गणपती अथर्वशीर्ष १: हा तर मिनी संस्कृतीकोशच

२८ ऑगस्ट २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


गणपती अथर्वशीर्ष आता घराघराघरात पोचलंय. पण डोकं ताळ्यावर आणणारी ही संस्कृत रचना घोकंपट्टीचा भाग बनलीय. त्याचा अर्थ समजून घेतला तर ते छान जगण्याचा मार्ग बनू शकतं. कारण त्यात भारतीय संस्कृतीतल्या महान संकल्पना द्राक्षाच्या घोसासारख्या लगडल्यात. नाहीतर ते फक्त कल्चरल स्टेटस सिंबॉल बनून बिनडोक पारायणापुरतं उरेल. त्याच्यावरच्या तीन लेखांची ही मालिका.

`तारिफ करू क्या उसकी जिसने तुम्हे बनाया`. हे गाणंही आहे आणि प्रश्नही. म्हटलं तर प्रेयसीच्या सौंदर्याचं कौतुक आणि म्हटलं तर बुचकळ्यात टाकणारा प्रश्नही. आपल्याला निर्माण करणाऱ्या देवाची आपण काय स्तुती करणार? हा प्रश्न आणखी नवे प्रश्न निर्माण करणारा. काम न करता स्तुती केली तर आपला बॉसही रागावतो, मग देव कसा प्रसन्न होणार? दिवसरात्र फक्त स्तुती करत बसलं तर बापही कंटाळेल, मग देव नाही का कंटाळणार?

देवाला खरंच स्तुती आवडते?

देवानेच श्रीमद् भगवद्गीतेत भक्तांना स्तुती आणि टीकेच्या पलीकडे जाऊन स्थितप्रज्ञ राहण्याचा संदेश दिलाय मग आपल्या स्तुती किंवा टीकेमुळे फरक पडत असेल तर तो देव कसला? आपण देवाची स्तुती केली नाही, म्हणून रागावत असेल तर तो देवच नाही, असं खुश्शाल मानून चालावं. मग आता देवाची स्तुतिस्तोत्र का गायची, असा प्रश्न उभा राहतो.

या प्रश्नाची अनेक उत्तरं आहेत. मुळात हा प्रश्न नवीन नाही. सर्व धर्मांच्या सर्व धर्मग्रंथांत देवाची स्तुती आहे. त्या पाठोपाठ स्वाभाविकपणे येणारा हा प्रश्न आणि त्याची निरनिराळी उत्तरंही. तरीही अशा प्रश्नांची रेडीमेड उत्तरं आपल्या कामाची नसतात. ती आपली आपल्यालाच शोधावी लागतात. देवाची स्तुती देवासाठी नसते तर ती असते आपल्यासारख्या भक्तांसाठी.

ती स्तुती, त्याच्या रूपाचं वर्णन यामुळे भक्तीभाव वाढतो, समर्पणाची इच्छा निर्माण होते आणि चित्त एकाग्रतेसाठी मदत होते. त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे देव समजून घेण्यास मदत होते. ज्यांना देव जवळून कळलाय ते त्यांचं देवाविषयीचं आकलन या स्तोत्रांमध्ये मांडतात. त्यावर विचार केल्यामुळे देवाविषयीची आपली समज वाढते आणि आपण देवाच्या अधिक जवळ जाऊ शकतो.

हेही वाचा : दगडूशेठ हलवाई गणपती खरोखर श्रीमंत झाला, त्याची गोष्ट

मुगल राजपुत्रामुळे कळली १०८ उपनिषदांची यादी

देवाच्या जाणकारीनं देवाच्या जवळ नेतं ते उपनिषद. उपनिषद या शब्दाचा अर्थही असा समजून घेता येतो. देव आपल्याला जितका स्पष्ट होईल, तितकं आपण त्याच्या जवळ जाऊ शकू. त्याचं लख्ख आणि बहुपरिचित उदाहरण म्हणजे श्री गणपती अथर्वशीर्ष अर्थात गणपती उपनिषद.

मुक्तिका हा श्रीराम-हनुमान यांच्यातला संवाद असणारा संस्कृत ग्रंथ. त्याची सर्वात जुनी लिखित प्रत शहाजहानचा मुलगा दारा शुकोह याच्या कागदपत्रांमध्ये सापडली आहे. अर्थात त्यापूर्वीही एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे मौखिक परंपरेनं हा ग्रंथ चालत आलेला असावा. त्यात १०८ महत्त्वाच्या उपनिषदांची यादी आहे. त्यांना पहिल्या नऊ उपनिषदांएवढी नसली तरी बऱ्यापैकी मान्यता आहे. त्यातल्या ८९व्या नंबरावर आपलं गणपती उपनिषद येतं, परंपरेने ते अथर्ववेदाशी संबंधित आहे.

गणपती उपनिषदं वेदाकालीन नाहीत

उपनिषद हा वेदांचाच भाग मानला जातो. तरीही प्रत्यक्ष वेदकालीन असलेली उपनिषदं फारच कमी आहेत. गणेशभक्त अभ्यासक प्रा. सी. ग. दसाई यांनी नोंदवल्याप्रमाणे, `जुन्या उपनिषदांची समाजांतील प्रतिष्ठा लक्षात घेऊन गणपती संप्रदायाच्या अनुयायांनीही गणपतीबद्दल जुन्या उपनिषदांच्या धर्तीवर उपनिषद रचली आणि आपल्या संप्रदायाला श्रुतिमान्यता आहे असे दाखविण्याचा प्रयत्न केला.` प्रसिद्ध सामाजिक इतिहासतज्ञ डॉ. जी. एस. घुर्ये यांनीही `गॉड्स अँड मेन` या ग्रंथात गणपतीच्या देवताशास्त्रीय मांडणीत गणपती अथर्वशीर्ष उत्तरकालीन असल्याचं मांडलंय.

मुळात वेदांमध्ये गजमुख गणपतीचे स्पष्ट उल्लेख नाहीत. ब्रह्मणस्पती म्हणजेच बहुधा बृहस्पती किंवा इंद्र यांच्यासाठी गणपती हे विशेषण वापरलं गेलं आहे. त्यामुळे अथर्वशीर्षासह पूर्वतापिनी, उत्तरतापिनी आणि हेरम्बोपनिषद ही चारही उपनिषदं वेदकालानंतर खूप उशिराने लिहिलेली असावीत असा कयास सर्वमान्य आहे. तसेच या उपनिषदाचे लेखक म्हणजे द्रष्टे ऋषी गणक हे वेदकालीन ऋषींमधले नाहीत. आस्तिक नास्तिक दर्शनांची सूत्ररूपाने मांडणी झाल्यानंतरच्या काळातले म्हणजे वेदकालाच्या खूप नंतरचे हे उपनिषद असावे, असे त्याच्या स्वरूपावरून वाटते.

फलश्रुतीमुळे उपनिषदांचा दर्जा गेला

बाकीची उपनिषदं जशी पुस्तकांमध्ये किंवा पाठशाळांमध्ये अडकून राहिली तसं मात्र अथर्वशीर्षाचं झालेलं नाही. विशेषतः पेशवाईच्या काळात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात गणेशभक्तीचा प्रभाव वाढला. त्यात अथर्वशीर्षाला अधिक मान्यता मिळाली. ब्राह्मणांच्या हजारो घरांमध्ये ते रोजच्या पूजेचा आणि पठणाचा भाग बनलं. त्याच्याशी संबंधित व्रते, अनुष्ठाने आणि पूजाविधी यांची रचना करण्यात आली. त्यातल्या मंत्रांचा संदर्भ देत ते किती `पॉवरफूल` आहे, याची वर्णनं लोकोक्तीचा भाग बनली.

अथर्वशीर्षांच्या पठणामुळे काय फायदे होतात, याची अशीच `पॉवरफूल` फलश्रुती अथर्वशीर्षाला नंतर जोडली गेली असावी. पण त्याचमुळे याला काही अभ्यासक शुद्ध उपनिषदाचा दर्जा देत नाहीत. ते केवळ शीर्ष बनून राहतं. उपनिषदांमध्ये तत्त्वज्ञान अपेक्षित असतं आणि कर्मकांडाला त्यात जागा नसते.

`शीर्ष याचा शास्त्रीय अर्थ मात्र अंत किंवा शेवटचा भाग असा आहे. उपनिषदांना वेदान्त म्हणतात, तथापि ही शीर्षे उपनिषदे असली तरी उपनिषदे आणि शीर्षांत भेद आहे. फलश्रुती फक्त शीर्षांना असते, उपनिषदांना नसते. आणि शीर्षे केवळ अथर्ववेदाचीच आहेत, हे याचे वैशिष्ट्य.` असा महत्त्वाचा उल्लेख अमरेंद्र गाडगीळ लिखित `श्री गणेश कोश` या महाग्रंथात सापडतो.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?

साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

कोरोनाची शिकार कशी करायची हे वायरस हंटरकडून शिकायला हवं!

 

अथर्वशीर्षात सापडतं जगण्याचं तत्त्वज्ञान

असं असलं तरी या फलश्रुतीला प्रतिष्ठा मिळवून देण्याची धडपडही झालेली आहे. अलीकडच्या काळात अथर्वशीर्षावर पुस्तकं लिहिणारे एस. के. कुलकर्णी, स्वानंद पुंड, स. ग. सावरकर, डॉ. शंकर अभ्यंकर, डॉ. माधव नगरकर यांनी या फलश्रुतीतील तत्त्वज्ञान मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्याविषयी कदाचित मतभिन्नता होऊ शकते पण फलश्रुतीआधीच्या अथर्वशीर्षात तत्त्वज्ञानाचा दर्जा वादातीत आहे.

जीव, जगत आणि जगदीश यांच्याविषयी तसंच यांच्यातील संबंधांविषयीचा अभ्यास म्हणजे तत्त्वज्ञान अशी भारतीय संस्कृतीची भूमिका आहे. तिला `आर्मचेअर फिलॉसॉफी` मान्य नाही. म्हणजे केवळ घटापटाच्या शुष्क इथे चर्चेला तत्त्वज्ञान म्हटलं जात नाही. तत्त्वज्ञान हे रोजच्या जगण्याशी संबंधित असावंच लागतं आणि त्याने माणुसकीच्या उन्नत पायऱ्या चढण्यासाठी माणसाची मदत करणं अपेक्षित आहे.

भारतीय संस्कृतीच्या या सकारात्मक पैलूशी संबंधित अनेक महत्त्वाच्या संकल्पना अथर्वशीर्षात येतात. वेलीवर द्राक्षाचा घोस जसा लगडावा तशा या संकल्पना वाक्यावाक्याला सापडत जातात. या संकल्पना समजून घेतल्या तर छान आयुष्य जगण्याचा मार्ग मिळत जातो. त्याचं मार्गदर्शन करणारे भारतीय संस्कृतीतील जे काही आहे, ते या अवघ्या दहा मंत्रांच्या छोट्याशा अथर्वशीर्षात आहे. त्यामुळे भारतीय संस्कृती आणि तत्त्वज्ञानातील सर्वात महत्त्वाच्या निवडक संकल्पनाचा हा `मिनी संस्कृतीकोश` आहे, असं म्हटलं ती अतिशयोक्ती ठरू नये.

अथर्ववेदातलं श्रेष्ठ ते अथर्वशीर्ष

कोणत्याही भारतीय संकल्पनेचा अर्थ शोधायचा झाला तर शब्दांची फोड केली जाते. निरुक्त या वैदिक एटिमॉलॉजीचा प्रभाव आपल्या आपल्यावर प्रचंड आहे. त्यामुळे निघंटूसारख्या प्राचीन डिक्शनऱ्यांचा आधार घेऊन शब्दांची तोडफोड केली जाते. त्यात बारीक बारीक काम हजारो वर्षं झालेलं आहे की एकाच शब्दाचे अनेक अर्थ निघतात. मग त्याच्या आधारे संकल्पनांच्या अर्थाची शोधाशोध या टोकापासून त्या टोकापर्यंत केली जाते.

शीर्ष म्हणजे डोकं. शरीरात डोकं महत्त्वाचं, प्रधान आणि श्रेष्ठ, तसं असणारं जे काही ते शीर्ष. त्यामुळेच शीर्षस्थान हा शब्द श्रेष्ठतावाचक अर्थाने आपण मराठीतही वापरतो. अथर्ववेदातला श्रेष्ठ भाग असा अथर्वशीर्षाचा प्राथमिक अर्थ काढता येतो. म्हणजेच अथर्वशीर्षांत प्रार्थना, कर्मकांड याच्या तुलनेत श्रेष्ठ असा ज्ञानाचा, तत्त्वज्ञानाचा भाग येतो.

हेही वाचा : मुंबईच्या सिद्धिविनायकाचा महिमा कसा पसरला?

नुसती घोकंपट्टी नको, अर्थ समजून घेऊया

पण इथेच हा अर्थाचा काथ्याकूट थांबत नाही. थर्व या धातूचा अर्थ अस्थिर, चंचल. रोजच्या मराठीत थर्व म्हणजे थरथरणारे. म्हणजेच अथर्व म्हणजे स्थिर, शांती. त्यामुळे डोकं शांत करणारं सुक्त असा अर्थ पद्मभूषण पं. श्रीपाद दामोदर सातवळेकर यांनी मांडला आहे. तो पुढे सर्वच अभ्यासकांनी चालवला आहे. दुसरीकडे याचाच आधार घेऊन अथर्वशीर्षाच्या टीकाकारांनी हे अस्थिर डोक्याच्या लोकांसाठीचे सुक्त असल्याचेही म्हटले आहे.

सर्वाधिक स्थिर असतं ते ज्ञान. त्यावर बुद्धी घासून घेतली तरच सत्यापर्यंत जाता येतं. डोकं ताळ्यावर येतं. धर्म आणि आध्यात्म म्हटलं की आपण चिकित्सा दूर ठेवतो. देवाचा विषय येताच डोळ्यांबरोबर डोकंही बंद करून घेतो. पण धर्म आधात्म्य ज्यांना आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट वाटते, त्यांनी बुद्धीचा सर्वाधिक वापर तिथेच करायला हवा. खरा धर्म शोधायला हवा.

अथर्वशीर्ष आपल्याला या खऱ्या धर्माचा रस्ता दाखवते, म्हणून महत्त्वाचं आहे. न समजता केलेली पारायणं कामाची नाहीत. भगवान व्यासांनी महाभारत लिहिताना खुद्द गणपती बाप्पालाही अट घातली होती, समजलं नाही तर लिहायचं नाही. ज्या गोष्टीत बाप्पाचाही अपवाद नाही, तिथे आपण निर्बुद्धपणे घोकंपट्टी केली, तर त्याला अर्थ उरेल का?

कल्चरल स्टेटस सिंबॉल बनलंय का?

ऐंशी नव्वदच्या दशकापासून आध्यात्मिक संघटनांच्या प्रभावामुळे मराठी, हिंदीसारख्या स्थानिक भाषांमधल्या संतसाहित्याची जागा संस्कृत स्तोत्रांनी घेतली आहे. त्यामुळे संस्कृतचे सोवळेपण सुटले. पण त्यातल्या त्यात कळणाऱ्या संतसाहित्यापासून अवघड अशा संस्कृत प्रार्थनेचा अर्थ समजून घेणं सर्वसामान्यांना कठीण होतं आहे. त्या अर्थांसाठी कुणा तरी जाणकारावर अवलंबून राहावे लागत आहे, ही वस्तुस्थिती आहे. असे असले तरी त्यामुळेच शेकडो वर्षे अभिजनांमधल्याही काही ठराविकांमध्येच असलेले अथर्वशीर्ष आता तळागाळात पोचलंय.

घराघरांमध्ये गणेशोत्सवात मोडक्या तोडक्या उच्चारांसह का होईना, पण अथर्वशीर्षांचे पठण होऊ लागले आहे. पुण्याच्या प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणेशोत्सवात हजारो महिला एकत्र येऊन अथर्वशीर्षाचे पठण करू लागल्या आहेत. त्याचे अनुकरण सर्वत्र होऊ लागले आहे. संकष्टीला, मंगळवारी अथर्वशीर्ष आकाशवाणीवर हटकून ऐकायला मिळू लागले आहे.

त्यामुळेच अथर्वशीर्षाचे पठण हे `कल्चरल स्टेटस सिंबल` बनण्याची शक्यता निर्माण झालीय. ते तसं न बनता माणुसकीचा विचार देणारा महामंत्र म्हणून आपल्या समोर यायला हवे. त्यासाठी त्याचा अर्थ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचायला हवा.

हेही वाचा : 

देश का नेता कैसा हो, गणपती बाप्पा जैसा हो!

आषाढी वारीनिमित्त पसरलेल्या वायरल विठ्ठलाची गोष्ट

बाप्पाचा प्रवासः सोवळ्यापासून ग्लोबल फ्रेंड गणेशापर्यंत

सुखकर्ता दुखःहर्ता ही आरतीच्या पलीकडे छान कविताही

आपल्या मुलांना वाचायला आवडतील अशा गणपतीच्या पाच गोष्टी

काश्मीरवर तावातावाने मत मांडण्याआधी एकदा ही पुस्तकं वाचून तर बघा

अमेझॉनच्या जंगलातली आग विझवण्यासाठी ब्राझीलने चक्क मिलिट्री पाठवली