सिंगल-डबलची स्ट्रॅटेजी फेल आणि भारत वर्ल्डकप बाहेर

११ जुलै २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


उन्हाळ्यातल्या उकाड्यानंतर पाऊस हवाहवासा वाटतो. पण भारत वि न्यूझीलंड सेमीफायनलमधे पाऊस पडला. भारताच्या खिशात असलेला सामना हरला. आणि भारत वर्ल्डकपमधून बाहेर पडला. आपल्या हरण्याला पाऊस कारणीभूत आहेच. पण धोनीने अवलंबलेली सिंगल-डबलची स्ट्रॅटेजीसुद्धा आपल्याला महागात पडली.

मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफोर्डवर तब्बल दोन दिवस चाललेल्या वनडे वर्ल्डकपच्या पहिल्या सेमी फायनलमधे न्यूझीलंडने भारताचा १८ धावांनी पराभव केला. त्यामुळे न्यूझीलंडच्या संघाने सलग दुसऱ्या वर्ल्डकपमधे फायनल गाठण्याची किमया केली. तर आयसीसी वनडे रँकिंगमधे अव्वल असणाऱ्या भारताचं आव्हान सेमी फायनलमधेच संपुष्टात आलं. या सामन्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने विजयाचे बहुतांश श्रेय हे न्यूझीलंडच्या गोलंदाजांना दिलं. त्यांनी केलेल्या प्रभावी माऱ्यामुळे ते फायनलला जाण्यास पात्र असल्याचं सांगितलं.

डकवर्थ लुईसमुळे हरलो नाही

पण, या सामन्यात फक्त न्यूझीलंड चांगली खेळली नाही. तर भारतानेही काही चुका केल्या. त्यामुळेच भारताला ५० षटकात २४० धावाही करणं मुष्कील झालं. या सामन्याचे पहिले सत्र म्हणजे पहिला दिवस भारतीय गोलंदाजांनी आणि क्षेत्ररक्षांनी गाजवल्याचं विराटने कबूल केलं. त्यानंतर पावसामुळे सामना राखीव दिवसावर गेला.

पाऊस सुरु झाला त्यावेळी डकवर्थ लुईसच्या गणिती टार्गेटनुसार भारताची वाट बिकट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. पण पावसाने डकवर्थ लुईसलाही त्यांचे गणिती सुत्र अमलात आणायला संधी दिली नाही. दुसऱ्या दिवशी सामना जिथे थांबला होता तिथूनच सुरु झाल्यामुळे पराभवाचे खापर डकवर्थ लुईसवर फोडण्याचाही विषय संपला. त्यामुळे भारताच्या पराभवाला पाऊस आणि खराब कामगिरी कारणीभूत आहे.

हेही वाचा: अंबाती रायडूमधेच तोंडावर राजीनामा फेकून मारण्याची हिंमत

टीम इंडियाचा पावसाने घात केला

यंदाच्या वर्ल्डकपमधे पावसाने सातत्यपूर्ण खेळी केली. त्याने वर्ल्डकपच्या पहिल्या सेमी फायनलमधेही उपयुक्त खेळी करत वनडे सामना टू डे केला. यामुळे भारताचंच टेन्शन वाढलं. वरकरणी जरी सामना पूर्ण ५० षटकांचा झाला, भारताने न्यूझीलंडला २३९ धावांत रोखलं. त्यामुळे सामना भारताच्या खिशात असल्याचं आपल्याला वाटलं पण तसं झालं नाही.

कारण काल जवळपास सात आठ तास पाऊस पडला होता. त्यातच ग्राऊंड फक्त खेळपट्टी आणि आणि रन-अप पुरतंच कव्हर केलं होतं. त्यामुळे बाकीच्या ग्राऊंडवर सतत पडणारा पाऊस ड्राय विकेटलाही खुराक देवून गेला. याचा फायदा दुसऱ्या दिवशी पहिल्यांदा भारताने आणि नंतर न्यूझीलंडच्या बॉलर्सनी उचलला. त्यांनी नवीन बॉलवर भारताची फॉर्ममधे असलेली टॉप ऑर्डर अवघ्या ५ रन्समधे उडवली. त्यामुळे २४० रन चेस करताना भारतावर चांगलंच दडपण आलं.

हेही वाचा: टीम इंडियाला यशाचा टीळा लावणारे रवी शास्त्री मैदानावर आल्यावर गो बॅकचे नारे लागायचे

पंत-पांड्याची सेन्सलेस फलंदाजी

भारताचे पहिले ४ बॅट्समन २४ रन्सवर बाद झाल्यानंतर आलेल्या पंत आणि पांड्याने भारताचा डाव सावरला. या दोघांनी पहिल्या १०- १५ ओवर खेळून काढल्या. न्यूझीलंडच्या फास्ट बॉलर्सचा, नवीन बॉलचा स्विंग कमी होऊपर्यंत किल्ला लढवला. पण त्यानंतर विल्यम्सनने डावखुरा फिरकी गोलंदाज सँडनरच्या हातात चेंडू दिला. त्यावेळी पंत आणि पांड्याच्या तोंडला पाणी सुटले.

त्यांना जडेजा आणि चहलचाही बॉल फिरत होता हे ते विसरले. त्यातच पाऊस पडला होता विकेट नेहमीपेक्षा जास्त स्लो झाली होती. त्यामुळे या दोघांचाही अवेळी मोठा फटका मारण्याचा मोह घातकी ठरला. सँडनरने या दोघांनाही ३२ - ३२ धावांवर बाद केले. त्यामुळे सेट दोन्ही बॅट्समन बाद झाले आणि भारताचे रनरेट वाढत गेला.

हेही वाचा: झोपाळू रोहित शर्मा आळस झटकून जगातला टॉप बॅट्समन बनला

धोनीची सिंगल-डबलची स्ट्रॅटेजी फसली

पांड्या-पंत माघारी गेल्यानंतर शंभरीच्या आतच माघारी गेल्यानंतर जडेजा आणि धोनीने सातव्या विकेटसाठी ११६ रन्सची भागिदारी रचली. पण या भागिदारीत मोलाचा आणि मोठा वाटा होता तो रविंद्र जडेजाच्या झुंजार अर्धशतकी खेळीचा. त्याने ५९ बॉलमधे ४ फोर आणि ४ सिक्स मारत १३० च्या स्ट्राईक रेटने ७७ रन्सची खेळी केली. त्याचा पार्टनर महेंद्र सिंह धोनीने वर्ल्डकपमधे सतत टीका होत असलेली त्याची सिंग-डबल स्ट्रॅटेजी याही सामन्यात अवलंबली. त्यामुळे त्याचं बॉल आणि धावातले अंतर वाढत गेलं. त्यामुळे फक्त जडेजावरच फटकेबाजीचा भार आला. त्यातच तो ४८ व्या षटकात बाद झाला. मग धोनीच भारताचा तारणहार होता.

कधी काळी धोनी समाना अखेच्या ओवरपर्यंतच जाऊच द्यायचा नाही. तो सामना ४८-४९ व्या ओवरमधेच संपवायचा. पण त्याने आपली स्टाईल बदलत सामना अखेरच्या षटकापर्यंत नेण्यास सुरुवात केली. ज्यावेळी त्याचे स्ट्राईक रेट चांगले होते त्यावेळी ही स्ट्रॅटेजी योग्य वाटायची कारण तो आणि त्याचा पार्टनर अखेरच्या पाच ओवरमधे तुफान फटकेबाजी करायचे पण, गेल्या काही सामन्यात ही फटकेबाजी दुर्मिळ झाली होती. आजच्या सामन्यातही तेच झाले जडेजा बाद झालेल्या ओवरमधे फक्त ६ धावा झाल्या तो ओवर होता ४८ वा.

हेही वाचा: टीम इंडिया निळ्याऐवजी केशरी रंगाच्या जर्सीमधे का खेळणार?

आणि भारत वर्ल्डकपमधून बाहेर

त्यानंतर १२ बॉलमधे ३१ रन्स म्हणजेच रनरेट १५.५ वर पोचला. त्यावेळी धोनीने एक सिक्स मारला. आणि पुढचा बॉल डॉट गेला. फर्गुसनच्या बाऊन्सर टाकलेल्या तिसऱ्या बॉलवर धोनीला सरळ फटकाही मारता आला नाही. त्यातच दोन धावा घेण्याच्या नादात तो धावबाद झाला आणि भारताच्या हातून सामना गेला.

धोनीने ७२ बॉल खेळून ६९.४४ च्या स्ट्राईक रेटने ५० रन्सची खेळी केली. ही धोनी स्टाईलला साजेशी खेळी नव्हती. जर धोनीनेही अखेरच्या षटकात फटकेबाजी करण्यापेक्षा जडेजाबरोबरच हीच फटकेबाजी ४५ व्या षटकापासून केली असती तर सामन्याचा निकाल वेगळा लागण्याची शक्यता जास्त असती धोनीची ही सिंगल-डबल करण्याची स्ट्रॅटेजी दुसऱ्यांदा वर्ल्डकपमधे फेल झाली आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात ही स्ट्रॅटेजी फेल गेली होती भारताने सामना हरला. त्यानंतर आज ही स्ट्रॅटेजी पुन्हा फेल गेली आणि भारत वर्ल्डकपमधून बाहेर गेला.

हेही वाचा: 

मोदींमुळे ५ ट्रिलियन हा शब्द ट्रेंड झालाय, पण ट्रिलियन म्हणजे एकावर किती शून्य?

लिटल मास्टर गावस्करच्या सत्तरीनिमित्त हे तर वाचावंच लागेल

वर्ल्डकप सेमीफायनलमधे 'या' चार टीमला एंट्री मिळणार

आषाढी वारीनिमित्त पसरलेल्या वायरल विठ्ठलाची गोष्ट