संत हा शब्द आपण अनेकदा मोघम अर्थाने वापरतो. हिंदीत तर बुवाबाबा, साधुंनाही संत म्हणून संबोधलं जातं. वारकरी पूर्व साहित्यात संत या शब्दाचा उल्लेख आहे. तरी वारकरी परंपरेत मात्र संत या संकल्पनेचा एक विशिष्ट अर्थ अपेक्षित आहे. त्यामुळे संत कुणाला म्हणावं, ही संकल्पना कशी विकसित झाली तसंच वारकरी परंपरेतली संत संकल्पना स्पष्ट करणारा हा लेख.
धर्मज्ञान आणि धर्मेतिहास अध्ययन शाखांमधे भागवत धर्म हे एक महत्त्वाचं प्रकरण आहे. भागवत धर्माचा विचार करणाऱ्या आपल्या पूर्वसूरींमधे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, राजारामशास्त्री भागवत, लोकमान्य टिळक, डॉक्टर रा. गो. भांडारकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्यासारख्या दिग्गजांचा समावेश होतो.
भागवत धर्माचा इतिहास लिहायचा म्हटला तर उपस्थित होणाऱ्या अनेक प्रश्नांपैकी या इतिहासाचे कोणते कालखंड म्हणायचे हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो. अर्थात हे कालखंड आपण कोणता दृष्टिकोन अंगीकारलाय यावर काही प्रमाणात तरी अवलंबून राहतील.
भागवत धर्माच्या इतिहासामधे वारकरी संप्रदायाची निर्मिती हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. इतका की भागवत धर्माच्या एकूण इतिहासाचे आपण वारकरी पूर्व आणि वारकरी उत्तर असे स्थूल कालखंड मानू शकतो.
हेही वाचा: आषाढी वारीनिमित्त पसरलेल्या वायरल विठ्ठलाची गोष्ट
विष्णू कृष्णाला भगवान मानणाऱ्यांचा भागवत धर्म वारकरी संप्रदाय होतो तो मुख्यत्वे विष्णू कृष्णाच्या श्रीविठ्ठल दैवतात झालेल्या रूपांतरामुळे. आणि या दैवताच्या म्हणजेच पंढरी क्षेत्राच्या नियमित आवर्तनांमुळे म्हणजेच वारीमुळे. परंतु दैवत आणि कर्मकांड एवढंच काही या नव संप्रदायाचं वैशिष्ट्य नाही. त्याची अन्यही अनेक वैशिष्ट्यं आहेत. त्यापैकी एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या संप्रदायाने प्रवर्तित केलेली संत ही संकल्पना.
वारकरी संप्रदायात जितकं महत्त्व विठ्ठल देवतेला आहे तितकंच संतांनाही आहे. म्हणून तर अगोदर विठ्ठलाची वारी होती. तिला पुढे संतांच्या वारीचीही जोड मिळाली. देव. संत आणि जीव यांच्यामधील एका विवक्षित संबंधावर हा संप्रदाय आधारित असल्याचं दिसतं.
हेही वाचा: गांधीजींना तुकोबा भेटले होते
भारतात याआधी ऋषी, मुनी, योगी, सिद्ध, भक्त, अशा कल्पना प्रचलित होत्या. आणि तशा अनेक व्यक्ती ही प्रत्यक्षात होऊन गेल्या. संत ही मात्र एक नवभूतच कल्पना मानली पाहिजे. वारकऱ्यांमधे अनेक फड आहेत. या फडांमधे वै. बाबासाहेब आजरेकर यांनी स्थापिलेला फड हा विचार आणि आचार या दोन्ही क्षेत्रात प्रमाणभूत असलेला एक फड आहे. आपल्याला मांडायचा मुद्दा धक्कादायक, पारंपरिकांना न रुचणारा असला तरी तो कोणाला न दुखावता सूचित करण्याची हातोटी या फडाने विकसित केली.
ज्ञानदेव, नामदेव पूर्व भगवद्-भक्तांची मोठी परंपरा भारतात होऊन गेली. तिच्यातील वंदनीय पूजनीय पुरुष संत नाहीत असं एकदम कसं म्हणायचें. तेव्हा आजरेकरांनी पूर्व पंगतीचे संत आणि उत्तर पंगतीचे संत असा फरक केला. ज्ञानदेव पूर्वकालीन संत म्हणजे पूर्व पंक्तीचे आणि ज्ञानदेवांसह नंतरचे संत म्हणजे उत्तर पंक्तीचे असा हा फरक आहे. पण तो पुरेसा सूचक आहे.
हेही वाचा: वारकरी संप्रदायाची सहिष्णुता आजच्या काळात महत्त्वाची
एका बाजूला पूर्वसुरींचा मान राखणं हे उचित असतं आणि दुसऱ्या बाजूला भाषा व्यवहार करताना आपण कळत-नकळत शब्दांची आणि संकल्पनांची व्याप्ती वाढवत असतो. महात्मा गांधींच्या पूर्वीची स्वातंत्र्य चळवळ आणि गांधीजींनी नव्या अहिंसात्मक पद्धतीने सुरू केलेली चळवळ यांच्यात गुणात्मक भेद आहे. पण आपण दोघांची गणना लढा यातच करतो.
इतकंच नाही तर गांधीजींच्या अहिंसात्मक चळवळीला अहिंसात्मक लढा असं म्हणतो. यात गैर काहीच नाही. गांधी पूर्व राजकारण्यांबद्दल आपल्या मनात आदर असतोच. इतिहासातही सातत्य असतं. स्वतः गांधींनाही ही नाळ तोडायची नव्हती. म्हणून तर ते गोखल्यांना गुरू मानत आणि टिळकांना महात्मा म्हणत.
तुकोबासुद्धा 'आम्ही वैकुंठवासी | आलो याच कारणांसी | बोलिले जे ऋषी | साच भावें वर्तायां ||' असे म्हणतात. हे सातत्य ही बांधिलकी व्यक्त करतात. पण सातत्य आणि साम्य यांच्यावर भर देत कोणी त्याच्यातील त्यांची स्वतंत्रता, त्यांची आत्मता म्हणजेच आयडेंटिटी नाकारू लागले तर हे योग्य नाही. कधीकधी नाकारण्यामागे पारंपरिकतेचे हितसंबंधही दडलेले असते. तेव्हा या नावीन्याचा ही उच्चार अधूनमधून करावा लागतो. आजरेकर यांच्यासारखा सूचक पद्धतीने केला तर कधी कधी त्याच्याकडे कानाडोळा करणं शक्य होतं म्हणून स्पष्टपणे करावा लागतो.
हेही वाचा: साडेसातशे वर्षांपूर्वीचे संत गोरा कुंभार आजही थोर का आहेत?
सांगायचा मुद्दा असा की संत हा शब्द पूर्वीच्या संस्कृत साहित्यातल्या सुभाषितवजा वाक्यात क्वचित आढळतो. तो सज्जन या अर्थाने आपल्याला दिसतो. संत ही एक स्वतंत्र कोटी, कॅटेगरी, एक नवा जीवनादर्श म्हणून आढळत नाही. तो विकसित झाला वारकरी परंपरेत. संत या शब्दावर वारकरी संप्रदायाचा हक्क आहे किंवा ती वारकऱ्यांची मक्तेदारी आहे असा याचा अर्थ नाही.
संत हा शब्द सर्रास सढळ हाताने वापरला जातो, त्याबाबतही तक्रार नाही. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या धर्म-पंथाच्या साहित्याचं परीक्षण केलं तर विशिष्ट शब्दांच्या निवडीकडे त्यांचे कल स्पष्ट दिसून येतात. आणि हे कल केवळ अपघाती किंवा योगायोगाने घडत आहेत असं म्हणता येत नाही. महानुभव पंथामधील दत्तात्रय प्रभू आणि श्रीकृष्ण यांना अन्य पंथीय ही ईश्वर मानतातच.
हेही वाचा: जगातल्या पहिल्या संत कान्होपात्रा स्मारकाची संघर्षकथा
अगदी बाराव्या तेराव्या शतकात होऊन गेलेल्या चक्रपाणी राऊळ, गोविंदप्रभू आणि चक्रधर यांनाही महानुभाव ईश्वरच मानतात. संत नाही. हे पाच मिळून महानुभावांचे कृष्ण पंचक अथवा पंचकृष्ण तयार होतं. त्यानंतर होऊन गेलेल्या नागदेव, परशरामबास, भास्करभट प्रवृत्तींना महानुभव आचार्य किंवा महंत म्हणतात. संत नाही. हीच बाब दत्त संप्रदाय, समर्थ संप्रदाय इत्यादी संप्रदायाच्या बाबतीत कमीजास्त फरकाने सत्य असल्याचं दिसून येईल.
सर्वच पंथामधील आदरणीय व्यक्तींना संत असं संबोधण्याची प्रथा अभ्यासकांनी पाडली. अर्थात ही प्रथा पडताना त्यांनी वारकऱ्यांच्या संत या संकल्पनेचं सार्वत्रिकीकरण केलं. खरंतर अभ्यासकांचं एक मुख्य काम सांकल्पनिक भेद स्पष्ट करणं हे आहे. पण ते न करता त्यांनी एका वारकरी संकल्पनेचं सामान्यीकरण केलं. हे एका अर्थी वारकऱ्यांच्या प्रभावाचंच द्योतक आहे. पण तरीही अभ्यासकांचं हे कृत्य वारकरी नसलेल्या अन्य सांप्रदायिकांनापण कितपत रुचत असेल यात शंकाच आहे.
हेही वाचा:
संन्यास घ्यायला निघालेले विठ्ठलराव विखे पाटील सहकार चळवळीचे जनक कसे झाले?
मोदींमुळे ५ ट्रिलियन हा शब्द ट्रेंड झालाय, पण ट्रिलियन म्हणजे एकावर किती शून्य?
गाडगेबाबांच्या शेवटच्या कीर्तनाचा सामाजिक आशय