महानुभाव-वारकऱ्यांमधली दरी मिटवणारे बाभुळगांवकर शास्त्री

१७ मे २०२३

वाचन वेळ : १५ मिनिटं


महानुभाव आणि वारकरी या दोन पंथांनी महाराष्ट्र घडवलाय. पण पुढे या दोन सांप्रदायात एवढं वैर निर्माण झालं की दोघे एकमेकांची तोंड बघेनात. अशा परिस्थितीत या दोन सांप्रदायाचा अभ्यास करून, समन्वयाची मांडणी करणाऱ्या महंत बाभुळगांवकर भोजराज शास्त्री यांना यंदाचा 'ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार' मिळालाय. त्यानिमित्त 'वारकरी दर्पण'साठी ज्ञानेश्वर बंडगर यांनी घेतलेली त्यांची मुलाखत इथं देत आहोत.

महानुभावांनी मराठीला साडेसहा हजारांहून अधिक ग्रंथ दिले. मराठीला व्याकरण दिलं. तत्त्वज्ञान दिलं. पण याच महानुभावांचं तोंड पाहू नये, असं या मराठी मुलखात सांगितलं गेलं. वारकरी पंथामधे तर महानुभावांबद्दल काहीही पसरवलं गेलं.

त्यामुळे महाराष्ट्राला नवा दृष्टिकोन देणाऱ्या या दोन पंथांमधे अकारण दरी निर्माण झाली. महानुभाव आणि वारकरी या दोन्ही पंथांनी महाराष्ट्राची जडणघडण केलीय. त्यांनी गीता आणि भागवताचं तत्त्वज्ञान सामान्यांना त्यांच्या भाषेत सांगितलं.

पण या दोन पंथांमधे निर्माण झालेली दरी सांधण्याचा प्रयत्न फारसा झाला नाही. महंत बाभुळगांवकर भोजराज शास्त्री यांनी आपलं आयुष्य त्यासाठी वाहून घेतलं. महानुभाव पंथाची दीक्षा घेऊनही त्यांनी महानुभाव-वारकरी पंथामधला सांधा जोडला. हे कार्य ऐतिहासिक आणि समन्वयाचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्राच्या परंपरेला साजेसं आहे.

आपल्याला महाराष्ट्र शासनाचा यावर्षीचा ज्ञानोबा- तुकाराम वारकरी पुरस्कार मिळाला. आपण महानुभाव पंथाचे आहात; पण आपण वारकरी संतसाहित्याची सेवा केली. या संतसाहित्याच्या सेवेबद्दल आपला सन्मान झाला. आपला वारकरी परंपरेशी कसा संबंध आला?

बाभुळगांवकर शास्त्री : माझ्या घरात वारकरी संप्रदाय होता. गावात वारकरी संप्रदाय होता. नात्यात वारकरी संप्रदाय होता. त्यामुळं माझ्यावर लहानपणीच वारकरी संप्रदायाचे संस्कार झाले होते. मला हरिपाठ पाठ होता. तुकारामांचे अनेक अभंग पाठ होते. मी तीन महिन्याचा असताना माझी आई वारली होती. त्यावेळी आत्यानं मला तिच्या घरी नेलं. सांभाळ केला. ती कट्टर वारकरी होती.

तिला महानुभाव पंथ आवडत नव्हता. मी महानुभावांकडे गेलो की ती चिडायची. त्यावेळी आमच्या गावात केशीराजबाबा नावाचे महानुभाव यायचे. मी उत्सुकतेपोटी त्यांच्याकडं जायचो. त्यांना मी गीता शिकवायची विनंती केली. त्यांनी सांगितलं, ‘तुला वाचता येत नाही तर गीता कशी शिकवणार?’ मी म्हटलं, ‘मी ऐकूनच गीता पाठ करतो.’ त्यानंतर त्यांच्याकडून मी गीतेचा पंधरावा आणि सोळावा अध्याय ऐकूनच पाठ केला.

मला अक्षरओळख नव्हती. एकदा आत्याला माझ्या खिशात गीतेचं पुस्तक दिसलं. महानुभावाचं पुस्तक खिशात ठेवलं म्हणून ती रागावली. मी तिला गीतेवरचा कृष्णाचा, अर्जुनाचा आणि हनुमानाचा फोटो दाखवला. आपल्याच देवाचे फोटो असल्याचं दाखवल्यावर ती खूष झाली. घरात एकंदरीत असं वारकरी वातावरण होतं त्यामुळं महानुभाव पंथाविषयी गैरसमज होते.

घरात वारकरी परंपरेचा वारसा असताना आपण महानुभाव कसे झालात?

त्याची एक गोष्ट आहे. माझा मोठा भाऊ हा वारकरी संप्रदायातला. आळंदीतल्या वारकरी शिक्षण संस्थेत त्यानं वारकरी कीर्तनाचं शिक्षण घेतलं होतं. त्याचं आमच्या मांजरगावात कीर्तन होतं. त्यावेळी मी गुराखी होतो. भावाचं कीर्तन आहे म्हणून मी माझ्या गुराखी मित्रांसह कीर्तन ऐकायला गेलो.

‘आता तरी पुढे हाची उपदेश । नका करू नाश आयुष्याचा॥’ या तुकारामांच्या अभंगावर कीर्तन केलं. कीर्तन ऐकताना मलाही कीर्तन शिकण्याची इच्छा झाली. कीर्तनानंतर मी भावाला भेटलो. त्याला मी आळंदीत जाऊन कीर्तन शिकण्याची इच्छा व्यक्त केली; पण त्यानं मला झिडकारलं.

तोच एकटा कसाबसा आळंदीत शिकत होता. मला नेल्यामुळं त्याची अडचण होणार होती. त्यामुळं त्यानं मला आळंदीत न्यायला नकार दिला. माझ्या मित्रांसमोर माझा अपमान झाला. मला वाईट वाटलं. इच्छा असूनही वारकरी संप्रदायातला कीर्तनकार होता येणार नव्हतं. त्यातच एकदा आपण महानुभाव व्हावं वाटलं आणि मी महानुभाव झालो.

महानुभाव होण्यासाठी दीक्षाविधी कसा असतो आणि आपण कोणाकडून दिक्षा घेतली?

महानुभाव होण्यासाठी पहिल्यांदा दीक्षा घ्यावी लागते. दीक्षा म्हणजे कानमंत्र दिला जातो. त्याला ‘उपदेश घेणं’ म्हणतात. दामोदरदादा कोठी नावाचे एक महानुभाव होते. ते आमच्या तालुक्‍याच्या ठिकाणी असलेल्या बदनापूरच्या आश्रमात राहत होते. त्यांची आमच्या गावातल्या धोंडीबा दादांशी ओळख होती. धोंडीबादादा महानुभावच होते.

माझ्या भावानं म्हणजे भानुदास बुवांनी मला आळंदीला न्यायला नकार दिल्यानंतर माझ्याजवळ महानुभाव होण्यावाचून पर्याय उरला नव्हता. त्यामुळं मी धोंडीबादादांना महानुभाव होण्याची इच्छा बोलून दाखवली. त्यांनी दामोदरदादा कोठी यांना आणून मला महानुभाव पंथाची दीक्षा देण्याचा विचार केला.

ज्या दिवशी मी दीक्षा घेणार होतो त्यादिवशी घरी माशांची भाजी केली होती. ती मी खाल्ली आणि त्यानंतर गुपचूप धोंडीबा दादांच्या घरी गेलो. दामोदरदादा कोठी आले होते. त्यांच्याकडून दीक्षा घेतली आणि मी महानुभाव झालो. घरात वारकरी परंपरा असताना मी महानुभाव झालो हे कोणाला आवडणार नाही म्हणून त्याविषयी मी कोणाला सांगितलं नाही.

महानुभाव पंथाची दीक्षा घेतल्यानंतर पुढे काय केलं?

त्यानंतर मी घरातल्या कोणाला न सांगता बदनापूरच्या महानुभाव आश्रमात गेलो. तिथं मला महानुभाव पंथाची ओळख झाली. मुळाक्षरांपासून अक्षरओळख व्हायला लागली. गीतेतले श्लोक पाठ करायला लागलो. आश्रमातल्या मोठ्या बाबांची म्हणजे शेवलीकर बाबांची पोथी ऐकायचो. फार काही कळायचं नाही पण तरीही पोथी ऐकण्यात आनंद मिळायचा. 

तुम्हाला महानुभाव पंथाची गोडी लागली. त्या काळात तुमचा वारकरी संप्रदायाशी संबंध येत होता का?

घरात, गावात आणि नात्यात वारकरी संप्रदाय असल्यानं वारकरी संप्रदायाचा थोडाफार परिचय होताच. पण आश्रमात बांधकर बाबा हे वारकरी संप्रदायाचे जाणकार अभ्यासक होते. ते पूर्वीचे कीर्तनकार. त्यानंतर त्यांनी महानुभाव पंथ स्वीकारला होता. त्यांच्याकडून वारकरी संप्रदायाविषयी माहिती मिळत होती. 

वारकरी संप्रदायात संन्यासी आणि संसारी असे दोन भाग नाहीत. महानुभाव पंथात मात्र संन्यासी आणि संसारी यांच्यात दोन भाग आहेत. त्यात नेमका काय फरक आहे?

महानुभाव पंथात उपदेश घेतल्यानंतर तुम्ही महानुभाव होतात. त्यानंतर तुम्हाला जर संन्यासी व्हायचं असेल तर त्यासाठी वेगळा दीक्षाविधी आहे. हा संन्यासाचा दीक्षाविधी झाल्यानंतर तुम्हाला नैष्ठिक ब्रह्मचर्य पाळावं लागतं. या दीक्षाविधीनंतर नाव बदललं जातं. भिका रंगनाथ डाके हे माझं मूळ नाव. पण मी संन्यास दीक्षा घेतली त्यावेळी माझं नाव बदलून ते भोजराज ठेवण्यात आलं.

तुम्ही महानुभाव पंथात गेल्याचं घरातल्या लोकांना कधी कळलं? त्यानंतर घरातल्या लोकांची प्रतिक्रिया कशी आली? 

महानुभाव पंथात गेल्यानंतर माझा पंथाचा अभ्यास सुरू झाला. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की संस्कृतचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यामुळं मी जळगाव जिल्ह्यातल्या फैजपूरच्या श्री चक्रधर संस्कृत विद्यालयाच्या गुरुकुलात प्रवेश घेतला. त्यावेळी मला व्याकरणातलं काहीच कळत नव्हतं.

तिथं आराध्येबाबा होते. त्यांनी मला व्याकरणातले बरेच प्रश्न विचारले. मला एकाही प्रश्नाचं उत्तर नीट देता आलं नाही. शेवटी त्यांनी लिंग किती हा प्रश्न विचारला. मी लगेचच उत्तर दिलं, ‘बारा जोतिर्लिंग आहेत.’ त्यावर सगळे हसायला लागले. मला माझी चूक लक्षात आली. त्यानंतर मी गुरुकुलात संस्कृतचा अभ्यास करणं सुरू केलं.

गुरुकुलात दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर झाल्या होत्या म्हणून गावाकडं निघालो. जाताना वाटेत बहिणीच्या घरी गेलो. बहिणीच्या घरी भाऊ आला होता. भाऊ म्हणजे भानुदास बुवा. मी महानुभाव झाल्याचा राग प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता. मी पूजा करत होतो त्यावेळी सगळेजण माझ्याकडं विचित्र नजरेनं पाहत होते. पूजा आटोपल्यावर भावानं शिव्या द्यायला सुरुवात केली.

आपल्या घरात वारकरी परंपरा असताना महानुभाव का झाला म्हणून विचारणा केली. मी निरुत्तर होतो. भावाबरोबर बहिणही रागावली. सगळ्या नातेवाईकांनी मी महानुभाव पंथ सोडावा असा आग्रह धरला. भावानं मला आळंदीत नेऊन वारकरी कीर्तनकार करण्याची तयारी दाखवली; पण मी महानुभाव पंथ सोडायला तयार नव्हतो. सगळ्यांनी मला टाकून दिल्यानंतर मला महानुभाव पंथानेच आधार दिला होता.

साधी अक्षरओळख नसणाऱ्या माझ्यासारख्याला त्यांनी कोणत्याही अपेक्षेशिवाय सांभाळलं होतं. सर्वज्ञ चक्रधर स्वामींच्या महानुभाव पंथात मला सामावून घेतलं होतं. मायेची ऊब दिली होती. त्यामुळं मी महानुभाव पंथ सोडू शकत नव्हतो. तेवढ्यात गावातल्या काही मंडळींनीही मला आधार दिला. त्याच्या इच्छेनुसार त्याला महानुभाव राहू द्या; असं त्या मंडळींनी सांगितलं. अखेर नाईलाजाने सगळे शांत झाले.

भावाचा आणि नातलगांचा संप्रदायाला इतका विरोध का होता?

त्यावेळी महानुभाव पंथाविषयी लोकांच्या मनात गैरसमज होते. महानुभाव लोक आमच्या देवांना मानत नाहीत. आमचे सण साजरे करत नाहीत. गणपती बसवत नाहीत. देवीचा नवरात्री उत्सव करत नाहीत. अशा अनेक महानुभाव गोष्टींमुळे हे महानुभाव लोक आमचे नाहीत असा अनेकांचा गैरसमज होता.

त्यातच विष्णूबुवा जोग महाराजांनी जळगावातल्या एका गावात कीर्तन करताना महानुभाव पंथावर टीका केली. त्यामुळं आमच्या लोकांनी चिडून त्यांच्यावर खटला भरला. त्यानंतर ल. सि. चौधरी यांनी महानुभाव पंथाविषयी गैरसमज पसरवणारं पुस्तक लिहीलं. ते पुस्तक आळंदीतल्या वारकऱ्यात पोहोचलं. तेच भावानेही वाचलं होतं.

एकूणच समाजात आणि विशेषतः वारकरी संप्रदायात महानुभाव पंथाविषयी गैरसमज पसरले होते. त्यामुळं भावाच्या मनात महानुभाव पंथाविषयी चीड होती. मी महानुभाव झाल्यानं सगळ्यांच्या मनात माझ्याविषयी रागाची भावना निर्माण झाली.

महानुभाव झाल्यानंतर तुम्हाला संप्रदायाविषयी काय वाटत होतं?

महानुभाव झाल्यानंतर मला अक्षरओळख झाली होती. मला वाचता येऊ लागलं होतं. महानुभाव पंथाच्या तत्त्वज्ञानाची ओळख होत होती. संस्कृतचा अभ्यास सुरू झाला होता. महानुभाव पंथातल्या सत्पुरुषांकडून इतरही संतांविषयी माहिती मिळत नाही. त्यातच मी जिज्ञासेनं वारकरी संप्रदाय जाणून घेत होतो. ज्ञानेधरी वाचली. एकनाथी भागवत वाचलं. तुकारामांची गाथा वाचली.

संत तुकाराम हे फार मोठे जनकवी आहेत. त्यांच्या अक्षरात अफाट सामर्थ्य आहे हे लक्षात आलं. तुकाराम महाराजांचा माझ्यावर खूप मोठा प्रभाव पडला. साध्या भाषेत जीवनमूल्यांवर भाष्य करणारा हा थोर कवी आहे हे मला समजलं. त्यानंतर मी महानुभाव पंथाचं आणि वारकरी संप्रदायाचं तत्त्वज्ञान एकत्रितपणे समजून घेऊ लागलो. मला अनेक समान जागा दिसू लागल्या.

दोन्ही पंथ कृष्णाचे उपासक आहेत. गीता आणि भागवत या ग्रंथांना दोन्ही संप्रदायात महत्त्वाचं स्थान आहे. दोन्ही पंथात फरक आहे पण तो तत्त्वज्ञानातल्या काही भागातला. हा फरक कायम ठेवत आपल्या चौकटीत राहून आपण इतर संप्रदायाचा आदर राखू शकतो असं मला वाटत होतं. त्यामुळं मी वारकरी संतांचा अभ्यास केला.

केवळ वारकरी संताचीच नाही तर इतरही पुस्तकं वाचू लागलो. मी ओशो वाचले. अनेक कांदबऱ्या वाचल्या. त्यातून दृष्टी व्यापक बनत गेली. महानुभाव आणि वारकरी हे दोन्ही पंथ सहभावाने नांदायला हवेत असं वाटू लागलं. गैरसमज संपून जायला हवेत त्यासाठी प्रत्येकाने काही पावलं टाकणं गरजेचं आहे याची जाणीव झाली.

‘अन्य वार्ता परी निद्रा चांग’ असं चक्रधर स्वामींचं वचन आहे. त्याचा अर्थ असा सांगितला जातो की महानुभाव पंथ सोडून इतरांचं तत्त्वज्ञान ऐकण्यापेक्षा झोपी जा. तरीही तुम्ही इतर तत्त्वज्ञानाविषयी माहिती मिळवत होतात हे कसं शक्‍य झालं?

‘अन्य वार्ता परी निद्रा चांग’ या वचनाचा चुकीचा अर्थ लावला गेला. त्यामुळं खरं नुकसान झालं. अन्य वार्ता म्हणजे इतर संप्रदायाच्या वार्ता असा नव्हे. अन्य वार्ता म्हणजे मानवी जीवनाच्या हिताला जे पोषक नाही अशा विषयावरची चर्चा. अशी चर्चा टाळावी. तशी चर्चा करण्यापेक्षा सरळ झोपी गेलेलं बरं अशी सर्वज्ञ चक्रधर स्वामींची आज्ञा आहे. 

एका बाजूने इतर संप्रदायाचं ऐकायचं नाही असं काही महानुभाव मानत होते. त्याचवेळी आपल्या महानुभाव पंथातलं तत्त्वज्ञान बाहेर जाऊ नये असाही पंथाचा दंडक होता. त्यामुळं पंथाविषयी गैरसमज निर्माण झाले असं वाटतं का? पंथातला विचार गोपनीय का ठेवला गेला?

पंथातला विचार गोपनीय ठेवणं ही चूकच होती. सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी पहिलं सूत्र पारध्यांना सांगितलं. ते पारधी काही महानुभाव नव्हते. ससिक रक्षण ही लिळा आहे. या लिळेत ‘एथ शरण आलीया काई मरण असे’ हे पहिलं सूत्र चक्रधर स्वामींनी सांगितलं; पण पुढे कोणत्यातरी कारणाने या सूत्रांचा महानुभाव नसलेल्या लोकांसमोर उच्चार करू नये असा प्रघात पडला.

त्यातून महानुभाव पंथांचं नुकसान झालं. लोकांच्या मनात गैरसमज तयार झाले. मी मात्र हे धुडकावून लावलं. मी महानुभाव नसलेल्या लोकांसमोर संगीतकथांच्या आणि इतरही माध्यमातून सूत्रांवर बोलू लागलो. त्याला काही कर्मठ लोकांकडून थोडाफार विरोधही झाला; पण ते सगळीकडेच होतं. मी केवळ सूत्रांवरच बोलत नव्हतो. सूत्रांबरोबर मी ज्ञानेधर महाराजांवर बोलायचो. तुकाराम महाराजांवर बोलायचो. ते लोकांना आवडायचं.

आमच्या पंथात नरेंद्र नावाचे एक कवी होऊन गेले. त्यांनी रुक्मीणीस्वयंवर हा काव्यग्रंथ लिहीला होता. तो त्यांनी रामदेवराय यादवाच्या दरबारात वाचून दाखवला होता. दरबारात काय कोणी महानुभाव नव्हतं. तो दरबारात वाचला गेलेला ग्रंथ जरी आम्ही बाहेर काढला असता तरी आमच्याविषयी गैरसमज पसरले नसते. तो ग्रंथ वाचताना तुम्हाला पानापानावर ज्ञानेश्वरीची आठवण येईल.

एकनाथ महाराजांनी तो ग्रंथ वाचला असता तर त्यांनी नरेंद्राला शाबासकी दिली असती; पण तो ग्रंथही आम्ही बाहेर काढला नाही. त्यामुळं आमच्याविषयी गैरसमज पसरले. ज्या तोंडाने आम्ही मराठीला साडेसहा हजारांहून अधिक ग्रंथ दिले. मराठीला व्याकरण दिलं. तत्त्वज्ञान दिलं. त्याच महानुभावचं तोंड पाहू नये असं या मराठी मुलखात सांगितलं गेलं.

आपण कीर्तनकार बनलात. कीर्तन या माध्यमाला वारकरी संप्रदायात प्रतिष्ठा आहे पण महानुभाव पंथात नाही. तरीही आपण कीर्तनाकडे कसे वळलात?

कीर्तनाला महानुभाव पंथात प्रतिष्ठा होतीच. गीतेच्या नवव्या अध्यायात कीर्तनाचा महिमा खुद्द भगवान श्रीकृष्णानीच सांगितलाय. चक्रधर स्वामींच्या सूत्रातही कीर्तनाचा महिमा आलाच आहे; पण नंतरच्या काळात महानुभाव पंथात कीर्तनाला फार प्रतिष्ठा नव्हती. मी मात्र कीर्तन या माध्यमाचा वापर करायचं ठरवलं.

मी शंकर महाराज खंदारकरांपासून धुंडा महाराज देगलूरकरांपर्यंत अनेक मातब्बर कीर्तनकारांची कीर्तनं ऐकली होती. त्यानंतर मी हरीदासी कीर्तत शिकलो. पूर्वरंगात तत्त्वज्ञानाचा भाग सांगायचा आणि उत्तररंगात त्याला अनुरुप आख्यान करायचं अशा स्वरुपात कीर्तन करायला लागलो.

कीर्तनात जसं चक्रधर स्वामींची सूत्रं यायची तसं ज्ञानोबा-तुकोबाही यायचे. आजही ज्ञानेश्वरीतल्या अनेक ओव्या आणि संतांचे अनेक अभंग पाठ आहेत. हे सगळं माझ्या कीर्तनात यायचे. त्यानंतर मी कीर्तन विद्यालय काढलं. ते सात-आठ वर्षं चालवलं. आता कीर्तनाची प्रशिक्षण शिबिरं आयोजित करतो. 

महानुभाव आणि वारकरी पंथाच्या समन्वयासाठी आपण कसे प्रयत्न केले? आता आपण काय करत आहात?

मी अनेक वारकरी कीर्तनकारांना भेटलो. बाबा महाराज सातारकर, जगन्नाथ आण्णा पवार आणि संदिपान महाराज हासेगावकर अशा काही कीर्तनकारांना भेटलो. त्यांच्याशी संवाद साधला. मी त्यांच्याशी नम्रतेनं वागलो. ते वर बसले तर मी खाली बसायचो.

मधल्या काळात दक्तेबाबा, बाबुराव वाघ आणि मारोती तुणतुणे या मंडळींनी महानुभाव पंथाविषयी चुकीची माहिती लिहीली. मी त्याला उत्तर दिलं. ‘आम्ही बिघडलो तुम्ही बी घडा’ हे पुस्तक लिहिलं. त्यांच्या विद्रतेचा आदर राखून त्यांना उत्तर दिलं. तुम्ही विद्वान आहात पण एकटेच विद्वान नाही हे समजावून सांगितलं.

तुमचा अनेक ग्रंथाचा अभ्यास असेल पण महानुभाव पंथाचा अभ्यास तुम्ही केला नाही हे आवर्जून सांगितलं. मला अनेक वारकरी मानतात. त्यांच्या सप्ताहात बोलवून कीर्तन करायला लावतात. प्रवचन करायला लावतात. कौतुक करतात. आता वातावरण बर्‍यापैकी निवळलंय. मी महाचिंतनी हा उपक्रम गेल्या २६ वर्षांपासून करतोय. त्यात महानुभाव नसलेल्या अनेकांना बोलवतो. त्याला हजारो लोक असतात.

मी जीवनमूल्यांवर बोलायला सांगतो. त्यासाठी तुम्ही इस्लामचा आधार घ्या. महानुभावांचा आधार घ्या. वारकरी संप्रदायाचा आधार घ्या. कोणताही आधार घ्या पण जीवनमूल्यांवर बोला असं सांगतो. त्याला उत्तम प्रतिसाद मिळतोय. महानुभाव पंथ हा सर्वांना सोबत घेऊन चालणारा पंथ होता. तो तसाच व्हावा यासाठी मी प्रयत्न करतोय. दलितांपासून मुस्लिमांपर्यंत सर्वांना या पंथाने सामावून घेतलंय.

चक्रधर स्वामींनी महानुभाव पंथात दलितांना सन्मान दिला पण नंतरच्या काळात महानुभाव पंथात दलितांना सन्मानाची वागणूक मिळाली का?

नाही. मी माझ्या मार्गस्थ या आत्मचरित्रात त्याविषयी लिहिलं आहे. अकोला जिल्ह्यातल्या अकोट तालुक्‍यात शिरसाली गावात भरपूर महानुभाव होते. ते दलित जातीतून आलेले. त्यांच्या गावात काही ब्राह्मण महानुभाव गेले होते.

दलित महानुभाव व्यक्तीच्या घरी गेल्यानंतर त्यांनी ब्राह्मण महानुभावांना दूध दिलं. दलितांनी दिलेलं ते दूध तो दलित स्वयंपाकघरात गेलेला पाहून ब्राह्मणांनी मोरीत फेकून दिलं. आमचं दूध पिऊन झाल्याचं सांगितलं. गरम दूध एवढ्या कमी वेळात पिल्यामुळं त्याला संशय आला. त्यानं मोरीत जाऊन पाहिलं तर तिथं दूध सांडलं होतं.

ते पाहून तो दलित महानुभाव म्हटला, ‘तुम्ही मोरीत दूध फेकलं नाही. चक्रधर स्वामींचा महानुभाव पंथ फेकला. ज्या चक्रधर स्वामींनी मातंगांचा लाडू ब्राह्मणांना खायला दिला त्याच पंथातले तुम्ही लोक मात्र दलितांच्या हातचं खात नाही याला काय म्हणावं?’ त्यानंतर त्या गावातल्या दलितांनी महानुभाव पंथ सोडला.

आपल्याला ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार मिळाल्यानंतर आपल्या भावाची प्रतिक्रिया काय होती?

भावाला खूप आनंद झाला. तो खूष होऊन सगळ्यांना सांगत सुटला. मला म्हणाला, ‘मी वारकरी कीर्तनकार आहे. शास्त्री आहे. लेखक आहे. वारकरी संप्रदायाविषयी पुस्तकं लिहिली; पण मला वारकरी संप्रदायात राहून जो पुरस्कार मिळवता आला नाही तो तुला महानुभाव पंथात राहून मिळवला. ज्ञानोबा-तुकोबांच्या नावाचा पुरस्कार माझ्या घरात आणला.’

त्यानंतर पुरस्कार वितरण झालं आणि काही दिवसातच तो देवाघरी गेला. त्याच्या मनातले महानुभाव पंथाविषयीचे सगळे गैरसमज संपले होते. माझ्या पंथातल्या काही लोकांनी तो पुरस्कार स्वीकारू नका असं सांगितलं होतं; पण मी ते ऐकलं नाही.

साडेसहाशे वर्षं आपल्याला बाहेर फेकलं गेलंय. या पुरस्काराच्या निमित्ताने ते आपल्याला आत घेतायत असं समाजावून सांगितलं. आता माझी जबाबदारी वाढलीय. ज्ञानोबा-तुकोबांची सेवा अधिक ताकदीने करायला पाहिजे याची जाणीव झालेली आहे.

(ही मुलाखत ह. भ. प. ज्ञानेश्‍वर महाराज बंडगर यांनी घेतली असून ते मे २०२३ च्या वारकरी दर्पण मासिकात प्रसिद्ध झाली आहे.)