कोरोना फक्त फुफ्फुसच नाही, तर आपल्या या अवयवांनाही करतोय टार्गेट

०८ मे २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


अन्न आणि आपल्यासारखा दुसरा जीव निर्माण करणं हेच पृथ्वीवरच्या जवळपास सगळ्या जिवांचं उद्दिष्ट असतं. कोरोना वायरसही त्याचसाठी आपल्या शरीरात येतो. आपल्या शरीरातल्या काही पेशींच्या माध्यमातून त्याला आपल्यासारखा दुसरा जीव निर्माण करायचा असतो. पण त्याच्या या प्रामाणिक प्रयत्नांत माणसाचे एक एक अवयव निकामी होत जातात.

‘एका दिवशी या २० खाटांच्या आयसीयू रूममधल्या दोन पेशंटला नेहमीपेक्षा खूप जास्त कफ झाला. तसं निदानही मी केलं. अनेकांची श्वसनसंस्था निकामी झाली होती. तर काहींच्या किडन्या कोणत्याही क्षणाला काम करणं थांबवतील अशा अवस्थेत होत्या. दोनच दिवसांपूर्वी एका तरूण मुलीचं हृदय बंद पडल्यावर तिला वाचवण्याचे अथक प्रयत्न माझ्या टीमने केले होते.’ न्यू ओरलियन्स या अमेरिकी शहरातल्या तुलेन युनिवर्सिटी स्कूल ऑफ मेडिसीन मधले डॉक्टर जोशुआ डेन्सन यांनी सायन्स मॅगझिन या ऑनलाईन वेबपोर्टलवर एक लेख लिहिलाय. त्यात ते पुढे लिहितात, ‘या सगळ्या पेशंटमधे एकच गोष्ट सारखी होती आणि ती म्हणजे त्या सगळ्यांना कोरोना वायरसची लागण झाली होती.’

या कोरोना वायरसला दयामाया नावाचा प्रकारच माहीत नसावा. आपल्या शरीरातला एकही महत्त्वाचा अवयव तो सोडत नाही. आपण श्वास घेतो त्या नळीतून हा वायरस आत जातो आणि पहिल्यांदा श्वसनसंस्थेतल्या अवयवांवर हल्ला करतो. हळूहळू हृदय, रक्तवाहिन्या, किडन्या, आतडी किंवा पचनसंस्थेतले अवयव आणि मेंदूलाही हा वायरस धोका पोचवतो.

हेही वाचा : कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

कोरोना पेशीवर का हल्ला करतो?

पृथ्वीवरच्या प्रत्येक जीवजंतूची जगण्यासाठी धडपड सुरू असते. खाणं पिणं आणि स्वतःची वंशावळ चालू ठेवण्यासाठी प्रजनन करणं एवढी दोनच कामं अनेक जीव करताना दिसतात. शरीरातल्या किंवा प्राण्यातल्या पेशींच्या जगण्याचं प्रयोजनच प्रजनन करणं म्हणजे आपल्यासारखा दुसरा जीव निर्माण करणं हे असतं. कोरोना वायरसही हाच निसर्ग नियम फॉलो करतोय. आपल्यासारखा दुसरा जीव निर्माण करणं एवढं एकच त्याच्या आयुष्याचं उद्दीष्ट आहे.

पण ब्लुमबर्ग न्यूज एजन्सीच्या एका स्टोरीनुसार, 'युनिवर्सिटी ऑफ हाँगकाँगमधल्या क्लिनिकल पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर जॉन निकोलस यांनी सांगितल्याप्रमाणे या वायरसला स्वतःहून दुसरा जीव निर्माण करता येत नाही. त्यासाठी त्याला प्राण्यांच्या किंवा माणसांच्या शरीरातल्या पेशी लागतात. पेशीच्या आत हा वायरस घुसतो आणि पेशीच्या भिंतीला चिकटून बसतो. तिथून पेशीच्या भिंतीत आपला आरएनए सोडतो. आरएनए म्हणजे या वायरसची ओळख असते. असा आरएनए पेशीत सोडला की पेशी त्या आरएनए असणारे जीव म्हणजेच दुसरे वायरस निर्माण करते.'

पेशीत शिरण्यासाठी या कोरोना वायरसला एका रिसेप्टरची म्हणजेच चेतातंतूची गरज असते. कोरोना वायरसला एसीई२ नावाचा रिसेप्टर लागतो. हा रिसेप्टर शक्यतो श्वसनसंस्थेत आणि जठर आतड्यात असणाऱ्या पेशींवरच उपलब्ध असतो, असं डॉक्टर निकोलस यांनी सांगितलं. म्हणूनच कोरोना वायरस या पेशींकडे आकर्षित होतो.

५ दिवसांनी घर बदलायचं

शरीरात वायरस गेला की तो त्या सेलला हायजॅक करून आपल्यासारखे दुसरे वायरस निर्माण करतो. डॉक्टर निकोलस म्हणतात, एक पेशी जवळपास ६ लाख नवे वायरस तयार करू शकते. आपल्या शरीरातल्या पेशीमधे अशी वायरसची गर्दी झाली की त्यांना बाहेर पडण्यासाठी जागा उरत नाही. तेव्हा हे वायरस पेशी फोडून बाहेर येतात. आणि पुन्हा प्रजनन करण्यासाठी नव्या पेशीवर हल्ला करतात.

इन्फ्लुएन्झा या आजाराचा वायरस एकाच दिवसात आपल्या शरीरातली पेशी फोडायला चालू करायचा. पण हा नवा कोरोना वायरस एका पेशीवर ५ ते ६ दिवस घालवतो. त्यामुळेच कोरोना वायरसची लक्षणं दिसायला खूप वेळ लागतो. त्यानंतर तो आपलं घर बदलतो.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?

साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

कोरोनाची शिकार कशी करायची हे वायरस हंटरकडून शिकायला हवं!

ऑक्सिजन पोचत नाही

कोरोना वायरसनं आपल्या सगळ्या पेशी फोडू नयेत म्हणून शरीर या पेशींना मारण्यासाठी दुसऱ्या पेशी म्हणजेच आपली रोगप्रतिकारक शक्ती वापरतं. या रोगप्रतिकारक शक्तीच्या पेशींना इन्फेक्शन झालेल्या ठिकाणी म्हणजे वायरस असलेल्या ठिकाणी आणण्यासाठी म्युकस म्हणजेच शेंबडाचा वापर होतो. शेंबुड किंवा कफमधे वायरसला मारण्यासाठी तयार केल्या गेलेल्या अँटीबॉडी आणि एन्झाईम्स असतात.

‘द न्यूयॉर्क टाइम’च्या एका बातमीनुसार, 'अशा प्रकारचा कफ आपल्या शरीरात नेहमीच तयार होत असतो. आपण आजारी नसतो, आपल्याला सर्दी झालेली नसते तेव्हाही हा कफ शरीरात असतोच. फक्त त्याचं प्रमाण कमी असतं. कुठलाही वायरस आत आला की हा कफ खूप जास्त प्रमाणात तयार होतो आणि आपल्याला सर्दी झाली असं आपण म्हणतो. वायरसला नष्ट करण्यासाठी आणलेल्या कफचं प्रमाण अति झालं की आपली फुफ्फुसं त्यानेच भरून जातात आणि श्वासातून आलेली हवा साठवायला जागा उरत नाही. साहजिकच, त्यामुळे शरीराला ऑक्सिजनही पोचत नाही. या स्थितीला एआरडीएस असं म्हणतात.'

एआरडीएस म्हणजे एक्युट रेस्पिरेटोरी डिस्ट्रेस सिन्ड्रोम. हा एआरडीएस फक्त वायरस आल्यामुळेच तयार होतो असं काही नाही. तर खूप सिगरेट फुकल्याने किंवा सतत रासायनिक गॅसच्या संपर्कात असल्यानंही हा आजार होऊ शकतो. अगोदरपासूनच एचआयवीचा वायरस शरीरात असणाऱ्यांना या आजाराचा मोठा धोका असतो. किंवा अगदी एखाद्या मोठ्या अपघातात आपल्या शरीराला बेदम मार लागला असेल तरीही हा आजार होऊ शकतो.

आता डायलिसिसचीही गरज

एआरडीएसमुळे रक्तवाहिन्यांना ऑक्सिजन पुरवणाऱ्या फुफुसातल्या नळ्यांभोवती कफ साचतो. त्यामुळे आपल्या रक्तामधे ऑक्सिजन मिसळण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. तसंच ऑक्सिजन नसलेलं किंवा कमी ऑक्सिजन असलेलं रक्त पुढे अवयवांकडे जातं. याचा पहिला परिणाम हृदयावर होतो. ऑक्सिजनची कमतरता असल्यानं रक्त वाहिन्या आकुंचन पावतात आणि रक्ताच्या गाठी तयार होण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. म्हणूनच हाय किंवा लो ब्लड प्रेशर असणाऱ्या व्यक्तींना कोरोना वायरसचा धोका जास्त असतो.

अमेरिकेतल्या येल युनिवर्सिटीतल्या किडनीतज्ञ अॅलन क्लिगर यांनी ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ला दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या हॉस्पिटलमधल्या कोरोना वायरसची लागण झालेल्या अर्ध्याहून जास्त पेशंटच्या लघवीमधे रक्ताचे किंवा प्रोटीनचे अंश सापडलेत. लघवीत प्रोटीन सापडणं हे किडन्या नीट काम करत नसल्याचं लक्षण आहे. न्यूयॉर्क आणि वुहान शहारातल्या हॉस्पिटल्समधे तर आयसीयूतल्या काही कोरोना पेशंटना दोन तीन दिवसांनी डायलेसिस करावं लागत होतं.

न्यूयॉर्कमधल्या एका हॉस्पिटलमधे आयसीयूत एडमिट ५१ पेशंटना २४ तास किडनी ट्रिटमेंटची गरज पडते. पण त्यांच्याकडे ३९ मशीन उपलब्ध आहेत. सध्या तरी आलटून पालटून या मशीनचा वापर केला जातोय. पण लवकरच वेंटिलेटरप्रमाणे डायलेसिस मशीनचीही कमतरता भासण्याची शक्यता 'द वॉशिंग्टन पोस्ट'च्या बातमीत व्यक्त करण्यात आलीय.

हेही वाचा : डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

लकवा मारण्याचाही धोका

मुळात आपल्या रक्तातच ऑक्सिजन कमी असल्यानं मेंदू आणि शरीरातल्या इतर अवयवांनाही ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडू लागतो. त्यामुळे कोरोना वायरसची लागण झालेल्या काही पेशंटना स्ट्रोक म्हणजे लकवा मारणं यासारख्या आजारांचाही सामना करावा लागू शकतो. शिवाय, फुफुसाप्रमाणे आतड्यात आणि मेंदूच्या काही भागातही एसीई२ रिसेप्टर्स उपलब्ध असतात, अशी माहिती सायन्समॅग या वेबसाईटवरच्या एका लेखात देण्यात आलीय. त्यामुळे आतड्यांमधे बिघाड होऊन उलटी, जुलाब अशा आजारांनीही माणसाचा जीव जाऊ शकतो.

मेंदूत किंवा आतड्यातल्या एसीई २ रिसेप्टर्सपर्यंत कोरोनाचे वायरस पोचतात की नाही, पोचले तर ते कसं पोचतात याविषयी अजून काही संशोधन उपलब्ध झालेलं नाही. कोरोना वायरस फुफ्फूसांसोबतच इतर अवयवांनाही इजा करतोय. त्यामुळे जगभरात कोविड १९ चे पेशंट फुफ्फुसं निकामी झाल्यामुळे नाही तर दोन्ही किडन्या निकामी झाल्यामुळे किंवा मेंदूत मोठा बिघाड झाल्याने जास्त मृत्यूमुखी पडताहेत, असं आतापर्यंत उपलब्ध झालेली आकडेवारी सांगते.

हेही वाचा : 

‘आयडिया ऑफ इंडिया’ महाराष्ट्रामुळंच

अत्त दीप भव हा तर बुद्ध होण्याचा पासवर्ड!

कोरोनाचे पेशंट या देशांत सापडले नाहीत की काही झोल आहे?

कोरोनानंतर दोन मोठी संकटं आपली वाट पाहतायत: नॉम चॉम्स्की

कोरोनावरचा उपाय म्हणून वायरल होणाऱ्या ५ गोष्टींमागचं अर्धसत्य

यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप असा बनवला होता

सदानंद मोरे सांगतायत ‘हे विश्वची माझे घर’ हीच आयडिया ऑफ महाराष्ट्र

अमेरिकेला कोरोनानं ताब्यात घेतलं, सेंट लुईस शहर वेगळं राहिलं, कारण

भाव पडल्यावर लगेच दूध सांडून देणारे शेतकरी आता लॉकडाऊनमधे दूध का सांडत नाहीत?