तंबाखूविरोधी दिवसः तंबाखू कंपन्या तरुणांनाच आकर्षित करण्यासाठी कॅम्पेन का राबवतात?

३१ मे २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


जानेवारी महिन्यापासून आपण सगळे कोरोना या जागतिक साथरोगाशी लढतोय. पण डब्लूएचओनं तर तंबाखू सेवन हाही जागतिक साथरोग असल्याचंच म्हटलंय. आज ३१ मे हा तंबाखू विरोधी दिवस. ई सिगारेटसारख्या नवनव्या साधनांचा वापर करून तरूणांना फसवणाऱ्या तंबाखू कंपन्यांविरूद्ध डब्लूएचओनं यंदा बंड पुकारलाय. आपणही त्यांना साथ द्यायला हवी.

आपण थिएटरमधे सिनेमा बघायला जातो तेव्हा सिनेमा चालू व्हायच्या आधी काही जाहिराती दाखवल्या जातात. प्रत्येक थिएटरमधे सिनेमाच्या आधी एक जाहिरात हमखास दाखवली जाते. भारत सरकारची निर्मिती असलेल्या या जाहिरातीत तंबाखू सेवनामुळे तोंडाचा कॅन्सर झालेल्या माणसांच्या आयुष्याची झलक दाखवलेली असते. आणि सोबत एक आवाहन केलेलं असतं, ‘तंबाखू जानलेवा है!’

अगदी सिगारेटच्या पाकिटावरही कॅन्सर झालेल्या तोंडाचं किंवा दातांचं चित्रच दाखवलेलं असतं. सध्या लॉकडाऊनमुळे थिएटर बंद असली तरी हा पदार्थ किती प्राणघातक आहे हे समजून घेण्याचं एक चांगलं निमित्त आपल्याला मिळालंय. ते म्हणजे जागतिक तंबाखूविरोधी दिवस.

हेही वाचा : जागतिक तंबाखूविरोधी दिन: तंबाखू खाणाऱ्यांमुळेच आपल्याला या १० गोष्टी कळाल्या

तंबाखू कोरोनापेक्षा जुना साथरोग

जानेवारी महिन्यापासून आपण सगळे कोरोना या जागतिक साथरोगाशी लढतोय. पण डब्लूएचओनं तर तंबाखू सेवन हाही जागतिक साथरोग असल्याचं म्हटलंय. विशेष म्हणजे, कोरोनापेक्षा हा फार फार जुना आहे. तरीही आपल्याला त्यावर उपाययोजना करणं तितकंसं महत्त्वाचं वाटत नाही.

डब्लूएचओच्या आकडेवारीनुसार जगभरातल्या १३० कोटी लोकांना तंबाखूचं व्यसन लागलंय. त्यापैकी दरवर्षी ८० लाख लोक तंबाखूमुळे होणाऱ्या आजारांनी मरतात. जवळपास ६८- ७० लाख लोकांना तंबाखूचं सेवन केल्याने हे आजार झालेले असतात. तर १२ लाख लोक सिगारेट किंवा त्यासारखे पदार्थ ओढणाऱ्यांच्या सतत संपर्कात आल्याने त्यांना आजार होतात. अशा लोकांना सेकंड हँड स्मोकर असं म्हटलं जातं.

तंबाखूचं व्यसन असणाऱ्या १३० कोटी लोकांपैकी ८० टक्के लोक हे विसकनशील किंवा गरीब देशातले असतात. या देशांसाठी तंबाखूमुळे होणाऱ्या आजार आणि त्यातून होणारे मृत्यू हा एक मोठा प्रश्न आहे. भारताचाही त्यात समावेश आहे. भारतात तंबाखूमुळे दरवर्षी जवळपास १० लाख लोकांना आपला जीव गमवावा लागतो.

आरोग्य की तंबाखू?

तंबाखूविरोधात जनजागृती निर्माण करण्यासाठी ३२ वर्षांपूर्वी १९८८ पासून दरवर्षी ३१ मेला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच डब्लूएचओकडून जागतिक तंबाखू दिवस साजरा केला जातोय. तंबाखू सेवनाचं सगळ्यात प्रसिद्ध माध्यम म्हणजे सिगारेट. डब्लूएचओच्याच आकडेवारीनुसार, जगभरातले जवळपास १ अब्ज लोक सिगारेट पितात. त्यामुळेच १९८७ मधे डब्लूएचओनं पहिल्यांदा ७ एप्रिल दिवस ‘नो स्मोकिंग डे’ म्हणून साजरा करण्याचा निश्चय केला होता. यादिवशी तंबाखू ओढणाऱ्यांना निदान २४ तास तरी सिगारेट आणि तंबाखूपासून दूर रहण्याचं आवाहन करायचं, असं डब्लूएचओचं म्हणणं होतं.

पण त्यानंतर १९८८ मधे दरवर्षी ३१ मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा करायचं नक्की झालं. सोबत तंबाखूला आपल्या रोजच्या जगण्यातल्या एका गोष्टीशी, आपल्या आरोग्याच्या प्रश्नांशी जोडून दरवर्षी एक थीम निवडायची असंही ठरलं. त्याप्रमाणे ‘तंबाखू की आरोग्य?’ अशी १९८८ सालाची थीम ठरली. या दोनपैकी एक निवडताना तुम्ही आरोग्याचीच निवड करा, असं आवाहन त्यावर्षी जगभरातल्या लोकांना केलं गेलं. त्यानंतर तंबाखू आणि महिला, तंबाखू आणि लहान मुलं, कामाच्या ठिकाणी केलं जाणारं तंबाखूचं सेवन, तंबाखू आणि फुफ्फुसांचं आरोग्य अशा अनेक थीम दरवर्षी साजऱ्या केल्या गेल्या.

२०२० मधे जागतिक तंबाखू विरोधी दिनासाठी डब्लूएओनं तंबाखू आणि तरुणाई अशी थीम निवडलीय. तंबाखूची निर्मिती करणाऱ्या उद्योगधंद्यांकडून केल्या जाणाऱ्या शोषणापासून तरुणांचं रक्षण करणं आणि त्यांना तंबाखू आणि निकोटीन असलेल्या पदार्थांचं सेवन करण्यापासून थांबवणं, अशा दोन उद्दिष्ट्यांसोबत यंदाचा तंबाखू विरोधी दिन साजरा होतोय.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?

हात धुण्यासाठी साबण वापरायचा की सॅनिटायझर?

कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

सुपर स्प्रेडर म्हणजे काय? ते मुद्दाम कोरोना पसरवतात का?

हर्ड इम्युनिटी ठरू शकते का कोरोनाच्या युद्धातलं भारताकडचं ब्रम्हास्त्र?

कोरोनाच्या R0 नंबरवर आपलं, लॉकडाऊनचं भवितव्य अवलंबून आहे?

तरूणांना आकर्षित करणाऱ्या आयडिया

यंदाच्या थीममधे सध्या सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे, असं म्हणता येईल. सेंटर फॉर डिसिज कंट्रोल या अमेरिकन संस्थेनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, तंबाखूचं सेवन करणाऱ्यात तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढेतेय. दर ४ पैकी १ तरूण मुलगा किंवा मुलगी तंबाखूच्या आहारी गेलाय. आणि यामागचं महत्त्वाचं कारण हे ई सिगारेटची निर्मिती आणि त्याचा प्रसार हे सांगण्यात आलंय. हा धोका ओळखून काही महिन्यांपूर्वीच भारतात ई सिगारेटवर बंदी घालण्यात आलीय.

तरूणांना आकर्षित करण्यासाठी ई सिगारेटसारखी गोंडस नावं देऊन नवनवीन गोष्टी तंबाखू निर्मात्यांकडून बाजारात आणल्या जातात, असं या संस्थेचं म्हणणं आहे. हे एकप्रकारे तरूणांचं शोषणच आहे. त्यासाठी सखोल संशोधन करून, तरूणांना आवडणाऱ्या जाहिराती दाखवण्यासारखी वेगवेगळी धोरणं या उद्योगधंद्यांकडून वापरली जातात.

वेगवेगळे फ्लेवर किंवा चव असलेले तंबाखूचे पदार्थ बाजारात विकले जातात. चेरी, बबल गम, कॉटन कँडी म्हणजे आपण लहानपणी खायचो त्या म्हातारीचे केस असे तरूणांना आवडणाऱ्या चवीचे तंबाखू आता उपलब्ध आहेत. या चवीकडे लहान मुलं आणि तरूण सहज आकर्षित होतात. शिवाय, हे पदार्थ ज्या पॅकेटमधून विकले जातात त्या पॅकेटचं कवरही आकर्षक, चकचकीत करण्यामागे या कंपन्यांचा कल असतो. त्या पदार्थाला वेगवेगळे आकारही दिले जातात. त्यामुळे ते जास्तच छान दिसतात.

हास्यास्पद म्हणजे, या नव्या पदार्थांची जाहिरात सिगारेटसारख्या जुन्या, ‘पारंपरिक पदार्थांपेक्षा कमी धोकादायक’ अशा पॅकेजिंगखाली केली जाते. त्यामागचं वैज्ञानिक कारण सांगितलं जातं नाही. पण शास्त्रज्ञ खरोखर हे पदार्थ तपासतात तेव्हा ते सिगारेटसारख्या पदार्थांएवढेच किंबहुना जास्त धोकादायक असतात. जाहिरात करण्यासाठी या कंपन्या एखाद्या अभिनेत्याचा किंवा प्रसिद्ध व्यक्तीचा वापर करतात. ती व्यक्ती प्रत्यक्ष आयुष्यात स्वतः हे पदार्थ वापरत नसली तरी त्या व्यक्तीला आदर्श मानणारी तरूणाई त्या पदार्थाकडे जातेच.

मुलांचं लवकर शोषण करता येतं

याहूनही धक्कादायक प्रकार या कंपन्या करत असतात. हे पदार्थ कुठल्या ठिकाणी सगळ्यात जास्त विकले जातील किंवा तरूणांना हे कोणत्या ठिकाणी सहज उपलब्ध होतील हे या कंपन्यांना चांगलं माहीत असतं. इतर कुणाहीपेक्षा तंबाखू कंपन्यांकडे तरुणांबद्दलचं इत्यंभूत माहीत असते. अगदी एखाद्या सरकारलाही आपल्या तरुणाईच्या आवडीनिवडी माहीत नसतील, त्या या तंबाखू कंपन्यांच्या चांगल्या ठाऊक आहेत.

तरूण मुलं जंकफूड, सोडा किंवा मिठाईच्या दुकानात वारंवार जात असतात हे या कंपन्यांनी चांगलं हेरलंय. त्यामुळे अशा दुकानांच्या जवळपास तंबाखूची टपरी किंवा दुकान थाटतात. इतकंच नाही, तर शाळेच्या किंवा कॉलेजच्या बाहेरही आपल्या पदार्थांची विक्री चांगली होते म्हणून तिथेही दुकान थाटतात. भारतात, शाळेपासून एक किलोमीटर आवारात अशी टपरी चालू करायला मनाई आहे.

यासोबतच, संपूर्ण एक पॅकेट विकण्याऐवजी सुट्या एक दोन सिगारेट, तंबाखूची छोटी पुडी असंही दुकानदार विकत असतात. कारण, सुट्या वस्तू जास्त स्वस्त पडतात. लहान मुलांकडे पैसे कमी असतात, त्यामुळे त्यांना अशा सुट्या वस्तू मिळालेलं बरं पडतं.

कुणी म्हणेल, जगात इतके लोक असताना विशेषतः तरूण मुलांवरच या कंपन्या का लक्ष ठेवून बसतील? त्याचं उत्तर सोपंय. मोठ्या माणसांप्रमाणे तरूण मुलांना बऱ्याचदा चांगल्या वाईटाची निवड करता येत नाही. मित्राच्या किंवा गोड गोड बोलणाऱ्या दुकानदाराच्या नादानं लहान मुलं सहज फसतात. शिवाय, या वयात आईवडलांचं ऐकायचं नाही, बंडखोरी करायची असाही अनेकांचा स्वभाव असतो. या सगळ्यामुळे तरूण मुलं लवकर फसतात.

हेही वाचा : ई-सिगारेटवर बंदी व्यसन रोखण्यासाठी की तंबाखू लॉबीमुळे?

तंबाखूमुक्त जगाचं स्वप्न

हे सगळं थांबवण्यासाठी डब्लूएचओनं यंदा तरूणाईला तंबाखूपासून वाचवण्याचा निर्णय घेतलाय. तंबाखूच्या जाहिरातींवर बंदी घातल्याने तंबाखू सेवन करणाऱ्यांची संख्या झपाट्याने कमी होते, असं डब्लूएचओचं म्हणणं आहे. शिवाय, तंबाखूवरचा कर वाढवणं हाही एक चांगला उपाय असू शकतो.

यासोबतच, तंबाखू कंपन्यांनी पसरवलेल्या खोट्या गोष्टींचं आणि तरूणांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी वापरलेल्या डावपेचांचं पितळं उघड पाडायचं यासाठीही डब्लूएचओ काम करणार आहे. फक्त एवढंच पुरेसं नाही तर शाळाशाळांमधे फिरून, प्रत्येक तरूण मुलाला आणि मुलीला भेटून तंबाखूमुळे काय दुष्परिणाम होऊ शकतात याबद्दल आणि तंबाखू कंपन्यांच्या पैसे कमवण्याच्या प्रवृत्ती मुलांना माहिती द्यायची गरज डब्लूएचओनं अधोरेखित केलीय.

प्रत्येक माणसाला निवड करण्याचा अधिकार आहे, असं प्रचार तंबाखू कंपन्या करत असतात. पण निवड करण्याचं स्वातंत्र्य देण्याआधी तंबाखूच्या वाईट गोष्टींबद्दल ते मुलांना काहीही सांगत नाहीत. त्यांचे खिसे भरण्यासाठी लोकांनी आपले जीव धोक्यात घालावेत असंच त्यांना वाटतं. त्यामुळेच अशा तंबाखूच्या आहारी जाऊन आपलं सर्वस्व गमावून बसणारी पिढी निर्माण होऊ देणं जगाला परवडणारं नाही, असं डब्लूएचओचं म्हणणं आहे.

डब्लूएचओनं या प्रयत्नात साथ देण्याचं आवाहनही जनतेला केलंय. त्यासाठी सोशल मीडियावर कॅम्पेन चालू करणं, शाळेत आपल्या आसपासच्या लहान मुलांसोबत याबाबतीत सातत्याने बोलत राहणं आणि आधीच तंबाखूच्या आहारी गेलेल्यांना मदत करणं ही कामं आपण करू शकतो. कोरोनापेक्षाही खूप जुन्या अशा तंबाखू साथरोगापासून आपल्याला सुटका मिळायला हवी.

हेही वाचा : 

कुछ वायरस अच्छे होते है!

जीवघेणा लॉकडाऊन संपवण्याचे चार साधेसरळ मार्ग

माझे जिवीची आवडी, पंढरपुरा आकाशमार्गे नेईन गुढी

कोरोना पॉझिटिव आलो तरी आम्ही घरीच राहिलो, कारण

लॉकडाऊननंतर आपण महाराष्ट्रातल्या शाळा कसं सुरू करू शकतो?

वस्तूंना हात लावल्यावर कोरोनाची लागण होण्याची शक्यता कमी झालीय?

लॉकडाऊनविरोधातल्या रस्त्यावरच्या आंदोलनांना ट्रम्प पाठिंबा का देताहेत?

दीपिका सांगतेय, लॉकडाऊनमधे मानसिक आरोग्य सांभाळण्याच्या १५ टिप्स