कोरोना वायरसपासून पुर्णपणे सुटका मिळवण्याचे दोनच मार्ग जगाकडे आहेत. एकतर स्वीडनसारखा हर्ड इम्युनिटीचा प्रयोग राबवणं, नाही तर जगातल्या सगळ्यांना प्रतिबंधात्मक लस देणं. त्यामुळेच कोरोनाच्या त्रासाला कंटाळलेलं जग लसीचं संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांकडे डोळे लावून बसलंय. जगभरात जवळपास शंभर ठिकाणी लस बनवण्याचं काम सुरू आहे.
आपल्या सगळ्यांच्या आयुष्याला वेटोळे घालून वर फणा काढून बसलेल्या या कोरोना वायरसपासून कधी एकदा सुटका मिळतेय, असं आता सगळ्या जगाला झालंय. पण आपण कितीही लॉकडाऊन केला, कितीही बंद ठेवलं तरी या जगातून कोरोना वायरस कधीही जाऊ शकत नाही, अशी शक्यता जागतिक आरोग्य संघटनेनं वर्तवलाय. लॉकडाऊन संपल्यानंतर कोरोना वायरसचा प्रसार कमी होईल. पण कधीही कोरोना वायरसची लाट परतून येण्याचा धोका कायम आपल्या डोक्यावर राहणार आहे.
आता कोरोना वायरसपासून पूर्णपणे सुटका मिळवायची असेल तर आपल्याकडे एकच पर्याय उरतो आणि तो म्हणजे समाजातल्या बहुतांश लोकांची कोरोना वायरसविरोधातली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं. आता रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे दोन मार्ग आपल्याकडे आहेत. एकतर स्वीडनसारखा हर्ड इम्युनिटीचा प्रयोग राबवणं असा प्रयोग राबवणं सगळ्याच देशांना शक्य होणारं नाही. त्यामुळेच संपूर्ण समाजाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा एकच मार्ग आपल्याकडे राहतो. समाजातल्या सगळ्यांना कोरोना वायरसची लस उपलब्ध करून देणं.
सगळ्या जगाचे डोळे कोरोना वायरसविरोधातली प्रतिबंधात्मक लस निर्माण करणाऱ्या संशोधकांकडे लागून राहिलेत. लस बनवायला इतका वेळ का लागतो, शास्त्रज्ञ नेमकं काय करतात, असे अनेक प्रश्न आपल्याला या अस्वस्थेच्या काळात पडत असतील. पण कुठल्याही वायरसची लस बनवणं हे सोपं काम नाही. अनेक देश यासाठी प्रयत्न करताहेत.
हेही वाचाः ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?
कोरोना वायरसविरोधात प्रतिबंधात्मक लस बनवण्यासाठी जगभरातल्या सगळ्याच देशात स्पर्धा लागलीय. जगभरातले सगळे शास्त्रज्ञ ही लस शोधून काढण्यासाठी दिवसरात्र मेहनत करतायत. इतिहासात कुठल्याही साथरोगाची लस शोधण्याचे इतके प्रयत्न यापूर्वी कधीही झाले नसतील. जगभरात सध्या लस बनवण्यासाठी शास्त्रज्ञांच्या १००हून जास्त टीम प्रयत्न करतायत. त्यापैकी फक्त ७ टीम सगळ्यांच्या पुढं गेल्या असून गेल्या महिन्यात त्यांनी या लसीची चाचणी सुरू केलीय.
यात अमेरिका, चीन, भारत, दक्षिण कोरिया, तैवान असे अनेक देश आहेत. बीबीसीच्या एका बातमीनुसार, अमेरिकेच्या सिएटलमधल्या एका संस्थेनं प्राण्यांवर केली जाणारी तपासणी टाळून थेट माणसांना लस टोचून पाहिलीय. युरोपातल्या ऑक्सफर्डकडूनही माणसावर प्रयोग करणं चालू झालंय. फ्रान्समधली सोनाफी आणि ब्रिटनमधली जीएसके या औषधनिर्मिती करणाऱ्या आघाडीच्या कंपन्यांनीही आपापली माणसं कामाला लावलीयत.
ऑस्ट्रेलियन वैज्ञानिकांनी प्राण्यांवर लसीचे प्रयोग चालू केलेत. प्राण्यांवर प्रयोग करून मग माणसांवर त्याची तपासणी करणारा ऑस्ट्रेलिया एकमेव देश आहे. चीनमधे जवळपास एक हजार शास्त्रज्ञ लस बनवण्याच्या कामाला लागलेत. पण तिथे हा संपूर्ण प्रश्न मिलटरीच्या हातात देण्यात आलाय. मिलिटरी हॉस्पिटलमधेच हे संशोधन केलं जातंय आणि तपासणीसाठी या मिलटरीतल्या स्वयंसेवकांचाच वापर केला जाणार आहे.
हे कोरोना स्पेशलही वाचाः
कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?
जगाच्या तुलनेत भारत कसा लढतोय कोरोनाशी?
साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं
कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?
कोरोनाचे पेशंट या देशांत सापडले नाहीत की काही झोल आहे?
किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?
अमेरिकेला कोरोनानं ताब्यात घेतलं, सेंट लुईस शहर वेगळं राहिलं, कारण
जनेरीक ड्रग्स म्हणजे आजारावरची औषधं आणि वेगवेगळ्या लसी तयार करण्याच्या क्षेत्रात जगभरात सगळ्यात मोठं योगदान भारताकडूनच दिलं जातं. पोलिओ, गोवर, न्युमोनिया, बीसीजी, रूबेला, गालगुंड अशा डझनभर आजारांच्या लसी इथंच बनवल्या जातात आणि त्यांचं उत्पादनही केलं जातं.
सध्या भारतातल्या जवळपास ६ कंपन्या ही कोरोना वायरसविरोधातली लस बनवण्याच्या कामाला लागल्यात. त्यातलीच एक म्हणजे पुण्यातली सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. ५३ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या कंपनीत दरवर्षी १.५ बिलियन लसींचे डोस तयार केले जातात. सात हजार लोक या कंपनीत काम करतात.
कोरोना वायरसची लस बनवण्यासाठी पुनावाला कंपनीनं ऑक्सफर्ड युनिवर्सिटीशी हातमिळवणी केलीय. ऑक्सफर्डमधे संशोधन करण्यात आलेल्या लसीचं सिरम कंपनी उत्पादन करेल. त्यासाठी चिंपाझीमधल्या काही वायरसचा वापर केला जातोय. हे सगळं सुरळीत पार पडलं तर सप्टेंबर महिन्याच्या शेवटापर्यंत आपल्याकडे एक मिलियन लस उपलब्ध असतील, असा अंदाज संशोधकांनी वर्तवलाय.
हेही वाचाः लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?
ब्लूमबर्गवर आलेल्या माहितीनुसार, लस म्हणजे त्याच रोगाचे अर्धमेले किंवा मेलेले जंतू असतात. एखाद्याला कोरोना वायरसची लागण झाली आणि तो त्यातून बरा झाला तर त्याचं शरीर त्या वायरसच्या अँटीबॉडीस साठवून ठेवतं. या अँटीबॉडीचा वापर करून लस बनवली जाते. कोरोना वायरस आल्यानंतर सुरवातीचा काळ तर त्याच्याबद्दल मुलभूत माहिती जमा करण्यातच गेला. ती माहिती हातात आल्याशिवाय लसीचा विचार करणंही शक्य नसतं.
त्यानंतर कोरोना वायरसची लागण झालेल्या आणि त्यातून बरं झालेल्या पेशंटमधे या वायरसच्या अँटीबॉडी साठवल्या जातात की नाही याबद्दल संशोधन झालं. आता या अँटीबॉडी मिळवून त्यापासून लस बनवण्याचं काम चालू आहे. त्यानंतर त्याच्या तपासण्या करून मग लसीचं संशोधन पूर्ण झालं असं आपण म्हणू शकतो.
महत्त्वाचं म्हणजे, एखाद्या देशानं किंवा संस्थेनं संशोधन पूर्ण केलं तरी ते संशोधन त्यांना फुड अँड ड्रग असोसिएशनसमोर सादर करावं लागतं. एफडीएकडून सगळी माहिती, संशोधनाच्या पद्धती असं सगळं तपासलं जातं. त्यानंतर संशोधनावर शिक्कामोर्तब होतो. असा शिक्का मिळाला की मगच औषध कंपन्या लसीचं उत्पादन चालू करू शकतात आणि मग लस आपल्या हातात पडते.
हेही वाचाः अरे, या दोघांनी जीव धोक्यात घालून पहिली लस टोचून घेतली ना, टाळ्या तरी वाजवा!
एखादी लस निर्माण करायला अगदी दशकं लागत नसली तरी काही महिने, एखादं दुसरं वर्ष तरी लागू शकतं. नेमक्या कोणत्या दिवशी, कोणत्या महिन्यात लस आपल्या हातात पडणार याबाबतही वेगवेगळे अंदाज वर्तवले जातायत. द गार्डियनच्या एका लेखात सांगितल्याप्रमाणे नॅशनल इन्टिट्यूशन ऑफ ऍलर्जी अँड इन्फेक्शिअस डिसीज या अमेरिकन संस्थेचे संचालक अँथनी फाऊशी यांनी पुढच्या १२ ते १८ महिन्यात लस येईल असा अंदाज वर्तवलाय. बिल अँड मेलिन्डा फाऊन्डेशन ही गेट्स यांची संस्था अशा संशोधनाला आर्थिक मदत करतेय. या संस्थेकडून नऊ महिन्यात लस येईल असं सांगितलं जातंय.
लस निर्मितीसाठी काहीजण जुन्या 'ट्राईड अँड टेस्टेड' या संशोधन पद्धतीचा वापर करतायत. तर काही जण नवीन तंत्रज्ञान आजमावून पाहतायत. वायरसचे अँटीबॉडी वापरण्याऐवजी कोरोना वायरस ज्या प्रोटीनमुळे पेशींमधे शिरू शकतो ते प्रोटीन कमी करणारे घटक लसीमधे घालण्याचे प्रयत्न चालू आहेत. तर वायरसचा जेनेटीक कोड वापरून त्याला कायमचं संपवता येईल का हेही बघितलं जातंय.
ऑक्सफर्ड युनिवर्सिटीकडून करण्यात येणाऱ्या संशोधनात चांगलीच प्रगती दिसतीय. संशोधकांनी नुकताच माकडावर लसीचा प्रयोग करून पाहिला आणि तो यशस्वीही झाला. कोरोना वायरस फुफ्फुसांना इजा पोचवू नयेत यासाठी माकडाला लसीचा एकच डोस पुरेसा झाला. एकूण ६ माकडांना हा डोस दिल्यानंतर कोरोना वायरस त्यांच्या शरीरात सोडण्यात आला. पण त्यातल्या एकाही माकडाला न्युमोनिया किंवा ताप सर्दीसारखा काहीही आजार झाला नाही. त्यामुळे या लसीबाबात एक आत्मविश्वास ऑक्सफर्डमधल्या संशोधकांच्या मनात निर्माण झाला आहे.
आता योग्य ती प्रक्रिया पूर्ण करून पुढच्या महिन्यात या लसीचा प्रयोग माणसावरही केला जाईल. त्यासाठी आरोग्य क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांचाच उपयोग केला जाईल. या प्रयोगही यशस्वी झाला तर लवकरच कोरोना वायरसची लस आपल्यासाठी उपलब्ध झालेली असेल.
हेही वाचाः
जीवघेणा लॉकडाऊन संपवण्याचे चार साधेसरळ मार्ग
लठ्ठ माणसांपेक्षाही कोरोना जास्त वजनदार का बनलाय?
कोरोना फक्त फुफ्फुसच नाही, तर आपल्या या अवयवांनाही करतोय टार्गेट
लॉकडाऊनविरोधातल्या रस्त्यावरच्या आंदोलनांना ट्रम्प पाठिंबा का देताहेत?
जगातल्या सगळ्यात मोठ्या दुर्गुणाविरुद्ध क्रिकेटनं एका हत्यारासारखं काम केलं
कोरोनापेक्षा खरा धोका आहे तो आपल्या आतल्या वायरसचाः युवाल नोवा हरारी
कोरोनाः बिल गेट्सनी २०१५ मधेच दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष आपल्याला भोवतंय