कोरोनाची शिकार कशी करायची हे वायरस हंटरकडून शिकायला हवं!

२५ मार्च २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


जंग यून क्योंग या दक्षिण कोरियातल्या डॉक्टर. कोरोनाच्या संकटातून दक्षिण कोरिया यशस्वीपणे बाहेर आला ते जंग यांच्या नियोजित व्यवस्थापनामुळेच. कोरियात अद्ययावत औषधं आणि चाचण्या करण्यापासून ते नागरिकांना दिलासा देण्यासाठी पत्रकार परिषदा घेईपर्यंत सगळ्या गोष्टी त्या हुशारीनं करत होत्या. आता तर दक्षिण कोरियाचं अध्यक्षपद त्यांना द्यावं अशी मागणी चालू झालीय. या वायरस हंटरनं कोरोनाला धूळ कशी चारली हे समजून घ्यायलाच हवं.

माणसाच्या डोळ्यालाही न दिसणाऱ्या एका वायरसनं जगभर धुमाकूळ घातलाय. या कोरोना वायरसशी कसं लढायचं, त्याला कसा आळा घालायचा हे अमेरिका, युरोपसारख्या बलाढ्य खेळाडूंनाही समजत नाहीय. आता भारताभोवतीही त्याचा विळखा हळूहळू घट्ट होताना दिसतोय.

जगभर कोरोना थांबायचं नाव घेत नाही. चीनला खेटूनच असणारा दक्षिण कोरिया हा देश मात्र कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी निर्णायक पावलं टाकतोय. अवघ्या जगाला या कोरोनाची शिकार कशी करायची, हा प्रश्न पडलेला असताना दक्षिण कोरियाच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिवेंशन म्हणजेच केसीडीसीच्या प्रमुख असणाऱ्या ५४ वर्षीय जंग यून क्योंग यांनी आपल्या कामगिरीच्या जोरावर दक्षिण कोरियातला वायरस आटोक्यात आणलाय. आता त्या वायरस हंटर म्हणून जगभरात प्रसिद्ध झाल्यात. 

कोण आहेत या वायरस हंटर?

ब्लूमबर्गने दिलेल्या एका बातमीनुसार, जंग यून क्योंग यांचा जन्म १९६५ मधे दक्षिण कोरियातल्या ग्वागजू इथं झाला. त्यांनी सेऊल नॅशनल युनिवर्सिटीतून मेडिकलची पदवी घेतली. तिथूनच मास्टर ऑफ डॉक्टरेट पूर्ण केलं. नंतर त्यांनी मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अँड डॉक्टरेट इन प्रिवेंटेटीव मेडिसिनचा अभ्यासक्रम पूर्ण केला.

सेऊल जवळ असणाऱ्या यांगजू या लहान खेड्यातून जंग यांनी आपल्या वैद्यकीय सेवेची सुरवात केली. १९९५ मधे दक्षिण कोरियाच्या राष्ट्रीय आरोग्य मंत्रालयात त्यांनी संशोधक म्हणून काम सुरू केलं. २००९ मधे एच१एन१ म्हणजेच स्वाईन फ्लूच्या उद्रेकामुळे दक्षिण कोरियात जवळपास साडे सात लाख लोक बाधित झाले होते. यादरम्यान जंग यांना आपत्कालीन विभागात बढती मिळाली. तिथं त्यांनी दखलपात्र काम केलं. 

२०१५ मधे दक्षिण कोरियात मर्स अर्थात मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोमचा प्रादुर्भाव वाढला. त्यात दक्षिण कोरियातल्या ३८ जणांचा बळी गेला. त्यावेळी जंग यांनी रोजच्या रोज पत्रकार परिषद घेऊन नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी, याबद्दल माहिती दिली. नागरिकही त्यांची परिषद आवर्जून बघत. त्यांच्या या कामाचं सोशल मीडियावर भरपूर कौतुकही झालं.

हेही वाचा : लॉकडाऊन न करता कोरोनाशी लढणाऱ्या दक्षिण कोरियाचं जगभर होतंय कौतूक

वायरस टेस्टिंग किटची निर्मिती

जंग यांच्या कामाची दखल घेऊन २०१६ मधे त्यांची केसीडीसीच्या रोग निवारण आणि प्रतिबंध या विभागाच्या प्रमुखपदी निवड झाली आणि पुढच्याच वर्षी म्हणजे २०१७ मधे त्यांची केसीडीसीच्या प्रमुखपदी वर्णी लागली. जंग यांनी चार्ज हाती घेताच केसिडीसीच्या व्यवस्थापनामधे पटापट बदल केले. 

दक्षिण कोरियाचं बायोटेक्नॉलॉजी क्षेत्र अत्यंत व्यापक आणि क्रियाशील आहे. जंग यांनी स्थानिक बायोटेक कंपन्यांच्या मदतीनं वायरस टेस्टिंग किट तयार केलं. आणि अवघ्या आठवड्याभरातच त्याला मंजुरी मिळवून दिली. या संपूर्ण प्रक्रियेला त्याआधी साधारणतः एक वर्ष तरी लागायचं.

डिसेंबर २०१९ मधे चीनमधे कोरोना हात पाय पसरू लागला. अशावेळी शेजारीच असलेला दक्षिण कोरिया यापासून बाजूला राहणं शक्य नाही, हे जंग यांनी ओळखलं. कोरोना विरोधात लढायची तयारी त्यांनी सुरू केली. जानेवारीमधे जंग या दिवसातून दोनदा पत्रकार परिषद घेत. परिषद कोरोना संदर्भात त्या नागरिकांना सगळी माहिती द्यायच्या. शिंकताना कशा प्रकारे शिंकावं, स्वच्छता कशी ठेवावी, गर्दी कशी टाळावी हे सांगायच्या. तसंच देशातल्या हॉस्पिटलची तयारी कशी आहे, त्यामधे कोणकोणत्या चाचण्या केल्या जातील, यासंदर्भातले अलर्ट हे स्मार्टफोन वापरणाऱ्यांना कशाप्रकारे मिळवता येतील अशा अनेक बारीकसारीक गोष्टींची संपूर्ण माहिती त्या नागरिकांना द्यायच्या.

कोरोनाबाबतीतल्या अफवा थांबवल्या

जानेवारीच्या शेवटी दक्षिण कोरियात कोरोनाचा पहिला संशयित सापडला. त्यानंतर लगेचच १६ दिवसात म्हणजे ४ फेब्रुवारीला कोरोना वायरसच्या पहिल्या चाचणीला जंग यांनी मान्यता मिळवून दिली. दरम्यान चार वेगवेगळ्या कंपन्या कोरोनाच्या टेस्ट किट बनवत होत्या. २७ फेब्रुवारीपर्यंत हे काम पूर्ण झालं. फोन बूथप्रमाणे दिसणाऱ्या ड्राईव्ह थ्रू सेंटरमधून चाचण्या घेतल्या जाऊ लागल्या. या नाविन्यपूर्ण पद्धतीमुळे दक्षिण कोरियाचा आरोग्य विभाग कोरोना विरोधात लढण्यासाठी सुसज्ज झाला. त्यामुळे प्रत्येक दिवशी जवळपास २० हजार लोकांची कोरोना तपासणी शक्य झाली.

जंग यांच्या या कामामुळे ३ लाख २० हजार लोकांची कोरोना चाचणी पूर्ण झाली. त्यांच्या रोजच्या पत्रकार परिषदांमुळे लोकांना टेस्टिंग किट कसं हाताळायचं हे लगेच लक्षात आलं. कोरोनावर शोधलेल्या नव्या लसींची चाचणी झाल्यानंतर त्याला मंजुरी मिळवून त्या लगेच बाजारात आणण्यात आल्या. त्यांच्या या प्रयत्नामुळे दोन आठवड्यांपूर्वी रोज ९०० हून अधिक असणारी संक्रमित रुग्णांची संख्या आता शंभरच्याही खाली आलीय.

सोशल मीडियाचा वापर करून जंग यांनी रोजच्या रोज फोटो आणि वीडियोच्या माध्यमातून जनजागृती केली. जंग यांना टीवीवर पाहणं अनेक कोरियन नागरिकांना महत्त्वाचं वाटायचं. कारण त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे नाही हे नेमकेपणानं लक्षात यायचं आणि अफवाही थांबायच्या. लोकांना जी माहिती समजणं आवश्यक आहे ती योग्य माध्यमातून लोकांपर्यंत पोचलीच पाहिजे, असं जंग यांचं मत आहे.

हे कोरोना स्पेशल लेखही वाचा :

एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?

कोरोनाशी धर्माचा संबंध लावणाऱ्यांचं काय करायचं बरं?

कोरोना वायरसः मोदींनी कुणाकडून घेतली जनता कर्फ्यूची आयडिया

विलगीकरण कक्षात डॉक्टर काय करतात, मुंबईची पत्रकार सांगतेय स्वानुभव

जय शेंडुरे: कोरोना आणि ट्रम्प प्रशासनाला पुरुन उरणारा रांगडा कोल्हापूरकर

या तर आमच्या नॅशनल हीरो

जंग यांनी अविरतपणे काम केलं. फक्त जेवण आणि पुरेशी झोप याशिवाय त्यांनी इतर कशाकडेही लक्ष दिलं नाही. एच१एन१ आणि मर्स वायरसवेळी केलेल्या कामाच्या अनुभवाचा त्यांना फायदा झाला. ‘या परिस्थितीत जंग यांच्यापेक्षा चांगलं काम दुसरं कुणीही करू शकणार नव्हतं. त्यांना पूर्वीच्या कामाचा अनुभव असल्यानं आपण नेमकं काय करू शकतो आणि काय करू शकत नाही, याची योग्य माहिती होती.’ असं मत केसीडीसीचे माजी प्रमुख जंग की सुक यांनी व्यक्त केलंय.
 
कोरोनामुळे जगभर बळींची संख्या वाढत असताना दक्षिण कोरियात मात्र तो नियंत्रणात आलाय. या वायरसला जंग यांनी अत्यंत व्यवस्थित आणि हुशारीनं हाताळलं. यामुळे बळींची संख्याही कमी झाली. त्यामुळे जंग आता आमच्या नॅशनल हिरो आहेत, अशी भावना तिथल्या नागरिकांच्या मनात आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून कोरियन जनतेनं त्यांना वूमन वॉरियर, वायरस हंटर, नॅशनल हिरो अशी अनेक बिरूदं लावलीयत. ट्विटरवर या संदर्भात कोरियन भाषेत #धन्यवाद केसीडीसी आणि #वुई सपोर्ट असे ट्रेंड चाललेत. जंग यांच्या नावानं अनेक फॅन क्लब तयार झालेत. देशावरचं कोरोनाचं हे संकट पूर्णपणे टळल्यानंतर जंग यांनाच दक्षिण कोरियाचा अध्यक्ष बनवावं, अशीही मागणी केली जातेय.

दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जाए इन यांनीही जंग यांच्या कामाबद्दल त्यांची प्रसंशा केली आणि त्यांनी आता स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असा सल्ला दिला. अमेरिकेचे अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे माजी प्रमुख स्कॉट गॉटलिब यांनी एक ट्विट केलं. अमेरिकेनं दक्षिण कोरियाच्या उपाययोजनांपासून धडा घेणं आवश्यक असल्याचं त्या ट्विटमधून त्यांनी सांगितलं. जंग यांच्या व्यवस्थापनापासून भारतानेही धडा घेण्यास काहीच हरकत नाही.

हेही वाचा : 

जगाच्या तुलनेत भारत कसा लढतोय कोरोनाशी?

कोरोनानंतर आपण वेगळ्याच जगात असणार आहोत

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

कोरोनाशी पंगा घेणारी बाईः हॉस्पिटलमधे न जाता कोरोना केला बरा

भारत कोरोनाच्या दुसऱ्या स्टेजमधे गेलाय, म्हणजे धोका किती वाढलाय?