सुपर स्प्रेडर म्हणजे काय? ते मुद्दाम कोरोना पसरवतात का?

१४ मे २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


भारतात लॉकडाऊन शिथील करण्याची, मागं घेण्याची चर्चा सध्या सुरू आहे. पण लॉकडाऊन मागं घेताना सुपर स्प्रेडरला रोखणं हे एक मोठं आव्हान आहे. कारण कोरोनाग्रस्तापेक्षा सुपर स्प्रेडर व्यक्तिला रोखणं हे जगापुढचं नवं संकट आहे. गुजरातच्या अहमदाबाद शहरात तर असे ३३४ सुपर स्प्रेडर सापडलेत. आणि त्यामुळेच गुजरातची स्थिती महाराष्ट्राहून बिकट झालीय. सुपर स्प्रेडर बनू नये म्हणून आपण काय करू शकतो?

कोरोना वायरसचे पाय भारताला लागले तेव्हापासूनच महाराष्ट्र हे राज्य कोरोना वायरसचा हॉटस्पॉट मानलं जात होतं. त्यातही महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि पुणे या दोन शहरात कोरोनानं सगळ्यात जास्त धुमाकूळ घातला. आता महाराष्ट्रात कोरोना वायरसचं प्रमाण थोडं मंदावलं असलं तरी मुंबई अजूनही रेड झोनमधेच आहे. त्यामुळे मुंबई आणि पुण्याचे काही भाग वगळता १७ मेपासून उर्वरित महाराष्ट्रातला लॉकडाऊन थोडाफार शिथील होईल अशी चर्चा सुरू आहे.

कोरोना वायरसमुळे भारत गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊनमधे आहे. येत्या १७ मेला आपण लॉकडाऊनच्या तिसऱ्या पर्वातून बाहेर पडू. आता १७ मेनंतर भारतातल्याही काही भागातला लॉकडाऊन शिथिल केला जाऊ शकतो. भारताच्या उर्वरित भागात आणि कोरोना वायरसचा हॉटस्पॉट मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्रासाठी ही दिलासादायक स्थिती असताना नुकताच भारतातल्या एका महत्त्वाच्या शहरातला लॉकडाऊन एकदम कडक केलाय. हे शहर म्हणजे गुजरातमधलं अहमदाबाद.

हेही वाचा : हर्ड इम्युनिटी ठरू शकते का कोरोनाच्या युद्धातलं भारताकडचं ब्रम्हास्त्र?

गुजरातमधे सापडले सुपर स्प्रेडर

टाईम्स ऑफ इंडियाच्या १० मेच्या बातमीनुसार अहमदाबादमधला लॉकडाऊन आधीपेक्षा जास्त कडक करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय. लॉकडाऊन कडक होणार म्हणजे किराणा माल, भाजीपाला, दूधविक्री अशा जीवनावश्यक वस्तूसुद्धा बंद राहणार. असा कडक लॉकडाऊन १५ मेपर्यंत लागू केला जाईल. आणि तो करण्यामागचं कारण असं की अहमदाबादमधल्या सुपर स्प्रेडर्सची संख्या झपाट्याने वाढतीय. आत्तापर्यंत अहमदाबादमधे कोरोना वायरसचे ३३४ सुपर स्प्रेडर सापडलेत.

सुपर स्प्रेडर म्हणजे नेमकं काय? या इंग्रजी शब्दाचा मराठीत साधा सोप्पा अर्थ होतो एखादी गोष्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवणारी व्यक्ती. ही गोष्ट म्हणजे काहीही असू शकते. एखादा मेसेज, एखादी वस्तू किंवा कोविड १९ या आजाराचे वायरससुद्धा!

सुपर स्प्रेडर म्हणजे काय?

एखाद्या संसर्गजन्य रोगाबाबतीत सगळे लोक सारखे नसतात. काही लोकांकडून कोरोना वायरसारख्या साथरोगाची लागण जास्त प्रमाणात होण्याचा धोका असतो. सीएनबीसी या वेबपोर्टलवरच्या एका लेखात जॉन हॉपकिन्स युनिवर्सिटीमधल्या डॉ. अमेशा अडल्जा म्हणतात, ‘एखाद्या संक्रमित व्यक्तीमुळे किती जणांना संक्रमण होऊ शकेल याचं कुठलंही प्रमाण न राहता जास्तीत जास्त लोकांपर्यंत वायरस पोचतो, अशा व्यक्तीसाठी सुपर स्प्रेडर हा शब्द वापरला जातो.’

साधारणपणे हे समीकरण ८०-२० असं असतं. म्हणजे, कोणत्याही संसर्गजन्य रोगाच्या ८० टक्के पेशंटला २० टक्के लोकांकडून लागण झालेली असते. याचा अर्थ असा की एका व्यक्तीकडून सुमारे ५ लोकांना वायरसची लागण होते. मात्र, सुपर स्प्रेडर्सच्या बाबतीत हा सिद्धांत काम करत नाही. एक सुपर स्प्रेडर कितीही लोकांना लागण करू शकतो.

अंदाजे १० हून जास्त लोकांमधे रोग पसरवणाऱ्या व्यक्तीला सुपर स्प्रेडर असं म्हटलं जातं. एक संपूर्ण गटही सुपर स्प्रेडर असू शकतो. म्हणजे, रेल्वेच्या एका डब्यात जमलेले लोक, एखाद्या पार्टीसाठी, कार्यक्रमासाठी किंवा सभेसाठी वगैरे जमलेले सगळे लोक सुपर स्प्रेडर असू शकतात. भारतातही तबलीगी जमातला सुपर स्प्रेडर म्हटलं गेलं. पण तबलीगी जमातमुळे पसरलेला कोरोना एका विशिष्ट मर्यादेनंतर थांबला.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोरोनाचे पेशंट या देशांत सापडले नाहीत की काही झोल आहे?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

अमेरिकेला कोरोनानं ताब्यात घेतलं, सेंट लुईस शहर वेगळं राहिलं, कारण

कोरोना फक्त फुफ्फुसच नाही, तर आपल्या या अवयवांनाही करतोय टार्गेट

कोरोनापेक्षा खरा धोका आहे तो आपल्या आतल्या वायरसचाः युवाल नोवा हरारी

कोरोनाः बिल गेट्सनी २०१५ मधेच दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष आपल्याला भोवतंय

कुणी मुद्दाम वायरस पसरवत नाही

आत्तापर्यंत असे ३३४ सुपर स्प्रेडर एकट्या अहमदाबादमधे सापडलेत. हे सुपर स्प्रेडर ओळखायचे कसे याबद्दल अनेक सिद्धांत मांडले जातात. द गार्डीयनवर उपलब्ध माहितीनुसार, 'काही तज्ञांच्या मते, रोगप्रतिकारक शक्ती चांगली नसणाऱ्यांना कोरोना वायरसला शरीरात दाबून ठेवता येत नाही. त्यामुळे ते सुपर स्प्रेडर होतात. तर काहींच्या मते, याउलट परिस्थिती असते. म्हणजे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती जास्त चांगली असल्याने त्यांच्यात कोरोना वायरसची लक्षणं दिसत नाहीत आणि त्यांच्या नकळतपणे कोरोना वायरसचं संक्रमण होतं.' कोरोनाची लक्षणं न दिसणं हे भारतापुढचं मोठं आव्हान बनलंय.

इथं एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. ती म्हणजे, माणूस सुपर स्प्रेडर असला किंवा नसला तरी, माणसाला कोरोना वायरसची लक्षणं जाणवत असतील किंवा नसतील तरी कोणताही माणूस मुद्दाम कोरोना वायरसची लागण कुणालाही करत नाही. डब्लूएचओनं तर हा शब्दही उच्चारायचं टाळलंय. तर अशा व्यक्तींना सुपर स्प्रेडर असं न म्हणता ‘सुपर स्प्रेडर परिस्थितीत जगणारे’ असं म्हणायचं आवाहन अनेक तज्ञ करतायत. नेमकी कोणत्या प्रकारची व्यक्ती सुपर स्प्रेडर बनून तिच्यामुळे इतर लोकांना वायरसची लागण होईल हे आजवर शास्त्रज्ञांनाही समजलेलं नाही.

सुपर स्प्रेडर बनण्यामागे अनेक कारणं असू शकतात. अनेकांच्या बाबतीत हे जैविकही असू शकतं, असं डॉक्टर अडेल्जा यांनी म्हटलंय. काही माणसांची जैविक जडणघडणच अशी असते ज्यामुळे त्यांच्या शरीरात इतरांपेक्षा जास्त वायरस तयार होतात. त्यांचं शरीर तशाप्रकारे काम करतं. किंवा शरीर कसंही असलं तरी मुळात खूप वेगाने स्वतःची वाढ करू शकणाऱ्या वायरसच्या गटाची लागण काही लोकांना होते. किंवा हे सगळं नसतानाही एखादा लागण झालेला माणूस काही लक्षणं दिसायच्या आतच खूप लोकांच्या संपर्कात आला तरी त्याला सुपर स्प्रेडर म्हणता येतं. एकामागेमाग घडणाऱ्या घटनांमुळे असं होत जातं. म्हणून तर त्याला सुपर स्प्रेडर परिस्थिती असं म्हणणं योग्य ठरेल.

एखादा माणूस नेमका कशामुळे सुपर स्प्रेडर बनतो याबाबत अजून काहीही डाटा उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे आपल्याला सुपर स्प्रेडर होणं कसं टाळता येईल हे सांगता येणं अवघड आहे. पण साथरोगाचा प्रसार होत असताना गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळून आपण स्वतःला सुपर स्प्रेडर होण्यापासून वाचवू शकू. आपण दुकानदार, किंवा आरोग्य अधिकारी अशा जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा करणारे असलो तरी आधी आपल्याला दुसऱ्या कुणाकडून कोरोनाची लागण होणार नाही, याची जास्त काळजी आपण घ्यायला हवी. सोशल डिस्टसिंग पाळणं हा आत्तातरी त्यावरचा एकमेव उपाय दिसतोय.   

ढिगभर लोकांना लागण करणारा बिझनेसमॅन

एकदा साथरोग पसरला की कुठलीही व्यक्ती सुपर स्प्रेडर असू शकते. एखादी व्यक्ती एका दिवसात अनेक लोकांच्या संपर्कात येत असेल तर ती सुपर स्प्रेडर बनण्याची शक्यता असते. दुकानदार, भाजीवाला, आरोग्य कर्मचारी, डिलीवरी बॉय, पोलिस असे अनेक त्यात येतात. यात त्यांना दोष देता येणार नाही. कारण, आपण घरात लॉकडाऊन झालेलो असताना हे लोक आपला जीव धोक्यात घालून बाहेर पडतायत, हे आपण लक्षात ठेवायला हवं.

एवढंच नाही, तर बिझनेसमनही मोठा सुपर स्प्रेडर असू शकतो. द गार्डीयनवर आलेल्या एका लेखात एका ब्रिटीश बिझनेसमनबद्दल लिहिण्यात आलंय. हा पन्नाशीचा बिझनेसमन एका कॉन्फरन्ससाठी सिंगापूरला गेला होता. तिथल्या अनेक लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. त्यानंतर तो फ्रान्सला गेला आणि तिथल्या एका हॉटेलमधे आपल्या कुटुंबासोबत राहिला. त्या हॉटेलमधल्या ९ वर्षाच्या मुलासोबत ५ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर तो पुन्हा युकेमधे आल्यावर त्याला कोरोनाची लागण झाली असल्याचं निदान करण्यात आलं.

हे फक्त कोरोना वायरसबाबतीतच होतं असंही काही नाही. प्रवासाची वेगवेगळी साधनं निर्माण झाली तेव्हापासून सुपर स्प्रेडर निर्माण झाले. द गार्डीयनवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, १९००मधे एका बाईमुळे ५१ जणांना टायफॉईडची लागण झाली होती आणि तिला स्वतःला टायफॉईडची कोणतीही लक्षणं दिसत नव्हती. १९९८ मधे फिनलंडमधल्या शाळकरी मुलामुळे वर्गातल्या इतर २२ मुलांना गोवरची लागण झाली होती.

हेही वाचा : कोविड टो म्हणजे काय? हे कोरोनाचं नवं लक्षण आहे का?

अहमदाबादमधे १४ हजार सुपर स्प्रेडर

अहमदाबादच्या ढोकला भागातल्या एका कलिंगड विक्रेत्याला कोरोनाची लागण झाली असल्याचं निदान करण्यात आलं. नियमितपणे त्याच्या संपर्कात येणाऱ्या ९६ लोकांनाही लागण झाली असल्याची शक्यता आहे. यात त्या विक्रेत्याचे कुटुंबीय तर येतातच पण इतर विक्रेते, डिलर आणि नियमितपणे येणारे ग्राहक या सगळ्यांचं विलगीकरण करण्यात आलं. त्यापैकी १२ लोकांची कोरोना टेस्ट पॉझिटिव आली असल्याचं जिल्हाधिकारी अरूण महेश बाबू यांनी एनडीटीवीला सांगितलं.

९ मेपर्यंत गुजरातमधे कोरोना वायरचे ७७९७ पेशंट सापडले. आणि ४७२ लोकांचा मृत्यू झाला होता. यातले ५५४० पेशंट एकट्या अहमदाबादमधले होते. आणि मृतांपैकी ३६३ लोक अहमदाबादचे रहिवासी होते. अहमदाबादमधल्या अधिकाऱ्यांनी एनडीटीवीलाच दिलेल्या माहितीनुसार, सध्या अहमदाबादमधले १४ हजार लोक सुपर स्प्रेडर असण्याची भीती आहे. त्या सगळ्यांचं स्क्रिनिंग चालू झालं.

अहमदाबाद महापालिकेने २० एप्रिलपासूनच अशा लोकांवर लक्ष ठेवायला सुरवात केली होती. त्यांच्यावर पाळत ठेऊन त्यांनी ३,८१७ लोकांचे सॅम्पल गोळा केले. त्यातले ३३४ लोक पॉझिटिव आले आणि ते सुपर स्प्रेडर असल्याचंही समजलं.

दक्षिण कोरियातल्या उदाहरणानं हादरवलं

दोन तीन दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. कोरोना वायरसविरोधात लढण्याचं आदर्श मॉडेल म्हणून बघितल्या जाणाऱ्या दक्षिण कोरियानं मेच्या सुरवातीला त्यांच्या देशातले नाईट क्लब चालू केले. त्यानंतर एक २९ वर्षाचा मुलगा अनेक बार आणि नाईटक्लबमधे मजा करून आला आणि नंतर त्याची टेस्ट पॉझिटिव आली. त्याच बार आणि नाईटक्लबमधे जवळपास ५५०० लोक जाऊन आले असतील. आत्तापर्यंत त्यापैकी १०० जणांची टेस्ट पॉझिटिव आलीय.

दक्षिण कोरियानं लॉकडाऊनशिवाय कोरोनाला रोखलं. फक्त नागरिकांवर काही निर्बंध घातली होती. कोरोनाचा प्रसार कमी झाल्यावर ही निर्बंध काढून टाकली आणि लगेचच सुपर स्प्रेडरचं प्रकरण पुढे आलं. तरी दक्षिण कोरियात कोरोनाग्रस्तांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याची क्षमता चांगली आहे. त्यामुळे वेळीच ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली. पण कोरोना वायरसच्या लढाईतलं आदर्श मॉडेल असणाऱ्या या दक्षिण कोरियामधे असं होताना पाहून जग पुरतं हादरून गेलंय.

पण भारताचं काय? उद्या लॉकडाऊन संपवल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात तपासण्या करून सुपर स्प्रेडरना रोखण्याची सुपरपॉवर एका रात्रीत भारताकडे कुठून येणार?

हेही वाचा : 

जीवघेणा लॉकडाऊन संपवण्याचे चार साधेसरळ मार्ग

किम जोंग उन गेले, तर उत्तर कोरियाचा वारसदार कोण होणार?

कोरोनाची शिकार कशी करायची हे वायरस हंटरकडून शिकायला हवं!

विटॅमिन डीच्या कमतरतेमधे दडलंय देशांच्या वेगवेगळ्या मृत्यूदराचं गुपित?

कोरोना संकटाशी तुलना होत असलेली १९३०ची जागतिक महामंदी कशी होती?

लॉकडाऊन न करता कोरोनाशी लढणाऱ्या दक्षिण कोरियाचं जगभर होतंय कौतूक

पंतप्रधान म्हणाले ते Y2K संकट, ही तर २१ व्या शतकातली पहिली ग्लोबल फेक न्यूज