गणपती अथर्वशीर्ष ३: पारायण करण्याआधी अर्थ समजून घेऊया

३० ऑगस्ट २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


घरी गणपती आले की घराघरात, मांडवामांडवात गणपती अथर्वशीर्ष म्हणून आपली कॉलर टाईट करण्याला ऊत येतो. पण अथर्वशीर्ष इतक्या क्षुल्लक कारणांसाठी नाही. ते बाप्पाला म्हणजे पर्यायाने आपल्याला समजून घेण्यासाठी आहे. भारतीय संस्कृतीतल्या महान संकल्पना समजून घ्यायचा तर अथर्वशीर्षाचा अर्थ समजून घ्यावा लागतो. आधीच्या तीन मंत्रांचा अर्थ दुसऱ्या लेखात आलाय. आता पुढे.

गणपती अथर्वशीर्ष म्हणायला सुरवात केली आधी शांतिपाठ येतो. त्यानंतर अथर्वशीर्षाची सुरवात होते. पहिल्या तीन मंत्रांमधे नेमकं काय आहे, कोणती मागणी केलीत, ते आपण दुसऱ्या लेखात पाहिलं. आता पुढच्या मंत्रांचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करुया

त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः। त्वमानंदमयस्त्वं ब्रह्ममयः। त्वं सच्चिदानंदाद्वितियोSसि। त्वं प्रत्यंक्षं ब्रह्माSसि। त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोSसि।।४।।

`तू वाणीरूप आणि चैतन्यरूप आहेस. तसंच आनंदरूप आणि ब्रह्मरूपही आहेस. नुसता आनंद नाही तर सच्चिदानंद आणि नुसता ब्रह्म नाही तर प्रत्यक्ष ब्रह्म आहेस. तूच ज्ञानस्वरूप आणि विज्ञानस्वरूपही आहेस.` हे गणेशाचं वर्णन अनेक तत्त्वज्ञानात्मक संकल्पना घेऊन येतं.

त्यातील एकेका संकल्पनेवर अनेक ग्रंथ लिहिले गेले आहेत. या ज्या काही थोर संकल्पना आहेत त्या वेगवेगळ्या नाहीत. त्या एकच आहेस आणि यापैकी कोणत्याही वाटेने गेलो तरी तुझ्यापर्यंतच पोहोचतो. अंतिम ज्ञान किंवा सत्य जेव्हा कृतीत उतरतं म्हणजेच तो स्वभाव बनतो तेव्हा खऱ्या आनंदाची अनुभूती होते.

सॉक्रेटिस म्हणतो वर्च्यु इज नॉलेज. एखादे तत्त्व आपल्या जगण्याचा स्थायिभाव बनतो तेव्हाच त्या तत्त्वाचे खरे ज्ञान होते, असे त्याचे म्हणणे आहे. ज्ञान जगण्यात उतरलं नाही तर अपचन होतं. ऍसिडिटी होते. ते टाळायचं असेल तर तत्त्वज्ञानातली सगळी पोपटपंची जगण्यात उतरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न हवा. तसा आनंद मिळवला तरच गणपती बाप्पा पावेल, अन्यथा नाहीच.

हेही वाचा : गणपती अथर्वशीर्ष २ : पारायण करण्याआधी अर्थ समजून घेऊया

सर्वं जगदिदं त्वत्तो जायते। सर्वं जगदिदं त्त्वत्तस्तिष्ठति। सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति। सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति। त्वं भूमिरापो नलो निलो नभः। त्वं चत्वारि वाक्पदानि ।।५।।

त्वं गुणत्रयातीतः। त्वं देहत्रयातीतः। त्वं कालत्रयातीतः। त्वं मूलाधारस्थितो सि नित्यम्। त्वं शक्तित्रयात्मकः। त्वां योगिनो ध्यायत्नि नित्यम्। त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वमिन्द्रस्त्वमग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवः स्वरोम् ।।६।।

अथर्वशीर्षातले हे दोन्ही महत्त्वाचे मंत्र. जगाची निर्मिती, सांभाळ आणि लय करणारा तूच आहेस, हे वर्णन केल्यानंतर एक छोटीशी जोड केलेली आहे की हे जग लय पावल्यावर तुझ्याकडेच परत येतं. काही ठिकाणी याचा अर्थ असाही आहे की तुझ्या ठायीच ते अनुभवता येतं. ज्यातून जगाची निर्मिती झाली ती जमीन, पाणी, आग, वारा आणि आकाश ही पंचमहाभूतं तूच असल्यामुळे जग तुझ्यात अनुभवता आलं तर नवल नाही, असंही ऋषी गणक सांगत आहेत.

त्यानंतर तूच चार वाणी, तीन गुण, तीन देह, तीन काळ, तीन शक्ती यांच्यात आणि यांच्यापल्याड परब्रह्म असल्याचं अथर्वशीर्ष सांगतं. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी हे वाणीचे चार प्रकार आहेत. सत्त्व, रज आणि तम हे तीन गुण आहेत. सूक्ष्म, स्थूल आणि कारण हे तीन देह आहेत. भूत, वर्तमान आणि भविष्य हे तीन काळ आहेत. चेतना, जाणीव आणि इच्छा या तीन शक्ती आहेत. आपल्याला या सगळ्याच्या पलीकडे देव सापडतो. योगीजन त्याचं ध्यान करतात तेव्हा या सगळ्याच्या मुळात तो असल्याचं त्यांना आढळतं.

तूच ब्रह्मा, तूच विष्णू, तूच रुद्र, तूच इंद्र, तूच अग्नी, तूच वायू, तूच सूर्य, तूच चंद्र, तूच ब्रह्म, तूच पृथ्वी, तूच अंतरीक्ष, तूच स्वर्ग आणि तूच ओंकार आहेस, असं गणेशाचं वर्णन अथर्वशीर्षात त्यापुढे सापडतं.

`एकं सत् विप्रा बहुधा वदन्ति` हे भारतीय संस्कृतीचं महान आधारभूत तत्त्व आहे. अंतिम सत्य हे एकच आहे, फक्त विद्वान मंडळी त्याचं वेगवेगळ्या प्रकारे वर्णन करतात. म्हणजेच कुणाचं वर्णन वेगळं असलं तरी मुळातलं सत्य तेच असणार, असा खंबीर विश्वास भारतीयांना आहे. त्यामुळेच अनेक आक्रमणं येऊनही या संस्कृतीने सगळ्यांना आपल्यात सामावून घेतलं आणि ती अधिक तेजाने उजळून निघाली.

`आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्व देव नमस्कारं केशवं प्रति गच्छति।` हा आमचा अनुभव आहे. आकाशातून पडलेलं पाणी समुद्रात जातं तसं कोणत्याही देवाला केलेला नमस्कार शेवटी एकाच ठिकाणी पोचतो, असं स्पष्टपणे सांगण्यात आम्हाला चुकीचं वाटत नाही.

त्यामुळे देवता वेगळ्या असतील, पूजाविधी वेगळ्या असतील, धर्म वेगळे असतील, धर्मग्रंथ वेगळे असतील, भाषा वेगळी असेल पण शेवटी जिथे डोकं घायायचं आणि टेकायचं ते सत्य एकच आहे. अथर्वशीर्षात हा विश्वास पहिल्या ओळीपासून शेवटपर्यंत दिसून येतो आणि त्यामुळेच ते उठून दिसतं.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?

साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

कोरोनाची शिकार कशी करायची हे वायरस हंटरकडून शिकायला हवं!

हर्ड इम्युनिटी ठरू शकते का कोरोनाच्या युद्धातलं भारताकडचं ब्रम्हास्त्र?

गणादि पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम्। अनुस्वारः परतरः। अर्द्धैन्दुलसितम्। तारेण रुद्धम्। एतत्तवमनुस्वरूपम्। गकारः पूर्वरूपम्। अकारो मध्यमरूपम्। अनुस्वारश्चान्त्यरूपम्। बिन्दुरुत्तररूपम्। नादः सन्धानम्। संहिता सन्धिः। सैषा गणेशविद्या। गणक ऋषिः। निचृद्गायत्रीछन्दः। गणपतिर्दैवता। ओम गं गणपतये नमः ।। ७ ।।

तत्त्वज्ञानात्मक निर्गुण मांडणी केल्यानंतर गणेशाचं मंत्ररूपातलं वर्णन येथे आलं आहे. शास्त्रानुसार पूजा करताना आपल्या आवडत्या देवतेला कोणत्या नावाने हाक मारावी, याचं वर्णन यात आहे. गणातला ग, पहिला वर्ण असणारा अ, अर्धचंद्र असणारा अनुस्वार, ओम एकत्र बांधून एकनादात होणारा उच्चार `ओम गं` हा गणपतीचा मंत्र आहे. नाव गणेशविद्या, त्याच्या द्रष्टा ऋषी गणक, छंद निचृद्गायत्री आणि देवता गणपती अशी या मंत्राची स्पेसिफिकेशन्स म्हणजे शास्त्रीय तपशील पुढे सांगितली आहेत. शेवटी रोजच्या वापरातला `ओम गं गणपतये नमः` असा पुजेचा मंत्रही सांगितला आहे. त्यानंतर गणेश गायत्रीमंत्रही सांगितला आहे.

एकदन्ताय विद्महे। वक्रतुण्डाय धीमहि। तन्नो दन्ती प्रचोदयात ।।८।।

मुख्य गायत्री मंत्र आता आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गोदेवस्य धीमहि। धियो यो नः प्रचोदयात। जन्माने क्षत्रिय असणारे महान ऋषी भगवान विश्वामित्र यांनी हा गायत्री मंत्र निर्माण केला. पण पुढे मुंज न झालेल्यांना सर्वांना त्याचे अनधिकारी ठरवण्यात आलं. त्यात महिला होत्या आणि ब्राह्मणेतर समाजही.

पण काळाच्या धबडग्यात त्याचं हे सोवळंओवळं कुठच्या कुठे वाहून गेलं. अनुराधा पौडवालांच्या आवाजातला गायत्री मंत्र आता रिक्षावाल्याच्या एफएमवरही ऐकू येतो. आता कुणीही गायत्री म्हणण्यापासून कुणालाच अडवू शकत नाही. पण जेव्हा ही बंदी होती, तेव्हा मध्यममार्ग म्हणून विविध देवतांचे गायत्री मंत्र बनवण्यात आले होते. त्यातला हा गणेश गायत्रीमंत्री.

त्याचा अर्थ असा, आम्ही एकदंताला जाणतो. वक्रतुंडाचं ध्यान करतो आणि तो दंती आम्हाला प्रेरणा देतो. या मंत्रापासून अथर्वशीर्ष गणेशाच्या सगुण रूपाकडे शेवटाची वाटचाल करतं.

एकदन्तं चतुर्हस्तं पाशमंकुशधारिणम्। रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजम्।। रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम्। रक्तगंधआनुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितम्।। भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम्। आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृतेः पुरुषात्परम्।। एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः ।।९।।

नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते स्तु लम्बोदरायैकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्ये नमो नमः ।।१०।।

ज्ञानमय तत्त्वज्ञानाबरोबरच भावभक्ती फुलण्यासाठी आवश्यकता असते ती सगुण रूपाची. ध्यानासाठी देवतेच्या सगुणोपासना म्हणजेच मूर्तिपूजा भारतीय संस्कृतीच्या मुख्य प्रवाहाने आपली मानलीय. उलट ते तिचं एक वैशिष्ट्यच बनलं आहे. तिच्यावर होणारी टीका लक्षात घेऊन देखील सर्वसामान्य साधकासाठी तिची गरज कायम स्वीकारण्यात आलेली आहे.

ज्ञान, कर्म आणि भक्ती या तिन्ही उपासनामार्गांचा समन्वय अथर्वशीर्षात घडवून आणलेलं आहे. त्यामुळेच इथे सगुण निर्गुणातलं भांडण नाही. उलट `सगुण निर्गुण एकू गोविंदू रे` हे संतांनी मांडलेलं तत्त्वज्ञान इथे साकार झालेलं आहे.

सगुणरूपातलं गणपतीचं वर्णन हे प्रतीकांचा समुच्चय आहे. एका आदर्श नेत्यासाठी आवश्यक असलेले गुण कोणते हे त्या प्रतीकांतून सांगितलं आहे. अथर्वशीर्षातलं गणेशरूप एक दात असणारं तसंच पाश, अंकुश, हत्तीचा दात आणि आशीर्वाद देणारे चार हात असणारं आहे. उंदीर त्याचं वाहन आहे. लाल रंग, मोठं पोट, सुपासारखे कान असणाऱ्या गणेशानं लाल कपडे, रक्तचंदनाची उटी आणि लाल फुलं धारण केली आहेत. यातील प्रत्येक प्रतीकाचा अर्थ आदर्श नेत्याचा एकेक गुण सांगतो, असं सविस्तर विवेचन स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले यांनी संस्कृती पूजन या पुस्तकात केलंय.

हेही वाचा : गणपती अथर्वशीर्ष १: हा तर मिनी संस्कृतीकोशच

जगाचं कारण असलेला, सृष्टीच्या आधीच प्रकट झालेला आणि प्रकृती पुरुषाच्या पल्याड असणाऱ्या गणपतीचं जो ध्यान करतो तो योगी सर्वश्रेष्ठ ठरतो. तरीदेखील हा देव भक्तावर कृपा करण्यासाठी उत्सुक असतो. व्रतं करणाऱ्या प्रत्येकाला पावणारा, सर्व लोकांचा नायक, भक्तांच्या चुका पोटात घालणारा लंबोदर, भक्ताला दोषांसहित स्वीकारणारा एकदंत, भक्तांची विघ्ने नाश करणारा आणि शिव म्हणजे ज्ञानाचा पुत्र असणाऱ्या आशीर्वाद देणाऱ्या गणपतीला मनोभावे नमस्कार करून अथर्वशीर्ष थांबतं.

पण अथर्वशीर्षाचं नुसतं पारायण करून थांबण्यात अर्थ नाही. यातली एकतरी संकल्पना खोलात जाऊन समजून घेण्याचा प्रयत्न केला तर गणपतीबाप्पाचं खरंखुरं सान्निध्य लाभू शकतं. कारण तोच ज्ञानमय आहे आणि तोच विज्ञानमयही. बुद्धीच्या देवतेसमोर नुसत्या पारायणात काहीच अर्थ नाही. जे बोलायचं ते नीट समजून घ्यायलाच हवं. तेव्हाच बाप्पा खरोखर पावतो.

हेही वाचा : 

देश का नेता कैसा हो, गणपती बाप्पा जैसा हो!

 

मुंबईच्या सिद्धिविनायकाचा महिमा कसा पसरला?

आषाढी वारीनिमित्त पसरलेल्या वायरल विठ्ठलाची गोष्ट

दगडूशेठ हलवाई गणपती खरोखर श्रीमंत झाला, त्याची गोष्ट

आपल्या मुलांना वाचायला आवडतील अशा गणपतीच्या पाच गोष्टी