पंतप्रधान इंदिरा गांधींवर गोळ्या झाडल्या आणि...

०२ नोव्हेंबर २०१८

वाचन वेळ : ४ मिनिटं


बुधवार, ३१ ऑक्टोबर १९८४. तो दिवस सफदरजंग रोडवरच्या पंतप्रधानांच्या घरात नेहमीसारखा सुरू झाला होता. पण तो नेहमीसारखा नव्हता. सकाळी ९ वाजल्यानंतर त्या दिवसाचा नूर पूर्णपणे बदलला. ३१ ऑक्टोबर १९८४ ला सकाळ पासून पुढच्या २४ तासात नक्की काय घडलं?  `द क्विंट`, `बीबीसी` आणि `फ्री प्रेस जर्नल` यांमधे आलेल्या लेखांच्या आधारे मांडलेला हा त्या दिवशीचा घटनाक्रम.

३० ऑक्टोबर १९८४

दुपारी जाहीर भाषणात पंतप्रधान इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या, `मी आज आहे. उद्या नसेनही. मला त्याची चिंता नाही. मी माझं आयुष्य तुमच्या सेवेत घालवलं, याचा मला अभिमान आहे... मी माझ्या शेवटच्या श्वासपर्यंत तुमची सेवा करत राहीन. मी मरेन तेव्हा माझ्या रक्ताचा शेवटचा थेंब भारताला मजबूत करण्यासाठीच असेल.`

३१ ऑक्टोबर १९८४, सकाळी ७.३०

रात्रभर जागरण होऊनही पंतप्रधान इंदिरा गांधी सकाळी साडेसात वाजता तयार होत्या. दोन अंडी, दोन पाव आणि संत्र्याचा ज्यूस इतकाच नाश्ता त्यांनी घेतला. त्या नेहमी कमीच नाश्ता करत. त्यांनी त्या दिवशी केशरी रंगाची साडी नेसली होती. 

सकाळी ९

त्या ऑफिससाठी निघत होत्या. ब्रिटीश दिग्दर्शक पीटर उस्तिनोव पंतप्रधान कार्यालयात इंटरव्यूसाठी त्यांची वाट पाहत होते. ते एका डॉक्युमेंटरीसाठी इंदिरा गांधींची मुलाखत रेकॉर्ड करणार होते.

सकाळी ९.०८

१, सफदरजंग रोड हे त्यांचं सरकारी घर होतं. शेजारच्या बंगल्यात ऑफिस होतं. दोन्ही बंगल्यांना जोडणारा विकेट गेट आवारातच होता. इंदिरा गांधी त्या गेटमधून जात असतानाच सबइन्स्पेक्टर बेअंत सिंग या बॉडीगार्डने त्यांच्यावर त्याच्या ३८ रिवॉल्वर मधून तीन गोळ्या झाडल्या. इंदिरा गांधी जमिनीवर पडल्यानंतर त्यांचा २१ वर्षीय सतवंत सिंग या दुसऱ्या बॉडीगार्डने त्यांच्यावर ३० राऊंड गोळ्यांचा मारा केला. पुढच्या काही मिनिटांतच इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिसच्या जवानांनी बेअंत सिंगला ठार केलं आणि सतवंत सिंगला ताब्यात घेतलं. 

सकाळी ९.३२

जखमी अवस्थेत असलेल्या इंदिरा गांधींना व्हाईट अँबेसेडर कारने एम्स हॉस्पिटलला नेण्यात आलं. इंदिरा गांधी त्यांची सून सोनिया गांधी यांच्या मांडीवर पडून होत्या. इंदिरा गांधींना कॅज्युलिटी विभागात नेण्यात आलं. तिथे डॉ. तीरथ दास डोगरा यांच्या नेतृत्वातल्या टीमने ऑपरेशन केलं. त्यांच्यावर ३३ गोळ्या झाडलेल्या होत्या. त्यातल्या ३० त्यांना लागल्या होत्या. २३ शरीराच्या आरपार गेल्या होत्या. सात शरीरात अडकलेल्या होत्या. 

दुपारी १२.३०

ही घटना घडली त्यावेळी राजीव गांधी प्रचारासाठी कोलकत्याला गेले होते. तिथे राजीव गांधींचा प्रवास थांबवून त्यांना दिल्लीला जायला सांगितले. राजीव गांधी विमानाची वाट पाहत होते. तेवढ्यात इंदिरा गांधींची प्रकृती चिंताजनक असल्याची बातमी बीबीसीवर चालवली जात होती.

दुपारी १२.३० ते ३

दिल्लीला जाणाऱ्या विमानात बसल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जींनी राजीव गांधींना पंतप्रधान पदाची सूत्रे स्वीकारण्याची सूचना केली. कोलकातावरुन दिल्लीला पोचण्यासाठी राजीव गांधींना अडीच तास लागले. 

दुपारी २.३०

डॉक्टरांची आणि इंदिरा गांधींची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. इंदिरा गांधी यांचं प्राणोत्क्रमण झालं.

दुपारी ३.१५

दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर राजीव गांधी एम्स हॉस्पिटलला पोचले. तिथे एम्स हॉस्पिटलचे मेडिकल सुपरिटेंडंट डॉ. एएन सफायानी पंतप्रधान इंदिरा गांधींचं निधन झाल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. 

राजीव गांधी भारताचे सहावे पंतप्रधान असतील, असा निरोप उपराष्ट्रपती आर वेंकटरमन यांनी राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांना दिला.

संध्याकाळी ६.४५

हंगामी सरकारची नेमणूक करावी लागू नये म्हणून राजीव गांधींनी भारताचे सहावे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. 

रात्री ८

दूरदर्शनवर न्यूज अँकर सलमा सुलतान यांनी इंदिरा गांधीच्या निधनाची बातमी दिली. यानंतर पंतप्रधान राजीव गांधींनी देशाला पहिल्यांदा संबोधित केलं.

मध्यरात्री

मध्यरात्रपर्यंत जवळपास दिल्लीतल्या सर्व भागातून हिंसाचाराच्या घटना सुरू झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या. दिल्लीतून सुरू झालेल्या शीखविरोधी दंगलीचे पडसाद हळूहळू शेजारील राज्यात उमटू लागले. तिथेही दंगली घडू लागल्या. दिल्लीतील दंगलीत जवळपास ३०० जण मारले गेले.

६ जानेवारी १९८९

इंदिरा गांधींवर गोळ्या झाडणारा सतवंत सिंग आणि षडयंत्राचा सूत्रधार केहार सिंग या दोघांना फाशी दिली.