कुछ वायरस अच्छे होते है!

३० मे २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


माणसाला संसर्गजन्य आजार देणारी, त्यातून त्यांचा जीव घेणारी, लॉकडाऊन घडवून आणणारी गोष्ट म्हणजे वायरस अशी आपली ठाम समजूत झालीय. पण या समजूतीला खोटं ठरवणारे अनेक वायरस जगात आहेत. आपलं हे जगचं कोट्यवधी वायरसनी बनलंय. आणि यातले बहुतांश वायरस माणसाला मदत करणारे आहेत. अगदी माणसाला श्वास घ्यायलाही या वायरसचीच मदत होते.

वायरस म्हटलं की आपले कान टवकारले जातात. मनाचं सगळं लक्ष तिथे वेधलं जातं. वायरस या शब्दाने आता आपल्याला चांगलीच भीती घातलीय. वायरस म्हटलं की कुठलातरी आजार होणार, जगावर संकट येणार, लॉकडाऊन वगैरे होणार, माणसांचे जीव जाणार असंच आपल्याला आता वाटतं. पण सगळेच वायरस काही वाईट नसतात.

खरंतर, पृथ्वीवरचा कुठल्याही जीवाचा या न त्या मार्गाने निसर्गाला उपयोग होतोच. निसर्गात अनेक प्रकारचे वायरस असतात. पृथ्वीवरच्या हजारो वायरसपैकी फक्त काही वायरसच माणसाला इजा पोचवतात. बाकी वायरस माणसाच्या शरीरात गेले तरीही माणसाचं काहीही वाकडं करू शकत नाहीत. उलट, ते माणसासाठी आणि निर्सगासाठी उपयोगीच पडतात. शास्त्रज्ञांच्या मते, कोट्यवधी वर्षांपासून म्हणजे माणसाच्याही आधीपासून हे वायरस पृथ्वीवर राहतायत. त्यातल्या अनेक वायरसने तर माणसाला त्यांच्या उत्क्रांतीत मदतही केलीय. थोडक्यात, काय तर, कुछ डाग अच्छे हैं, तसं काही वायरस चांगलेही असतात.

हेही वाचा : इतिहास सांगतो, निसर्गातलं वैविध्य संपत असल्यानं जगावर वायरस संकट

वायरस जिवंत नसतातच

माणसाच्या संसर्गजन्य आजाराला कारणीभूत असणारा एक जीव अशी वायरसची व्याख्या आपल्या सगळ्यांना माहीत आहे. संसर्गजन्य रोगाचं कारण एक वायरस असतो हे साधारण १९व्या शतकात वायरसवरती संशोधन सुरू झाल्यावर माणसाला कळालं. त्यावेळी वायरसचा अभ्यास फक्त संसर्गजन्य रोगांच्या दृष्टीकोनातून केला जात होता. मात्र २०व्या शतकाच्या सुरवातीला हे वायरस निसर्गात कोणकोणती भूमिका बजावतात यादृष्टीनेही संशोधक विचार करू लागले.

तंत्रज्ञान विकसित होऊ लागलं तसतशी या वायरसची अधिकाधिक माहिती मिळत गेली. त्याप्रमाणे वायरसच्या व्याख्येतही बदल होऊ लागले. अलीकडे जेनेटिक इन्फोर्मेशन किंवा कोड असलेला आणि या जेनेटिक कोडचं संरक्षण करण्यासाठी एक आवरण असलेला एक छोटासा रेणू किंवा कण म्हणजे वायरस अशी वायरसची व्याख्या केली जाते.

प्रजनन करणं हे अशा वायरसचं एकमेव काम असतं. त्यासाठी ते एखाद्या पेशीला चिकटतात आणि त्या पेशीमधे आपलं जेनेटिक मटेरिअल सोडतात. काही वायरस पेशीमधे घुसून तिथे रेंगाळत राहतात आणि संधी मिळताच पेशीचा डीएनए काढून त्या जागी आपला डीएनए ठेवतात. साहजिकच पेशी या नव्या डीएनए मटेरीअलचं प्रजनन करते म्हणजेच नवे वायरस बनवते. काही वेळा तर हे वायरस पेशीला हायजॅक करतात आणि तिचं सगळं वागणं नियंत्रित करू लागतात.

हे वायरस जिवंत नसतातच असं अनेक शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. पण या ग्रहावर सगळ्यात जास्त संख्या कुणाची असेल तर ती या वायरसचीच आहे असं म्हणावं लागेल. त्यातले काही वायरस इतके छोटे असतात की पृथ्वीवरच्या समुद्रातले सगळे वायरस एकाखाली एक मांडले तर ती रांग पृथ्वीवरून मंगळापर्यंत जाऊन परत येईल, असं साऊथ फ्लोरिडा युनिवर्सिटीतले संशोधक म्या ब्रेईटबार्ट यांचं म्हणणं सायन्स इनसाईड यावेबसाइटवरच्या एका लेखात आलंय. एवढंच नाही, तर मंगळापासून पृथ्वीपर्यंतच्या १२ कोटी रांगा हे वायरस तयार करतील, असंही ते म्हणतात.

माणसाचा खरा दोस्त

समुद्रातही सगळ्या जीवजंतुंमधे वेगवेगळ्या प्रकारच्या वायरसचंच प्रमाण जास्त आहे. हे वायरस फक्त समुद्रातच नाही तर पृथ्वीवर आपल्या आजुबाजुला सगळीकडे असतात. इनसाईड सायन्स या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार आकाशात अंदाजे १० चा २३ वा वर्ग एवढे तारे आहेत. तर पृथ्वीवर १० चा ३१ वा वर्ग इतके वायरस राहतात. या वायरसनंतर सगळ्यात जास्त संख्या असलेला जीव म्हणजे बॅक्टेरिया किंवा जिवाणू.

‘समुद्राच्या ओंजळभर पाण्यात जवळपास २०० दशलक्ष वायरस असतात. आणि तेवढ्याच पाण्यात २० दशलक्ष जिवाणू असतात.’ असं अमेरिकेतल्या बॉटॉन रॉग युनिवर्सिटीतल्या समुद्रशास्त्रज्ञ जेनिफर ब्रुम यांचं म्हणणं इनसाईड सायन्स या वेबसाईटवरच्या लेखात मांडलं गेलंय. काही जिवाणू हे माणसासाठी चांगले असतात तर काही अतिशय घातक असतात. तसंच, वायरसचंही असतं. पण महत्त्वाचं असं की माणसासाठी घातक असणाऱ्या जिवाणूंची संख्या मर्यादित ठेवण्याचं काम काही वायरस करतात.

निसर्गात असणाऱ्या या जिवाणूंनाही माणसाप्रमाणे वायरसची लागण होते, असं जेनिफर म्हणतात. माणसाला खाण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या अनेक गोष्टीवर आणि हवेत हे जिवाणू असतात. त्यांच्या उपस्थितीमुळे त्या अन्नाची रासायनिक प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे वायरसची लागण या जिवाणूंना होते तेव्हा ही प्रक्रिया कमी होते. त्यामुळे अन्नामधले, हवेतले पोषक घटक तसेच राहतात असं जेनिफर सांगतात.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?

साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

कोरोनाची शिकार कशी करायची हे वायरस हंटरकडून शिकायला हवं!

किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?

माणसाचे आजारही थांबवतात वायरस

वायरस हे माणसाचे शत्रु म्हणण्यापेक्षा खरंतर मित्रच म्हणायला हवेत. कारण, जगात असलेल्या हजारो वायरसपैकी काही मोजकेच वायरस माणसाला आजारी पाडतात. उरलेले अनेक वायरस माणसाच्या कामालाच येतात. उलट हे वायरस जिवाणूंचे एक नंबरचे शत्रु असतात. आपल्या पचनसंस्थेत असे अनेक जिवाणू असतात. त्या जिवाणूंमुळे माणसाला पचनसंस्थेचा संसर्ग होतो.

पचनसंस्थेतल्या या जिवाणूंवर हल्ला करणारे अनेक वायरस आपल्याला या संसर्गापासून वाचवतात, अशी माहिती पेनिसेल्विया स्टेट युनिवर्सिटीतल्या प्राध्यापिका मारिलीन रोसनिक यांनी सायन्स डेली या वेबपोर्टलवरच्या एका लेखात लिहिलीय. मुख्य म्हणजे, पचनसंस्थेत असलेल्या या वायरसपैकी एकाही वायरसचा माणसाला त्रास झाल्याचं एकदाही समोर आलेलं नाही. त्यामुळेच, पचनसंस्थेचा एखादा आजार झाला असेल तर त्या माणसाच्या शरीरात हे वायरस सोडून त्याला बरं करता येऊ शकतं का अशा उपचारपद्धतीवर सध्या अनेक ठिकाणी संशोधन सुरू आहे.

माणसाच्या शेंबडात म्हणजेच म्युकसमधेही अनेक प्रकारचे वायरस असतात, असं रोसनिक सांगतात. या म्युकसमधे म्युकिन्स नावाचा एक रेणू असतो. हा रेणू प्रथिनं आणि साखर यांनी बनलेला असतो. शिवाय काही रसायनांचं आवरण त्याभोवती असतं. म्युकिन्सना त्यामुळे शरीरात आलेल्या सुक्ष्मजंतूशी लढता येतं. म्युकसमधे असलेले अनेक वायरस म्युकिन्समधली ही साखर धरून ठेवतात. आपल्या लाळेतही असे वायरस असतात. ते जिवाणूंना मारून टाकतात आणि आपले दात किडण्यापासून वाचवतात.

म्हणून आपण अंडी घालत नाही

शिवाय, या जगाची उत्क्रांती होण्यामागे किंवा या जगात पाण्यात पहिला जीव निर्माण होण्यामागे ज्या गोष्टी कारणीभूत होत्या त्यात या वायरसचा महत्त्वाचा सहभाग होता. माणसाच्या उत्क्रांतीतही या वायरसचा मोठा वाटा असल्याचं मानलं जातं. चिंम्पाझीचा माणूस झाला तेव्हा त्या चिंम्पाझीकडून ३० टक्के प्रथिनं आपण घेतली. ती घेणं काही वायरसमुळे शक्य झालं, असं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे.

रेट्रो वायरसकडून आलेल्या एका प्रथिनामुळे माणसाची मज्जासंस्था निर्माण झाल्याचं इनसाईड सायन्सच्या वेबसाईटवर लिहिण्यात आलंय. शिवाय, उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार पृथ्वीवरचे सगळे प्राणी पहिले अंडी घालत होते. पण अंड्यांचं संरक्षण करणं त्यांच्यासाठी अवघड होत होतं. म्हणून आधी अंडी घालून मग त्यातून पिल्लू बाहेर आल्यानंतर त्या पिल्लाची देखभाल करायची ही लांबलचक प्रक्रिया टाळण्यासाठी अनेक प्राणी पोटातच पिल्लांना वाढवून मग त्यांना जन्म देऊ लागले. त्यातून पिल्लू जन्माला घालणारे सस्तन प्राणी आणि अंडी घालणारे अंडज प्राणी अशी प्राण्यांची विभागणी झाली.

ही उत्क्रांती शक्य झाली ती सिन्सिटिन या वायरसमधल्या एका प्रथिनामुळे. प्राचीन रेट्रोवायरसमधे हे प्रथिन मुबलक प्रमाणात आढळत असे. तिथून हे प्रथिन आपल्या जेनेटिक मटेरिअलमधे घातलं गेलं. आपल्या पोटातल्या गर्भाला पोटा सुरक्षित ठेवण्यासाठी हे वायरस मदत करत असतं. आपल्याला आज अंडी घालावी लागत नाहीत यासाठी या वायरसला आपण थँक्य म्हटलंच पाहिजे!

हेही वाचा : टोमॅटो फ्रिजमधे ठेवणं योग्य नाही, असं शास्त्रज्ञ का म्हणतात?

वायरस ऑक्सिजन देतात

पण वायरस फक्त माणसालाच नाही तर निसर्गातल्या अनेक जिवांना उपयोगी असतात. आश्चर्य म्हणजे, झाडांप्रमाणे काही वायरसना फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण करण्याची शक्ती असते. अमेरिकेतल्या लेसिस्टर युनिवर्सिटीतल्या मार्था क्लॉकी यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत २००३ मधे केलेल्या संशोधनातून हे समोर आलंय.

क्लॉकी यांना एका वायरसमधे प्रकाश संश्लेषण करण्याची शक्ती झाडांच्या पानांना देणारं पीएसबीए हे जेनेटिक मटेरीअल सापडलं. हे वायरस समुद्रातल्या सायनोबॅक्टेरिया या जिवाणूला लागण करतात. सायनोबॅक्टेरिया हे जिवाणू झाडांप्रमाणे प्रकाश संश्लेषण करू शकतात. प्रकाश संश्लेषण म्हणजे झाडांची पानं सुर्यप्रकाश शोषून घेऊन त्याचं रुपांतर कार्बोहायड्रेट म्हणजे कर्बोदकांमधे करतात. या प्रक्रियेत भरपूर ऑक्सिजन तयार होतो आणि पानांप्रमाणे हे जिवाणूही तो ऑक्सिजन हवेत सोडतात.

वायरसमधल्या पीएसबीए या जेनेटिक मटेरीअलमुळे सायनोबॅक्टेरिया या जिवाणूला लागण झाल्यानंतरही प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया चालूच राहते, असं क्लॉकी यांनी केलेल्या संशोधनातून समोर आलं. इतकंच नाही, तर वारविक युनिवर्सिटीत झालेल्या काही संशोधनातून ही प्रक्रिया नुसती चालूच राहत नाही तर वायरसची लागण न झालेल्या जिवाणूंपेक्षा दुप्पट वेगाने होते, हे स्पष्ट झालं. 

आपल्या वातावरणात असलेल्या ऑक्सिजनपैकी एक तृतीयांश ऑक्सिजन या सायनोबॅक्टेरीया निर्माण करत असतात. जगभरातल्या सायनोबॅक्टेरीया जिवाणूंपैकी जवळपास निम्म्या जिवाणूंना या वायरसची लागण झालेली असते. थोडक्यात, माणसाने प्रत्येक आठ श्वासानंतर आत घेतलेला एक श्वास हा या वायरसमुळे आलेला असतो, असं क्लॉकी म्हणतात.

वायरसमुळेच टिकलीय निसर्गातली जैवविविधता

झाडांना आणि वनस्पतींना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जगायलाही वायरस मदत करतात. अत्यंत उष्ण वातावरणात जगणाऱ्या वनस्पतींना एवढ्या उष्ण हवेत आणि गरमागरम मातीत जगण्यासाठी बुरशी आणि वायरसची मदत होत असते.

आपली एक वायरसची फौज निर्माण करून सततच्या हवामान बदलांना तोंड द्यायला वनस्पती तयार होतात. मातीत पुरेसा नायट्रोजन असेल तर स्वतःच्या आतमधे वेगळा नायट्रोजन तयार करून आपली उर्जा घालवण्यापासून हे वायरस तीन पाती गवताला थांबवतात. वायरस एवढं सगळं काम करत असले तरीही आपल्याला या वायरसच्या जगाची अजून पुरेशी माहितीच झालेली नाहीय. म्हणूनच, वायरसवरती अधिकाधिक संशोधन होण्याची गरज आहे.

सर्वात पहिले या वायरसमधेच किती जैवविविधता आहे, किती वेगवेगळे प्रकार आहेत ते शोधावं लागेल. जगभरातल्या युनिवर्सिटींनी हे काम हाती घेतलंय. मात्र, या वायरसमुळे किती प्रकारची जैवविविधता निसर्गात जन्माला येते याचाही शोध घ्यायला हवा. काही चांगल्या वायरसविषयीची माहिती आपल्याजवळ असायलाच हवी.

हेही वाचा : 

कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?

कोरोना पॉझिटिव आलो तरी आम्ही घरीच राहिलो, कारण

कोरोनाच्या काळात जन्मलेल्या मुलाला काय म्हणायचं बरं?

एडवर्ड जेन्नरः देवी संपवणाऱ्या या देवमाणसाने लसीकरण शोधलंय

कोरोनाच्या R0 नंबरवर आपलं, लॉकडाऊनचं भवितव्य अवलंबून आहे?

कोरोना काळात आपल्याला पेशंटचे १७ अधिकार माहीत असायला हवेत!

साथरोग आला म्हणून मासिक पाळी थांबत नाही, उलट गुंतागुंतीची बनते!

दीपिका सांगतेय, लॉकडाऊनमधे मानसिक आरोग्य सांभाळण्याच्या १५ टिप्स