‘माझ्या नवऱ्याची बायको’ आणि ‘आई कुठे काय करते’ या तशा एकाच विषयावरच्या मालिका. नवरा आपल्या साध्या बायकोला सोडून मॉडर्न, स्मार्ट मुलीच्या प्रेमात पडतो आणि त्यामुळे गृहिणीत कसा बदल होतो हेच राधिका आणि अरुंधतीच्याही गोष्टीतून दिसतं. पण तरीही राधिकापेक्षा अरुंधती वेगळी आहे. तिचं हे वेगळेपण समाजात बाईविषयी नेमके काय समज असतात याची अनेक गुपितं उघड करणारं आहे. म्हणूनच आपणही ते समजून घ्यायला हवं.
‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही झी मराठीवरची अतिशय गाजलेली मालिका. टीआरपीच्या स्पर्धेत या मालिकेनं सुरवातीपासूनच आपली आघाडी टिकवून ठेवली. पण अलिकडेच प्राईम टाइममधून ही मालिका मागे फेकली गेली. पूर्वी रात्री ८ वाजता लागणारी ही मालिका गेल्या सोमवारपासून संध्याकाळी ६:३०ला लागते. तर दुसरीकडे त्याच विषयावरच्या स्टार प्रवाहवर लागणाऱ्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेला भरभरून प्रतिसाद मिळतोय.
‘माझ्या नवऱ्याची बायको’ आणि ‘आई कुठे काय करते’ या दोन्ही मालिकांची गोष्ट जवळपास सारखीच आहे. ऑफिसमधल्या स्मार्ट, मॉडर्न, उद्धट, आत्मकेंद्री बाईशी असलेले नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध कळल्यानंतर सुरू होणारा आदर्श गृहिणीच्या अस्तित्वाचा, आत्मभानाचा प्रवास. कमी अधिक प्रमाणात हीच दोन्ही मालिकांची थीम.
या थीमवर फक्त मराठीतच नाही तर हिंदी, कन्नड, गुजराती, बंगाली, पंजाबी, भोजपुरी सगळ्याच भाषांमधे मालिका झाल्यात. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मूळ मालिकेचा रिमेक करून झीच्या कन्नड आणि पंजाबी भाषेतल्या चॅनेलवरही लागतो. तिथंही या मालिका जबरदस्त चालतात. तर ‘स्रीमोई’ या मूळ बंगाली मालिकेचा मराठीत ‘आई कुठे काय करते’ आणि नंतर हिंदीत ‘अनुपमा’ हा रिमेक करण्यात आला.
मध्यंतरी रोमँटिक मालिका फार लागायच्या. तसंच आता विवाहबाह्य संबंध दाखवणाऱ्या मालिकांचं पीक आलंय. यातून देवाच्याही मालिका सुटत नाहीत. खंडोबाची दोन बायकांची मालिका तर गाजतेच. या शिवाय, विठ्ठलाच्या मालिकेतही विठ्ठलला भुरळ घालू पाहणारी सत्यभामा आणि त्यामुळे असुरक्षित वाटून घेणारी रूक्मिणी दाखवावीच लागते. मागे शंकराच्या हिंदी मालिकेतही गंगा, शंकर आणि पार्वतीचा लव ट्रँगल दाखवलेला.
इतर विषयावर निघालेल्या मालिकांनाही त्यांच्या मुख्य नायिकेच्या आयुष्यात नवऱ्याच्या विवाहबाह्य संबंधाचं दुःख देण्याचा मोह आवरत नाही. ‘डोली अरमानों की’, ‘कुमकुम भाग्य’ अशा अनेक हिंदी मालिकांची नावं घेता येतील. आपल्याकडेही ‘सुंदरा मनामधे भरली’ किंवा ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ असो किंवा झी मराठीवरची ‘कारभारी लै भारी’ असो. नवऱ्याच्या मैत्रिणीशिवाय कथाच पुढे जात नाही.
हेही वाचा : लोक आपापल्या सोयीपुरता स्त्रीवाद का मांडतात?
‘तुमची करमणूक कशात होते त्यातून तुमची संस्कृती दिसते. सावित्रीबाई फुलेंच्या, बाबासाहेब आंबेडकरांच्या मालिकांना टीआरपी मिळत नाही. पण त्याउलट या मालिकांना भयंकर टीआरपी असतो. कारण, इथल्या प्रत्येक बाईला वाटतं की समोरच्या मालिकेतली राधिका किंवा अरुंधती म्हणजे आपणच आहोत. ही आपलीच गोष्ट आहे. आपल्या आयुष्यातही असंच होतंय किंवा झालं होतं किंवा होऊ शकेल,’ असं ‘मिळून साऱ्याजणी’ या मासिकाच्या संपादक गीताली वि. मं. यांनी कोलाजशी बोलताना सांगितलं.
फक्त बायाच नाही तर घराघरातले पुरुषही या मालिका आवडीने पाहत असतात. म्हणूनच ‘या मालिकांमधून पुरुषांना आपल्या सुप्त इच्छा, आकांक्षा पूर्ण झाल्यासारख्या वाटतात असं का म्हणू नये?,’ असा प्रश्न ‘सम्यक’ या महिलांसाठी काम करणाऱ्या एनजीओचे कार्यकारी अध्यक्ष आनंद पवार विचारतात.
‘हे पुरुषसत्तेचं विचित्र प्रकटीकरण आहे. बायांबद्दलचा असा भेदभाव स्थापन करायला पुरुषसत्तेतल्या लोकांना आवडत असतं. घरातली बाई फक्त काम करणारी आणि बाहेरची बाई फक्त सुंदर दिसणारी असावी हे पुरुषांच्या मनातही असतं. आम्ही महाराष्ट्रासह यूपी, बिहारमधल्या खेडेगावात काम केलं. तिथल्या ‘रोज रोज दाल चावल कौन खायेगा?’ या मानसिकतेतल्या पुरुषांना तर या मालिका फारच आवडतात. ते कदाचित प्रत्यक्षात पूर्ण करू शकणार नाहीत अशा गोष्टी पडद्यावर पूर्ण झालेल्या पाहणं पुरुषांना आवडतं.’ असंही ते पुढे म्हणाले.
मालिका समाजाचा आरसा असतात की या मालिकांचा प्रभाव समाजावर पडत असतो या प्रश्नाचं उत्तर देणं फारच अवघड आहे. अशा मालिकांचा काही एक परिणाम त्या पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या मनावर होत असतो. ‘या मालिकांमुळे काय होतं तर ती पाहणाऱ्या बाया स्वतःला पुरुषसत्तेच्या चौकटीत अधिकाधिक बसवण्याचा प्रयत्न करू लागतात,’ असं गीतालीताईंचं म्हणणं आहे.
म्हणजे असं की, नवरे मॉडर्न बाईच्या प्रेमात पडतात तर आपणही मॉडर्नच राहिलं पाहिजे, स्लीम, सुंदरच दिसलं पाहिजे असं तिला सतत वाटू लागतं. यासोबतच नायिकेसारखं सोज्वळ राहण्याचं, कुणी कसंही वागलं तरी सगळ्यांशी चांगलंच वागत राहण्याचं प्रेशरही तिच्यावर येतं. नवऱ्याच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक बाईला ती आपली शत्रू मानते. हे सांस्कृतिक राजकारण या मालिका उत्तम पद्धतीने रूजवतात. खरा प्रेक्षक या मालिकेला नाही तर या राजकाणालाच मिळत असतो.
हेही वाचा : सिमोन द बोव्हुआर: महिलांनो, आपण हिचं फार मोठं देणं लागतो!
‘माझ्या नवऱ्याची बायको’ आली तेव्हा तिनेही अशाच प्रकारचं राजकारण समोर आणलं. त्यामुळं ती फार चालली. पण ‘आई कुठे काय करते’ कानामागून आली आणि तिखटच झाली. आत्तापर्यंत झालेल्या विवाहबाह्य संबंध दाखवणाऱ्या मालिकांमधे ‘आई कुठे काय करते’ त्यातल्या त्यात वेगळी आहे, असं म्हणता येईल. तिचं हे वेगळेपण समाजात बाईविषयी नेमके काय समज असतात याची अनेक गुपितं उघड करणारं आहे. म्हणूनच ‘माझ्या नवऱ्याची बायको’सारख्या मालिकांशी तुलना करत ते समजून घेणं फार गरजेचंय.
पहिले ‘माझ्या नवऱ्याच्या बायको’ची गोष्ट पाहू. राधिका, तिचा नवरा गुरुनाथ आणि त्यांचा सात आठ वर्षांचा लहान मुलगा अथर्व यांचं कुटुंब. गुरुनाथ शनाया नावाच्या एका तरूण, अविवाहित मुलीच्या प्रेमात पडलाय. तो घरी वेळ देत नाही, शनायावर खूप पैसे खर्च करतो. राधिकाला हे कळतं तेव्हा अनेक दिवस ती हे मान्यच करू शकत नाही. हळूहळू ती बदलते. मोठी उद्योजिका होऊन गुरुनाथला धडा शिकवते.
दुसरीकडे ‘आई कुठे काय करते’ मधली अरुंधतीही राधिकासारखीच साधी राहणारी आहे. घरातली, बाहेरची नाती जपणारी आहे. ती दोन मुलांची आणि एका मुलीची आई आहे. घरात सासू सासरेही आहेत. अनिरुद्ध हा तिचा नवरा गेली १२ वर्ष संजना या त्याच्या ऑफिसमधल्या सहकारी मैत्रिणीच्या प्रेमात आहे. ही गोष्ट अरुंधतीला कळाल्यावर तिचा आत्मसन्मान जागृत होतो. घरचं सांभाळत नवनवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न अरुंधती करतेय. आता लवकरच अरुंधती आणि अनिरुद्धचा घटस्फोट होईल असं दिसतंय.
‘पुन्हा स्त्री उवाच’ या ऑनलाईन अंकाच्या संपादक आणि स्त्रीवादी कार्यकर्त्या वंदना खरे म्हणतात, ‘आई कुठे काय करते ही मालिका अतिशय वेगळ्या पद्धतीने हाताळली गेलीय. आधी झालेल्या अनेक मालिकांच्या तुलनेत अरुंधतीचा प्रवास जरा जास्त समजूतदारपणे दाखवला जातोय.’
‘माझ्या नवऱ्याची बायको’मधे सुरवातीपासूनच नुसता मेलोड्रामा दाखवण्यात आला. आपण विवाहबाह्य संबंधाचा प्रश्न पुढे आणतोय असं भासवणाऱ्या या मालिकेनं त्या प्रश्नाचं सुलभीकरणही करून टाकलं. ‘बाईला घराबाहेर काढलं जातं तेव्हा तिला खूप त्रास सहन करावा लागतो. नवऱ्याने टाकेलल्या बाईला सहज कुणीही घरात प्रवेश देत नाही. पण राधिकाला घराबाहेर काढल्यानंतर कितीतरी महिने ती शेजाऱ्यांकडे राहते,’ असं खरे कोलाजशी बोलताना सांगत होत्या.
‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका विनोदी अंगाने गेली. त्यामुळे एखाद्या बाईला तिचा नवरा फसवतोय या विषयाचं गांभीर्यच त्यात राहिलं नाही. कधी राधिकाच्या भाषेचा तर कधी शनायाला स्वयंपाक येत नाही या गोष्टीचा विनोद करून प्रेक्षकांना हसवण्याचा प्रयत्न केला. ‘आई कुठे काय करते’ ही जास्त गंभीर मालिका आहे. त्यामुळेच त्यात या प्रश्नाचं गांभीर्य अधोरेखित होतं. अरूंधतीला गर्भाशयाचा आजार झाल्याचं दाखवलंय. शिवाय या सगळ्या ताणामुळे तिला डायबेटिस सुरू होतो असंही आहे. हा फार महत्त्वाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केलाय,’ असंही वंदना पुढे म्हणाल्या.
हेही वाचा : बायका आंदोलक बनून रस्त्यावर उतरतात, त्याचा अर्थ पुरुष कसा लावणार?
या दोन्ही मालिकेत चांगल्या आणि वाईट बाईच्या व्याख्या अगदी नक्की केल्यात. ‘करिअर करणारी, आणि अमुक एक प्रकारचे कपडे घालणारी बाई ही नेहमी वाईटच असणार हे सगळ्याच मालिकांमधे दाखवलं जातं. एखादी व्यक्ती खूप चांगली, तर दुसरी व्यक्ती अतिशय वाईट असं प्रत्यक्ष आयुष्यात कधीच नसतं,’ असं महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ म्हणजेच मासूम या संस्थेचे माजी कार्यक्रम अधिकारी मिलिंद चव्हाण म्हणतात.
घरातल्या सगळ्या बाया सुगरण आणि बाहेरच्या बायांना साधा चहाही करता येत नसतो. ‘आई कुठे काय करते’ आणि ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या दोन्ही मालिकेत अशा पद्धतीने पात्रांना काळं पांढरं केलेलं दिसतं. स्वयंपाक हे बाईचंच काम असं समजणाऱ्या समाजात साधा चहाही करता येत नाही, कधीच स्वयंपाकघरात गेली नाही अशी कोणती बाई असते का? असा प्रश्न चव्हाण विचारतात.
पण त्यातल्या त्यात आई कुठे काय करते मधली संजना वेगळी दाखवलीय, असं वंदना खरेंचं म्हणणं आहे. ती कधीही कटकारस्थानं करत नाही. वंदना खरे म्हणतात, ‘सुरवातीला शनाया म्हणजे शॉपिंग करणारी, दुसऱ्याच्या पैशावर जगणारी अशी मुलगी दाखवली होती. पण संजना अशी नाही. एका लग्न झालेल्या माणसाशी नातं जोडताना बाईची काय बाजू असते तसं तिचं काही एक म्हणणं आहे. ती स्वावलंबी आहे.’
असं असतानाही शनायासारखाच संजनालाही वाईट ठरवण्याचा प्रयत्न ‘आई कुठे काय करते’ मधेही केलाय. ‘कुणालाही वाईट न ठरवता विवाहबाह्य संबंध आणि त्यानंतर गृहिणीचा प्रवास दाखवता येऊ शकतो. १९९८ च्या सुमारास स्टार प्लसवर सांस नावाची नीना गुप्ताची मालिका लागायची. त्यात हा मुद्दा अतिशय तरल पद्धतीने आलेला दिसतो,’ असं वंदना खरे यांनी सांगितलं.
माझ्या नवऱ्याची बायकोमधे लग्नसंस्थेचं फारच गौरवीकरण केलंय. गुरुनाथ आणि शनायाबद्दल कळल्यानंतरही राधिका तिचं लग्न वाचवायचा खूप प्रयत्न करत असते. राधिका सगळ्यांचंच लग्न लावत असते. स्वतःही पुन्हा वाजत गाजत लग्नच करते. शनायाचंही भलं करायचं म्हणून पुन्हा तिचं लग्नच लावून देते.
‘याऐवजी आई कुठे काय करते मधे संजना लग्नाची मागणी घालते तेव्हा कुणीच कुणाच्याच लग्नात सुखी नाही, अशा पद्धतीचं एक म्हणणं पुढे येतं. अगदी उघडपणे नाही पण आडून आडून लग्नसंस्थेचा फोलपणा दाखवण्याचे प्रयत्न त्या मालिकेत झालेत,’ असं वंदना खरे यांचं निरीक्षण आहे.
हेही वाचा : चला, समतेच्या सॅनिटायझरनं पुरुषी वर्चस्वाचा वायरस मारून टाकूया
म्हणूनच राधिकापेक्षा अरुंधती जास्त वेगळी आहे. कारण अरुंधती साच्यात बसलेली असूनही चौकटीच्या बाहेरची आहे. अरुंधती ही नुसती साधी, सोज्वळ नाही. प्रसंगी ती मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी आई आहे. आपल्या मुलीचा विनयभंग करणारा मुलीच्या कॉलेजातला मुलगा नातेवाईक असला तरी ती त्याला सगळ्यांसमोर कानाखाली मारू शकते. इतकंच नाही तर नवऱ्याशी घटस्फोट घेतलेल्या, बलात्कार झालेल्या मुलीला म्हणजे अनघाला आपल्या घरात आणते. आपल्या मुलाशी तिचं लग्न व्हावं म्हणूनही प्रयत्न करते.
नवऱ्यानं फसवलंय हे लक्षात आल्यानंतर ती त्याला माफ करत नाही. किंवा तोच कसा चांगलाय आणि त्या दुसऱ्या बाईनंच कसं त्याला नादाला लावलंय, असंही म्हणत नाही. त्याच्याशी लढण्याचा अहिंसक मार्ग स्वीकारते. त्याला डबाच देणं बंद करते.
संजनाशी संबंध ठेवण्याचं स्पष्टीकरण अनिरुद्ध तिला देतो. त्याच्या मानसिक, भावनिक, बौद्धीक गरजा अरुंधतीसारखी गावंढळ बायको पूर्ण करू शकली नसती, असं तो म्हणतो. तेव्हा माझ्या गावंढळ राहणाऱ्यालाही तुम्हीच जबाबदार आहात हे चोख प्रत्युत्तर समस्त बायकांच्या वतीनेच आपल्या नवऱ्याला देण्याची हिंमत अरुंधती दाखवते.
नवऱ्यानं फसवल्याचं कळाल्यावर अरुंधती पहिले स्वतःसाठी वेळ काढते. तिच्या राहिलेल्या, न राहिलेल्या इच्छा पूर्ण करू लागते. फोर व्हिलर चालवायला शिकते. राधिकाप्रमाणे ती ३०० कोटींच्या कंपनीची मालकीण वगैरे होत नाही. एका साध्या शाळेत ती साधी क्राफ्ट आणि संगीत शिक्षिका होते. घराचा उंबरा ओलांडते. आणि म्हणूनच ती जास्त प्रेरणादायी, जास्त आपली वाटू शकते.
हातात पैसा आला म्हणून अरुंधतीला आत्मविश्वास येत नाही. तर आत्मभान जागृत झाल्यामुळे येतो. त्यासाठी तिला पाश्चिमात्य कपडे किंवा अगदी पंजाबी ड्रेसही घालायला लागत नाही. ती अजूनही साडीच नेसते. केसही आधीसारखेच वेणीत गुंफलेले असतात. राधिकाप्रमाणे ती स्वतःची भाषा सोडून प्रमाण मराठी किंवा फाडफाड इंग्रजीही बोलत नाही. पण तरीही तिच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आपली मनं जिंकतो.
अरुंधतीच्या या वेगळेपणाचा आपल्या समाजावर काही एक परिणाम होईल की नाही माहीत नाही. पण तिला मिळणारा टीआरपी पाहता चौकटीबाहेरचं काहीतरी पहायला समाज आसुसलाय हे स्पष्ट होतं. प्रेक्षकांना आता अस्सलता हवीय. नेहमीसारखी कटकारस्थानं आणि रडणारी बाई नकोय. त्यामुळे आता टीवी मालिकांनीही हळूहळू आपली क्षितिजं विस्तारत ‘माझ्या बायकोचा मित्र’ सारख्या मालिका दाखवायला हरकत नाही.
हेही वाचा :
#NoBra या हॅशटॅगविषयी ब्र का नाही काढायचा?
मराठी टीवी सिरियलमधल्या मुली असं का वागतात?
शंभुराजेंच्या बदनामीचा दोनशे वर्षांपासूनचा कट एका मालिकेने उधळला!
मुलींच्या लग्नाचं वय वाढवण्याच्या निर्णयाचं आपण स्वागत करायला हवं?
राधिका सुभेदार सांगते, मासिक पाळीविषयी गुप्तता नको स्वच्छता बाळगा