पुरामुळे वाहन खराब झाल्यास बेसिक विमा काही कामाचा नाही

१२ ऑगस्ट २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


सध्या महाराष्ट्रातले काही जिल्हे महापुराचा सामना करताहेत. यात जीवतहानी, मालमत्तेची हानी होतेय. मोठ्या कष्टाने घेतलेल्या गाड्यांचंही मोठं नुकसान होतंय. पण बेसिक विम्यात या नुकसानीची भरपाई मिळत नाही. त्यासाठी कॉम्प्रिहेन्सिव विमा उतरवावा लागतो.

महाराष्ट्राच्या काही भागात अतिवृष्टीने थैमान घातलंय. पाऊस पडला की भरपूर पडतो नाहीतर पडतच नाही. त्यात शहरांमधे शहरीकरणाचे दुष्परीणाम म्हणजे थोडासा पाऊस पडला तरी सहज एक फूट पाणी भरतं. यामुळे आपल्या रोजच्या कामांमधे अडथळे येतात. आपल्या वाहनांचंही नुकसान होतं.

भर पावसात गाड्यांचं नुकसान

जोरदार पाऊस पडला. सगळे रस्ते पाण्याने ब्लॉक झाले की, आपल्या गाड्यासुद्धा हमखास पाण्यात अडकतात. यंदाच्या पावसाने सगळीकडे पूरस्थिती निर्माण झालीय. या पुरात अडकलेल्या कितीतरी कार, बाईकचे फोटो, वीडियो सोशल मीडियावर वायरल झालेत. गाडी पाण्यात अडकली की तिचं नुकसान व्हायला सुरवात होते.

पावसाळ्यात झाड पडणं, दरड कोसळणं, पाण्यात अडकणं इत्यादी घटनांची शक्यता जास्त असते. अशावेळी आपल्या गाडीचं काही खरं नसतं. अगदी इंजिन आणि इंजिनाचे भाग खराब होण्यापासून गाडीतलं फ्युएल लिकेज होईपर्यंत बरंच नुकसान होऊ शकतं. अगदी गाडीच्या इंटेरिअरचाही चुरा होऊ शकतो.

पावसाने झालेलं नुकसान विमा देत नाही

वेगवेगळ्या कारणांमुळे वाहनांचं नुकसान होऊ शकतं, हे ध्यानात घेऊन आपण गाडी घेतानाच विमा उतरवतो. सहसा आपण आग, चोरी, स्फोट, दरोडा, दंगल, आंदोलन, भूकंप, पूर, वादळ, अपघात, दहशतवादी हल्ला आदी घटनांचा विचार करून गाडीच्या नुकसानभरपाईसाठी कोणता विमा घ्यायचा ते ठरवतो. विम्यामुळे गाडीला आर्थिक संरक्षण मिळतं. विमा हे एका अर्थाने आपल्या गाडीसाठी आर्थिक कवच आहे.

विम्यामधे आपल्याला झटका देणारी एक तांत्रिक गोष्ट आहे. पावसाळ्यात विशेषत: पाणी भरल्यामुळे झालेलं गाडीचं नुकसान कोणताच बेसिक विमा भरून देत नाही. कारण आपण विमा खबरदारी म्हणून आणि अपघातासाठी काढतो. पण त्यात सगळ्या गोष्टी कवर होत नाहीत. आणि कधी जोरदार पाऊस पडला. गाडी पाण्यात अडकली तर सगळं आर्थिक नुकसान आपल्यालाच सहन करावं लागतं.

कॉम्प्रिहेन्सिव विम्यातल्या बेसिक गोष्टी

आपण सगळ्या गोष्टींची खबरदारी म्हणून कॉम्प्रोहेन्सिव विमा काढायला हवा. आपल्याला पावसाळ्यात होणाऱ्या नुकसानीची भरपाई हा विमा देऊ शकतो. या विम्यामधे कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे गाडीचं नुकसान झाल्यास ते भरून निघतं. तसंच चोरी, दंगल, तोडफोड, आग आणि प्राण्याकडून गाडीला किंवा गाडीमुळे प्राण्याला इजा झाल्यासही पूर्णपणे भरपाई मिळते.

यात गाड्यांची टक्कर झाल्यास, आपल्या चुकीमुळे समोरच्या गाडीचं नुकसान झाल्यावर भरपाई मिळत नाही. आणि मुख्य म्हणजे अपघातात गाडीतल्या प्रवाशाला लागल्यासदेखील कोणतीच भरपाई मिळत नाही. कॉम्प्रिहेन्सिव विम्यातल्या या बेसिक गोष्टी आहेत. पॉलिसी बझारच्या वेबसाईटवर ही माहिती देण्यात आलीय.

हेही वाचाः आता पूर ओसरतोय, आपण मदत कशी करू शकतो?

तर नुकसान भरपाई मिळणार नाही

आता हा कॉम्प्रिहेन्सिव विमा आपल्याला पावसाळ्यात पाणी भरल्यामुळे होणारं नुकसान कशाप्रकारे भरून देतो हे समजून घेतलं पाहिजे. आपल्या कारमधले काही भाग हे फिक्स असतात. मूळ इंटेरिअर, इंजिन आणि इंजिनाचे भाग. पण गाडीतली साऊंड सिस्टीम, एसी, सिट इत्यादी गोष्टी या काढता येतात आणि नवीन बसवता येतात. त्यामुळे फिक्स गोष्टींव्यतिरिक्त इतर कोणत्याच भागांची नुकसान भरपाई मिळत नाही.

त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्या गाडीची व्यवस्थित देखभाल केली नसेल, तिची वेगळच्या वेळी सर्विसिंग केली नसेल. त्यामुळे पुरात किंवा कमी पावसातही गाडी खराब झाली. आणि या गोष्टी विमा कंपनीला सर्वेत म्हणजे तपासणीत आढळल्या तर आपल्याला नुकसान भरपाई मिळणार नाही. रिलायन्स इन्शुरन्सचे व्यवस्थापक राजीव सिंह यांनी द हिंदू पेपरशी बोलताना ही माहिती.

झिरो डेप्रिसिएशन फक्त ५ वर्षांसाठी

नुकसान झालेल्या गाडीची दुरुस्ती करताना बदलले जाणारे सुटे भाग यावर आकारला जाणारा डेप्रिसिएशन ग्राहकाकडून कापला जातो. आपल्या गाडीला किती वर्षं झाली त्यानुसार घसारा म्हणजे डेप्रिसिएशन कापूनच भरपाई दिली जाते. ही गोष्ट कॉमन आहे. आणि बेसिक विम्यामधे असते. हे कॉम्प्रिहेन्सिव विम्यातही असतं.

नवीन सुविधांनुसार झिरो डेप्रिसिएशन पॉलिसी मिळते. पण ही पॉलिसी आपल्याला कार घेतल्यावर फक्त पहिल्या पाच वर्षांसाठीच मिळते. त्यानंतर आपण ठरवलेली विमा पॉलिसी लागू होते.

कॉम्प्रिहेन्सिव विम्यात कॅशलेस दावा करण्याची सोय नसते. आपल्याला आधी स्वत:च्याच खिशातून पैसे भरावे लागतात. आणि नंतर दावा करून मग भरपाई मिळवता येते. पण आता काही कंपन्यांनी ही सुविधा सुरू केलीय.

आपण काय काळजी घेतली पाहिजे?

आपल्या कारचा विमा मान्यताप्राप्त विमा कंपनीकडून उतरवून घेतला पाहिजे. जेणेकरून कुठेच फसवणूक होणार नाही. विम्याच्या पॉलिसीचं नूतनीकरण झालंय, की नाही हे आपण वेळोवेळी तपासलं पाहिजे.

आपण गाडी घेऊन घरातून बाहेर पडतो तेव्हा काही गोष्टी सोबत घेणं गरजेचं आहे. गाडीच्या मालकीचे कागद, विम्याचे कागद जवळ ठेवले पाहिजेत. तसंच गाडीत विमा कंपनीचे टोल फ्री नंबर लिहून ठेवले पाहिजेत. म्हणजे काही घडल्यास पटकन कंपनीला संपर्क साधता येईल. आणि आपल्या प्रश्नांची उत्तरंही मिळतील.

पाण्यात गाडी अडकल्यावर ती चालू होत नसेल. तर चालू करण्याचा खूप प्रयत्न करू नका. कारण त्यामुळे गाडीत आणखी समस्या निर्माण होतात. अशावेळी आपण विमा कंपनीच्या एजंटला कॉल करायला पाहिजे. अशाप्रकारे आपण पावसाळ्यातही गाडीचं नुकसान भरून काढू शकतो.

हेही वाचाः 

गेल्या दहा दिवसात पुराने कोल्हापूरला कसं वेढलं?

नोबेल विजेती मलाला यूसुफजई काश्मीरवर काय म्हणाली?

तणसः विस्कटणारी गावं आणि एकाकी तरुणाईचा विलक्षण कोलाज

नरेंद्र मोदींच्या मॅन वर्सेस वाईल्डच्या ट्रेलरपेक्षा मिम्स जास्त इंटरेस्टिंग