हात धुण्यासाठी साबण वापरायचा की सॅनिटायझर?

१९ एप्रिल २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


कोरोनाला पळवून लावण्यासाठी जगभरात हात धुण्याचा ट्रेंड आलाय. यासाठी काही लोक साबणाचा वापर करत आहेत. तर काहीजण सॅनिटायझर वापरत आहेत. त्यामुळे सॅनिटायझरची मागणी इतकी वाढलीय की पुरवठा कमी पडू लागला. साहाजिकच, किंमतही वाढली. पण सॅनिटायझर आपले हात साबणापेक्षा चांगले स्वच्छ करू शकत नाही. मुलं हाताला लावलेलं सॅनिटायझर चाटतात, असं समोर आलंय.

कोरोना वायरसनं भारताचं दार ठोठावलं आणि लगेचच सॅनिटायझरच्या किमती अगदी आभाळाला जाऊन पोचल्या. पूर्वी ३० ते ४० रूपयाला मिळणारं सॅनिटायझर २०० ते ५०० रूपयांपर्यंत मिळू लागलं. तेही फारशा प्रसिद्ध नसलेल्या अविश्वसनीय ब्रॅंडचं. अनेकांनी सॅनिटायझरची साठवणूक करून ठेवल्यामुळे बाजारात अशी परिस्थिती आली असं म्हटलं जातं.

आजही सॅनिटायझर विकत घ्यायला गेलो तर बहुतेक मेडिकल आणि दुकानांमधे उपलब्ध नसतंच. आणि असलं तरी काहीच्या काही किमतीला ते विकलं जातं. त्यामुळे सामान्य माणसांना सॅनिटायझर परवडत नाहीत. पण खरंतर, सॅनिटायझर विकत घ्यायची गरजच नाहीय. कारण सॅनिटायझरपेक्षा साबण किंवा हॅण्डवॉशनेच हातांची स्वच्छता चांगली होते.

हेही वाचा : आपल्याला हात धुवायला शिकवणाऱ्या या दोघांना बिग थँक्यू

साबणाला पर्याय म्हणून सॅनिटायझर

साबण ही गोष्ट फार जुन्या काळापासून वापरली जाते. पहिल्यांदा इजिप्तच्या लोकांनी साबण तयार केला असं म्हटलं जातं. ते रोज साबणाने आंघोळही करत असत. मात्र, साबणाने हात धुतल्याने आजारापासून संरक्षण होतं हे माहीत नव्हतं.

१७० वर्षांपूर्वी ही गोष्ट आपल्याला कळाली. मिलिटरी मेडिकलमधे काम करणाऱ्या नर्स फ्लोरेन्स नाईटॅन्गल आणि डॉक्टर इगनाझ सिमेलविस या दोघांनी साबणानं हात धुतले तर या जंतूंची संख्या झपाट्याने कमी होते आणि भयंकर रोगापासून आपलं रक्षण होतं हे लक्षात आणून दिलं.

साबणाचं द्रव्यरूप म्हणजेच हॅण्डवॉश. जे काम साबण करतो तेच हॅण्डवॉशकडून केलं जातं. पण हॅण्डवॉश किंवा साबण यापैकी कशाचाही वापर करून हात धुवायचे असतील तर त्यासाठी पाणी लागतं. प्रवासात किंवा ऑफिसमधे अनेकदा हात धुण्याइतकं पाणी उपलब्ध नसतं. अशावेळी पाण्याशिवायही हात स्वच्छ करता यावेत म्हणून अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर बाजारात आलं.

सॅनिटायझर कुठेही नेता येतं

गोष्टींचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी मेडीकल क्षेत्रात १८व्या शतकापासूनच अल्कोहोलचा वापर केला जात होता. पण अल्कोहोल आणि पाणी किंवा जेल एकत्र करून सॅनिटायझर सारखा पदार्थ बनवता येतो याचा शोध लुप हर्नानजेझ या कॅलेफोर्नियातल्या नर्सने साधारण ४० वर्षांपूर्वी लावल्याचं म्हटलं जातं. त्यानंतर हळूहळू सॅनिटायझरची इंडस्ट्री उभी राहिली.

सध्या बाजारात विकल्या जाणाऱ्या सॅनिटायधरमधे अल्कोहोलसोबतच इझोप्रोपील, इथियल आणि ग्लिसरीन असेही घटक असतात. साबण किंवा हॅण्डवॉशमुळे हात कोरडे पडतात. पण सॅनिटायझरमधल्या घटकपदार्थांमुळे हात कोरडे पडत नाहीत. शिवाय, सॅनिटायझर वापरायला आणि हाताळायला सोपं असतं.

खिशात, पर्समधे कुठेही सॅनिटायझरची छोटी बॉटल सहज बसते. आणि फक्त दोन तीन थेंब हातावर घेऊन चोळले की झालं काम! साबणाप्रमाणे २० सेकंद हात धुवायची, पाणी वापरायचीही गरज पडत नाही. त्यामुळेच साबण आणि हॅण्डवॉशपेक्षा सॅनिटायझरला लोकांची मागणी असते. साबणापेक्षा पटकन सॅनिटायझरनेच हात स्वच्छ करण्याकडे आपला शॉर्टकट कल असतो.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?

कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?

कोरोनाचा पेशंट वेंटिलेटरवर किती काळ जिवंत राहतो?

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

सगळे जंतू मारत नाही

पण खरंतर, सॅनिटायझर ही साबण नसेल तर तात्पुरती वापरायची गोष्ट आहे. साबण आणि सॅनिटायझर यांच्या शर्यतीत साबणंच जास्त चांगला ठरतो. सॅनिटायझर साबणाइतकं चांगलं नसतं, अशी माहिती अमेरिकी सरकारच्या सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिवेन्शन या संस्थेच्या वेबसाईटवर सापडते. त्यामागे चार कारणं असल्याचं सांगितलंय.

पहिलं, सॅनिटायझरमुळे सगळे जंतु मरत नाहीत. क्रिप्टोस्पोरिडियम, नोरोवायरस आणि क्लोस्टोरिडियम डिफिसाईल असे काही जर्म आणि वायरस सॅनिटायझरने मरत नाहीत. हॉस्पिटल किंवा लॅबोरेटरीसारख्या ठिकाणी काम करणारे कर्मचारी नेहमी सॅनिटायझरचा वापर करतात. त्यांचे हात खूप मातकट किंवा तेलकट नसतात. त्यामुळे जंतुंच्या संपर्कात आले तरी सॅनिटायझरमुळे हात स्वच्छ होऊ शकतात.

आपण मात्र रोजच्या जगण्यात अन्नाला, वेगवेगळ्या वस्तूंना हात लावतो. त्यामुळे हात तेलकट होतात. शिवाय, बागकाम करताना किंवा बाहेर ट्रेकिंगला, प्रवासात जाताना हातांना धूळ, माती लागते. अशावेळी सॅनिटायझर वापरलं तरीही सगळे जंतू मारले जात नाहीत. अशावेळी साबण आणि पाण्याचा वापर करून हात धुणंच जास्त चांगलं असतं.

विषबाधा होण्याची भीती

दुसरं म्हणजे, सॅनिटायझर वापरून हात स्वच्छ करणाऱ्यांच्या शरीरात जंतुनाशकांची म्हणजे पेस्टासाइडची संख्या वाढल्याचं समोर आलंय. कारण अनेक घातक रसायनांवर सॅनिटायझरचा काहीही उपयोग होत नाही, असं एका अभ्यासातून सिद्ध झालंय. पेस्टीसाइडची संख्या जास्त म्हणजे शरीरात विषारी द्रव्य जास्त असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे घातक रसायनं, किटकनाशकांना हात लावला असेल तर साबण आणि पाणी वापरूनच हात धुवावे लागतात.

तिसरं, सॅनिटायझरमधे ६० ते ९५ टक्के अल्कोहोल नसेल तर त्या सॅनिटायझरचा फारसा उपयोग होत नाही. ६० टक्क्यांपेक्षा कमी अल्कोहोल असणारे सॅनिटायझर फक्त वायरस आणि जर्मची संख्या कमी करतात. पण त्यांना पूर्णपणे मारून टाकत नाहीत. त्यामुळे सॅनिटायझर वापरलं तरी संसर्गाचा धोका कायम राहतो. सॅनिटायझर वापरण्याचीही पद्धत असते. थोडं सॅनिटायझर हातावर घेऊन ते सुकायच्या आत संपूर्ण हाताला चोळलं गेलं पाहिजे. पण अनेकवेळा सॅनिटायझर संपूर्ण हाताला नीट लागत नाही. 

चौथं, सॅनिटायझरमधे इथिल अल्कोहोल असतं. असं सॅनिटायझर तोंडात गेलं किंवा हाताला जास्त लागल्याने अन्नाबरोबर पोटात गेलं तर अल्कोहोल पॉयझनिंग म्हणजे विषबाधा होण्याची भीती असते. विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत असं हमखास घडतं. युएस पॉईझन कंट्रोल सेंटरमधे २०११ ते २०१५ या दरम्यान लहान मुलांना सॅनिटायझरमुळे विषबाधा झाल्याच्या ८५ हजार केसेस आल्या होत्या.

चांगला वास येणारे, वेगवेगळ्या विशेषतः भडक रंगाचे किंवा छानसं पॅकेजिंग असलेले सॅनिटायझर लहान मुलं खातात किंवा जास्त लावतात, असं समोर आलंय. त्यामुळेच लहान मुलांना सॅनिटायझर देऊन चालणार नाही. त्यांच्यासाठी साबणच वापरावा लागेल.

हेही वाचा : ग्लोव्ज घातल्याने कोरोनापासून आपलं संपूर्ण संरक्षण होतं?

हात धुणं का गरजेचं?

आपण सगळी कामं हातानेच करतो. गोष्टी उचलतो, ठेवतो, हाताने जोर लावून हलवतो. कम्पुटरवर काम करतो, पेनाने लिहितो. अशा वस्तूंवर कोरोना किंवा इतर कोणतेही वायरस असतील तर ते आपल्या हातावरही येतात. मानवी शरीर हे वायरसचं आवडतं घर असतं.

वायरस हातावर किंवा शरीराच्या कुठल्याही भागाच्या संपर्कात आला तर तो त्वचेवरच्या मृत पेशी वापरून आपलं पोट भरतो. त्यासाठी वायरस पेशी स्वतःभोवती एक आवरण निर्माण करतो. हे आवरण चिकट असतं. त्यामुळे वायरस पेशीला चिकटून राहतो. अशा वायरस असलेल्या हाताने आपण जेवलो किंवा डोळ्याला, नाकाला हात लावला तर तिथून वायरस शरीरात प्रवेश करतो आणि शरीरातल्या वेगवेगळ्या पेशींवर हल्ला करू लागतो. म्हणून साबणाने हात धुणं गरजेचं आहे.

‘द गार्डीयन’च्या वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार, एखादा वायरस तीन गोष्टींपासून बनलेला असतो. आरएनए, प्रोटीन आणि लिपिड्स. माणसाचा डीएनए असतो तसं वायरसचा आरएनए असतो. हा आरएनए वायरसचं मूळ असतं. त्यानंतर मधे प्रोटीनचा थर असतो. मग लिपिडचं आवरण असतं. हे आवरण चिकट असतं. त्यामुळे वायरस पेशींवर चिकटून राहतो. या तीन गोष्टी एकत्र करून वायरस स्वतःच स्वतःची निर्मिती करतो.

साबणात ऍमफिफिल्स नावाचा एक पदार्थ असतो. हे ऍमफिफिल्स लिपिडचं आवरण विरळ करतात. त्यामुळे वायरस शरीरापासून वेगळा होतो. शिवाय, साबणाने आरएनए, प्रोटीन आणि लिपिड्स या तीन गोष्टींचं एकत्रीकरण होण्याची प्रक्रिया थांबते. आणि साहजिकच वायरस निर्जीव होतो. म्हणून साबणाने हात धुणं गरजेचं आहे. पण साबण नसेल तेव्हा आपण सॅनिटायझर वापरणं ठीक आहे. पण ते सुद्धा ६० टक्के अल्कोहोल असणारं सॅनिटायझर असावं.

हेही वाचा : 

लॉकडाऊनमधे आपण माणूसकीलाच क्वारंटाईन केलंय का?

महिनाभराच्या लॉकडाऊनपासून या देशांनी घेतला मोकळा श्वास

कोलंबसने नेलेल्या साथरोगांनीच संपवली मूळ अमेरिकी संस्कृती

बाहेरून आणलेलं सामान वायरस फ्री करण्याचं साधंसोप्पं प्रॅक्टिकल

हमीद पर उम्मीद : कोरोनाचं औषध सिप्ला शोधेल असं जगाला का वाटतं?