ही १३ मिनिटांची शॉर्टफिल्म बघण्यासाठी कुठल्याही समीक्षकाची गरज नाही

०५ मार्च २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


युट्यूबवर टॉप ट्रेंडमधे असणाऱ्या काजोलच्या ‘देवी’ या शॉर्टफिल्मचं सध्या सर्वत्र कौतूक होतंय. पण त्यासोबतच अनेक स्वयंघोषित समीक्षक या फिल्मचा रिव्यू लिहायच्या नादात तिचे स्पॉईलर्सही देतायत. आपण ही शॉर्टफिल्म बघून त्या कथानकाच्या उलगडणाऱ्या पदरासोबत आपल्या संवेदना जागं होण्याचा अनुभव स्वतः घ्यायला हवा.

मन सुन्न करणारा शेवट, डोकं भन्न करणारा क्लायमॅक्स, अंगावर शहारे, शरीराला थरारे आणणारी स्टोरी असं काय काय म्हणत शेवटी त्या दोघांचा जाती व्यवस्थेने बळी घेतला. बाळ रक्तानं माखलेले पाय घेऊन चालत होतं आणि त्याच्या इवल्याशा पायाचे ठसे उमटत होते तेव्हा काळजात चर्र होत होतं किंवा नागराजने व्यवस्थेच्या विरोधात दगड भिरकावला. जब्याने शेवटी भिरकावलेला दगड पाटलाच्या नाही तर आपल्या अंगावर आला असं काय काय लिहीत सिनेमा रिलीज झाल्यानंतर लगेच पहिल्या दुसऱ्या दिवशी कित्येक स्वयंघोषित समीक्षक सोशल मीडियावर पल्लेदार रिव्यू लिहून मोकळे झाले.

हेही वाचा : नव्याकोऱ्या चार सिनेमांसोबत नेटफ्लिक्स आणतंय नवं कल्चर

सिनेमांचे रिव्यू स्पॉईलर्स देतात

समीक्षण किंवा रिव्यू म्हणजे सिनेमाची सगळीच्या सगळी गोष्ट सांगणं किंवा ‘शेवटी असं असं होतं’ म्हणत सिनेमाचे सगळे पत्ते इकडेच उघडं करणं नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येक नागरिकाला आहे. ज्यांना शब्दात व्यक्त होता येतं त्यांनी आपापली मतं नक्कीच व्यक्त करावीत. पण ते व्यक्त करताना आपण त्या कलाकृतीवर, त्यांच्या मेहनतीवर पाणी तर घालत नाही ना याचं किमान भान तरी बाळगायला हवं. सोशल मीडियाच कशाला आजकाल प्रसिद्ध वेब पोर्टल्स, वर्तमानपत्रात येणारं सिनेरिव्यूसुद्धा स्पॉईलरयुक्त असल्याचं आपल्याला बघायलं मिळतं.

हे सर्व कळकळीने सांगायचं निमित्त काय तर, आताही गेल्या चार दोन दिवसात अशा स्पॉईलर वाटणाऱ्या समीक्षक लोकांच्या प्रतिभेला धुमारे फुटू लागलेत. युट्यूबवर ‘देवी’ नावाची एक ११ मिनिटांची शॉर्ट फिल्म रिलिज झालीय. तिच्याबद्दल व्यक्त होताना लोक तिची सगळी स्टोरीच सांगू लागलेत.

ही फिल्म मन सुन्न करणारी, अंगाला थरकाप आणणारी, डोळ्यात आसवं आणायला भाग पाडणारी आहे, यात शंकाच नाही. पण म्हणून तिच्याबद्दल व्यक्त होताना आपण तिच्या निर्मात्यांवर अत्याचार करतोय, नव्याने पहायला जाणाऱ्या प्रेक्षकांना सर्वच सांगून त्यांची उत्कंठा वाढवण्याऐवजी आपण ती कमी करतोय, हे कसं कळत नाही आपल्याला?

एकाच घरात बसल्यात अकरा महिला

एक कुठल्याशा गावखेड्यातली उत्तर भारतीय, मुकबधीर, विशीतली मुलगी फटके मारून मारून टीवी चालू करतेय. एक कुणी मध्यमवर्गीय साधारण तिशी चाळीशीची बाई दिवाबत्ती करतेय. एक पंचवीस तीस वर्षांची हाय क्लास तरुणी पार्टीत घालतो तशा ड्रेसमधे बसून वोडका पितेय. एक चाळीशी पार केलेली कुठल्याशा कॉर्पोरेट कंपनीत चांगल्या हुद्द्यावर असेल अशी दिसणारी कोट घातलेली एक बाई काहीतरी विचार करत खुर्चीवर झुलतेय.

पन्नाशी साठी उलटलेल्या लुगडं नेसलेल्या दोन मराठी बायका पत्ते खेळतायत. एक मध्यमवर्गीय मराठी वयस्कर बाई वाटाणे सोलत बसलीय. एक तरुणी मेडिकलचा अभ्यास करण्यात मग्न आहे. एक बुरख्यातली मुस्लिम महिला पायावरचे केस काढण्यासाठी वॅक्स करतेय. आणि मागे दोन जणी कुणाशी काहीच न बोलता सुन्न पडून आहेत.

ही कुठल्या वेगवेगळ्या प्रदेशांतील, वेगवेगळ्या घरांतील दृश्यं नाहीत. या वेगवेगळ्या आर्थिक सामाजिक स्तरातल्या, वेगवेगळ्या जाती धर्माच्या, वेगवेगळ्या वयांच्या आणि संस्कृतीच्या अकरा महिला एकाच खोलीत बसल्यात.

या अशा वेगवेगळ्या रंगाच्या आणि ढंगाच्या बायका एकाच खोलीत का बसल्या असतील? त्या तिथं का आहेत? त्यांच्यासोबत काय घडलंय किंवा घडणार आहे. पुढे नेमकं असं काय घडलं की ही फिल्म पाहणारे आम्ही सुन्न झालो, असं म्हणू लागलेत किंवा फिल्मचा विषय नेमका काय आहे यातलं काहीही इथं सांगायला नको.

हेही वाचा : सैरंध्री : पहिल्या मेड इन इंडिया सिनेमाची शंभरी

‘देवी’सोबतच ‘फोर’ ही पुन्हा गाजली

काजोल, श्रुती हसन, नेहा धुपिया, नीना कुलकर्णी, मुक्ता बर्वे यांसारख्या दमदार ताकदीच्या अभिनेत्रींनी यात वेगवेगळ्या बायकांची पात्र साकारलीयत. केवळ एकाच लोकेशनवर, एकाच सीनमधे तेरा मिनिटांत ही शॉर्ट फिल्म आपल्या समोर उलगडत जाते. कित्येक लेखक दिग्दर्शक मंडळींनी या पूर्वी हाताळलेल्या विषयाला अतिशय सर्जनशील आणि प्रभावी पद्धतीने प्रियांका बॅनर्जी यांनी स्वतःच्या लेखणीतून आणि दिग्दर्शनातून मांडण्याचा प्रयत्न केलाय.

अशी ही काहीशी वेगळ्या धाटणीची आणि तीन दिवसांत ५ मिलियन्सच्या वर व्ह्युव्ज मिळालेली युट्यूबवर उपलब्ध असणारी ‘देवी’ शॉर्ट फिल्म कुणा स्वयंघोषित समीक्षकाच्या नजरेतून पाहण्यापासून स्वतःला वाचवायला हवं. स्वतः जाऊन त्या कथानकाच्या उलगडणाऱ्या पदरासोबत आपल्या संवेदना जागं होण्याचा अनुभव स्वतः घ्यायला हवा. त्याहून महत्वाचं म्हणजे ही फिल्म पाहून झाल्यावर इतरांना स्पॉईलर सांगणारा समीक्षक बनण्यापासूनही स्वतःला वाचवायला हवं.

ही फिल्म पाहून स्वतःला सावरून झाल्यावर युट्यूबवर अभिषेक राय दिग्दर्शित ‘फोर’ नावाची एक साडेपाच मिनिटांची शॉर्टफिल्म आहे ती सुद्धा पाहून घ्यायला हवी. ३१ मे २०१८ ला म्हणजेच साधारण दोन वर्षांपूर्वी अपलोड केलेली ही फिल्म आहे. ‘देवी’ जेवढी गाजतेय तेवढीच या फिल्मचीही चर्चा होतेय. कारण देवीच्या निर्मात्यांवर ‘फोर’ ची संकल्पना जशीच्या तशी कॉपी केल्याचा आरोप होतोय. काय खरं, काय खोटं हे आपल्याला दोन्ही फिल्म्स पाहून लगेच लक्षात येईलच.

हेही वाचा : 

#बॉयकॉटदीपिका हॅशटॅगने छपाकचा गल्ला खाल्ला?

बॉलिवूडच्या सिनेमात कधी आनंदी दलित पाहिलाय का?

हिंदी सिनेमांच्या नव्या हिंदुस्तानला फेक राष्ट्रवादाचा तडका

पटकथाकार जावेद अख्तरांचा स्ट्रगलही पटकथेएवढाच फिल्मी आहे

(लेखक हे मंगळूरच्या श्रीनिवास युनिवर्सिटीत फिल्ममेकिंग हा विषय शिकवतात.)