ताप मोजणाऱ्या बंदुकीनं कोरोना वायरसवर अचूक निशाणा साधता येईल?

१८ जुलै २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


ऑफीस, हॉस्पिटल, बँका अशा ठिकाणी प्रवेश करण्यापुर्वी ताप मोजणारी एक बंदुक आपल्यावर रोखली जाते. या गनमुळे कोरोना वायरसची लागण झालेली व्यक्ती शोधता येते. अनलॉक चालू झाल्यापासून ठिकठिकाणी टेम्परेचर गनचा वापर चालू झालाय. तरीही कोरोना वायरसचा प्रसार थांबलेला नाही. उलट गनच्या चुकीच्या वापरामुळे पेशंटची संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललीय.

अनलॉक सुरू झालंय तसे आपण सगळे हळूहळू घराबाहेर पडू लागलो आहोत. वेगवेगळ्या दुकानात जाऊन गरजेच्या वस्तू, सामान घेऊ लागलो आहोत. कुठल्याही दुकानात जाण्याआधी दुकानदार मास्क घालण्याची आणि हाताला सॅनिटायझर लावण्याची विनंती करतात. डीमार्ट, बीग बझार किंवा एअर कंडिशन दुकानात तर यासोबत एका मशीनने आपल्या शरीराचं तापमानही मोजतात. फक्त दुकानांच्याच नाही तर काही ठिकाणी बिल्डिंग किंवा सोसायटीच्या गेटवर, शाळा कॉलेजच्या गेटवर सिक्युरिटी गार्डकडेही ही टेम्परेचर गन असते.

या गनने डोक्यावर निशाणा धरला की आपल्या शरीराचं तापमान त्यात मोजलं जातं. ते नेहमीपेक्षा जास्त असेल तर आपल्याला कोरोना वायरसची लागण झाली असण्याची शक्यता असते. असे लोक शोधणं या गनने सोपं होतं. म्हणूनच देशातल्या आणि परदेशातल्या बहुतांश सगळ्याच लोकांनी या गनचा वापर करणं सुरू केलंय.

हेही वाचा : कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?

टेम्परेचर गन म्हणजे काय?

आपण ताप आलाय की नाही हे मोजायला थर्मामीटर वापरतो. ही टेम्परेचर गन म्हणजेही एक थर्मामीटरच असतो. या गनमधे इन्फ्रारेड म्हणजेच रेडिएशन असलेला एक सेन्सर बसवलेला असतो. म्हणूनच याला इन्फ्रा गन असंही म्हणतात. आपण शरीराच्या किंवा एखाद्या पृष्ठभागाच्या संपर्कात आलोय हे या सेन्सरमुळे कळतं. त्यानंतर लगेचच ही गन रेडिएशन सोडते. म्हणूनच गन मधून एक लाल रंगाचा प्रकाश बाहेर येत असतो. या रेडिएशनमधून शरीराचं तापमान मोजलं जातं. मात्र, थर्मामीटरप्रमाणे शरीराशी याचा संबंध येत नाही. त्यामुळेच एखाद्या साथरोगात अशा उपकरणाची मागणी फार वाढते.

शरीराचं तापमान मोजण्यासोबतच कुठल्याही पृष्ठभागाचं तापमान मोजायला ही गन वापरली जाते. एखाद्या मशीनमधल्या काही पार्ट्सचं किंवा एखाद्या मशीनचं तापमान  मोजायलाही याचा वापर करतात. ब्लॅक बॉडी रेडिएशन या तत्त्वावर ही गन काम करत असल्याची माहिती सायन्सिंग डॉट कॉम या वेबसाईटवरच्या एका लेखात देण्यात आलीय.

आपल्या कपाळापासून साधारण पाच ते सहा सेंटीमीटर अंतरावर ही गन धरायला हवी. प्रत्येक कंपनीच्या गनप्रमाणे हे अंतर बदलू शकतं. पण कपाळापासून ९० अंशाच्या कोनात म्हणजे बरोबर एका सरळ रेषेत ही गन धरावी लागते. त्यासाठी आपलं कपाळ स्वच्छ, कोरडं आणि मोकळं असावं लागतं. हेअरबँड, स्कार्फ यांनी कवर करून चालत नाही.

साथरोगाचा प्रसार कमी का होत नाही?

थर्मामीटर गन प्रमाणेच थर्मल कॅमेरेही आपल्या शरीराचं तापमान मोजतात. साधारणपणे ९८.६°F म्हणजेच ३७ डिग्री सेल्सियस हे आपल्या शरीराचं साधं तापमान असतं. यापेक्षा जास्त तापमान मोजलं जात असेल तर आपल्याला ताप आला असण्याची शक्यता असते. पण माणसाच्या शरीराचं तापमान साधारणपणे ९७°F ते ९९°F म्हणजेच ३६.१ डिग्री सेल्सियस ते ३७.२ डिग्री सेल्सियस यामधे असू शकतं असंही काही तज्ञांचं म्हणणं आहे. पण यापेक्षा खूप जास्त तापमान थर्मामीटर गनवर दाखवलं जात असेल तर आपल्याला ताप आला असू शकतो.

साधारण दोन ते तीन हजार रूपयाला ही गन मिळते. त्यावर नियम आणि वापरण्याच्या अटीही दिलेल्या असतात. लॉकडाऊन चालू असला तरीही या गनला ऑनलाईन आणि मेडिकलच्या दुकानातही इतकी मागणी आहे की पुरवठा कमी पडतोय.

खरं म्हणजे, इतके लोक ही गन वापरत असतील तर साथरोगाचा प्रसार कमी व्हायला हवा होता. पण तसं झालेलं दिसत नाही. उलट, कोरोना वायरसच्या वाढत्या पेशंटची संख्या पाहता अनेक शहरात पुन्हा लॉकडाऊन करण्यात येतोय. याचं कारण, चुकीच्या पद्धतीने ही गन वापरली जातेय.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?

साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?

गन फक्त त्वचेवरचं तापमान मोजते

शक्यतो, दारात उभं राहणारे सिक्युरिटी गार्ड किंवा वॉचमन या गनचा वापर करतात. पण ही गन वापरण्यासाठी योग्य आणि पुरेसं शिक्षण त्यांना दिलं जात नाही. गनच्या मागे दिलेल्या सुचना वाचून ती गन वापरणं सुरू केलं जातं. त्या सुचनांमधेही सगळ्या गोष्टींची कल्पना दिलेली नसते. गनमागचं विज्ञान ती वापरणाऱ्याला माहीत नसेल तर ती वापरणं आणखीनच अवघड जातं.

अनेकदा तापमान तपासताना वॉचमन गन शरीराच्या अगदी जवळ किंवा अगदी लांब धरतात. गन शरीराच्या जास्त जवळ आली तर उगाचच तापमान जास्त दिसतं. याउलट, शरीरापासून लांब धरली असेल तर तापमान कमी दिसतं. अशावेळी अंगात ताप असणारा म्हणजेच कोरोना वायरसची लागण झाल्याची शक्यता असणारा माणूस या गनच्या चाचणीतून यशस्वीपणे बाहेर येतो आणि गर्दीत मिसळतो.

मुळातच, ही गन त्वचेच्या आतलं नाही तर त्वचेच्या वरचं तापमान मोजते. समजा, एखाद्या माणसाला सकाळी ताप आला असेल आणि ताप घालवण्यासाठी त्याने काही औषधं घेतली असतील तर त्याचा ताप वरून उतरलेला असतो. पण फक्त त्वचेच्या वरचं तापमान मोजत असल्याने अशा पेशंटवर या गनचा काहीही उपयोग होत नाही. अनेकदा आपल्या आसपासच्या वातावरणावरही या मशीनचं अचूकपण ठरतं. खूप उन्हात किंवा धुळीच्या ठिकाणी उभे असू तर साहजिकच मशीन चुकीचे रिझल्ट देते.

आपण भ्रमात तर रहात नाही ना?

अनेकांना कोरोना वायरसची लागण झालेली असतानाही ताप येत नाही. किंवा काहींना ताप सोडून इतर लक्षण दिसतात. भारतात तर कोरोना वायरसचे असिप्टोमॅटिक म्हणजेच लक्षणं दिसत नसणारे पेशंट जास्त आहेत, असं वारंवार आपण ऐकतोय. यामुळेच कोरोना वायरसचा प्रसार जास्त होतो असं डब्लूएचओनेही म्हटलंय. या लोकांना ताप येतच नाही तर ही गन त्यांना शोधण्यासाठी उपयोगी ठरेलंच कशी?

काही पेशंटना कोरोना वायरसची लागण झाल्यानंतर तीन चार दिवसांनी ताप येतो. या तीन चार दिवसांत या गनचा त्यांच्यावर काहीही परिणाम होत नाही. काही वेळा तर ताप आलेला नसतानाही शरीराचं तापमान जास्त मोजलं जातं. वेगवेगळ्या कारणांनी आपल्या शरीराचं तापमान वाढू शकतं. डोक्याला स्कार्फ किंवा हेअरबँड बांधला असेल आणि अचानक तो काढला तर तो भाग हाताला गरम लागतो. तेच रीडिंग गनमधे दाखवलं जातं आणि व्यक्तीला ताप आला आहे असा निष्कर्ष निघतो.

या गनच्या अशा मर्यादांमुळे वायरसची खरोखर लागण झालेली व्यक्ती त्यातून सहीसलामत सुटण्याची आणि वायरसची लागण न झालेली व्यक्ती अडकण्याची भीती असते. ही गन ताप आलेल्या लोकांना शोधू शकते, हे खरं आहे. त्याचा वापरही योग्यच आहे. पण आपण गन वापरली म्हणजे आत जाणार प्रत्येक माणूस सुरक्षित आहे या भ्रमात आपण राहतोय आणि त्यामुळे कोरोना वायरसचा प्रसार वाढतोय, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

हेही वाचा : जीवघेणा लॉकडाऊन संपवण्याचे चार साधेसरळ मार्ग

गोळी कोरोना वायरसला मारायची आहे!

या मशीनच्या आकारावरूनही टीका होतेय. बंदुकीच्या आकाराचं हे मशीन डोक्यावर ठेवून वापरायचं असतं, ही संकल्पना अतिशय हिंसक आहे. अनेकांना ही गन कपाळावर आली की एकदम दचकायला होतं. लहान मुलांवरही याचा वाईट परिणाम होऊ शकतो. आता साथरोगात याची मागणी वाढलेली असताना याचा आकाराचा नव्याने विचार केला जायला हवा. लहान मुलांसाठी काही कार्टुनच्या आकारात हे मशीन बनवणं सहज शक्य होईल. शिवाय, कपाळाऐवजी हातावरून किंवा मनगटावरून तापमान मोजलं जावं अशीही मागणी होतेय.

या मशीनचा हा महीमा सोशल मीडियावरही जाऊन पोचलाय. मिथून चक्रवती एका पारदर्शी सायकलच्या मागे लपून शत्रुवर गोळीबार करतोय असा सिनेमातला एक सीन मीमम्हणून सोशल मीडियावर वायरल होतोय. खाली लिहिलंय, मिथून चक्रवर्ती या सायकल मागे आहे तितकेच सुरक्षित आपण टेम्पेरेचर गनमुळे आहोत असं लिहिलंय. सायकल पारदर्शी असल्याने मिथूनला गोळी कधीही लागू शकते. तशीच आपल्यालाही कधीही लागण होऊ शकते. अशावेळी मास्क आणि सॅनिटायझरची साथ आपण सोडायला नको.

हेही वाचा : 

युद्धात जिंकणाऱ्या अमेरिकेला कोरोना का हरवतोय?

कोरोना पॉझिटिव आलो तरी आम्ही घरीच राहिलो, कारण

कोरोनाच्या काळात जन्मलेल्या मुलाला काय म्हणायचं बरं?

सुपर स्प्रेडर म्हणजे काय? ते मुद्दाम कोरोना पसरवतात का?

एडवर्ड जेन्नरः देवी संपवणाऱ्या या देवमाणसाने लसीकरण शोधलंय

कोरोनाच्या R0 नंबरवर आपलं, लॉकडाऊनचं भवितव्य अवलंबून आहे?

कोरोना काळात आपल्याला पेशंटचे १७ अधिकार माहीत असायला हवेत!

विटॅमिन डीच्या कमतरतेमधे दडलंय देशांच्या वेगवेगळ्या मृत्यूदराचं गुपित?