तुमचा फेसमास्क WHO नं सांगितल्यासारखा आहे का?

२९ जून २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


कोरोनापासून वाचायचं तर मास्क लावणं महत्त्वाचं आहेच. पण तो योग्य प्रकारे वापरला नाही तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. उलट स्वतःची फसवणूकच होते. म्हणूनच आता घराबाहेर पडल्यावर नेमका कुठल्या प्रकारचा, कुठल्या मटेरिअलचा, कुठल्या आकाराचा मास्क वापरायचाय आणि वापरून झाल्यावर त्याचं काय करायचं अशा सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला डब्लूएचओनं जारी केलेली गाईडलाईन्स देते.

भारतात अनलॉक ०.१ची प्रक्रिया चालू झालीय. येत्या महिनाभरात भारतातले आणखी काही दैनंदिन व्यवहार पूर्ववत होतील. दुकानं चालू होतील, मॉल, थेटर उघडतील, काही दिवसांत शाळाही चालू होतील. हळूहळू खासगी ऑफिसही चालू झालेत.

आपण लॉकडाऊन संपवायला सुरवात केली असली तरी कोरोना वायरसची लागण होण्याची भीती संपलेली नाही, हे आपण लक्षात ठेवायला हवं. शाळा, ऑफिस किंवा कामाच्या ठिकाणी जाताना आपल्याला गर्दीतूनच जावं लागणार आहे. त्यामुळे बाकी काही नसलं तरी एक गोष्ट आपल्याला कटाक्षाने पाळायचीय आणि ती म्हणजे सार्वजनिक ठिकाणी फेसमास्क घालणं.

हेही वाचा : डब्ल्यूएचओनं आधीचं कोरोनाचा इशारा दिला, तरीही ब्लेमगेम का सुरूय?

कोरोना वायरसची लागण झालेल्या माणसाच्या संपर्कात आल्याने आपल्यालाही त्या वायरसची लागण होऊ शकते, हे तर आता सगळ्यांनाच माहितीय. माणसाच्या श्वसन संस्थेमार्फत हे वायरस पसरतात. त्यामुळेच आपल्याला दुसऱ्यांकडून वायरसची लागण होऊ नये म्हणून मास्क घालणं गरजेचं आहेच. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे, नकळतपणे आपल्याला संसर्ग झाला असला तर आपल्यामुळे दुसऱ्यांना त्याची लागण होऊ नये म्हणूनही आपण सतत मास्क घालायला हवा.

पण चुकीच्या पद्धतीने मास्क घातला किंवा चुकीचा मास्क घातला तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही, असं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अर्थात डब्लूएचओनं स्पष्ट केलंय. मग योग्य मास्क कोणता आणि तो वापरण्याची योग्य पद्धत कोणती हे आपल्याला शिकून घ्यावं लागेल. त्यासाठीच डब्लूएचओनं जारी केलेली ही नवी मार्गदर्शक तत्त्वं वाचावीच लागतील.

१. कुठला मास्क घालावा?

बाजारात अनेक प्रकारचे मास्क उपलब्ध आहेत. त्यांची विभागणी मेडिकल आणि नॉन मेडिकल मास्क अशा दोन गटात होऊ शकते. सर्जरी किंवा एन९५ असे मेडिकल मास्क फक्त डॉक्टर, नर्सेस आणि हॉस्पिटलमधे काम करणारे सफाई कर्मचारी यांनी वापरावेत. श्वासाचा त्रास होत असणाऱ्या व्यक्तीने एन९५ हा मास्क वापरू नये.

सामान्य माणसांनी हे मास्क वापरण्याऐवजी साधे म्हणजेच नॉन मेडिकल मास्क वापरले तरी चालतील. फक्त, सार्वजनिक ठिकाणी गेल्यावर शारीरिक अंतर ठेवणं शक्य नसेल आणि संसर्गाचा खूप धोका असेल तर मात्र सामान्य माणसांनीही मेडिकल मास्क वापरणं गरजेचं आहे. तसंच, एखाद्याला कोरोना वायरसची लक्षणं दिसू लागली तर त्यानेही साधा मास्क सोडून मेडिकल मास्क वापरावा.

२. मेडिकल मास्क कसा वापरावा?

मेडिकल मास्क ओला, मळलेला किंवा खराब झालेला नसावा. काम करताना मधेच मास्क नीट बसवण्यासाठी त्याला हात लावू नये. असं चुकून झालं तर हात धुवून  मास्क काढून टाकावा आणि दुसरा मास्क घालावा.

मास्क एकदा वापरून झाला की तो परत वापरू नये. तसंच, दोन माणसांत एकच मास्क वापरणंही योग्य नाही. हे मास्क फेकून द्यायचीही एक पद्धत असते ती तंतोतंत पाळावी. प्रत्यक्ष रूग्णांच्या संपर्कात न येणाऱ्या हॉस्पिटल प्रशासनातल्या कर्मचाऱ्यांना हे मास्क वापरण्याची गरज नाही.

३. नॉन मेडिकल मास्क कसा वापरावा?

मेडिकल मास्क असो वा नॉन मेडिकल, एकानं वापरलेला मास्क दुसऱ्यांनी वापरू नये. ओला, मळकट आणि फाटका नॉन मेडिकल मास्क वापरू नये. वापरून वापरून मास्क जीर्ण झाला किंवा फाटला तर लगेचच फेकून द्यावा.

हे कोरोना स्पेशलही वाचा :

लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोरोनाचे पेशंट या देशांत सापडले नाहीत की काही झोल आहे?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

अमेरिकेला कोरोनानं ताब्यात घेतलं, सेंट लुईस शहर वेगळं राहिलं, कारण

कोरोना फक्त फुफ्फुसच नाही, तर आपल्या या अवयवांनाही करतोय टार्गेट

कोरोनापेक्षा खरा धोका आहे तो आपल्या आतल्या वायरसचाः युवाल नोवा हरारी

कोरोनाः बिल गेट्सनी २०१५ मधेच दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष आपल्याला भोवतंय

४. मास्क घालताना घ्यायची काळजी

- स्वच्छ नवा मास्कच वापरावा. एकदा वापरलेला मेडिकल मास्क परत वापरू नये. कापडी मास्क असेल तर तो स्वच्छ धुवून कडक उन्हात वाळवलेला हवा.

- मास्क घालण्यापूर्वी हात स्वच्छ धुवून घ्यावेत.

- मास्कच्या आतल्या भागाला हात लागणार नाही याची काळजी घेत त्याच्या दोरीला धरावं. आतली बाजू नाकावर ठेऊन त्याच्या दोऱ्या कानामागे टाकाव्यात किंवा गाठ मारावी.

- मास्कने तोंड आणि नाक पूर्णपणे झाकलं जाईल याची काळजी घ्यावी.

५. मास्क काढताना घ्यायची काळजी

- पहिले हात साबणाने धुवावेत.

- मास्कच्या दोरीला हात लावून त्याच्या नाकावर असलेल्या भागाला हात न लावता मास्क काढावा.

- मास्क काढताना डोळ्याला आणि नाकाला हात लागणार नाही याची काळजी घ्यावी. काढल्यावर लगेचच चेहऱ्यावरून हात फिरवू नये.

- मेडिकल मास्क असेल तर लगेचच कचरा कुंडीत फेकून द्यावा. कापडी मास्क असेल तर स्वच्छ धुवून टाकावा. लगेच धुणं शक्य नसेल तर एखाद्या पिशवीत ठेऊन द्यावा.

६. कोणत्या कापडाचा मास्क चांगला? 

मास्क विकत घेताना शक्यतो धुता येईल अशा कॉटन मटेरिअलचाच घ्यावा. त्याचबरोबर इलॅस्टिक मटेरिअलचा मास्क कधीही वापरू नये. इलॅक्टिक असलेल्या मास्कमुळे नाकाच्या आणि तोंडांच्या समोरचा भाग ताणला जातो आणि मास्कमधली सुक्ष्म भोकं मोठी होतात. त्यातून जंतू आत जाण्याचा धोका वाढतो.

७. कापडी मास्क कसा धुवावा?

कापडी मास्क सतत धुवत राहिलं पाहिजे. मास्क बनवण्यासाठी कोणत्या प्रकारचं कापड वापरलं गेलंय ते तपासून मग तो कसा धुवायचा हे ठरवता येईल. अनेकदा मास्कला चिकटवलेल्या टॅगवर धुण्याबाबतीत काही सूचना दिलेल्या असतात. मास्क शक्यतो हळूवारपणे धुतला पाहिजे. घसघस घासला, खूप ताणला किंवा ब्रशचे खूप फटकारे मारले तर मास्क फाटण्याची शक्यता असते. 

शक्यतो मास्क गरम पाण्यात साबण किंवा वॉशिंग पावडर लावून धुवावा. अगदी गरमागरम पाण्यात मास्क खराब होण्याची शक्यता असते. गरम पाणी नसेल तर गार पाण्यात मास्क धुवावा. मात्र, मास्कचं कापड गरम पाण्यात धुतलं तर चालतं की नाही हेही तपासून घ्यावं.

हेही वाचा : WHOनं सांगितलेल्या खाण्यापिण्याबद्दलच्या पाच टिप्स भिंतीवर चिकटवा

८. मास्कला किती पदर असावेत?

कमीत कमी तीन पदर किंवा लेअर मास्कला असायला हवेत. सगळ्यात आतला पदराचा माणसाच्या शरीराशी प्रत्यक्ष संबंध येत असतो तर सगळ्यात बाहेरच्या पदराचा बाहेरच्या वातावरणाशी संबंध येतो. त्यामुळे त्या दोघांमधे आणखी एक पदर असणं गरजेचं आहे.

तीन पदरांपैकी सगळ्यात आतला पदर हा कॉटनच्या कापडाचा असायला हवा. सगळ्यात बाहेरचा पदर पॉलिस्टर सारख्या कापडाचा तर मधला पदर सिन्थेटीक कापडाचा असणं योग्य असतं.  कापडाचा एक तुकडा एकटा वापरण्याऐवजी असे तीन पदर करून वापरला तर ५ पटीने जास्त संरक्षण होतं. तर ४ पदर केले तर 7 पट जास्त संरक्षण होतं.

पण खूप पदर असेलला घट्ट मास्क लावलातर आपल्याला श्वास घेणं अवघड जाईल हेही लक्षात ठेवायला हवं.

९. मास्कचा आकार कोणता असावा? 

मास्कचा आकार सपाट, सरळ असावा. असा सरळ किंवा डकबिल म्हणजे बदकाच्या चोचीसारखा मास्क आपल्या नाकावर, गालावर आणि हनुवटीवर व्यवस्थित बसतो. नाकावर आणि हनुवटीच्या इथे मास्कचं तोंड व्यवस्थित बंद होत नसेल तर आपण बोलत असू तेव्हा आपल्या तोंडातली हवा मास्कमधून गाळून बाहेर जाण्याऐवजी किंवा आत येण्याऐवजी खालून आतबाहेर करेल.

आता लॉकडाऊन संपल्यावर घराबाहेर पडताना पाण्याची बाटली, डब्बा याप्रमाणेच मास्कही आपण घेऊ. पण या मास्कसोबत बाहेर पडल्यावर शारीरिक अंतर पाळायचे नियम आणि हात धुण्याची सवय जोपासायलाही आपल्याला विसरायचं नाहीय.

हेही वाचा : 

कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?

जीवघेणा लॉकडाऊन संपवण्याचे चार साधेसरळ मार्ग

खरंच, भारतात कोरोनाची दुसरी लाट जूनमधे येणार आहे?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

माझा कोरोना पॉझिटिव काळातला अनुभव सांगतो, घाबरायचं काम नाही

कोरोनाची जुनी-नवी लक्षणं कोणती? त्यांच्यापासून संरक्षण कसं करायचं?

कोरोना काळात आपल्याला पेशंटचे १७ अधिकार माहीत असायला हवेत!