पाऊस तर जगभर पडतो, पण भारतातला मान्सून जगावेगळा आहे!

०८ जून २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


भारतातल्या बहुतांश उद्योगधंद्यांचं गणित हे पावसाच्या येण्या न येण्यावर अवलंबून आहे. हा पाऊस म्हणजे जून ते सप्टेंबर या महिन्यात येणारा मॉन्सून. असा मॉन्सून जगातल्या अनेक देशात येतो. पण भारतासारखा मॉन्सून जगभरात कुठेच येत नाही. भारतासाठी इतका महत्त्वाचा असणारा हा मॉन्सून नेमका कसा तयार होतो, त्याची ही इंटरेस्टिंग गोष्ट.

भारत हा एक कृषीप्रधान देश आहे, असं म्हटलं जातं. भारतीय अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा वाटा शेती व्यवसायानं उचललाय. तसंच, भारतातला जास्तीत जास्त म्हणजे जवळपास ५९ टक्के रोजगार शेती आणि त्यासंबंधित व्यवसायातूनच उपलब्ध होतो. भारतातले बहुतेक उद्योगधंदे शेती व्यवसायावरच आधारित असतात. आणि शेती एका महत्त्वाच्या गोष्टीवर अवलंबून असते आणि ती म्हणजे मॉन्सून.

मॉन्सून हा शब्द अरेबिक भाषेतल्या ‘माऊसिम’ या शब्दापासून आलाय. माऊसिम म्हणजे वाऱ्याची दिशा बदलल्याने झालेला ऋतुबदल. सुरवातीला मॉन्सून हा शब्द दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणाऱ्या वाऱ्यांसाठी वापरला जात असे. अरेबियन खलाशी अरबी समुद्रातल्या वाऱ्यांची दिशा सांगायला या शब्दाला वापर करत होते. पण आता वर्षाच्या ठराविक वेळेत पडल्या जाणाऱ्या पावसाळ्याच्या ऋतुसाठी हा शब्द वापरला जातो.

मॉन्सूनमधे पडणारा पाऊस आणि इतरवेळी पडणारा पाऊस यात फरक असतो. कारण, मॉन्सूनचा पाऊस पडण्यामागे सुर्याचं वाढलेलं तापमान ही महत्त्वाची गोष्ट कारणीभूत असते. शिवाय, वाऱ्यांची दिशा कशी आहे यावरूनही पाऊस मान्सून आहे की नाही ते ठरतं. मॉन्सूनमधला पाऊस तयार होण्याची प्रक्रियाही वेगळी असते. त्यामुळे त्याचे चांगले परिणाम शेतीवर आणि नदी, नाले, झरे अशा पाण्याच्या साठ्यांवरही दिसतात. 

भारतासोबतच, मेक्सिको आणि नैर्ऋत्य अमेरिका, पश्चिम आफ्रिकेचा काही भाग, ब्रिटन, पश्चिम जर्मनी, उत्तर फ्रान्स, चीनचा भारतालगत असलेला भाग, कोरिया, जपान, फिलिपिन्स, विएतनाम आणि ऑस्ट्रेलियाचा काही भागातही मॉन्सून येतो. या सगळ्या देशात वर्षातल्या वेगवेगळ्या वेळी पाऊस पडतो. भारतात साधारणपणे जून ते सप्टेंबर या चार महिन्यात मॉन्सूनचा पाऊस येतो. त्यावेळी वाऱ्यांची दिशा नैर्ऋत्यकडून ईशान्यकडे म्हणजेच साधारण केरळपासून अरूणाचल प्रदेशाकडे अशी असते. या पावसावर भारतातल्या प्रत्येक माणसाचं जगणं अवलंबून असतं. त्यामुळेच असा आपल्यासाठी इतका महत्त्वाचा असणारा हा मॉन्सून नेमका कसा तयार होतो, हे समजून घ्यावंच लागेल.

हेही वाचा : जगात पर्यावरण आणीबाणी घोषित करा सांगणाऱ्या ग्रेटा ताईची गोष्ट

जमिनीचंही तापमान वाढायला हवं

कुणी म्हणेल पाऊस कसा तयार होतो ते आम्ही शाळेतच शिकलोय. सूर्याच्या उष्णतेनं पाण्याची वाफ होते. ती वाफ वर जाते तिथे तिला गारवा लागल्यामुळे पाणी असलेले ढग तयार होतात आणि ते ढग जमिनीवर येऊन पाऊस पाडतात. पावसाच्या निर्मितीचं हे साधं विज्ञान तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती असतं. पण हे ढग समुद्रातून जमिनीवर कसे येतात. भारतात फक्त उन्हाळ्यातच पाण्याची जास्त वाफ का होते आणि भारतात वेगवेगळ्या भागात वेगवेगळा पाऊस का पडतो अशा भन्नाट प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी पावसाचं सूक्ष्म विज्ञान समजून घ्यावं लागेल.

इंडियन ऍकेडमी ऑफ सायन्सच्या रेसोनन्स या मासिकाच्या मे २००७ च्या अंकात बंगळूरू इथल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधल्या प्राध्यापिका सुलोचना गाडगीळ यांचा एक लेख आहे. या लेखात दिलेल्या माहितीनुसार मॉन्सूनच्या पावसासाठी फक्त समुद्रातल्या पाण्याचंच नाही तर जमिनीचं तापमान वाढणंही गरजेचं असतं.

कारण पृथ्वीची रचना साधारणपणे जमीन आणि समुद्र अशी झालीय. शिवाय आकाशात हवेच्या दाबाचे पट्टेही असतात. सूर्याच्या उर्जेमुळे जमीन आणि समुद्रातलं पाणी यांचं तापमान एकसारखंच गरम झालं तर हवेतले दाबाचे पट्टे एका सरळ रेषेत राहिले असते. पण मुळात तसं होत नाही.

जमीन समुद्रात तापमान विसंगती

गाडगीळ यांनी लेखात सांगितल्याप्रमाणे, जमीन लवकर गरम होते आणि लवकर थंड होते. याउलट, पाण्याला गरम आणि थंड व्हायलाही वेळ लागतो. त्यामुळे जमिनीच्या तुलनेत समुद्रातल्या पाण्याचं तापमान कमी असतं. सूर्य आला की जमिनीवरच्या पृष्ठभागावरचा एकच थर गरम होतो आणि सूर्य मावळेपर्यंत किंवा सूर्याची प्रखरता कमी होईपर्यंत तो अजून अजून गरम होत राहतो. पण समुद्राच्या पहिल्या थरातलं पाणी गरम झालं की त्याची वाफ होते आणि त्या जागी खालचं गार पाणी घेतं. त्यांच्यात अशा प्रकारचं अभिरसण होत राहतं.
समुद्र आणि जमिनीचं तापमान असं वेगवेगळं होण्याला याला डिफरन्शिअल हिटिंग म्हणजेच तापमान विसंगती असं म्हटलं जातं. या तापमान विसंगतीचा परिणाम हवेच्या दाबावर होतो. ते एका सरळ रेषेत न राहता वर खाली होतात.

मॉन्सूनचा पाऊस निर्माण होण्यासाठी असं पोषक वातावरण लागतं. त्यात, जमिनीवरची हवा जास्त गरम असल्याने तिथे प्रेशर ग्रॅडिअन्ट म्हणजेच दबाबाची तीव्रता वाढते. थोडक्यात, दाबाच्या पहिल्या पट्ट्यातली हवा वर वर जाते. वर जाते म्हणजे, पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर चंद्रावर जाते, असं नाही. तर वायूमंडळाच्या शेवटच्या पट्ट्याला जाते आणि तिथे सगळीकडे पसरते. वर गेल्यामुळे ही हवा गार होते आणि तिथून वाहत समुद्राच्या बाजुने खाली येते. अशाप्रकारे या हवेचा आणि त्याबरोबर पाण्याच्या वाफेचा गोलाकार पद्धतीनं वर खाली होण्याचा खेळ चालू असतो.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?

साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

कोरोनाची शिकार कशी करायची हे वायरस हंटरकडून शिकायला हवं!

किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?

सूर्याचं उत्तरायण फायद्याचं

हिवाळ्यात सूर्य भारतापासून लांब असतो. तेव्हा पाण्यापेक्षा जमीन लवकर गार पडते. त्यामुळे जास्त दाबाचा पट्टा जमिनीवर तर कमी दाबाचा पट्टा समुद्रावर तयार होतो. अशावेळी वारे जमिनीकडून समुद्राकडे वाहत राहतात. पण उन्हाळ्यात वाफेच्या आणि हवेच्या गोलाकार खेळामुळे जमिनीवरची गरम हवा वर गेली की जमिनीवर कमी दाबाचा पट्टा तयार होतो. पुन्हा ती हवा वर जाऊन गार होऊन खाली समुद्रावर येते तेव्हा त्या हवेची घनता जास्त असते. साहजिकच, समुद्रावर जास्त दाबाचा पट्टा निर्माण होतो. असे वेगवेगळे दाबाचे पट्टे निर्माण झाल्यामुळे वारे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे म्हणजेच समुद्राकडून जमिनीकडे वाहू लागतात.

समुद्राकडून जमिनीकडे येणाऱ्या हवेत समुद्राच्या पाण्याची वाफ म्हणजेच आर्द्रता असते. ही आर्द्रता जमिनीवरच्या हवेच्या एकदम वरच्या दाबात गेली की थंड होते आणि त्यातून पाणी म्हणजेच पाऊस पडतो, असं गाडगीळ लिहितात.

गाडगीळ यांनी सांगितलेली ही प्रक्रिया एडमंड हॅले या शास्त्रज्ञाने मांडली होती. पण यासोबतच इंटरट्रॉपिकल कंर्वजस झोन तयार झाल्यामुळे मॉन्सूनचा पाऊस तयार होतो हे संशोधन नंतर काही शास्त्रज्ञांनी मांडलं. पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात आणि दक्षिण गोलार्धात वेगवेगळे वारे वाहत असतात. हे वारे ज्या ठिकाणी एकत्र येतात त्याला इंटरट्रॉपिकल कंर्वजस झोन असं म्हटलं जातं. साधारण उन्हाळ्याच्या दिवसात हा झोन भारताच्या भूमीवर येतो. इतरवेळी तो विषुवृत्त रेषेवर म्हणजे पृथ्वीच्या बरोबर मध्यभागी असतो.

पृथ्वी सूर्याभोवती फिरत असल्याने २१ मार्चपासून सूर्याचं उत्तरायण म्हणजेच पृथ्वीच्या उत्तरेकडे सरकणं चालू होतं. यावेळी सूर्याच्या एकदम समोर जो पट्टा असतो त्या पट्ट्यात भारत येतो. त्यामुळे एरवी विषूवृत्तावर मिळणारी उर्जा उन्हाळ्यात भारताच्या पट्ट्यात जास्त मिळू लागते. सहाजिकच, भारताची जमीन तापते, तिथे कमी दाबाचा पट्टा आणि भारताला लागून असलेल्या अरबी समुद्रात आणि पॅसिफिक महासागरात जास्त दाबाचा पट्टा तयार होतो. आणि वारे समुद्राकडून सूर्याकडे वाहू लागतात.

एकाचवेळी घडतात तीन घटना

थोडक्यात, भारतात मॉन्सून तयार होण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसांत एकाचवेळी तीन महत्त्वाच्या घटना घडत असतात. एक म्हणजे, सूर्यानं उत्तरेचा मार्ग धरल्याने भारतातल्या जमिनीचं तापमान वाढतं, तापमान विसंगती तयार होते आणि समुद्राकडून जमिनीकडे वारे वाहू लागतात. दुसरं, जमिनीवरचं तापमान वाढल्याने उत्तर आणि दक्षिण समुद्रातले दोन्हीकडचे वारे भारताच्या जमिनीवर एकत्र येतात. म्हणजेच इंटरट्रॉपिकल कंर्वजस झोन तयार होतो. आणि तिसरी घटना म्हणजे हिमालयावरचा जास्त दाबाचा पट्टा नाहीसा होतो.

इतरवेळी म्हणजे सप्टेंबर ते मार्चपर्यंत कर्कवृत्तावर सूर्याची उष्णता सगळ्यात जास्त असल्याने हिमालयाच्या भागात जास्त दाबाचा पट्टा निर्माण झालेला असतो. याला जेट स्ट्रिमचा भाग म्हटलं जातं. मार्चनंतर सूर्य उत्तरेकडे प्रवास करतो तसा हा जेट स्ट्रिमसुद्धा हिमालयाच्या उत्तरेकडे सरकतो आणि हिमालय ओलांडून चीनमधे जातो. यामुळे हिमालयावर कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो.

या तीन घटनांना साथ मिळते ती वाऱ्याची. अलनिनो म्हणजे पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवावरून वारे तिरके वाहत असतात आणि दक्षिण आफ्रिकेच्या समुद्रकिनारी येऊन धडकतात. तिथून ते वारे विषुवृत्त ओलांडून वर आले की आपली दिशा बदलतात आणि भारताच्या दिशेने वाहू लागतात. हे वारे फार लांबचा प्रवास करतात. आफ्रिकेच्या समुद्रकिनाऱ्यावरून निघालेले वारे सगळा समुद्र, भारत ओलांडून थेट चीनमधे घुसायचा प्रयत्न करतात. पण त्याआधीच तिबेटमधे उंचावर असलेल्या पठारामुळे त्यांना अडथळा निर्माण होतो आणि ते पुन्हा माघारी फिरतात.

हेही वाचा : इतिहास सांगतो, निसर्गातलं वैविध्य संपत असल्यानं जगावर वायरस संकट

केरळमधेच येतो पहिला पाऊस

असा अखंड प्रवास हे वारे करत असतात. पण दक्षिण आफ्रिकेकडून वारे येतात तेव्हा समुद्र पार करून भारतात घुसतात ते भारताच्या नैऋत्य भागाकडून म्हणजेच केरळमधून. ते येताना सोबत आर्द्रता म्हणजेच पावसाचे ढग सोबत आणतात. म्हणून पहिला पाऊस केरळमधे पडतो. अनेकदा बंगालच्या उपसागरातून पाऊस ईशान्य भारतातही दाखल होतो. पण शक्यतो केरळमधे पाऊस कधी येणार यावरून तो पुढे भारतातल्या इतर भागात कधी पोचणार याचा अंदाज लावला जातो.

महत्त्वाचं म्हणजे, भारत पृथ्वीच्या विषुववृत्ताच्या थोडासा वर असल्यामुळे हे सगळं व्यवस्थित जुळून येतं. भारताची भौगौलिक परिस्थिती भारतातल्या मॉन्सूनमागचं खरं कारण आहे. भारताच्या उत्तरेला हिमालय आहे. हिमालयाच्या पुढे म्यानमारमधे आराकान योमान ही पर्वतरांग तर पश्चिमेला पाकिस्तानमधे असलेली सुलेमान किर्थर या पर्वतरांगा आहेत. त्यामुळे भारताचा असा एक बंदिस्त प्रदेश तयार होतो.

या बंदिस्त प्रदेशात वरच्या भागात चीन, रशिया अशी मोठ्ठीच्या मोठ्ठी जमीन आहे. तर खाली भला मोठा पॅसिफिक महासागर आहे. जमीन, पाणी आणि सूर्याच्या उत्तरायणामुळे नेमकं उन्हाळ्यातच मिळणारं प्रखर ऊन अशी अभूतपुर्व परिस्थिती पृथ्वीवर इतर कुठेही तयार होत नाही. म्हणूनच भारतातला मॉन्सून हा जगातला सगळ्यात वेगळा ठरतो.

हवामान खात्याचा बिनचूक अंदाज

जगभरात भारत हा मुळातच वेगळा देश आहे. इथली भाषा वेगळी, संस्कृती वेगळी, राहणीमान वेगळं, लोक वेगळी. तसंच, इथला मॉन्सूनही सगळ्यात वेगळा. हा मॉन्सून इतका वेगळा आहे की याबद्दलची सगळीच्या सगळी माहिती आपल्याला अजूनही मिळालेली नाही. त्यामुळेही आपल्या हवामान खात्याचा पावसाचा अंदाज आता आतापर्यंत चुकायचा. यंदा मात्र तो बिनचूक ठरलाय.

मॉन्सूनचा अंदाज कसा लावायचा, तो येण्यासाठी पोषक वातावरण कोणतं, हवामानात काय बदल होतो किंवा अगदी मान्सूनचे ढग कसे तयार होतात वगैरे गोष्टी आपल्याला माहीत आहेत. यातून आपली आत्तापर्यंतची गरजही भागतेय. पण मॉन्सून आपल्यासाठी इतका महत्त्वाचा आहे की त्याची प्रत्येक छोटी गोष्ट जाणून घेण्यासाठी भारतात आजही भरपूर संशोधन केलं जातं.

हेही वाचा : 

कुछ वायरस अच्छे होते है!

कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?

माझे जिवीची आवडी, पंढरपुरा आकाशमार्गे नेईन गुढी

हवामान बदल हे मानवजातीच्या अस्तित्वासमोरचं मोठं आव्हान

अमेझॉनचं जंगल कसं आहे? आणि तिथले आदिवासी कसे राहतात?

कोरोनाच्या R0 नंबरवर आपलं, लॉकडाऊनचं भवितव्य अवलंबून आहे?

कोरोना काळात आपल्याला पेशंटचे १७ अधिकार माहीत असायला हवेत!

आरेतल्या वृक्षतोडीचा झाडं लावून निषेध करणाऱ्या चिंचणीची भन्नाट गोष्ट!