व्यापाऱ्यांची चंगळ


अयोध्येत ६ डिसेंबरला काय होणार, या उत्सुकतेने लाखो कारसेवकांना गेला आठवडाभर भंडावून सोडलं होते. या खेपेची कारसेवा म्हणजे ती ‘कलंकित’ वास्तू जमीनदोस्त करण्याची निर्णायक कारसेवा, असे समीकरण मनाशी बांधून अनेकजण आले होते. त्यामुळे ‘रणचंडीको नरमुंडो की माला पहनायेंगे, खायी थी जो कसम उसे पूरा कर दिखलाऐंगे, आगे कदम बढाया है, अब पीछे नही हटेंगे’ ही घोषणा ठिकठिकाणी लिहिण्यात आली होती.

‘रामजीका काम ये है रामजीका’ असं म्हणत महिलाही हीच खूणगाठ बांधून आल्या आहेत. ‘सियावर रामचंद्र की जय’, या घोषणा देत तरुणांनी घसे मोकळे केले. कोणी डोक्याची चक्की केली, तर कोणी ‘राम’ ही अक्षरंही डोक्यावर कोरली. कारसेवकांच्या उदंड उत्साहाने अयोध्या-फैजाबाद फुलून गेले होते. ही दोन शहरं म्हणजे जणू मिरज-सांगलीच. तेवढंच अंतर, तो रस्ताही गजबजून गेला आहे. या दोन्ही शहरांत अहोरात्र वाहतूक आहे. मिळेल त्या वाहनाने अथवा पायी देखील!

एकूण दोन लाख कारसेवक आजमितीला या दोन शहरांत आहेत. शिवाय पोलिस. राज्याचे आणि केंद्राचे. केंद्राचे पोलिस दूर दृष्टी पथात न येणारे. केंद्र सरकारच्या जागा जिथे आहेत, तिथं त्यांचा मुक्काम, अन्नधान्य बरोबरंच आणले आहे. पाण्यासाठी स्वतःच्या बोअर लावल्या. स्वतःचे मोबाईल टेलिफोन एक्सचेंज आणले. राज्य सरकारकडून कसलीच अपोक्षा न ठेवता स्वतःची व्यवस्था त्यांनी स्वतः केली आहे. 

केंद्रीय राखीव पोलिस फक्त बाजारातून भाजी विकत घेतात. दोन लाख कारसेवक आणि सीआरपी यांच्यामुळे भाज्यांचे दर वाढलेत. चाळीस पैशाची भाजी तब्बल चार रुपये किलोने विकली जात आहे. अयोध्येतील कळकट हॉटेलात एक भजा एक रुपयाला विकला जात आहे. एकंदरीत व्यापाऱ्यांची चंगळ आहे. मंदिरात बऱ्यापैकी माया जमत आहे.

अयोध्येत जिकडे पाहावे तिकडे पत्रावळी दिसत आहेत. द्रोण आणि पत्रावळ्या चाटणारी माकडे पाहताना कसेसेच होते. पण ती मात्र खुशीत आहेत. रिक्षावाले, टॅक्सीवाले, दुकानदार, पुजारी, हॉटेल मालक या सगळ्यांना या आठवड्यात लाभ होता. प्रभू रामचंद्राच्या भूमीचे दर्शन झाल्यामुळे कारसेवक महिला पुरुषही आनंदात आहेत ते वेगळंच.

‘राम की धरती, रामका भारत, यही हमारी अदालत’ अशा घोषणा दिल्या जात असताना, भांगडा आणि डिस्को करताना कारसेवा कशी होणार असा प्रश्न सर्वांना भंडावत होता. अगदी आल्या दिवसापासून. आज विश्व हिंदू परिषदेच्या मार्गदर्शक मंडळात याबाबत निर्णय होणार होता. त्यामुळे कमालीची उत्सुकता होती. अगदी तुळजापूर तालुक्यातून इरकली लुगडी नेसलेल्या बायांनाही! महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक येथून आलेल्या कारसेवकांची संख्या पाहून विद्यमान राज्यकर्त्यांना घाम फुटावा, अशी स्थिती आहे.

तर मार्गदर्शक मंडळाची बैठक हनुमान बागेत चालली होती. अयोध्येत राम, लक्ष्मण, सीतामैया, लवकुश, हनुमान, रामायण अशीच नावे प्रत्येक ठिकाणाला आहेत. इथे एकही इमारत अशी नाही की जिच्यावर प्रभू रामचंद्राचं चित्र नाही. इकडे रामकथा कुंज येथील ध्वनिक्षेपकावरून सक्त सूचना देण्यात येत होत्या. राम मार्गावर कारसेवकांच्या रांगा लावण्यात आल्या होत्या. प्रांताप्रमाणे उद्याच्या कारसेवेची ही रंगीत तालीम आहे, असं सांगण्यात येत होतं.

अगदी सुरूवातीला आंध्र प्रदेशातील कारसेवक, त्यातही पंतप्रधान पी. वी. नरसिंह राव यांच्या नांद्याल या लोकसभा मतदारसंघातील. नरसिंह राव यांचे आजोळ वंगारा हे गाव. तिथली दहा मुलं तर अगदी पहिल्या रांगेत. मंडल श्रीनिवास हा विद्यार्थी त्यांचं नेतृत्व करीत होता.

आंध्रातून मोठ्या संख्येने कारसेवक आलेले. त्यांना विचारलं उद्या कारसेवा कशी करणार. सर्वाचं एकच म्हणणं जसा आदेश दिला जाईल तशी. आंध्र प्रदेशनंतर महाराष्ट्राच्या जथ्था. महाराष्ट्राच्या कारसेवकांवर संघाचे जबर वर्चस्व. कोणी काहीही विचारायला जा. ठराविक साचेबंद उत्तर. विदर्भ आणि मराठवाड्यातील लोक काही बोलायला गेले तर अर्धी चड्डीवाला हजर. प्रश्न मिटला. महाराष्ट्रानंतर राजस्थान, पंजाब, कर्नाटक, मध्य प्रदेश अशा रांगा लागलेल्या. सर्वात शेवटी उत्तर प्रदेश आणि बिहार.

जथ्थे चालले होते. रामलल्ला हम आये है. त्याचवेळी ध्वनिक्षेपकांच्या संस्कृत प्रचुर आणि मराठी धाटणीच्या विशुद्ध हिंदीतून सूचना चालल्या होत्या. उद्या सकाळी ठीक ११ वाजता याच पद्धतीने जमायचे. प्रत्येक कारसेवक आपल्या मुठीत माती घेईल. ती माती टाकून त्याने कारसेवा पूर्ण करावयाची. यावेळी अनुशासन राखले जाईल. जराही गडबड अपेक्षित नाही. वगैरे. वगैरे.

सूचना ऐकताच उत्तर प्रदेश, बिहार आणि राजस्थानच्या कारसेवकांची माथी भडकतात. हम थोडेही मिट्टी डालनेको आये है? हमे तो यह कलंक का ढाचा खत्म करना है. यह कौन है निर्णय करानेवाले. ढांचेको नोंचने नहीं दिया, तो रास्ते रास्ते मे आग लगायेंगे. यह तो कल्याण सिंग को बचाने का तरीका है. हम तो राम के आदेश का पालन करेंगे. यह कौन होते है हमे आदेश देनेवाले.

राजस्थानातील तरुण भडकलेले असतात. पाठोपाठ बिहारचे तरुण घोळक्याने अद्वातद्वा बोलत असतात. यह कारसेवा थोडीही है. यह तो नाटक है. नेतागिरी करने के बजाय नौटंकी बजाव. इ. इ. बिहारमधील तरुण शांतपणे बडबडत असतात. स्वयंसेवक भणभणत असतात.

हमारा यह जुनून देखकरही हमे कतारमे पीछे खडा किया जा रहा है, असंही बिहारी राजस्थानी तरुण सांगत होते. भाजपवाल्यांची ही चालबाजी आम्ही चांगली ओळखतो, असे त्यांचं म्हणणं. रामलल्लाची घोषणा देत जथ्थे पुढे झाले. वादग्रस्त जागेत गेले आणि तिथून रांगेतून बाहेर. आपापल्या वसाहतीत. संपले.

वादग्रस्त बाबरी मशिदीच्या बाहेर एक मोठं कुंपण आहे. अलीकडे मुलायम सिंगांच्या सरकारने आणखी एक कुंपण घातलं आहे. त्याच्याही बाहेर आता कल्याणसिंग यांच्या सरकारने लाकडी कुंपण उभं केलं आहे. लाकडी कुंपणाच्या आत राज्याचे पोलिस. कुंपणाबाहेर संघाचे स्वयंसेवक. त्यामुळे उद्याच्या अनुशासनाची पूर्ण तयारी झाली आहे.

जथ्थे ‘रिहर्सल’ करत असताना तिकडे वेदमंदिरात अशोक सिंघल, आचार्य वासुदेव यांची वार्ताहर बैठक चालू असते. न्यायालय, केंद्र सरकार यांच्यावर भरपूर आणि खरपूस टीका चालली होती. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे उद्याची कारसेवा नाही, असं ते वारंवार सांगत होते. वार्ताहर प्रश्नांचा भडीमार करताना ते चिडत होते.

एक मात्र निश्चित की उद्या कारसेवाही होणार आणि न्यायालयाच्या निर्णयाचे पालनही? गडबड करणारे फार गडबड करतील अशी शक्यता दिसत नाही, आजतर. कारण असे गाजर दिले आहे की, जे खाताही येईल आणि नंतर पुंगी करुन वाजवताही येईल! असो.


६ डिसेंबर १९९२, अयोध्या
अखेर ते घडलंच

राम रस्त्यावर सकाळी ८.३० पासून लागलेल्या रांगा प्रथम आंध्र, नंतर महाराष्ट्र वगैरे वगैरे परिसरात सुमारे दीड दोन लाख कारसेवक बसलेले. 'राम कथा कुंजा'च्या गच्चीवरून ध्वनिक्षेपकाद्वारे सूचना चाललेल्या असतात. शांततेनं कारसेवा करा, अनुशासन पाळा, काही लोकं माथी भडकावतील, पण शांतता राखा.

अशोक सिंघल बोलण्यास उभे राहतात. 'आम्ही सर्व हिंदू एक आहोत. आमच्यात मतभेद नाहीत. ही पत्रकार मंडळी खोटंनाटं लिहितात. त्यांना योग्य तो जबाब द्या' या आघातात बीबीसीचा उद्धार.

वादग्रस्त २.७७ एकर जागेत, शिलान्यास झालेल्या ठिकाणी झेंडा फडकावलेला असतो. राज्याचे पोलिस चहुबाजुंनी तैनात. त्यांच्यापुढे संघाचे स्वयंसेवक, क्षणाक्षणाला उत्साहाचं उधाण येत असते. 'सियावर रामचंद्र की जय' वगैरे. सकाळी ठीक ९.५५ वा. साधूसंतांना राम चबुतऱ्यावर सोडण्यात येतं. शंखध्वनी साऱ्या आसमंतात घुमतो.

याच वेळी सशस्त्र पोलिसांसह जिल्हा दंडाधिकारी श्रीवास्तव पाहणीसाठी चबुतऱ्यावर येतात. रामनामाच्या घोषणा. आजूबाजूया सर्व इमारती झाडांवर बघे कारसेवक. चबुतऱ्यावर ३०० ते ४०० साधू जमतात. साधू संत आज चबुतरा धुणार होते. पण त्यासाठी आधी ठरल्याप्रमाणे शरयू नदीतून पाणीही आणलेलं दिसत नव्हतं. 'राममंदिर के नींव पर (शिलान्यास) मिट्टी डालनी है', असं सांगून आजच्या कारसेवेत सर्वांचं समाधान होईल, हे आम्ही पाहू. पण तुम्ही संयम राखा. १० वाजून २० मिनिटांनी लालकृष्ण अडवाणी राम चबुतऱ्यावर येतात. बरोबर मुरली मनोहर जोशी, प्रमोद महाजन. कारसेवकांमार्फत प्रचंड स्वागत. दोघे नेते पाहणी करतात. एवढ्यात जोशींना ठेच लागते. अंगठ्याचे नख निघतं. तसे ते बाहेर निघतात.

एवढ्यात दक्षिणेच्या दरवाजातून काही कारसेवक कडं तोडून आत घुसतात. आगंतुकपणे. घोषणांचा धुमाकूळ. संघ स्वयंसेवक त्यांना अडवतात. थोडी हाणामारी. थोड्या वेळाने आणखी काही तसेच घुसतात. अडवाणी त्यांनी शांत करण्याऐवजी तसेच निघून जातात. घुसखोरांचा पत्रकार आणि छायाचित्रकार यांच्यापुढे नाच सुरू होतो. साधूसंत दोन्हीकडून नाच पाहतात.

'राम कथा कुंज'च्या गच्चीवरून अडवाणी भाषण करण्यास उभे राहतात. 'अब दुनिया की कोई ताकद राममंदिर को रोक नही सकती', अडथळे आणले तर केंद्रात सरकार चालू देणार नाही. 'जो शहीद होने आये है, उन्हे शहीद होने दो. रामचरण मे जाना अगर उनके भाग में होगा, तो उन्हे शहीद होने दो'.  भाषा आक्रमक. प्रक्षोभक. त्यांच्या प्रत्येक वाक्याला कारसेवकांची दाद.

रा. स्व. संघाच्या आत्मघातकी पथकाने राम चबुतऱ्यावर प्रवेश केलेला असतो. काही घुसखोरांना बाहेर काढलं जातं. हाणामाऱ्या नि बाचाबाची. काही साधू आया बहिणीवरून शिव्या घालतात. एक साधू 'वॉइस ऑफ अमेरिका'च्या वार्ताहराला मारहाण करतो. 'टाइम' मॅगझीनच्या वार्ताहरही यातून सुटत नाहीत. शिव्यांच्या लाखोलीत पाच पंचवीस छायाचित्रकारांचे कॅमेरे हिसकावून घेतले जातात. काही काँक्रीटवर आदळले जातात, तर काही पळवले जातात. आरडाओरडा, गोंधळ. 

सिंघल येतात. निघून जातात. या गोंधळात अडवाणी आपले कमांडर शोधू लागतात. 'मेरे कमांडर किधर है', अशी चौकशी करतात. प्रचंड हादरलेले असतात. गडबड, गोंधळ सुरूच. प्रभू रामचंद्रांनी संयम पाळला म्हणूनच धनुष्य तोडलं. हा ढाचाही तसाच तुटेल. कारण तोपर्यंत साधूसंत शांत होणार नाहीत. माईकवरून कुणाचं तरी भाषण सुरू असतं. गडबड वाढते.

११ वाजून ५० मिनिटं. मशिदीवर पहिला दगड पडतो. पाठोपाठ चहूबाजूंनी दगडाचा वर्षाव. राज्य सरकारच्या सांगण्यावरून मशिदीत केंद्रीय राखीव पोलिसांची तुकडी तैनात असते. या दगडफेकीत हे ७-८ पोलिस घायाळ. तेवढ्यात काही घुसखोर कुंपणावरून मशिदीत घुसतात. घुमटावर चढतात. हजारो कारसेवक उन्मादाने नाचू लागतात. दगडफेकीला आणखीनच जोर चढतो. माईकवरून सूचना सुरू होतत. कोई भी पुलिस हस्तक्षेप करेगा नही. 'पुलिस को अनुरोध है के वो किसी भी हालत मे हस्तक्षेप ना करे'. कारसेवकांवर दगड फेकू नका. कारण आपलेच कारसेवक जखमी होत आहेत.

पोलिस स्वस्थपणे पाहात आहेत. तेवढ्यात आणखी शेकडो कारसेवक कुंपणावरून आत शिरतात. सीआरपीचे डीआयजी ओ. पी. मलिक यांना दगड लागतो. कारसेवक मशिदीत घुसतात. गर्भगृहात जेथे रामाची मूर्ती ठेवली आहे, तेथे विनयकुमार पांडे नावाचा पुजाऱ्याचा मुलगा बसलेला असतो. संतप्त कारसेवक त्याला मारहाण करून मूर्ती बाजूला ठेवतात. मूर्तीचे मुकूट आणि सोन्याचांदीचे दागिने पळवले जातात. घायाळ सीआरपी त्या मुलास घेऊन नियंत्रण कक्षात येतात.

मिळेल त्या हत्याराने, साधनाने घुमटांची खुदाई सुरू होते. शंखध्वनी, टाळ्या, घोषणा आणि तोडफोड. यात बाहेरची भिंत पडते. तसा टाळ्यांचा कडकडाट. मशिदीचा ताबा पूर्णपणे कारसेवक आणि साधूंकडे. सगळे पोलिस एका बाजुला होतात. जिल्हा दंडाधिकारी ज्येष्ठ पोलिस अधिकारी हे दृश्य जवळच्या नियंत्रण कक्षात बसून स्वस्थपणे पाहत असतात. जमावात आता ढोलकी, टाळ, ताशा वगैरे. लोक विजयी मुद्रेने मशिदीच्या विटा, सळ्या वाजतगाजत नेत असतात. एव्हाना १५ ते २० कारसेवक जखमी. ५० ते ६० पत्रकार-छायचित्रकारांना मारहाण. यातून बीबीसीचे मार्क टुलीही सुटत नाहीत. ६० ते ७० कॅमेरे लंपास. 

'सारे रोड ब्लॉक किये जाय. सीआरपी की एकी भी गाडी अंदर आ न सके.' २ वाजून ४० मिनिटांनी घुमटाची एक भिंत कोसळते. २ वाजून ५० मिनिटांनी घुमट जमीनदोस्त. माईकवर आता ऋतंभरा येतात. 'कलंक का ये ढाचा खत्म करो. राम नाम सत्य है. बाबरी मशीद तोड दे.' ऋतंभरा म्हणत, 'एक धक्का और दो'. कारसेवक म्हणतात, 'बाबरी मशीद तोड दो.'

४ वाजता आणखी एक घुमट जमीनदोस्त. त्यात अनेक कारसेवक जखमी. त्यांची जागा तिसरी तुकडी घेते. सर्वत्र जल्लोष आणि घोषणा. जिल्हा दंडाधिकारी आणि इतर नुस्ते पाहतात. बरोबर ४ वाजून ४६ मिनिटांनी मधला घुमट खाली येतो. लाखो कारसेवक आनंदाने नाचत असतात. 

'कलंक का ढाचा खत्म हुआ', राज्याचे पोलिस एकमेकांना टाळ्या देत असतात. साध्वी ऋतंभरा जोराजोरात अभिनंदन करत असतात. कारसेवकांच्या रांगा रेल्वे स्टेशनकडे. प्रत्येक जण बरोबर जाताना मशिदीच्या दगड विटांसह दिसतो. वार्ताहर छायाचित्रकार पोलिसांच्या ट्रकमधून कसेबसे फैजाबादेत. तिथे कर्फ्यू. तिथले लोक म्हणतात, आखिर बीजेपीने ढाचा खत्म तो किया. सर्वत्र बीजेपीचे कौतुक. कर्फ्यूतही रस्त्यावर वर्दळ. चर्चा. एव्हाना अडवाणी जोशी कधीच गायब झालेले असतात.

७ डिसेंबर १९९२, अयोध्या
कारसेवकांचं राज्य

उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर अनेक शहरांत संचारबदी. फैजाबादेत सहा डिसेंबरच्या रात्री काही ठिकाणी जाळपोळ. रस्त्यावर शुकशुकाट. कारसेवक जथ्थ्या जथ्थ्याने निघालेले. परतीच्या वाटेत घोषणा ऐकायला मिळत नाहीत. जो तो शांतपणे निघालेला. संचारबंदी असली तरी फारशी कठोर नाही. त्यामुळे घराच्या दाराबाहेर पेपर वाचत चर्चा चाललेली मिळते.

कल्याणसिंगने सही वक्त पर इस्तीफा दे दिया. अब तो नरसिंहा राव को भी जाना पडेगा. अच्छा हुवा बरसोंका कलंक मिट गया. बीजेपी तो अब सेंटरमे जायेगा. कोई उसे रोक नही पायेगा. एकंदर लोक भाजपवर एकदम खूष. वी. पी. सिंग आणि नरसिंह राव या दोघांनाही शिव्याशाप. राज्याचे पोलिसही वर्तमानपत्र वाचत चर्चा करताना दिसतात. सूर एकच. बीजेपीने बडा अच्छा काम किया. सर्वत्र टीका होत असताना जनमत भाजपबरोबर.

अयोध्येच्या वाटेवर जाताना फैजाबादेत झालेली जाळपोळ दिसते. फैजाबादची हद्द संपातच अयोध्येची हद्द सुरू होते. कारसेवक मोठ्या प्रमाणात रेल्वे स्थानकाकडे निघालेले असतात. प्रत्येकाच्या हातात कारसेवेची खूणगाठ म्हणून वीट, सळई इत्यादी वस्तू. बाबरी मशीद पाडल्यानंतर मिळलेल्या चीजा. मधूनमधून सीयारामच्या घोषणा.

अयोध्येत शिरताच ठिकठिकाणी धुराचे लोट आकाशाकडे झेपावताना दिसतात. घरांना, दुकानांना आगी लावण्याचा कार्यक्रम जोरात सुरू असतो. हा कार्यक्रम रात्रीपासून असल्याने एव्हाना ६०-७० घरं भस्मसात झालेली असतात. कारसेवक उत्साहाने उरलेली कारसेवा करताना दिसत असतात. स्थानिक लोक घरं दाखवतात आणि कारसेवक आगी लावतात, असं चित्र. स्थानिक पोलिस कोंडाळी करून प्रत्येक घटना कुतुहलाने पाहताना दिसतात. घर अथवा दुकान फुटलं की लोक आत घुसून लूटमार करतात. यात स्थानिक पोलिसही हाताला लागेल ते घेऊन बाजुला होतात. कारसेवक चुकून एका हिंदूच्या बंद घरावर हल्ला करतात. लोक सांगतात, 'इधर नहीं भाइं उधर'. मोर्चा तिकडे वळतो. असे प्रकार अयोध्येत ठिकठिकाणी चालू असतात.

स्थानिक अधिकाऱ्यांना विचारलं असता ते म्हणतात, `हम क्या करें, हमें काई आदेश नहीं. डीएम फैजाबाद जा बैठे है.` बाबरी मशिदीजवळ जोरात कारसेवा चाललेली असते. एव्हाना मशीद पूर्णपणे साफ झालेली असते. बायका पुरुष उत्साहाने माती, दगड, विटा दूरवर टाकताना दिसतात. विश्व हिंदू परिषदेच्या माईकवरून सूचना चाललेल्या असतात. ज्यांना काल कारसेवेत भाग घेता आला नाही, त्यांनी आज कारसेवा करुनच निघावे. पवित्र कार्यात मागे राहू नका. इ. इ.

इतक्यात आकाशात हेलिकॉप्टर घिरट्या घालू लागलेत. उद्ध्वस्त बाबरी मशिदीजवळ पाचपन्नास हजारांचा जमाव 'जय सीयाराम'च्या घोषणा देतो. हेलिकॉप्टर बीएसएफ अथवा लष्कराचं असावं. अयोध्येची हवाई पाहणी चालू असते. बाबरी मशीद चली गयी, अब नरसिंह राव चला जायेगा, जोरदार घोषणा. उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरी अयोध्येत कारसेवकांचेच राज्य सुरू असतं.

मशिदीची जागा साफ करुन तिथे रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा कार्यक्रम चालू असतो. तात्पुरती जागा सारवून त्यावर मूर्ती ठेवल्या जात असतात. राम मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्याशिवाय डीएम म्हणजे जिल्हा दंडाधिकारी सीआरपींना बोलावणार नाहीत, अशी जोरदार चर्चा. तिकडे रामकथा कुंजच्या गच्चीवरुन भाषणं चालू असतात. हजारोंच्या संख्येने कारसेवक ती भाषणं ऐकत असतात. अब महाराष्ट्र के भूतपूर्व विरोधी पक्ष नेता मनोहर जोशी साहब भाषण करेंगे. जोशी मोठ्या जोशात बोलत असतात. सहा डिसेंबर हा हिंदूच्या इतिहासातील एक सुवर्ण दिन म्हणून नोंद होईल. इ. इ.

फैजाबादकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी वखारी पेटलेल्या असतात. उरल्यासुरल्या मशिदी फोडण्याचं काम सुरू असतं. धुराचे लोळ आकाशाकडे झेपावत असतात. विहिंपच्या नेत्यांच्या मोटारीचा ताफा निघालेला असतो. पुढे एस्कॉर्ट, मागे एस्कॅर्ट. आचार्य गिरीराज किशोर एका मोटारीतून आग पहात जात असतात. जय सीयारामच्या घोषणेने त्यांना निरोप देण्यात येत असतो.

थोड्या वेळाने शिवसेना नेत्यांच्या मोटारी निघतात. मनोहर जोशी, सुधीर जोशी, दत्ता नलावडे, लीलाधर डाके, आनंद दिघे फैजाबादकडे मार्गस्थ होतात. जाळपोळ आणि लुटालूट चालूच असते. पोलिस मजा पाहत असतात आणि हेलिकॉप्टर आकाशात घिरट्या घालत असतं. अजूनही केंद्र सरकार आकाशातच असतं.

८ डिसेंबर १९९२, अयोध्या
शेवट!

अयोध्येत ८ डिसेंबरला पहाटे साडेतीन-चारचा सुमार. बाबरी मशिदीच्या जागेवर चोहोबाजूने पाच फुटी भिंत. आत चौथरा, चौथऱ्यावर राम, लक्ष्मण आणि सीतेच्या मूर्ती विराजमान झालेल्या असतात. पाच पन्नास उत्साही कारसेवक परिसरात गप्पा मारत बसलेले असतात काळोख आणि थंडी. केंद्रीय राखीव पोलिसांचा रॅपिड अॅक्शन फोर्स काळोखात सावधपणे निघालेला. बाबरी मशीद एका टेकाडावर होती. मागच्या बाजूला मोठा खोलवर भाग.

अयोध्येतील वादग्रस्त जागेचा ताबा घेण्याचा आदेश जारी झालेला असतो. चोहोबाजूने जवान सावकाशपणे अंदाज घेत पुढे निघालेले असतात. हळूहळू टेकाड चढून एक एक जण वर येतो. ज्या जागेवर मूर्ती ठेवल्या आहेत, तिला वेढा पडतो. इतक्यात कारसेवकांना खबर लागते. शंभर दोनशे तरुण सामोरे जातात. आरडाओरडा आणि गलका. सगळे खडबडून जागे होतात.

जवान काठ्या लाठ्या आपटत चालून जातात. त्यामुळे एकच घबराट. जे कारसेवक सामना करायला जातात त्यांच्यावर सौम्यपणे छडीमार. जो तो धावत सुटतो. एव्हाना सगळे जागे होऊन परिसराकडे निगालेले असतात. 'राम कथा कुंज'चा माइक सुरू होतो. 'अयोध्यावासी चले आव, सीआरपीने हमला बोल किया हे', ` रामद्रोही आये हे. अयोध्यावासी चले आव.'

हनुमानगढी आणि मानसभवनमधून दगडफेक सुरू होते. रॅपिड अॅक्शन फोर्सची त्वरेने कारवाई. अश्रुधूराची पाच नळकांडी फुटतात. दुसऱ्या बाजूने थंडगार पाण्याचा मारा. जो तो मिळेल त्या वाटेने. जीवन मुठीत घेऊन. कोण म्हणते फैरिंग हो रही है. मग आणखीनच धावाधाव. अवघ्या पंधरा मिनिटात सगळा परिसर रिकामा.

रॅपिड अॅक्शन फोर्सची कारवाई फत्ते झालेली असते. सगळा विवाद्य परिसर ते ताब्यात घेतता. कारसेवक फैजाबादच्या रस्त्यावर जमलेले असतात. तिथेही चोहोबाजूने केंद्रीय राखीव पोलिस. कारसेवा रोखी गयी है. आप अपने अपने सीआरपीच्या गराड्यात राममूर्ती सुरक्षित. पूजेसाठी फक्त पुजाऱ्याच्या अपवाद.

अयोध्या रेल्वे स्थानकावर परतण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या लागल्या असतात. काल रात्रीपासून १८ गाड्या भरभरून कारसेवक गेले. थांबण्याचा आदेश असतानाही. रात्रीच पंतप्रधान नरसिंह राव यांचा निरोप आला होता, असे विहिंपवाले सांगतात. शांतपणे परिसर मोकळा करा, केन्दीय राखीव पोलिस मारहाण करणार नाही. झालं तसंच. किरकोळ दगडफेक आणि परचुटन लाठीमार. मामला संपला.

सकाळपर्यंत राखीव पोलिसांनी संबंध अयोध्येत झडत्या घेतल्या. जे बाहेरगावचे होते, त्या सर्वांना बाहेर काढून वाटेला लावले. नऊ वाजेपर्यंत सगळ्या अयोध्येवर नियंत्रण. दुपारी १२ वाजेपर्यंत सबंध वादग्रस्त विभागाभोवती तारेचं जबर कुंपण उभारलं होतं. कुंपणाबरोबरच जागोजाग सशस्त्र जवान.

उत्तर प्रदेशचे पोलिस कारसेवकांबरोबच दूर लोटलेले असतात. अयोध्येतील कारसेवकांच्या सर्व राहुट्या रिकाम्या झालेल्या असतात. दुपारी बाराच्या सुमारास महाराष्ट्रातील आणि खासकरून मुंबईचा जथ्था निघालेला असतो. हा जथ्थ्या शेवटचा असल्यामुळे अयोध्येत आता एकही कारसेवक उरलेला नसतो. सरचिटणीस अशोक सिंघल सकाळी पाऊणे दहाच्या सुमारास अयोध्या सोडून गेलेले असतात.

गेले पंधरा दिवस गजबजलेली अयोध्या जवळजवळ निर्जीव. आठ दिवसरात्र चाललेले भटारखाने थंड झालेले. भटारखान्याबाहेर कांदे, बटाटे आणि वांग्यांचे ढीग तसेच पडलेले. गेले पंधरा दिवस अहोरात्र घसा कोरडा करणारा विहिंपचा ध्वनिक्षेपकही आता शांत झालेला असतो. त्यामुळे एकदम शांतता. अयोध्येत आता फक्त सीआरपीएफ आणि रॅपिड अॅक्शन फोर्सच्या मोटारींचा आवाज. जागोजागी कारसेवकांनी केलल्या जाळपोळीच्या खुणा आणि उद्ध्वस्त झालेली मुसलमानांची घरे. बाकी सर्व संपलंय

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत. )