पुलित्झरसारखं वागणाऱ्या पत्रकारांनाच पुलित्झर मिळालाय

१६ जून २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


पत्रकारितेतला नोबेल समजला जाणाऱ्या पुलित्झर पुरस्कारांची ११ जूनला घोषणा झाली. यावर्षी जॉर्ज फ्लॉईडची हत्या, ब्लॅक लाइव मॅटर चळवळ आणि कोरोना साथरोगाचं पडद्यामागचं सत्य सांगणाऱ्या पत्रकारांनीच बहुतेक पुरस्कार पटकावलेत. फक्त बातम्या नाहीत तर त्यापलीकडचे संदर्भ आणि दृष्टिकोन देणारे हे पत्रकार आहेत.  ज्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो त्या जोसेफ पुलित्झर यांचा वारसा चालवणारे हे पत्रकार आहेत.

पुलित्झर जिंकलेल्यांची नावं कोलंबिया युनिवर्सिटीच्या लायब्ररीत शिक्कामोर्तब होत होती तेव्हा ‘आल्मा मॅटर’लाही समाधान वाटलं असेल. आल्मा मॅटर म्हणजे पोषण करणारी आई. युनिवर्सिटी आणि शाळा कॉलेजला लॅटिन भाषेत असं म्हटलं गेलंय. या आल्मा मॅटरचं एक शिल्प कोलंबिया युनिवर्सिटीच्या लायब्ररीच्या बाहेर आहे. पुलित्झर पुरस्काराची बैठक यावर्षी या लायब्ररीत भरली होती. पुरस्कारांच्या नावातली विविधता, त्यांनी केलेलं काम इतकं खास होतं की ही आल्मा मॅटरही भरून पावली असेल. 

११ जूनला हे पुरस्कार एका ऑनलाईन सेमिनारमधून जाहीर करण्यात आले. यातल्या नावांमधली, पुरस्कार दिला गेलाय त्या विषयांमधली विविधता कमालीची होती. अमेरिकेतल्या वंशवाद विरोधी चळवळीचं चित्रण करणारी मुलगी, चळवळीदरम्यान झालेल्या जाळपोळीचे फोटो घेणारा फोटोग्राफर, साथरोगाचं सत्य बाहेर आणणारी न्यूज संस्था, रॅश ड्रायविंग करणाऱ्या ट्रक ड्रायवरबद्दल सरकारला खडबडून जागा करणारा रिपोर्टर असं मोठं क्षितिज पुलित्झर पुरस्कारानं कवेत घेतलंय. 

यात चीनमधल्या मुस्लिमांच्या छळांबद्दल रिपोर्ट लिहिणारी भारतीय वंशाची एक पत्रकारही आहे. कार्टुन कॅटेगरीतून एकालाही बक्षीस दिलं गेलेलं नाही, असंही यावर्षी झालंय. पण ही विविधता पुलित्झर पुरस्काराचं एकमेव वैशिष्ट्य नाही.

हेही वाचा : बाळशास्त्री जांभेकर : पत्रकारितेच्या पलिकडचे पत्रकार

पुलित्झर पुरस्काराचा इतिहास

अमेरिकेतल्या कोलंबिया युनिवर्सिटीकडून दरवर्षी पत्रकारिता, कला, संगीत आणि साहित्यासाठी २१ कॅटेगरीतून पुलित्झर पुरस्कार दिले जातात. यात १४ पुरस्कार पत्रकारितेसाठी, ६ साहित्य आणि एक संगीत क्षेत्रातल्या व्यक्तीला दिला जातो. सोबतीला ४ फेलोशिपही दिल्या जातात. या पुरस्कारांची निवड करण्यासाठी एक स्वतंत्र बोर्डही असतं. पंधरा हजार डॉलर आणि सर्टिफिकेट असं या पुरस्काराचं स्वरुप असतं. शिवाय, पब्लिक सर्विस कॅटगरीतल्या विजेत्याला सोन्याचं मेडलही मिळतं. अमेरिकेतले पत्रकार जोसेफ पुलित्झर यांच्या नावाने गेल्या १०५ वर्षांपासून हा पुरस्कार दिला जातोय.

जोसेफ पुलित्झर हे ‘द वर्ल्ड’ या दैनिकाचे संपादक आणि प्रकाशक होते. त्यांच्या कामानं त्यांनी पत्रकारितेची व्याख्या बदलवली. त्यावेळेच्या भ्रष्ट सत्ताधाऱ्यांचं पितळं उघड पाडणं एवढं एकच त्यांचं ध्येय असल्यासारखं ते काम करायचे. अमेरिकेतल्या मॅनहॅटनमधल्या कोलंबिया युनिवर्सिटीत पत्रकारिता विभाग चालू करण्यासाठी त्यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात काही रक्कम लिहून ठेवली होती. या पत्रकार विभागाकडूनच काही पुरस्कार देण्यात यावेत अशीही त्यांची इच्छा होती.

१९११ला त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर ४ जूनला १९१७ ला पहिल्या पुलित्झर पुरस्कारांचं वितरण झालं. त्यानंतर एप्रिलमधे हे पुरस्कार दिले जाऊ लागले. पण कोरोना वायरसमुळे गेली दोन वर्ष पुन्हा जूनपर्यंत हे पुरस्कार लांबवावे लागले.

या पुरस्काराला पत्रकारितेतला नोबेल असं म्हणलं जातं. त्यासाठी ७५ डॉलर रुपये फी भरून आपलं नाव पुरस्कारासाठी नोंदवावं लागतं. त्यातून प्रत्येक कॅटेगरीतले तीन फायनलिस्ट पुलित्झर बोर्डाकडून निवडले जातात. या तीन फायनलिस्टमधल्या एकाला पुरस्कार दिला जातो. पण पुरस्कार देताना तीनही फायनलिस्टची नावं वाचून दाखवली जातात. अनेकदा फक्त फायनलिस्ट काढले जातात पण त्यातल्या कुणालाही पुरस्कार मिळत नाही.

आव्हानात्मक वर्ष

२०२० हे पत्रकारितेच्या इतिहासातलं अतिशय वेगळं वर्ष होतं. कोविड १९ च्या साथरोगाचं घोंगावणारं वादळ डोक्यावर घेऊन पत्रकार जगभर घडणाऱ्या गोष्टी डोळ्यात साठवत होते. शब्दांच्या, कॅमेऱ्याच्या माध्यमातून इतरांसमोर मांडत होते. अशातच अमेरिकेनं जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय अमेरिकन नागरिकाच्या हत्येनं उसळलेली चळवळ पाहिली. अमेरिकेच्या इतिहासातली सगळ्यात रंजक निवडणूकही याच काळात झाली. त्यानंतरचा व्हाईट हाऊसवरचा म्हणजेच लोकशाहीवरचा हल्ला अनुभवला.

या वर्षात पत्रकारांना अगदी अनपेक्षित आव्हानांचा सामना करावा लागला. आपल्या सहकाऱ्यांचं, नातेवाईकांचं कोरोनामुळे झालेलं दुःख पचवून हे पत्रकार पुन्हा उभे राहत होते. ब्लॅक लाईव्स मॅटर चळवळीतल्या आंदोलकांवर होणारी मारहाण कॅमेरात कैद करताना त्यांच्याही जिवाला धोका होता. निवडणुकीमुळे दोन मतांमधे विभागलेल्या अमेरिकेच्या नागरिकांचा त्यांच्या पत्रकारितेवरही परिणाम झाला. खोट्या बातम्या, फेक न्यूज, लसीबदद्लची मिथकं यांनी बरबटून गेलेला मीडिया हे पत्रकार साफ करत होते.

या घटनांचा आवाका, पत्रकारांवरचे धोके लक्षात घेता वेळ साधून, चोख रिपोर्टिंग करणं आपल्या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचं काम किती महत्त्वाचं असतं हेच दिसून येतं. म्हणूनच ‘या वर्षीच्या विजेत्यांनी फक्त बातम्या दिल्या असं नाही. तर इतर कुठेही उपलब्ध नसणारे संदर्भ, माहिती आणि त्याला लागून येणारा दृष्टिकोनही त्यांनी दिला,’ असं पुलित्झर बोर्डानं म्हटलंय.

हेही वाचा : रवीश कुमारः नजर पैदा करणारा पत्रकार

कश्मीरचा कर्फ्यू टिपणाऱ्यांना पुलित्झर

खरंतर, पुलित्झरने निवडलेल्या प्रत्येक पुरस्कारप्राप्त पत्रकारावर, त्यांनी लिहिलेल्या रिपोर्टवर विशेष लेख लिहिता येईल. २०१९ मधे भारतात ३७० कलम रद्द करुन काश्मिरचा विशेष दर्जा काढून घेतला आणि तिथे कर्फ्यू लावला. या कर्फ्यूचं, तिथल्या परिस्थितीचं चित्रण करणाऱ्या चन्नी आनंद, यासिन दार, मुख्तार खान या तीन भारतीय फोटोग्राफरना फिचर फोटोग्राफीसाठी २०२०चा पुलित्झर देण्यात आला.

त्याआधी २०१९ ला न्यूयॉर्क टाइम्समधल्या तीन पत्रकारांना डोनाल्ड ट्रम्प यांच्या संपत्तीवर १८ महिन्यांची शोध पत्रकारिता केल्याबद्दल एक्सप्लेनेटोरी रिपोर्टिंग या कॅटेगरीतून पुलित्झर मिळाला होता. टॅक्स चुकवले असल्याने डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला ‘स्वतः कमावलेली संपत्ती’चा दावा कसा खोटा आहे हे या तिघांनी दाखवून दिलं होतं.

भारतीय वंशाचे पुरस्कारप्राप्त पत्रकार

यावर्षी दिलेले पुरस्कारात बहुतेक जॉर्ज फ्लॉईड यांच्या हत्येनंतर उसळलेल्या चळवळीचं आणि कोरोना साथरोगाचं रिपोर्टिंग करणारे पत्रकार आहेत. ब्रेकिंग न्यूज रिपोर्टिंगमधे जॉर्ज फ्लॉईडच्या हत्येची ब्रेकिंग न्यूज देणाऱ्या ‘द स्टार ट्रीब्युन’ या पेपरच्या कर्मचाऱ्यांना मिळाला. एक्सप्लेनेटरी रिपोर्टिंगमधे एका वायरसनं जगातल्या सगळ्यात मोठ्या देशाला कसं भाग पाडलं हे सांगणाऱ्या ‘द अटलांटिक’च्या एड याँग यांना पुरस्कार मिळाला. याशिवाय, पोलिसांच्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे दरवर्षी मृत्यूमुखी पडणाऱ्या हजारो लोकांचं गाऱ्हाणं मांडणारं मार्शल प्रोजेक्टच्या कर्मचाऱ्यांचं रिपोर्टिंग राष्ट्रीय स्तरावर नावाजलं गेलं.

तर आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या रिपोर्टिंगसाठी भारतीय वंशाच्या मेघा राजगोपालन यांच्यासोबत ऍरीसन किलिंग आणि चेरिस्टो बुशेक यांना पुरस्कार मिळाला. न्यूयॉर्कच्या बझफिडन्यूजमधून या तिघांची सॅटेलाईटचे फोटो आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करून तयार केलेली लेखमाला प्रसिद्ध झाली होती. रिएज्यूकेशन कॅम्पच्या नावाखाली चिनी सरकारने मुस्लिमांना कैद करण्यासाठी उभारलेल्या जेलचं रिपोर्टिंग या लेखमालेत आहे. भारतीय वंशांचे नील बेदी यांनी फ्लोरिडामधे सरकारी अधिकारी आणि लहान मुलांच्या तस्करीबाबत टंपा बे टाइम्ससाठी शोध पत्रकारिता केली होती. त्यासाठी त्यांनाही सहकाऱ्यांसोबत स्थानिक पत्रकारितेच्या कॅटेगरित पुलित्झर मिळाला.

फोटोजर्नालिझममधेही यावेळी ब्लॅक लाइव्स मॅटर चळवळीदरम्यान काढलेल्या फोटोंनीच बाजी मारलीय. याशिवाय एका पत्रकाराचाही खास उल्लेख करून तिला पुलित्झर देण्यात आला. या १८ वर्षांच्या पत्रकार मुलीने याआधी कधीही कोणत्याही न्यूज चॅनेलमधे, पेपरमधे अगदी रेडिओवरही काम केलं नाहीय.

जॉर्ज फ्लॉईडची हत्या होत असताना शेजारून जाणाऱ्या डार्नेला फ्रेजियर या १८ वर्षांच्या मुलीनं पटकन घटनेचा वीडियो शूट केला. तिच्या एका वीडियोमुळेच ब्लॅक लाइव मॅटर ही चळवळ जगात सगळीकडे चालू झाली. सामान्य नागरिकांची पत्रकारितेतली भूमिका किंवा सिटिझन जर्नालिझम किती महत्त्वाचं आहे हे अधोरेखित करण्यासाठी हा पुरस्कार तिला दिला असल्याचं पुलित्झर बोर्डानं म्हटलंय.

हेही वाचा : पत्रकारच भाट असतील तर प्रश्न कोण विचारणारः सिद्धार्थ वरदराजन

नव्या जमान्यातले पुलित्झर

आजपर्यंतची पुलित्झर पुरस्कार मिळालेल्यांची नावं पाहता खरोखर फक्त बातम्या देणाऱ्या नाही तर बातम्यांच्या पलीकडे दृष्टिकोन देणाऱ्या पत्रकारांना पुलित्झर दिला गेलाय. सॅटेलाईटसारख्या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या पत्रकारांचीही पुलित्झरने दखल घेतलीय. स्वतःच्याच देशावर टीका करुन साथरोगाच्या काळात केलेल्या चुकांचा पाढा वाचून दाखवणारे पत्रकारही आहेत. तसेच देशातला वंशवाद कितीही क्रूर असला तरी त्याविरोधात एकटवलेले पत्रकारही आहेत. देशातल्या पोलिसांची पोपटपंची करणारे नाही तर वेळप्रसंगी त्यांच्याविरोधात बोलणारे पत्रकार या पुलित्झरचे मानकरी असतात.

कोणत्याही गुन्ह्याची माहिती घेताना पत्रकार शक्यतो पोलिसांचा बाईट घेतात. पण तेवढ्यावर अवलंबून राहून पत्रकारिता पूर्ण होत नसते हे सांगणाऱ्या पत्रकारांचा पुलित्झरने सन्मान केलाय. थोडक्यात पत्रकारितेची व्याख्या बदलणाऱ्यांना, तशी धमक असणारे पुलित्झर पुरस्काराचे मानकरी झालेत. ज्यांच्या नावाने हा पुरस्कार देतात ते जोसेफ पुलित्झरही असेच होते. नव्या जमान्यातल्या आधुनिक ‘पुलित्झर’नाच यावर्षी पुलित्झर पुरस्कार मिळालाय.

हेही वाचा : 

नेशन वॉन्ट्स टू नो अर्णब, ये जबां किसकी हैं?

हत्ती आणि गाढव अमेरिकेच्या राजकारणात आले कसे?

बातम्या कवर करतानाचा ताण पत्रकारांना आजारी पाडतोय

प्रबोधनकारांच्या पत्रकारितेविषयी आपल्याला काय माहितीय?

पहिल्या वृत्तपत्रापासूनच मीडियाचा स्वातंत्र्यासाठी संघर्ष आजही सुरूच