आजारी पडण्यापूर्वी कुठे कुठे जातात कोविड १९ चे पेशंट?

३० नोव्हेंबर २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं संकट जगाच्या डोक्यावर घोंघावतंय. लॉकडाऊन नसल्यानं अनेक लोक इकडून तिकडे प्रवास करतायत, सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावतायत. पण याच कार्यक्रमात कोरोनाची लागण होण्याचा धोका सर्वाधिक असतो असं समोर आलंय. आजारी पडण्यापूर्वी कोरोनाचे पेशंट याच ठिकाणी जातात.

कोरोनाच्या प्रसाराचा आलेख जगभरात पुन्हा वर जातोय. दिवसेंदिवस पेशंटची संख्या वाढतेय आणि कोरोनाची दुसरी लाट आल्याचं म्हटलं जातंय. काही आशियाई देशांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून स्वतःला सुखरूपपणे बाहेर काढलंय. तर युरोपात आत्ताच दुसऱ्या लाटेला सुरवात झालीय. भारतात ही सुरवात अजून व्हायचीय. तर अमेरिकेत कोरोनाची तिसरी लाट चालू झाल्याचं बोललं जातंय.

अमेरिकेत लॉकडाऊन केलेला नाही. त्यामुळे तिथली प्रार्थनास्थळ, कामाची ठिकाणं, रस्ते,हॉटेल, थेटर सगळं सगळं नेहमीसारखं सुरूय. खूप लोक इकडून तिकडे जातात. त्यामुळेच कोरोना खूप सहज पसरतो. पण आलाबामा पब्लिक हेल्थ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार कोरोनाची लागण होण्याचा धोका काही विशिष्ट भागांमधे सगळ्यात जास्त असतो असं समोर आलंय.

हेही वाचा : जो बायडन टीमवर ओबामा काळाचा प्रभाव?

आजारी पडण्याआधी

आलाबामा हे अमेरिकेतलं एक राज्य. या राज्याच्या सरकारी आरोग्य विभागाची आलाबामा डिपार्टमेंट ऑफ पब्लिक हेल्थ ही प्राथमिक आरोग्य सेवा सुरूय. आलाबामा मधल्या लोकांना अनेक सार्वजनिक आरोग्य सेवा इथून पुरवल्या जातात. सध्याच्या साथरोगाच्या काळातही ही संस्था फक्त लोकांना सेवा देण्याचंच नाही तर कोरोना संबंधी अनेक संशोधनं प्रसिद्ध करण्याचंही काम करतेय.

या संस्थेकडून ६ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर या दोन आठवड्यात कोरोना झालेल्या काही लोकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यात ते आजारी पडण्यापूर्वी कुठे कुठे गेले होते याचीही विचारणा करण्यात आली. यातून कोरोनाची लागण होण्याचा धोका कोण कोणत्या जागी सर्वाधीक आहे हे स्पष्ट झालं.

या सगळ्या जागांची नावं एकत्र करून आलाबामा संस्थेने एक वर्ड क्लाऊड बनवला. वर्ड क्लाऊड म्हणजे एकाच विषयाशी संबंधीत वेगवेगळ्या शब्दांचा संग्रह. ट्वीटर हॅण्डलवर हा वर्ड क्लाऊड शेअर केलाय. अनेकांनी हा वर्ड क्लाऊड शेअर करून धोक्याच्या जागांची सूचनाही दिलीय.

कुठे आहे सर्वात जास्त धोका?

या वर्ड क्लाऊडमधे चर्च हा शब्द मध्यभागी अतिशय ठळक, मोठ्या अक्षरात लिहिलाय. त्याखाली शाळा, कुटुंब, मयत हे तीन शब्द आहेत. याशिवाय, पार्टी, खेळ, कामाचं ठिकाण, बार, मित्रमैत्रीणी, प्रवास हे शब्दही स्पष्ट पणे दिसून येतात. या जागी कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका सर्वाधीक असल्याचं त्यांना सांगायचं आहे.

सार्वजनिक कार्यक्रम, चर्चमधे होणारा बात्पिझ्माचा कार्यक्रम, थेटर, संग्रहालय, किराणामालाचं दुकान, परिषदा, मतदानाची केंद्र, प्रवास, हॉटेल, लग्नसमारंभ, अशा काही जागाही धोक्याच्या आहेत. या जागी जाणं आपण टाळायला हवं, हेच या वर्ड क्लाऊडमधून दिसून येतं.

तरीही, काही कारणास्तव या जागांमधे किंवा सार्वजनिक कार्यक्रमांमधे सहभागी होण्याची वेळ आलीच तर शक्य होईल तितकी सुरक्षीतता बाळगायला हवी, असं आलबामा इन्सिट्युटने म्हटलंय. हात धुणं, शारीरिक अंतर पाळणं आणि सगळ्यात महत्त्वाचं मास्क घालणं हेच उपाय आहेत.

हेही वाचा : खरंच कोरोनाची दुसरी लाट त्सुनामी ठरेल का?

महाराष्ट्रात काय काळजी घ्यायची?

भारतात कोरोनाची दुसरी लाट येऊ द्यायची नसेल तर आलबामा इन्सिट्यूटच्या या वर्ड क्लाऊडचं म्हणणं गंभीरपणे घ्यावं लागेल. तीन सूत्रांचा वापर करताना आपल्याला कुठे जाणं टाळायचं आहे हे लक्षात आलेलं आहेच. याशिवाय, आपण गेलो आणि काही लक्षणं जाणवू लागली तर लगेचच स्वतःला क्वारंटाइन करून घ्यायला हवं.

महाराष्ट्रातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रार्थनास्थळ उघडण्याची परवानगी दिलीय. पण चर्च म्हणजेच प्रार्थनास्थळं ही कोरोना पसरवण्याची सगळ्यात महत्त्वाची केंद्रं असल्याचं आलबामाच्या वर्ड क्लाऊडमधून दिसतंय त्यामुळे आता मंदिरात, मस्जिदीत किंवा इतर कोणत्याही प्रार्थनास्थळांवर जाताना जास्तीत जास्त काळजी घ्यायला हवी.

हेही वाचा : 

कोरोना लसीच्या स्पर्धेत कोण पुढे, कोण मागे?

कॉर्पोरेट घराण्यांच्या हातात बँकेच्या चाव्या देणं धोक्याचं?

आरसेप व्यापारी कराराला विरोध करणं भारतासाठी धोक्याचं ठरेल?

कमला हॅरिस : संघर्ष करण्याची तयारी असेल तर तुम्ही जगाला बदलू शकता!