भारत-चीन सीमेवर तणाव वाढल्यापासून परत एकदा १९६२ च्या युद्धाची चर्चा चालू झालीय. माजी पंतप्रधान पंडित नेहरूंमुळे आपण युद्ध हरलो, त्यांनी चांगली शस्त्रास्त्र पुरवली नाहीत, असं म्हटलं जातंय. हिंदी-चिनी भाई भाईचा नारा देणाऱ्या नेहरूंच्याच पाठीत चीनने खंजीर खुपसला. पण कोणत्याही निष्कर्षावर येण्याआधी आपण त्यावेळची नेमकी परिस्थिती समजून घेतली पाहिजे.
सध्या आपल्या भारतीयांच्या मनात प्रामुख्याने दोन गोष्टी आहेत. एकतर कोरोना वायरस आणि दुसरं, भारत-चीन सीमेवर चाललेला तणाव. या तणावाच्या परिस्थितीत अनेक उलटसुलट चर्चांना तोंड फुटलंय. पंडीत जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना १९६२मधे झालेल्या भारत-चीन युद्धाची उलटसुलट चर्चा होतेय. वॉट्सअप युनिवर्सिटीवर फॉरवर्डिंगचा उद्योग जोरात सुरू आहे. नेहरूंमुळे आपण युद्ध हरलो, अक्साई चीनचा भाग गमावला, नेहरूंनी मुद्दाम आपल्याला हरवलं अशा अनेक गोष्टी बोलल्या जातायत. नेहरूंच्या धोरणातच भारत आणि चीन यांच्यातल्या संघर्षाची पाळंमुळं आहेत, असंही काहींचं म्हणणं आहे.
पण चीन आणि भारतादरम्यान तणावाची परिस्थिती ही १९६२ पासून नाही तर १९१४ मधे सिमला करारापासूनच सुरू झालीय, असं पत्रकार आणि ‘नेहरू : मिथक और सत्य’ या पुस्तकाचे लेखक पीयूष बबेले यांचं म्हणणं आहे. इतकंच नाही तर १९६२ मधे नेहरूंना चीनने धोका दिल्यानंतर भारताने आपली युद्धनीति बदलली आणि त्यामुळे आपण १९६८च्या युद्धात तग धरू शकलो असंही बबेले यांचं म्हणणं आहे. पीयूष बबेले यांनी आपल्या वैयक्तिक युट्यूब चॅनेलवर टाकलेल्या एका वीडियात याची सविस्तर मांडणी केलीय. या वीडियोतल्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांचं रेणुका कल्पना यांनी केलेलं शब्दांकन इथं देत आहोत.
हेही वाचा : चीन कधीच जगावर सत्ता गाजवू शकत नाही, कारण
१९१४ मधे ब्रिटिश अधिकारी, तिबेट आणि चीन यांच्यात सिमला करार झाला. भारताच्या, चीनच्या आणि तिबेटच्या सीमा निश्चित करण्यासाठी ही बैठक होती. तेव्हा तिबेटवर चीनचं नियंत्रण राहील. पण तो आपापला कारभार पाहील असं ठरलं होतं. शिवाय, तीन देशांच्या सीमांवर एक मॅकमोहन रेषा बनवण्यात आली. मात्र चीनने या कराराला विरोध केला. तिबेट आणि ब्रिटिश इंडियाने तो मान्य केला आणि त्यावर सही केली. नंतर हा करार पाश्चिमात्य देशांनीही मान्य केला. मात्र तिबेट हा वेगळा भाग आहे ही आणि भारताच्या भागात काय काय येतं ही गोष्ट चीन तेव्हापासून अमान्यच करत आलाय.
१९४७ मधे भारत स्वतंत्र झाला आणि १९४९ मधे चीनमधे माओंनी क्रांती घडवून आणली. भारताने लोकशाहीचा, कल्याणकारी राज्याचा मार्ग स्वीकारला तर चीन हुकूमशाही अंमलाखाली आला. माओवादी सत्तेवर आल्यानंतर लगेचच १ वर्षात म्हणजे १९५० मधे चीनने तिबेटवर हल्ला केला आणि तिबेट चीनचाच एक भाग बनलं. तोपर्यंत चीन आणि भारतामधे तिबेट हे एक बफर स्टेट होतं.
दोन बलाढ्य राज्यांमधले वाद टाळण्यासाठी त्यांच्यामधे असा एखादा छोटा देश म्हणजेच बफर स्टेट असणं चांगलं असतं, असं मानलं जातं. पण १९५० मधे चीनने त्यावर कब्जा केल्यानंतर नकाशे बदलले. त्यातही चीन आणि दलाई लामा यांनी तिबेटमधे सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचं सूत न जुळल्याने १९५९मधे ते भारतात पळून आले आणि भारतात त्यांनी स्वायत्त सरकार स्थापन केलं. त्यामुळे आपण सरळ सरळ चीनविरोधी भूमिका घेतल्याचं स्पष्ट झालं.
चीनने तिबेटवर आपला हक्क सांगितला, त्यानंतरच पंडित नेहरू सावध झाले होते. संसदेत त्यांनी दिलेली भाषणं आणि राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेली पत्रं यावरून हे स्पष्ट होतं. आता आपल्याला हिमालयाच्या सुरक्षिततेबाबत विचार करावा लागेल. नेपाळच्या सुरक्षेसाठी वेगळ्या योजन्या कराव्या लागतील, अशा अनेक गोष्टी नेहरू मांडत होते.
तेव्हाच म्हणजे साधारण १९५८ मधे चीनने ग्रेट लीप फॉरवर्ड या नावाने नवी योजना आणली. शेतीवर आधारित अर्थव्यवस्थेची कास सोडून औद्योगिकीकरणाकडे वाटचाल करण्यासाठी चीनमधे ही योजना राबवण्यात आली. देशात कम्युनिझमच्या नावाखाली हुकूमशाही चालली होती. त्यामुळेच शेती सोडून औद्योगिकीकरणाकडे जायला देश तयार नसला तरी जबरदस्ती हा बदल घडवून आणला गेला. तेव्हाच तिथे नैसर्गिकरित्या थोडा दुष्काळही पडला.
चीनमधे भूकबळी आणि दुष्काळाची ही स्थिती चार ते पाच वर्ष राहिली. चिनी सरकारच्या आकडेवारीनुसार या ग्रेट लिप फॉरवर्डमधे दीड कोटी चिनी नागरिकांचा मृत्यू झाला. मात्र, बाकी सुत्रांच्या म्हणण्यानुसार, जवळपास चार कोटी लोकांचा मृत्यू झाला असावा. हा जगातला सगळ्यात मोठा मानवनिर्मित दुष्काळ होता. याचबरोबर उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यामधे १९५० ला झालेल्या लढाईतही चीनने आपलं कोट्यवधी सैन्य गमावलं होतं. पण या लढाईत त्यांना डोंगरदऱ्यात युद्ध कसं केलं जातं याचा धडा मिळाला होता. याचाच वापर करून चीनने १९६२ मधे भारतावर हल्ला केला.
ज्येष्ठ राजकीय विचारवंत सुधींद्र कुलकर्णी यांनी १९ जून २०२० ला इंडियन एक्सप्रेसमधे लिहिलेल्या लेखानुसार, १९६० मधे चीनचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष चाऊ एन लाय भारतात आले होते. अक्साई चीन आमच्या ताब्यात द्या आणि आम्ही अरूणाचल प्रदेशच्या भागावर सांगत असलेला हक्क सोडून देतो, असं त्यांचं म्हणणं होतं. नेहरूंनी याला साफ नकार दिला आणि १९६२ मधे युद्ध सुरू झालं. थोडक्यात, चीनने आक्रमण करण्यामागे नेहरूंनी दलाई लामांना दिलेला आश्रय हे कारण नव्हतं. तर, चीनची आपलं साम्राज्य वाढवण्याची इच्छा हे खरं कारण होतं.
हे कोरोना स्पेशलही वाचा :
लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?
डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!
कोरोनाचे पेशंट या देशांत सापडले नाहीत की काही झोल आहे?
कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?
एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?
किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?
न्यूयॉर्क टाईम्सच्या आकडेवारीनुसार, १९६२ च्या युद्धात आपले जवळपास १ हजार सैनिक शहीद झाले. तर आपणही जवळपास ८०० चीनी सैनिकांना मारलं होतं. १९६२चं युद्ध नेहरू हरले, त्यांच्यामुळे आपण अक्साई चीनचा भाग गमावला वगैरे म्हटलं जातं. पण भारताच्या किंवा चीनच्या नाही तर अमेरिकी मीडियाच्या आकडेवारीनुसारही आपण चिनी लोकांना चांगला धडा शिकवलाय हे कळतं.
शिवाय, अक्साई चीनचा भाग वगळता आसाम आणि अरूणाचल प्रदेशच्या आसपासच्या बऱ्याचशा भागातून चीनला परत जावं लागलं. विशेषतः अरूणाचल प्रदेशचा भाग आपल्याकडे राहणं खूप महत्त्वाचं होतं. आपल्याकडे चीन इतकीच अत्याधुनिक यंत्रणा, शस्त्रास्त्रही होती. आपण हवाई मार्गाचा वापर करून ती आपल्या सैनिकांपर्यंत पोचवलीसुद्धा होती. मात्र तरीही आपण हे युद्ध हरलो, त्याची दोन कारण नेहरूंनी सांगितली आहेत.
एक म्हणजे, कोरियाशी युद्ध केल्यामुळे डोंगर असलेल्या भागात कसं लढायचं याचा अनुभव चीनकडे होता. आणि दुसरं, आपले किती सैनिक मेले याचा चीनला काहीही फरक पडत नव्हता. कोरियन युद्धात त्यांनी कोट्यवधी गमावले, देशात दुष्काळ पडला होता तेव्हा कोट्यावधी गमावले तसेच भारताच्या युद्धात काही लोक गमावले तरी चीनला काहीही फरक पडत नव्हता. पण भारतासारख्या मानवी हक्कांना मानणाऱ्या देशामधे एक सैनिक मेला तरी ती फार मोठी घटना मानली जाते.
१९६२ च्या युद्धानंतर भारत आणि चीन यांच्यामधे वास्तविक नियंत्रण रेषा म्हणजेच लाईन ऑफ कंट्रोल आखली गेली. पण त्यानंतरही चीन शांत राहिला नाही. १९६८ मधे चीनने पुन्हा भारतावर हल्ला केला. हा हल्ला सीमावादावरून नाही तर सिक्कीमवरून झाला. सिक्कीम तेव्हा भारताचा भाग नव्हता. तो भारताच्या संरक्षणाखाली कारभार करणारा स्वतंत्र देश होता. या सिक्किमच्याही पलिकडे भारत-चीन यांच्यात युद्ध झालं. या युद्धात भारतानं चीनी सैनिकांना पूर्णपणे परत पाठवून दिलं.
इतकंच नाही तर चीनने भारताच्या हद्दीत अनेक ठिकाणी तंबू ठोकले होते, झेंडे फडकवले होते. ते सगळे आपण तिथून काढले आणि आपला भाग आपल्याजवळच ठेवला. १९६८च्या या युद्धात आपले १५० सैनिक शहीद झाले. पण आपण चीनचे जवळपास ३४० सैनिक मारले. थोडक्यात, आपण १९६२चं युद्ध हरलो. पण त्यानंतर लगेचच १९६८ च्या युद्धात आपण जिंकलो. कारण, चीनने धोका दिल्यामुळे नेहरूंनी भारताची युद्धनीति पूर्णपणे बदलली.
हेही वाचा : छोटासा नेपाळ अचानक भारताकडे डोळे वटारून का बघतोय?
नेहरूंनी 'ग्लिम्पसेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री' या आपल्या ग्रंथात शेजारी देशांशी नेहमीच चांगले संबंध ठेवण्याच्या धोरणाचा आग्रह धरला होता. सगळं जग स्वातंत्र्य अनुभवेल, आपण स्वतंत्र होऊ तेव्हा फक्त भारत देशच नाही तर संपूर्ण आशिया खंड एक मोठी ताकद बनून पुढे येईल, असं त्यांना वाटत होतं.
त्यामुळेच नेहरूंनी हिंदी-चिनी भाई भाई हा नारा दिला. भारताचे सगळेच पंतप्रधान हाच नारा देतात. म्हणून तर दोन अडीच वर्षांपूर्वी शी जिंगपिंग भारतात आले होते तेव्हा मोदी त्यांच्यासोबत झोका खेळत होते. पण भाई भाई म्हणवल्या जाणाऱ्या चीनने भारताच्या विशेषतः नेहरूंच्या पाठीत खंजीर खुपसलं.
त्यानंतर नेहरूंनी नीति बदलली. आपण शेजारी राष्ट्रांशी आपुलकीचे संबंध ठेवायचे, कधीही स्वतःहून हल्ला करायचा नाही. पण त्याचवेळी समोरच्याने हल्ला केला तर त्यांच्याविरोधात लढण्यासाठी आपण तयार रहायला हवं ही आता भारताची युद्ध नीति आहे. ही नीति नेहरूंनीच स्वीकारलेली आहे.
हेही वाचा :
कोरोनाच्या R0 नंबरवर आपलं, लॉकडाऊनचं भवितव्य अवलंबून आहे?
वस्तूंना हात लावल्यावर कोरोनाची लागण होण्याची शक्यता कमी झालीय?
ट्रम्प यांच्या धमकीला घाबरून भारतानं औषधावरची निर्यातबंदी उठवली?
विटॅमिन डीच्या कमतरतेमधे दडलंय देशांच्या वेगवेगळ्या मृत्यूदराचं गुपित?
लॉकडाऊनविरोधातल्या रस्त्यावरच्या आंदोलनांना ट्रम्प पाठिंबा का देताहेत?