कोरोनाची लागण झालेल्याच्या संपर्कात आल्यावर काय करायचं?

१९ ऑगस्ट २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


गेल्या एक दोन दिवसांत भेटलेल्या एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं तर आपल्याला फार भीती वाटू लागते. अनेकदा या भीतीमुळे आपण कोरोनाची टेस्ट करून घेतो. पण एखाद्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यावर नेमकं काय करायचं, टेस्ट कधी करायची यामागे विज्ञान आहे. हे विज्ञान समजून न घेता लगेचच टेस्ट केली तर त्याचा रिझल्ट निगेटिवच येईल.

मुंबईतलं सिल्वर ओक हे शरद पवारांचं निवासस्थान. सिल्वर ओकमधल्या १२ जणांना कोरोना वायरसची लागण झालीय. त्यात सुरक्षा रक्षक, स्वयंपाक करणाऱ्या महिला आणि ड्रायवरचा समावेश आहे. त्याचसोबत, गेल्या आठवड्यात खुद्द शरद पवारही कराडला गेले होते. त्यांच्या या दौऱ्यानंतर मंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. शरद पवार या सगळ्यांच्या जवळून संपर्कात आले होते. म्हणून त्यांचीही मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमधे कोरोना टेस्ट करण्यात आली. ती टेस्ट निगेटीव आली. तरीही पुढच्या पाच दिवसांसाठी पवारांनी स्वतःला क्वारंटाईन करून घेतलंय.

आपण कोरोनाची लागण झालेल्या माणसाच्या संपर्कात आलो तर आपल्यालाही लागण होण्याची दाट शक्यता असते. म्हणूनच हे कळल्या कळल्या अनेकजण भीतीपोटी किंवा एकदाचं टेन्शन गेलेलं बरं असं म्हणून कोविडची टेस्ट करून घेतात. बरेचदा अशी टेस्ट निगेटिवही येते. कारण, ती करण्याची वेळ चुकलेली असते.

हेही वाचा : जीवघेणा लॉकडाऊन संपवण्याचे चार साधेसरळ मार्ग

कधी होते लागण?

कोरोनाची लागण झालेल्या माणसाच्या संपर्कात आल्यावर लगेचच आपल्याला लक्षणं दिसत नाहीत किंवा लगेचच आपल्यामुळे इतरांना लागणही होत नाही. त्यामुळेच लागण झालेल्या पेशंटच्या संपर्कात आल्याचं आपल्याला कळल्यावर नेमकं काय करायचं, टेस्ट करायची की नाही, कधी करायची या गोष्टी समजून घ्याव्या लागतील.

कोविड १९ या आजाराचे वायरस एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे पसरतात. पण हा प्रसार आपण कोरोना वायरसची लागण झालेल्या एखाद्या माणसाच्या खूप जवळून संपर्कात आलो असू तरच होतो. लागण झालेल्या माणसाच्या श्वसनसंस्थेतल्या द्रव्याच्या थेंबात कोरोनाचे वायरस असतात. माणूस खोकताना, शिंकताना किंवा बोलताना त्यांच्या नाकावाटे किंवा तोंडावाटे हे वायरस आपल्यापर्यंत पोचतात.

आता लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की कोरोनाची लागण झालेल्या सगळ्यांकडूनच त्या वायरसचा प्रसार आपल्यापर्यंत होत नाही. मास्क आणि शारीरिक अंतर पाळलं असेल तर लागण होण्याची शक्यता फारच कमी होते. अमेरिकेतल्या वॉशिंग्टन स्टेट डिपार्टमेंट ऑफ हेल्थकडून काढण्यात आलेल्या परिपत्रकात सांगितल्याप्रमाणे, ६ फुटांपेक्षा कमी अंतरावरून आणि १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीच्या आपण संपर्कात आलो असू तरच आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची शक्यता असते. अशा व्यक्तीला जवळून संपर्कात आलेली व्यक्ती असं म्हटलं जातं.

उगाच टेस्ट नको

या जवळून संपर्कात आलेल्या व्यक्तींमधे घरच्या लोकांचा जास्त समावेश होतो. अनेकदा घरातल्या एका व्यक्तीमुळे कुटुंबातल्या इतरांनाही कोरोनाची लागण झाल्याचं आपण पाहतो. तसंच, कोरोनाची लागण झालेल्यांकडे काम करणाऱ्या कामगारांना वायरसचा संसर्ग होतो किंवा उलट कधीतरी लागण झालेल्या कामगारांकडूनही आपल्यापर्यंत वायरस येण्याची शक्यता असते.
 
अनेकदा आरोग्य व्यवस्थेतले कर्मचारी आपण कोरोनाची लागण झालेल्या माणसाच्या संपर्कात आलो असल्याची माहिती आपल्याला फोन करून कळवतात. अशा आरोग्य कर्मचाऱ्यांचा फोन आला किंवा जवळच्या एखाद्या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव आला तरच आपल्याला कोविडची लागण झाल्याची शक्यता असू शकते. अशी शक्यता असेल आणि आपल्याला लक्षणं दिसत असतील तरच टेस्ट करावी, असं तज्ञांचं म्हणणं आहे.

टेस्टचा रिपोर्ट आलेला नाही पण आपण जवळून संपर्कात आलेल्या माणसाला फक्त सर्दी, ताप आलाय, डोकं दुखतंय म्हणून आपण टेस्ट करायला जाणं योग्य नाही. किंवा आपल्या खात्रीसाठी लक्षणं नसतानाही टेस्ट करणं बरोबर नाही, असं वॉशिंग्टन हेल्थ डिपार्टमेंटच्या परिपत्रकात दिलंय.  

हे कोरोना स्पेशलही वाचा :

ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?

टेस्ट कधी करावी?

कोरोनाची लागण झाल्यानंतर लक्षणं दिसायला जवळपास १४ दिवसांपर्यंतचा कालावधी लागू शकतो. बहुतेक पेशंटमधे ५ दिवसानंतरच लक्षणं दिसायला सुरूवात होते. शिवाय, लागण झाल्यानंतर ४ दिवसांनी आपल्यामुळे इतरांना लागण होण्याचा काळ सुरू होतो. या ४ दिवसांच्या आतच टेस्ट केली तर त्याचा रिपोर्ट निगेटिव येतो. त्यामुळेच, कोरोनाची लागण झाल्या झाल्या लगेचच टेस्ट करू नये.

लागण झालेल्या माणसाच्या संपर्कात आलो होतो हे कळल्यावर लगेचच आपण स्वतःला क्वारंटाईन केलं पाहिजे. या क्वारंटाईनच्या काळात आपल्याला काही शारीरिक त्रास होतोय का यावर लक्ष ठेवायला हवं. थर्मामीटरने आपल्या शरीराचं तापमान मोजत रहायला हवं. कुठलीही औषधं न घेता आपल्याला ताप, सर्दी होत नाहीय ना याची काळजी घ्यायला हवी.

पाच दिवसानंतर लक्षणं दिसू लागली तरच टेस्ट करणं योग्य ठरेल. सध्या कोरोना लागण ओळखण्यासाठीच्या अनेक टेस्ट उपलब्ध आहेत. स्वॅब टेस्ट, नेझल टेस्ट, अँटीबॉडीची टेस्ट अशा वेगवेगळ्या टेस्टपैकी पीसीआर म्हणजेच वायरस आहे की नाही हे शोधणारी टेस्च करावी. लागण झाली असेल तर पाचव्या दिवसापासून ते तिसाव्या दिवसापर्यंत आपण कोरोना पॉझिटीव येतो.

पण ५ दिवसांनंतरही लक्षणं दिसलीच नाहीत तर मात्र पुढचे १४ दिवस क्वारंटाईन रहावं लागेल. १४ दिवसांनंतरही आपल्याला लक्षणं दिसली नाहीत किंवा काहीही त्रास झाला नाही तर आपण जिंकलो असं म्हणू शकतो. कोरोनाची लागण आपल्याला झालेली नव्हती, असं म्हणू शकतो. १४ दिवसानंतर आपण पुन्हा घराबाहेर पडून आपापल्या कामाला लागू शकतो.

हेही वाचा : 

युद्धात जिंकणाऱ्या अमेरिकेला कोरोना का हरवतोय?

कोरोना पॉझिटिव आलो तरी आम्ही घरीच राहिलो, कारण

कोरोनाच्या काळात जन्मलेल्या मुलाला काय म्हणायचं बरं?

सुपर स्प्रेडर म्हणजे काय? ते मुद्दाम कोरोना पसरवतात का?

एडवर्ड जेन्नरः देवी संपवणाऱ्या या देवमाणसाने लसीकरण शोधलंय

कोरोनाच्या R0 नंबरवर आपलं, लॉकडाऊनचं भवितव्य अवलंबून आहे?

कोरोना काळात आपल्याला पेशंटचे १७ अधिकार माहीत असायला हवेत!

विटॅमिन डीच्या कमतरतेमधे दडलंय देशांच्या वेगवेगळ्या मृत्यूदराचं गुपित?