जॉन केनेंडींची हत्या झाली तेव्हा शांतपणे फोटो काढणाऱ्या कोण होत्या?

३० जून २०२१

वाचन वेळ : ५ मिनिटं


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन केनडी यांच्या हत्येप्रसंगी गोळी चालल्यानंतर गोंधळ उडालेला असताना एक बाई अत्यंत शांतपणे हातातल्या कॅमेराने तो प्रसंग टिपत होती. संशोधकांनी या अज्ञात बाईच्या हातात कॅमेरासारखी पिस्तूल असल्याचा दावा केलाय. पण हत्येच्या घटनेनंतर आजवर तिचा काहीही थांगपत्ता लागलेला नाही. उलट, गुढतेचं वलय घेऊन फिरणाऱ्या इल्युमिनाती या गुप्तहेर संघटनेची ती सदस्य असल्याचं म्हटलं जातंय.

अमेरिकेच्या टेक्सासमधल्या डल्लास शहरात २२ नोव्हेंबर १९६३ला एक ऐतिहासिक घटना घडली. अमेरिकेचे अत्यंत लोकप्रिय राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनडी यांची एका रोड शोमधे गोळी घालून हत्या करण्यात आली. त्याआधी जवळपास शंभर वर्षांपूर्वी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचीही अशीच हत्या झाली होती. आजवर या दोन्ही घटनांमधला संबंध आणि सारखेपण दाखवण्यात अनेकांनी आपली पेनं झिजवलीत. प्रत्येकाने आपल्या पद्धतीने शोध घेऊन उलगडलेलं रहस्य सांगण्याचा प्रयत्न केला. असं असलं तरी या दोन घटनांमागचं रहस्य संपलेलं नाही.

दोन्ही हत्यांमधे मारेकरी ठरवण्यात आलेल्यांचीही लगेच हत्या झाली. त्यामुळे हत्या, हत्यारे आणि हत्येमागचे हात कायमचे रहस्याच्या ब्लॅक होलमधे गडप झाले. आजही जगात या घटनांचं गूढ आकर्षण कायम आहे.

हेही वाचा : आपल्याला घरात थांबायचं इतकं टेन्शन का आलंय?

हत्येची सुई इल्युमिनातीकडे

त्यातही केनडी यांच्या हत्येतल्या रहस्यात एका छायाचित्राने अथांग गहिरेपण भरलंय. हत्येच्या प्रसंगी उपस्थितीत एका छायाचित्राकाराने काढलेल्या छायाचित्रात गोळी चालल्यानंतर उडालेल्या गोंधळात एक महिला अत्यंत शांतपणे तिच्या हातातील कॅमेराने तो प्रसंग टिपतांना दिसते. 

बऱ्याच संशोधनकर्त्यांनी या अज्ञात महिलेच्या हातात कॅमेरा सदृष्य पिस्तूल असल्याचा दावा केलाय. सीआयएने महिलेचा प्रचंड शोध घेतला. मात्र हत्येच्या घटनेनंतर आजवर या महिलेचा काहीही थांगपत्ता लागलेला नाही. रशियन पद्धतीने बांधलेल्या स्कार्फमुळे ती इतिहासात 'द बबुश्का लेडी' म्हणून ओळखली जाते. मोनालिसाच्या हास्याप्रमाणे बबुश्का लेडीबद्दलचं गूढ आजही अबाधित आहे.

केनडींच्या हत्येनंतर संशयाची सुई तीनशे साठ अंशात फिरुन अखेर एका बिंदूवर स्थिर झाल्यासारखी दिसते. हा बिंदू म्हणजे एक रहस्यमय आणि गूढ संघटन. ज्याला इल्युमिनाती म्हणून ओळखलं जातं. बबुश्का लेडीचा संबंध इल्युमिनातीसोबत जोडण्यात आला. हत्येच्या मागे हे संघटन असल्याचा अंदाज साधार सिद्ध करण्याचा प्रयत्न झाला. 

समाजोपयोगी की विघातक?

सर्वसामान्यांना रॉ, मोसाद, सीआयए इत्यादी गुप्तहेर संघटना आणि त्यांचे रोमांचकारी कारनामे माहित असतात. यासगळ्या गुप्तहेर संघटनांच्याही आधीपासून अस्तित्वात असलेली गुप्तहेर संघटना म्हणूनही इल्युमिनातीचा उल्लेख अनेक ठिकाणी करण्यात आलेला दिसतो. हे संघटन गूढ, रहस्य, संशय, गैरसमज इत्यादींच्या धुक्यात गुरफटल्याने त्याचं नेमकं स्वरूप आणि कार्य याबाबत अनेक कथा-दंतकथा निर्माण झाल्यात. त्यामुळे इल्युमिनाताला समाजोपयोगी मानावं की समाजविघातक याबाबत जगातले अभ्यासक-संशोधक आणि विविध राष्ट्रांच्या गुप्तहेर संघटना यांच्यातच संभ्रम आहे. 

इल्युमिनातीबाबत जगात सर्वसामान्यांना खूप कमी माहिती असल्याचं जाणवतं. आजवरच्या संशोधनात इल्युमिनातीसंदर्भात काही विश्वनीय माहिती संकलित झालेली दिसते. त्याची गोष्टच सांगायची झाली तर सुरवात १७४८ पासून करायला लागेल.

हेही वाचा : वीस वर्ष सत्ता भोगणाऱ्या पुतिन यांना का बदलायचंय रशियन संविधान?

समान समाजाचं स्वप्न

१७४८ला जर्मनीच्या वबेरिया प्रांतात एक अनाथ मुलगा जन्मलेला. चुलत्याच्या आधाराने वाढला. जगाचं निदर्य वास्तव आणि विषमतेचे हलाहल पचवत मोठा झाला. भविष्यात आपण समताधिष्ठित समाजाची स्थापना करू, असं त्याचं स्वप्न होतं. त्यासाठी शिक्षणाच्या जोरावर आपल्या जीवनाला आकार दिला. इंगोलश्टाट विद्यापीठात चर्च कायदा किंवा कॅनन लॉ आणि व्यावहारिक तत्त्वज्ञान विषयाचा प्राध्यापक आणि एक कुटुंबवत्सल गृहस्थ म्हणून हा अनाथ मुलगा म्हणजेच ॲडम विशॉप्ट म्हणून ओळखला जातो.

ॲडम विशॉप्ट आयुष्यात स्थिर-स्थावर होतो. बाह्य जगात शांत दिसणाऱ्या या प्राध्यापकाच्या मनात नव्या जगाचे विचार थैमान घालत होते. माणसानेच निर्माण केलेला धर्म, माणसाच्या गुलामीचं आणि शोषणाचं कारण बनलाय. हा विचार विशॉप्टच्या मनात पक्का झालेला. एक कॅथोलिक ख्रिश्चन म्हणून आणि चर्चच्या कायदयाचा अभ्यासक म्हणून धर्माचा अंर्तबाहय अनुभव आणि धर्म संकल्पनेतली व्यर्थातता त्याला अस्वस्थ करत होती.

धर्ममुक्त मानवी जीवन या संकल्पनेतून अखेर १ मे १७७६ ला ॲडम विशॉप्ट एका गुप्त संघटनेची स्थापना करतो. त्या संघटनेचं नाव ऑर्डर ऑफ इल्युमिनाती. इल्युमिनाटस या लॅटिन शब्दावरुन इल्युमिनाती शब्द निर्माण झालाय. ज्याचा अर्थ प्रकाशमान किंवा प्रबुद्ध असा होतो. इल्युमिनातीला प्रबुद्धता युग गुप्त समिती, असंही आपण मराठीत म्हणू शकतो. 

इल्युमिनातीचा बहर

नव्या विश्वाच्या व्यवस्थेचं स्वप्न ॲडम विशॉप्ट आणि विद्यापीठातल्या त्याच्या पाच सहकाऱ्यांनी पाहिलं. १७८४ पर्यंत या संघटनेची सदस्य संख्या पाच हजारापर्यंत गेली. धर्म आणि कर्मठतेपासून मुक्त अशा समानतेवर आधारित नव्या जगाची निर्मिती त्यांना करायची होती. 

इल्युमिनातीची संकल्पना स्पष्ट करणाऱ्या विशॉप्ट यांनी लिहिलेल्या पुस्तकाची एक प्रत आजही इंगोलश्टाट इथल्या संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आलीय. विशॉप्ट यांच्या घरात इल्युमिनातीच्या प्राथमिक गुप्त बैठका होत असत. 

संघटनेच्या सदस्यांची संख्या दिवसोंदिवस वाढत गेली तसा स्थानिक सरकारला याचा सुगावा लागला. इल्युमिनातीवर बंदी घालण्यात आली. विशॉप्ट यांना दुसऱ्या शहरात पाठवण्यात आलं. तिथं त्यांनी आपलं उर्वरित आयुष्य शांततेत घालवलं. त्यांची इल्युमिनाती मात्र चांगलीच बहरली.

हेही वाचा : कुणालाही न उलगडलेले मिखाईल गोर्बाचेव

धर्मावर श्रद्धा ठेवणारे मुर्ख

एका धर्मातीत आणि समताधिष्ठित जगाचं स्वप्न बाळगणाऱ्या इल्युमिनातीची मुलभूत विचारधारा आणि उद्देश चांगले होते. पुढे मात्र इल्युमिनाती वादग्रस्त ठरू लागली.  दुःखातून मुक्ततेसाठी ईच्छामरण अथवा आत्महत्येचं समर्थन, चूक करणाऱ्यांना मृत्यूदंड देण्यावर विश्वास, धर्मावर श्रद्धा ठेवणारे लोक मुर्ख आहेत आणि त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे इत्यादी गोष्टी समोर आल्याने संघटनेवर अंकुश वाढवण्यात आला.

याचबरोबर जगात सगळीकडे गर्भपातावर बंदी असताना इल्युमिनातीकडून गर्भपाताला प्रोत्साहन देण्यात येत आहे, अशी माहिती सरकारी गुप्तहेर संघटनांना मिळाली. गर्भपातासाठी आवश्यक उपकरणं संघटनेच्या सद्स्यांकडून जप्त करण्यात आली. लिखाणासाठी न दिसणारी शाई, आत्महत्येला प्रोत्साहन देणारं लिखित साहित्य, तसंच अनेक विचित्र योजनांचे अंजेडे इल्युमिनातीच्या सद्स्यांकडून ताब्यात घेण्यात आले.  यामुळे संघटनेला एक गूढतेचे वलय प्राप्त झालं.

वह कौन थी?

इल्युमिनाती आज एक षडयंत्रकारी संघटन म्हणून कुप्रसिद्ध झालीय. तिची प्रतिमा जाणीवपूर्वक तशी केलेली दिसते. मार्क डाईससारख्या षडयंत्र सिद्धांतवादी लेखकांच्या मते इल्युमिनाती आजही आपलं अस्तित्व टिकवून आहे. तसंच जगातली वर्तमान सरकारं आणि विविध संस्था यांच्या माध्यमातून या संघटनेचे सदस्य त्यांना अपेक्षित नव्या जगाला अस्तित्वात आणण्यासाठी अनुकूल घटना घडवत असतात.

फ्रेंच राज्यक्रांती, वाटरलूची लढाई,केनडींची हत्या अशा अनेक ऐतिहासिक घटनांच्यामागे इल्युमिनातीच होती. उच्चशिक्षित असलेल्या इल्युमिनाती सदस्यांकडे विशिष्ट गूढ शक्ती आहेत, असे आरोप विविध गुप्तचर संघटना सातत्याने करत असतात. जगात कोणत्याही घटनेचे धागेदोर सापडत नसतील, तर जगातल्या सगळ्या कार्यक्षम गुप्तचर संघटनांना आपली अकार्यक्षमता आणि हतबलता यांचं खापर फोडण्यासाठी इल्युमिनातीच्या अदृष्य-अगोचर अस्तित्वाचा लाभ घेता येतो.

एखादया चांगल्या आणि कल्याणकारी विचारधारेचा अतिरेक तिला कायमचं बदनाम करू शकतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे इल्युमिनाती. ‘द बबुश्का लेडी’ आणि इल्युमिनाती दोन्हींच्या बाबतीत ‘वह कौन थी?’ हे गूढ असंच अबाधित राहणार आहे.

हेही वाचा : 

जे झालं ते चुकीचंच पण..

उत्तर कोरिया आतून नेमका दिसतो कसा?

'ब्रोकन’ तरूणाई ‘ब्रेक’ डान्सवरच थिरकणार ना!

दाढी वाढवून गुरुदेव होता येत नाही आणि खादी वापरून महात्मा

एका शिक्षकाला बियरने चीनमधला सर्वात श्रीमंत माणूस बनवलं, त्याची गोष्ट