तौक्ते चक्रीवादळानंतर आता पूर्व किनारपट्टीवर धडकणाऱ्या ‘यास’ चक्रीवादळाशी भारताला दोन हात करायचेत. गेल्या काही वर्षांत समुद्रात येणाऱ्या चक्रीवादळांची संख्या खूप वाढलीय. संशोधकांच्या मते, जागतिक तापमान वाढीमुळे समुद्राचं तापमान वाढल्यानं चक्रीवादळांची संख्या वाढतेय. पर्यावरणातला अवाजवी हस्तक्षेप थांबवला तर जागतिक तापमान वाढ आपण रोखू शकतो. पण प्रश्न हा आहे की आपण हे करणार का?
एक कोटीपेक्षा जास्त लोक बाधित. अडीच ते तीन लाख लोकांचं स्थलांतर. १२२ लोकांचा मृत्यू. ५६ हजारपेक्षा जास्त घरांची पडझड. शेकडो फळबागा उद्ध्वस्त. अनेक ठिकाणच्या पाणी पुरवठा यंत्रणेला फटका. वीज पुरवठा बंद पडून अनेक शहरं आणि गावं अंधारात. हजारो कोट्यावधींचं नुकसान. ही आहे १४ ते १९ मे या काळात ‘तौक्ते’ या चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची आकडेवारी.
वर्षभरापूर्वी ‘निसर्ग’ चक्रीवादळाने केलेल्या नुकसानीतून सावरण्यापुर्वीच ‘तौक्ते’ चक्रीवादळाने महाराष्ट्रासोबत देशाला तडाखा दिला. वाढती संख्या आणि तीव्रतेमुळे चिंतेचा विषय ठरलेली ही चक्रीवादळं निर्माण होतात ती प्रामुख्याने समुद्राच्या तापमान वाढीमुळे.
समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान वाढलं की तिथल्या पाण्याची वाफ होऊन ती वर सरकते. परिणामी कमी दाबाच्या पट्ट्याची पोकळी तयार होते. वातावरणातली थंड हवा या पोकळीच्या दिशेने चक्रकार वाहू लागते. हीच चक्राकार हवा अनुक्रमे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वेगाने मार्गक्रमण करू लागते. त्याला आपण चक्रीवादळ म्हणतो.
मागची काही वर्ष चक्रीवादळांच्या वाढलेल्या संख्येमागे मुख्यत: समुद्राचं वाढतं तापमान कारणीभूत आहे. समुद्राचं हे तापमान वाढतं प्रामुख्याने दोन कारणांनी. एक नैसर्गिक आणि दुसरं मानवनिर्मित. जसं की बंगालचा उपसागर उथळ असून त्याचं तापमान निसर्गत: जास्त आहे. त्यामुळे तिथं पूर्वीपासून चक्रीवादळं निर्माण होतात. त्यांची तीव्रताही जास्त असते.
हेही वाचा : चक्रीवादळाचं नाव कसं ठरवतात?
याउलट गेली काही वर्ष जागतिक तापमान वाढीमुळे समुद्राचं तापमान वाढतंय. अरबी समुद्रासारख्या निसर्गत: कमी तापमान असलेल्या समुद्राचं तापमान वाढून चक्रीवादळांची संख्या वाढतेय. संशोधकांच्या मते, जागतिक तापमान वाढ अशीच राहिली तर भविष्यात चक्रीवादळांची एकूण संख्या आणि त्यांची तीव्रता वाढत जाणार आहे.
आता ही जागतिक तापमान वाढ होतेय ती मुख्यत: माणसामुळे, आपल्यामुळे. आपण केलेल्या वृक्षतोडीमुळे, वायूप्रदुषणामुळे, पर्यावरणात केलेल्या अवाजावी हस्तक्षेपामुळे. आपण ठरवलं, वृक्षतोड कमी करून वृक्षलागवड वाढवली, वायूप्रदुषण कमी केलं, पर्यावरणातला अवाजवी हस्तक्षेप थांबवला तर जागतिक तापमान वाढ रोखू शकतो.
परिणामी समुद्राची तापमान वाढ कमी होऊन चक्रीवादळांची वाढती संख्या आणि तीव्रता कमी करू शकतो. चक्रीवादळांमुळे होणारी वित्त, जीवित आणि पर्यावरणाची हानी रोखू शकतो. पण प्रश्न हा आहे की आपण हे करणार का?
सध्या चक्रीवादळांमुळे होणारी आर्थिक आणि जीवित हानी थांबवण्यासाठी त्यांचा अचूक अंदाज बांधला जातो, त्याप्रमाणे उपाय केले जातात, पूर्वतयारी केली जाते. यातून होतं काय? तर चक्रीवादळामुळे होणारं नुकसान आपण कमी करू शकतो.
आपल्याला हे नुकसान टाळता येणार नाही. त्यापासून पळूनही जाता येणार नाही. शिवाय अंदाज बांधून आणि पूर्वतयारी करूनदेखील आत्तापर्यंतच्या चक्रीवादळांनी केलेलं नुकसान पाहता केवळ तेवढं पुरेसं दिसत नाहीय.
चक्रीवादळांमुळे होणारं नुकसान टाळायचं असेल, चक्रीवादळांची संख्या आणि तीव्रता कमी करायची असेल तर समुद्राची आणि त्या अनुषंगाने जागतिक तापमान वाढ रोखणं हाच सध्यातरी परिणामकारक उपाय दिसतोय.
हेही वाचा : इतिहास सांगतो, निसर्गातलं वैविध्य संपत असल्यानं जगावर वायरस संकट
आठवड्यापूर्वीच येऊन गेलेल्या ‘तौक्ते’ चक्रीवादळानंतर आता २६-२७ मेला देशाच्या पूर्व किनाऱ्यावर ‘यास’ चक्रीवादळ धडकण्याचा इशारा हवामान विभागाने दिलाय. हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार होणारी जीवित आणि आर्थिक हानी रोखण्यासाठी आता पूर्वतयारीही केली जाईल. पण चक्रीवादळांच्या या वाढत्या संख्येला रोखण्याचं काय?
त्यासाठी जागतिक तापमान वाढ रोखणं हा एकच पर्याय आपल्यासमोर आहे. आपण ठरवलं तर ही तापमान वाढ रोखू शकतो. वाढत चाललेली चक्रीवादळांची संख्या आणि तीव्रता पाहता आत्तातरी आपण तापमान वाढ रोखण्यासाठी काही करणार आहोत का? की ‘तौक्ते’, ‘निसर्ग’मधून काहीच न शिकणारे आपण चक्रीवादळांचं हे वाढतं दुष्टचक्र असंच सुरु ठेवणार आहोत?
हेही वाचा :
डळमळले भूमंडळ : किल्लारीच्या आठवणींना उजाळा (भाग १)
पाऊस तर जगभर पडतो, पण भारतातला मान्सून जगावेगळा आहे!
कोरोनापेक्षा खरा धोका आहे तो आपल्या आतल्या वायरसचाः युवाल नोवा हरारी