तर अत्रेही म्हणाले असते, कुठं आहे महाराष्ट्र माझा?

०१ मे २०२२

वाचन वेळ : ६ मिनिटं


आज एक मे. महाराष्ट्र दिन. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठीच्या आंदोलनात आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या लेखणी आणि वाणीनं मराठी जनतेमधे चैतन्याचं स्फुल्लिंग निर्माण केलं होतं. आजच्या महाराष्ट्राचं चित्र पाहून त्यांनी कदाचित अशाच प्रकारचं भाषण केलं असतं.

माझ्या तमाम मराठी बांधवांनो आणि भगिनींनो!

गेल्या दहा हजार वर्षांत झाली नव्हती इतकी आपल्या महाराष्ट्राची महादशा आजच्या राजकारण्यांनी करून टाकलीय. आमचे महाराष्ट्र शाहीर राम गणेश गडकरी म्हणून गेलेत,

‘मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा,
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा’

मंगल, पवित्र असं जे काही महाराष्ट्रात होतं, ते काळाच्या ओघात संपून गेलंय की काय? आता बघावं तिकडं दगडच भरलेले दिसतात. राजकारणात बघा, साहित्यात बघा, कलेच्या क्षेत्रात पाहा. विचारवंत, जाणकार अभ्यासू कुठं दिसतच नाहीत.

राजकीय दगडोबांचा महाराष्ट्र

जे दिसतात त्यांच्याकडं पाहिलं की वाटतं, यांच्यापेक्षा दगड बरे! (हशा) खरंच सांगतो. दगड बरे असतात. कुणी हलवलं तर हलतात. नेम धरून फेकून मारलं, तर लक्ष्याचा नेमका वेध करतात. मंदिर, धरणं, घर बांधण्यासाठी त्यांचा उपयोग तरी होतो. हे विविध क्षेत्रांतले दगडोबा महाराष्ट्राला खात सुटलेत.

आमचे विनोबा भावे म्हणून गेलेत, ‘भूक असताना आपल्या वाट्याची अर्धी भाकरी दुसर्‍याला देणं याला धर्म म्हणतात.’ हे आमचे राजकारणातले दगडोबा अजीर्ण होईपर्यंत खातात. पोट भरलं तरी दुसर्‍याचं हिसकावून खातात. अहो, यांना काहीही खायला चालतं. या लोकांनी श्रीखंड खाता खाता भूखंड खाऊन कधी संपवले, हे उभ्या महाराष्ट्राला कळालंच नाही. (हशा)

हेही वाचा: पेशवाईच्या स्वैराचाराला 'फटका'वणारा तमासगीर कीर्तनकार

उठवळ राजकारण्यांचा महाराष्ट्र

या महाराष्ट्राच्या निर्मितासाठी १०५ हुताम्यांनी बलिदान दिलं. आमचे ‘ज्ञानपीठ’विजेते कवी विंदा करंदीकर यांच्या कवितेची आठवण मला आज होते. हुताम्याला आदरांजली वाहताना ते म्हणतात, ‘ही माती तुला कधीही विसरणार नाही.’ करंदीकर, तुमचा अंदाज चुकला. कुणाला आहे आठवण त्या हुताम्यांची? ते हुतात्मे आता स्मारकापुरते आणि त्यांचे पुतळे हार घालण्यापुरते उरलेत, हे आपलं दुर्दैव नाही का?

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते. त्यांचे-आमचे मतभेद होते. पण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जे पायाभूत स्वरूपाचं काम केलं, त्याचं आम्ही सदैव कौतुकच करतो. याच यशवंतरावांचा वारसा सांगणारे नेते काय पद्धतीचं राजकारण करतात? खरं तरते नावापुरते वारसदार उरले आहेत.

आजच्या महाराष्ट्राच्या राजकारणातल्या नेत्यांचा उठवळपणा पाहून यशवंतरावही ढसाढसा रडले असते. ‘हे असले राजकारणी पाहण्यासाठी महाराष्ट्राचा ‘मंगल कलश’ घेऊन मी आलो होतो की काय?’ असा प्रश्न त्यांना नक्कीच पडला असता. कोण आहेत हे नेते? काय आहे त्यांची लायकी? कसं काय निवडून येतात हे लोक? अशा अनेक प्रश्नांचा भुंगा माझा मेंदू पोखरत राहतो.

अलीकडं तर मी टीव्ही पाहणंच सोडून दिलंय. बघावं तेव्हा कुणीतरी कुणावर तरी आरोप करत असतो. हा म्हणतो, तो भ्रष्टाचारी. तो म्हणतो, हा भ्रष्टाचारी. सगळे एकाच माळेचे मणी! याला झाकावा आणि त्याला काढावा अशी स्थिती. हे लोक बोलतात की वचा वचा भांडतात, काय कळतच नाही. याच्यापेक्षा पाण्यासाठी नळावर भांडणार्‍या आमच्या बायका बर्‍या. (हशा) अहो खरंच, सगळ्या राजकारणाची नौटंकी करून टाकलीय या लोकांनी.

ताळतंत्र सुटलेल्या मीडियाचा महाराष्ट्र

राजकारणी बेताल झालेत. महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी इतकी कधीच घसरलेली नव्हती. नेत्यांचे पाय घसरणं एकवेळ समजू शकतो; पण बोलणंही घसरावं म्हणजे काय? आम्हीही विरोधकांवर जहाल टीका केली. झोंबणारे शब्द वापरले. मुद्द्यावरून गुद्याची भाषाही केली. पण बुद्धीचं भान कधी सोडलं नव्हतं. आमची टीका जनहिताची होती.

आता हे कमी म्हणून की काय, त्यात आमच्या दांडकं घेऊन पळणार्‍या पत्रकार बंधुंची भर पडलीय. उठवळ नेत्यांच्या भाषणांना ‘लाईव’ दाखवून आपला टीआरपी वाढतोय, असं समजणारे हे आमचे चॅनेलवाले बांधवही ताळतंत्र सुटल्यागत वागू लागलेत, याचं मला फारच वाईट वाटतं. त्यांना आमचं प्रामाणिकपणाचं सांगणंय की, ‘बाबांनो, जरा लोकमान्य टिळकांची पत्रकारिता अभ्यासा.’

सगळं जगाचं ज्ञान आपल्याच डोक्यात भरलंय, असं समजणार्‍या या गुगलवाल्या पत्रकारांनी मी आयुष्यात जे गाडीभर लिहून ठेवलंय, ते जरा नीट वाचून बघावं. पण गंभीरपणानं काही वाचण्याचा, समजून घेण्याचा वेळ कुणाला आहे? सगळेच कशाच्यातरी मागं धावत सुटलेत.

हेही वाचा: सारं काही समष्टीचा एल्गार

लोकशाहीचा सौदा मांडणारा महाराष्ट्र

हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. ज्ञानोबा, तुकोबांचा आहे. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे. भडभुंज्या नेत्यांनी त्याचं पार वाटोळं करून टाकलंय. रेल्वेचा एक अपघात झाल्यावर लालबहादूर शास्त्री यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. आजचे आमचे नेते कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तुरुंगात जातात. जामिनावर सुटून, बाहेर येऊन मंत्री होतात, याला निलाजरेपणा नाही तर दुसरं काय म्हणायचं?

पक्षनिष्ठा, विचारांचं राजकारण यांनी पार मातीमोल करून टाकलंय. येनकेन प्रकारानं सत्तेला चिटकून राहणं हेच यांचं ध्येय. त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या सौदेबाजीला हे तयार असतात. या नेत्यांनी निवडणुका म्हणजे पैशाचा खेळ बनवलाय. सामान्य मतदारही आपलं मत हजार-दोन हजार रुपयांसाठी विकण्याइतका निर्ढावलाय. ही खरं म्हणजे आमच्या लोकशाहीची शोकांतिकाच म्हणावी लागेल.

कला विकलेला महाराष्ट्र

कला, साहित्याच्या क्षेत्रातले लोक जरा विचारी, शहाणे म्हणून त्यांच्याकडं अपेक्षेनं पाहावं अशीही परिस्थिती राहिलेली नाही. राजकारण्यांसारखीच सत्तास्पर्धा, गटबाजी या साहित्यिक, कलावंतांमधे दिसते. ‘लेखण्या मोडून बंदुका करा’ असं स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले होते. बंदुका करायचं राहूद्या, यांनी आपल्या लेखण्याच राजकारण्यांच्या चरणी वाहून टाकल्यात.

साहित्य मंडळातलं एखादं पद, पुरस्कार मिळाले की हे लेखक, कलावंत खूश. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर लेखकांपेक्षा राजकारण्यांची गर्दी पाहिली की, आणीबाणीतल्या दुर्गा भागवत आठवतात. कराडच्या साहित्य संमेलनात सरकारला ठणकावून सांगण्याचं धाडस त्यांनी केलं होतं. 

आताचे राजकीय नेत्यांपुढे शेपूट हलवणारे साहित्यिक पाहिले की, ‘हेच फळ काय मम तपाला’ असं म्हणावं लागतं. सिनेमे आम्हीसुद्धा काढले. साने गुरुजींच्या ‘श्यामच्या आई’वर निर्माण केलेल्या आमच्या सिनेमाला ‘राष्ट्रपती पदक’ मिळालं. आजचे अनेक सिनेमे समाजात दुही, भेदभाव निर्माण करू लागतात, तेव्हा चिंता वाटते.

हेही वाचा: बशीर मोमीन – कवठेकरः कोंबड्या विकण्यापासून जीवनगौरव पुरस्कारापर्यंत 

सुखासीन कार्यकर्त्यांचा महाराष्ट्र

कलेतली कला संपून कारागिरीच उरलीय, असं म्हणावं तर कारागिरीचं कामही नीट केलं जात नाही, असं दिसतं. स्वतंत्र महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आम्ही मोठं आंदोलन केलं. महाराष्ट्र आडवा-उभा पेटून निघाला. आज आंदोलनं आणि चळवळी थंडावल्यात. स्वामी रामदास यांनी ‘सामर्थ्य आहे चळवळीचे’ म्हटलं होतं. आता बघेल तिकडं वळवळच उरल्याचं दिसतं!

महात्मा गांधींनी ‘महाराष्ट्र हा कार्यकर्त्यांचा मोहळ आहे,’ असं म्हटलं होतं. आताचे बहुतेक कार्यकर्ते निवडणुकीपुरतेच उरल्यासारखे वाटतात. पैसे देईल त्याच्याशी यांची बांधिलकी. काही कार्यकर्त्यांनी एनजीओच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय निधी जमवून समाजकार्याला वाहून घेतलंय. तळपायाला भिंगरी बांधून खेडोपाडी कार्य करणारे ते कार्यकर्ते कुठं आणि हे एसीतले सुखासीन कार्यकर्ते कुठं?

कुठंय माझा स्वाभिमानी महाराष्ट्र

आज आपल्या महाराष्ट्रापुढं शेकडो गंभीर प्रश्न आहेत. उन्हाच्या काहिलीनं महाराष्ट्र तापतोय. अवकाळी, दुष्काळी परिस्थितीनं शेतकर्‍याचं कंबरडं मोडलंय. उद्योगाचा विकास खुंटलाय. सहकार डबघाईला आलाय. अनेक क्षेत्रांतली महाराष्ट्राची पिछेहाट कोण थांबवणार?

आमचा सीमाबांधव महाराष्ट्रात येण्यासाठी तळमळतोय. का सुटत नाही सीमाप्रश्न? महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी चिंतामणराव देशमुखांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. आज एकतरी नेता तशी हिंमत दाखवू शकतो का? राज्याचा प्रश्न आला की, इतर राज्यांतले नेते पक्षभेद विसरून एक होतात. दिल्लीत महाराष्ट्राच्या नेत्यांनी असं केल्याचं एकतरी उदाहरण सांगता येईल का?

महाराष्ट्रावर केंद्रानं नेहमीच अन्याय केलाय. दिल्लीतल्या दरबारी नेतृत्वानं महाराष्ट्राच्या स्वतंत्रवृत्तीच्या नेत्यांचं खच्चीकरण केलंय, हा इतिहास आहे. म्हणूनच महाराष्ट्राचा स्वाभिमान जागृत करण्याची पुन्हा एकदा गरज आहे. तो दिवस लवकरच येवो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना!

जय हिंद! जय महाराष्ट्र!

(टाळ्यांचा कडकडाट)

हेही वाचा:

शंकर भाऊ साठे : १६ पुस्तकं लिहणारे अण्णाभाऊंचे भाऊ

खरंच, बाबासाहेबांना महाड सत्याग्रहापर्यंत फुले परिचित नव्हते?

नाना शंकरशेठ होते म्हणून मुंबई आंतरराष्ट्रीय ख्यातीचं शहर बनलं

शाहिरांनी महाराष्ट्राचा इतिहास फक्त गायला नाही तर घडवलायही

(दैनिक पुढारीच्या बहार पुरवणीतून साभार)