जगातल्या सगळ्यात मोठ्या दुर्गुणाविरुद्ध क्रिकेटनं एका हत्यारासारखं काम केलं

१५ मे २०२०

वाचन वेळ : ८ मिनिटं


खरंय की, निव्वळ मनोरंजनापेक्षा क्रिकेटमधे अधिक असं काही क्वचितच असतं. मात्र पन्नास वर्षांपूर्वीच्या त्या दोन महिन्यांमधे खेळल्या गेलेल्या पाच कसोटी सामन्यांमधे क्रिकेटपेक्षा अधिक काही तरी निश्चितच होतं. एखाद्या व्यक्तीच्या त्वचेच्या रंगावरून त्याचं समाजातलं स्थान आणि अधिकार ठरवण्याचे दिवस आता दक्षिण आफ्रिकेत फार राहिले नाहीत, असा संदेश त्यातून गेला होता.

सन २००८ मधे सुरू झालेल्या इंडियन प्रिमिअर लीगच्या तेरा वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडतंय की, यंदा ही स्पर्धा होणार नाही. त्यामुळे आयपीएलचे चाहते नक्कीच निराश झाले असतील. त्यापैकी काही जणांना आपण यंदा आयपीएलच्या आनंदापासून वंचित राहिलो असंही वाटलं असेल. पण त्यांनी इंग्लिश क्रिकेट, चाहत्यांचा विचार केल्यास त्यांचं दुःख थोडं हलकं होईल.

कारण इंग्लंडमधे १९४६ पासून आतापर्यंत म्हणजे गेली ७४ वर्षे कौंटी क्रिकेट म्हणजे आपल्याकडे जशी रणजी ट्रॉफी असते तशी इंग्लंडमधील देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा नियमितपणे चालत आलीय. यंदा मात्र कौंटीचे सामने होणार नाहीत. त्यामुळे इंग्लिश क्रिकेट चाहते त्या मोठ्या आनंदाला मुकणार आहेत.

हेही वाचा : महात्मा गांधींचं क्रिकेटशी नातं सांगणारे हे किस्से आपल्याला माहीत आहेत का?

दुसरं महायुद्ध १९४५ मधे संपले. तेव्हापासून दरवर्षीच्या उन्हाळ्यात इंग्लंडमधे कौंटी क्रिकेटचे सामने खेळले जातात. तसंच आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटही नियमितपणे खेळले जात आहेच. दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ १९७० मधे इंग्लंडच्या दौऱ्यावर येणार होता. दक्षिण आफ्रिकेतल्या वर्णभेदी व्यवस्थेच्या धोरणानुसार त्या संघातले सर्व खेळाडू श्वेतवर्णीय असणार होते. मात्र याच सुमारास दक्षिण आफ्रिकेशी क्रीडाविषयक संबंधांवर बहिष्कार टाकावा यासाठीची चळवळ इंग्लंडमधे जोर धरत होती.

याचं कारण होतं, डी ऑलिविएरा प्रकरण. १९६८-६९ मधे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणाऱ्या इंग्लंडच्या क्रिकेट संघात बेसिल डी ऑलिविएरा हा दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन इथे जन्मलेला आणि नंतर ब्रिटिश नागरिक झालेला मिश्रवर्णीय क्रिकेटपटू असणार होता. ‘हा खेळाडू दौऱ्यावर येणार असेल तर आम्ही इंग्लंडच्या संघाबरोबर खेळणार नाही’, असं दक्षिण आफ्रिकेने जाहीर केलं होतं. मात्र या दौऱ्यातून डी ऑलिविएराला वगळण्यास इंग्लंडने नकार दिला होता. त्यामुळे मग इंग्लंडच्या संघाचा १९६८-६९ चा पूर्वनियोजित दक्षिण आफ्रिका दौराच रद्द झाला होता.

पुढं हे प्रकरण आंतरराष्ट्रीय क्रीडावर्तुळात फारच गाजलं. क्रिकेटच्या बाहेरसुद्धा याची दखल घेतली गेली. डी ऑलिविएरा प्रकरणामुळे १९७० मधे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने वर्णभेदी दक्षिण आफ्रिकेशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवण्यावर बंदी घातली. याचबरोबरीने अशी बंदी इतरही खेळांवर घालण्यात आली होती आणि ही बंदी १९९२ पर्यंत टिकली.

मात्र सर्व श्वेतवर्णीय खेळाडू असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या स्प्रिंगबॉक या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रग्बी संघाने १९६९-७० मधे इंग्लडचा दौरा केला होता. त्या दौऱ्याच्या निमित्ताने डाव्या विचारसरणीच्या ‘न्यू स्टेट्‌समन’ या साप्ताहिकाने 'Apartheid is Not a Game' या शीर्षकाचा लेख प्रसिद्ध करून त्या दौऱ्यावर बहिष्कार टाकावा, असं आवाहन केलं होतं.

तर उजव्या विचारसरणीच्या ‘स्पेक्टॅटर’ या नियतकालिकाने न्यू स्टेट्‌समनच्या लेखाचा प्रतिवाद करताना असं उत्तर दिलं होतं की, खेळ आणि राजकारण यांची सरमिसळ करता कामा नये. अर्थात रग्बी संघाचा नियोजित तो दौरा यथास्थित पार पाडला. मात्र दक्षिण आफ्रिकेचा रग्बी संघ जिथे जिथे गेला तिथे तिथे त्यांना निषेधाला तोंड द्यावं लागलं. एकदा तर त्या संघाच्या बसचं अपहरणही करण्यात आलं होतं.

त्या काळात मेरिलिबॉन क्रिकेट क्लब म्हणजेच एमसीसी या संस्थेचं इंग्लिश क्रिकेटवर वर्चस्व होतं. अतिशय कर्मठ दृष्टिकोन असलेल्या या संस्थेनं १९७० मधे नियोजित असलेला दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा पार पडायला हवा, अशी भूमिका मार्टिन विल्यमसन यांनी घेतली होती. या सर्व वादविवादाचा त्यांनी छोटेखानी पण उत्कृष्ट रीतीने इतिहास लिहिलाय.

ते लिहितात, ‘एमसीसीचे पदाधिकारी म्हणजेच इंग्लिश क्रिकेटचे धुरीण त्यांच्या निर्णयावर ठाम होते. दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाचा दौरा होऊ द्यावा, अशी त्यांची भूमिका होती. एमसीसी आणि आयसीसी यांच्या काही बैठकांच्या नोंदीनुसार असं लक्षात येतं की, इंग्लिश क्रिकेटचे धुरीण इंग्लंडमधे मेट्रिक म्हणजेच दशमान मापनपद्धती लागू केल्यामुळे अंतर आणि वजन यांच्यामधे होणाऱ्या बदलांबाबत चिंताग्रस्त होते. उदाहरण सांगायचं झालं, तर खेळपट्टीची लांबी २२ यार्डांऐवजी २०.१२ मीटर होणार आहे आणि क्रिकेटच्या चेंडूचं वजन साडेपाच औन्सवरून १५५.८ ग्रॅम होणार आहे. या बदलांशी कसं जुळवून घ्यायचं याची त्यांना चिंता होती.’ (बघा https://www.espncricinfo.com/story/š/id/२२२५२१७७/politics-killed-tour)

हे कोरोना स्पेशलही वाचा :

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोरोनाचे पेशंट या देशांत सापडले नाहीत की काही झोल आहे?

किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?

अमेरिकेला कोरोनानं ताब्यात घेतलं, सेंट लुईस शहर वेगळं राहिलं, कारण

कोरोना फक्त फुफ्फुसच नाही, तर आपल्या या अवयवांनाही करतोय टार्गेट

कोरोनापेक्षा खरा धोका आहे तो आपल्या आतल्या वायरसचाः युवाल नोवा हरारी

कोरोनाः बिल गेट्सनी २०१५ मधेच दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष आपल्याला भोवतंय

एकीकडे असं होत असतानाच दुसऱ्या बाजूला, मूळचे दक्षिण आफ्रिकेचे पण आता अनिवासी रहिवासी म्हणून इंग्लंडमधे राहणारे पीटर हेन यांच्यासारख्या काही कार्यकर्त्यांनी वर्णभेदी दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा दौरा होऊ नये, अशी आग्रही भूमिका घेतली होती. तो दौरा होऊ नये या भूमिकेला अनेकांनी पाठिंबा दिला. त्यात क्रिकेटविषयी लिहिणारे नामवंत लेखक आणि समालोचक जॉन अर्लोट यांचाही समावेश होता. तेदेखील आयुष्यभर वर्णभेदाच्या धोरणाचे कडवे विरोधक होते. डी ऑलिविएराला इंग्लडमधे येण्यासाठी त्यांनीच मदत केली होती.

‘जर हा दौरा झालाच, तर त्या सामन्यांचं समालोचन मी करणार नाही,’ अशी भूमिका अर्लोट यांनी घेतली. इतर पत्रकारांनीही त्यांना पाठिंबा दिला. पण ‘पहिली कसोटी पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार जूनच्या पहिल्या आठवड्यात होईल’, असं २० मे १९७० ला जाहीर करून इंग्लिश क्रिकेटच्या धुरिणांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं.

मात्र या घोषणेनंतर केवळ तीनच दिवसांनी दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा इंग्लंड दौरा रद्द करण्यात आलाय, असं जाहीर झालं. इंग्लिश क्रिकेटच्या धुरिणांना इतक्या लवकर शरणागती का पत्करावी लागली, या प्रश्नाचं उत्तर क्रिकेटच्या बाहेर होतं. तेव्हा इंग्लडमधे मजूर पक्षाची सत्ता होती आणि त्या पक्षातल्या सदस्यांचा एक मोठा गट वर्णभेदाच्या विरोधात होता.

ब्रिटनचे तत्कालीन गृहमंत्री जेम्स कॅलाघन यांनी एमसीसीला एक खरमरीत पत्र लिहिलं होतं आणि तो दौरा रद्द करण्यात यावा, असं सांगितलं होतं. ब्रिटिश सरकारला दुखवू इच्छित नसल्यामुळे एमसीसीने ते सामने रद्द केले होते. तेव्हा ब्रिटनमधे हुजूर पक्ष सत्तेत असता तर कदाचित तो दौरा झाला असता आणि मग त्याचे काय परिणाम झाले असते, कोण जाणे!

या साऱ्या गदारोळात १९७० च्या कौंटी क्रिकेटचे सामने नेहमीप्रमाणे चालूच होते. मात्र आंतरराष्ट्रीय कसोटी सामनेच होणार नसतील, तर त्यामुळे निर्माण झालेली वेळापत्रकातील पोकळी कशाने भरून निघणार होती? याच सुमारास उर्वरित जगातल्या अव्वल क्रिकेट खेळाडूंचा एक संघ ‘रेस्ट ऑफ द वर्ल्ड XI’ या नावाने पाच कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडच्या दौऱ्यावर येणार, असं ठरलं. एक विलक्षण प्रेरणादायी मानावं असं हे पाऊल होतं. गिनीस या मद्य कंपनीने त्या कसोटी मालिकेसाठी २० हजार पौंड रकमेचं प्रायोजकत्व देण्याची तयारी दर्शवली. त्या काळी ही रक्कम बरीच मोठी होती.

तर, बरोबर ५० वर्षांपूर्वी याच महिन्यात मे १९७० मधे उर्वरित जगातल्या विविध वंशांच्या अव्वल दर्जाच्या क्रिकेटपटूंचा संघ ‘रेस्ट ऑफ द वर्ल्ड XI’ इंग्लडच्या संघाविरुद्ध पाच कसोटी सामने खेळण्यासाठी निवडला गेला. क्रिकेट इतिहासातला आजवरचा सर्वोत्तम क्रिकेटपटू मानला जातो, त्या वेस्ट इंडीजच्या सर गारफिल्ड सोबर्सकडे त्या संघाचं नेतृत्व होतं.

हेही वाचा : स्पर्श न करता खेळता येतं, म्हणून आपल्याकडे क्रिकेट वाढलं

सोबर्सशिवाय वेस्ट इंडीजचेच रोहन कन्हाय, क्लाइव लॉईड, लान्स गिब्स आणि डेरिक मरे हे अन्य चार कृष्णवर्णीय खेळाडूही निवडले गेले. दक्षिण आफ्रिकेतून बॅरी रिचड्‌र्स, ग्रॅहॅम पोलॉक, एडी बार्लो, शॉन पोलॉक या प्रसिद्ध खेळाडूचे वडील पीटर पोलॉक आणि माईक प्रॉक्टर हे पाच श्वेतवर्णीय खेळाडू निवडले गेले. पाकिस्तानचे इंतिखाब आलम आणि मुश्ताक महम्मद, ऑस्ट्रेलियाचा ग्रॅहम मॅकेन्झी आणि भारताचा फारूक इंजिनिअर हे खेळाडूही त्या संघात होते.

खेळातल्या कौशल्याच्या बाबतीत यजमान इंग्लडचा संघ ‘रेस्ट ऑफ द वर्ल्ड XI’वर मात करू शकेल इतक्या ताकदीचा नव्हता. मात्र इंग्लंडच्या संघामधेही काही उत्तम खेळाडू होते. भरपूर अनुभव असलेला कप्तान रे इलिंगवर्थ हा चातुर्य आणि डावपेचात्मक बुद्धी यासाठी ओळखला जात असे. जेफ बॉयकॉट आणि कॉलिन कॉड्री हे दर्जेदार फलंदाज आणि जॉन स्नो आणि डेरेक अंडरवूड हे चांगले गोलंदाज त्या संघात होते. इंग्लंडचा ॲलन नॉट तर जगातील सर्वोत्तम यष्टिरक्षक म्हणून ओळखला जात होता.

अशा रीतीने यजमान इंग्लंड विरुद्ध ‘रेस्ट ऑफ द वर्ल्ड XI’ यांच्यातली कसोटी मालिका सुरू झाली. पहिल्या सामन्याची सुरवात लंडनमधे १७ जून १९७० ला क्रिकेटची मक्का म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्‌सच्या मैदानावर झाली. शेवटचा सामना लंडनमधल्याच ‘द ओवल’ मैदानावर झाला. ही कसोटी मालिका बरोबर दोन महिनं चालली.

नॉर्टिगहॅम इथे खेळला गेलेला दुसरा कसोटी सामना इंग्लडने जिंकला. इतर चार सामने मात्र रेस्ट ऑफ द वर्ल्ड XI संघाने जिंकले. या मालिकेत सोबर्स, लॉईड आणि बार्लो यांनी प्रत्येकी दोन शतकं झळकावली. अन्य काही पाहुण्या खेळाडूंचीही उत्कृष्ट फलंदाजी इंग्लंडमधील क्रिकेटप्रेमींना पाहता आली. दक्षिण आफ्रिकेच्या एडी बार्लोने अष्टपैलू कामगिरी करत त्याच्याच देशातील माईक प्रॉक्टर याच्याप्रमाणेच उत्तम गोलंदाजीही केली.

दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघानं १९६५ मधे इंग्लंडचा दौरा केला होता. त्या दौऱ्यात डावखुरा फलंदाज ग्रॅहम पोलॉक याने लक्षणीय कामगिरी करून चांगलाच ठसा उमटवला होता. त्यामुळे १९७० च्या मालिकेत ‘रेस्ट ऑफ द वर्ल्ड XI’ कडून खेळणाऱ्या पोलॉककडून पुष्कळ अपेक्षा होत्या. पहिल्या चारही सामन्यांत त्याची कामगिरी मध्यम दर्जाची होती. मात्र ‘द ओवल’वर झालेल्या अखेरच्या सामन्यात मात्र त्याने सहजसुंदर आणि उत्कृष्ट फटकेबाजी करत आकर्षक असे शतक झळकावले. या डावादरम्यान पोलॉकने गॅरी सोबर्ससह खेळपट्टीवर बराच काळ टिकाव धरून फलंदाजी केली. या दोघांनी अतिशय कमी कालावधीत दीडशे धावांची भागीदारी केली.

ग्रॅहम पोलॉकच्या त्या शतकी खेळीचे काही भाग युटयूबवर उपलब्ध आहेत. ते पाहून त्या भागीदारीसंदर्भात त्या काळी काय लिहिलं गेलं होतं, हे वाचण्याची इच्छा वाचकांना होऊ शकेल. जॉन अर्लोट यांनी ‘द गार्डियन’मधे लिहिले होतं, ‘त्या दिवशी जगातील दोन उत्कृष्ट डावखुरे फलंदाज सामन्याचा शेवट निश्चित करण्यासाठी आणि मैदान व्यापून टाकण्यासाठी एकत्र आले होते. पोलॉक खेळायला आल्यानंतर साधारण तासाभराने सोबर्स फलंदाजीला आला. म्हणजे सोबर्स फलंदाजीला आला तेव्हा पोलॉक खेळपट्टीवर चांगलाच सेट झालेला होता. तरीही या दोघांमधे चित्ताकर्षक अशी जुगलबंदी काही काळ चालू होती.’

‘पोलॉकने एक आकर्षक फटका मारला की, संधी मिळताच सोबर्सही तितकाच आकर्षक फटका मारत होता. एकाच्या पाठोपाठ दुसऱ्याचा टोला असे करत बरोबरी साधली जात होती. त्यांचे कवर ड्राइवज आणि स्क्वेअर कट्‌स यांची तुलना करणं म्हणजे उत्कृष्ट मनोरंजन होतं. पण लवकरच सोबर्समधल्या कॅप्टनला जाणीव झाली की, पोलॉकला अधिक मोकळीक देण्याची गरज आहे. मग त्याने कुशलतेने खेळत, मात्र स्वतःच्या वकुबाची जाणीव प्रेक्षकांना करून देण्यासाठी अधूनमधून फटके मारत, पोलॉकला जास्त स्ट्राईक देण्यातच समाधान मानलं.’

हेही वाचा : महान क्रिकेटपटूंच्या निवृत्तीचा चीड आणणारा भारतीय इतिहास

जॉन वूडकॉक यांनी ‘द टाइम्स’मधे लिहिलं, ‘गेली काही वर्ष या दोघांपैकी सर्वोत्तम फलंदाज कुणाला म्हणावं, याविषयी क्रिकेटपटू चर्चा करत होते. या कसोटी सामन्यामधे स्वतःच्या विजयाची खात्री बाळगणाऱ्या इंग्लडच्या संघविरोधात हे दोघे सोनेरी सूर्यप्रकाशात धावबाद होईपर्यंत एकत्र होते. दिवस मावळतीला जात असताना पोलॉकच्या प्रत्येक ड्राइव्हची बरोबरी तितकाच शानदार ड्राइव्ह मारून सोबर्स करत होता.’

‘काही काळानंतर मात्र तो पोलॉकची कामगिरी पाहणं पसंत करू लागला. याला ‘सिंहासनाचा त्याग’ म्हणण्यापेक्षा, त्याच्या मोठेपणाचं लक्षण मानणं योग्य ठरेल. समान क्षमतेच्या खेळाडूंमधे त्या दिवशी पोलॉक हा सर्वोत्तम फलंदाज होता. मात्र हेही तितकेच खरं होतं की या मालिकेत सोबर्सची बरोबरी करणारं कुणीच नव्हतं.’

तर, अर्लोट नक्कीच आणि कदाचित वूडकॉक हे जाणून होते की ते त्यावेळी जे काही पाहत आहेत, ते खेळाच्या संदर्भात आणि सामाजिकदृष्ट्यादेखील फार महत्वाचं होतं. पोलॉक आणि सोबर्स यांचं एकत्र खेळपट्टीवर असणं ही केवळ ‘aesthetic treat' नव्हती, तर अधिक चांगल्या आणि न्याय्य जगाची ती झलक होती.

आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमधे त्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचे श्वेतवर्णीय आणि वेस्ट इंडीजचे कृष्णवर्णीय खेळाडू कधीही एकत्र खेळले नव्हते. या कसोटी मालिकेत मात्र सोबर्सच्या नेतृत्वाखाली पाच श्वेतवर्णीय दक्षिण आफ्रिकन खेळाडू समाधानाने खेळत होते, ही बाब वर्णभेदाचा सिद्धांत आणि त्याप्रमाणं केलं जाणारं वर्तन यांचं निर्णायकरीत्या खंडन करण्यासाठी पुरेशी होती. इंग्लडच्या संघात पूर्वीचे दक्षिण आफ्रिकेचे असलेले आणि नंतर इंग्लडचे नागरिक झालेले श्वेतवर्णीय टोनी ग्रेग आणि मिश्रवर्णीय बेसिल डी ऑलिविएरा हे दोघं एकत्र खेळत होतं, ही बाबदेखील दखल घेण्याजोगी होती. कारण त्या दोघांच्या मातृभूमीमधे त्यांनी असं एकत्र खेळणं याची कल्पनासुद्धा शक्य नव्हती.

ऑगस्ट १९७०मधे मी बारा वर्षांचा होतो आणि मला क्रिकेटचं वेड लागलेले होतं. त्या वेळी बीबीसी रेडिओवरून प्रसारित होणाऱ्या ‘टेस्ट मॅच स्पेशल’ कार्यक्रमामधे या सामन्यांचं समालोचन मी ऐकलं आणि वृत्तपत्रांतून त्यांच्याविषयी वाचलं. हा लेख लिहायला घेण्यापूर्वी काही प्राथमिक स्रोत पाहिले, त्या वेळी मला एक गोष्ट प्रकर्षाने आठवली की, एका सामन्यात (तो कोणता, याविषयी मला खात्रीने सांगता येत नव्हतं) गॅरी सॉबर्स आणि ग्रॅहम पोलॉक एका अभेद्य भागीदारीसाठी एकत्र आले होते.

त्या भागीदारीतील काही भाग मी रेडिओवर नक्की ऐकला असेल किंवा ‘क्रिकेटर’ या नियतकालिकात वाचला असेल. माझे लाड पुरवणाऱ्या वडिलांनी माझ्यासाठी त्याचं सभासदत्व घेतलं होतं. ते काहीही असो श्वेतवर्णीय आणि कृष्णवर्णीय अशा त्या खेळाडूंमधील जुगलबंदीने इतक्या दूर भारतातल्या एका शाळकरी मुलाला प्रचंड प्रभावित केलं होतं, हे मात्र खरं. असाही विचार मनात येऊन जातो की, त्याच घटनेमुळे दक्षिण आफ्रिकेतल्या काही श्वेतवर्णीय, कृष्णवर्णीय आणि मिश्रवर्णीय मुलांवरदेखील तसाच प्रभाव पडला असेल.इंग्लड आणि ‘रेस्ट ऑफ द वर्ल्ड XI’ यांच्यातले ते पाच क्रिकेट सामने आधी अधिकृत कसोटी सामने मानले गेले होते. नंतर मात्र आयसीसीने तो दर्जा काढून घेतला. त्यामुळे त्या कसोटी सामन्यांमधे जे खेळले, त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीच्या सांख्यिकी माहितीत या सामन्यांना मोजलं गेलं नाही. पण त्याने काहीही फरक पडत नाही.

कोणतीही गोष्ट, मी पुन्हा एकवार सांगतो, कोणतीही गोष्ट ५० वर्षांपूर्वी इंग्लडमधे खेळल्या गेलेल्या त्या सामन्यांचे ऐतिहासिक महत्त्व हिरावून घेऊ शकणार नाही. हे खरंय की, निव्वळ मनोरंजनापेक्षा क्रिकेटमधे अधिक असं काही क्वचितच असतं. मात्र त्या दोन महिन्यांमधे खेळल्या गेलेल्या पाच कसोटी सामन्यांमधे क्रिकेटपेक्षा अधिक काही तरी निश्चितच होतं. एखाद्या व्यक्तीच्या त्वचेच्या रंगावरून त्याचं समाजातलं स्थान आणि अधिकार ठरण्याचे दिवस आता दक्षिण आफ्रिकेत फार राहिले नाहीत, असा संदेश त्यातून गेला होता.दक्षिण आफ्रिकेत वर्णभेदाविरोधात लढाई लढली आणि जिंकलीही गेली ती प्रामुख्याने राजकीय आघाडीवर. मात्र खेळानेही त्यात मर्यादित का होईना भूमिका बजावली होती. गॅरी सोबर्स हा ‘वर्णभेदाच्या विरोधात मोहीम उघडणारा प्रचारक’ म्हणून ओळखला जात नाही. तसंच कोणत्याही प्रकारची राजकीय कृती करण्यासाठीही त्याची ओळख नक्कीच नाही. मात्र १९७०च्या उन्हाळ्यात तो तसा होता आणि त्याच्या संघात आणि विरोधात खेळणारेही तसेच होते!

हेही वाचा : 

लठ्ठ माणसांपेक्षाही कोरोना जास्त वजनदार आहे?

टू डेज वन नाईट: बेरोजगार कुटुंबाची जागतिक गोष्ट

पुरुषांनी रडायला हवं असं सचिन तेंडूलकर का म्हणाला?

शिवाजी पार्कचा श्रेयस अय्यर तर विराटच्या ‘नक्शे कदम पर’ चाललाय!

लेडी सेहवाग शफालीचा सिक्सर पुरुषांनाही तोंडात बोट घालायला लावतो!

मॅकडोनल्ड खाऊच्या ठेल्यापासून फास्टफूड इंडस्ट्रीचा बादशाह कसा बनला?

अमेरिकेत लॉकडाऊनविरोधातल्या रस्त्यावरच्या आंदोलनांना ट्रम्पचा पाठिंबा का?

पंतप्रधान म्हणाले ते Y2K संकट, ही तर २१ व्या शतकातली पहिली ग्लोबल फेक न्यूज

१९९१ मधे भारताला कर्जही मिळत नव्हतं, पण आजचा भारत त्या संकटातून उभा झालाय

(साप्ताहिक साधनाच्या १६ मे २०२० अंकात विचारवंत, लेखक रामचंद्र गुहा यांचा हा लेख आलाय. सुहास पाटील यांनी या लेखाचा अनुवाद केलाय.)