जॉर्ज फ्लॉईडच्या हत्येनंतर अमेरिकेत ब्लॅक लाइव मॅटर या नावाने वर्णद्वेषविरोधी चळवळ चालू झाली. अनेक गौरवर्णीय लोकही या चळवळीत सामील झाले होते. भारतीय आणि इतर आशियाई लोकांनाही सौम्य पातळीवर का होईना वर्णद्वेषाचा फटका बसतो. भारतीय आणि इतर आशियाई अमेरिकन लोकांनी या चळवळीला साधा पाठिंबाही दर्शवला नाही. आपण आदर्श अल्पसंख्यांक असल्याच्या धुंदीत भारतीय राहतात.
जॉर्ज फ्लॉईडच्या हत्येनंतर अमेरिकेत जनक्षोभ उसळला. कृष्णवर्णीयांवर होणारी हिंसा आणि समाजात रुजलेल्या वर्णभेदाविरोधात देशातले लक्षावधी गौरवर्णीय अमेरिकन वर्णभेदाविरोधात रस्त्यावर उतरलेत. व्हाईट हाऊस या अध्यक्षांच्या निवासावरही त्यांनी धडक मारली. पण कोलंबसच्या भूमीत राहणारे भारतीय मात्र या आंदोलनात सहभागी झाले नाहीत. या उद्रेकाशी आमचा काय संबध असं भारतीयांसारख्या इतर आशियाई अमेरिकन लोकांना वाटत असावं.
काहीजण आपल्यावर झालेल्या वांशिक अत्याचारांचा पाढा वाचत दुसऱ्या अल्पसंख्याकांवर झालेल्या हिंसेसंबंधांत काही भाष्य करायला नकार देतायत आणि आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करतायात. देशात आफ्रिकन अमेरिकन जनतेला किती संघर्ष करावा लागतो याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं जातं. गेल्या आठवड्यात अनिवासी भारतीयांच्या म्हणजेच एनआरआयच्या एका कार्यक्रमात हे सारं पहायला आणि ऐकायला मिळालं.
हेही वाचा : अमेरिकेतल्या ब्लॅक लाईव्ज मॅटर आंदोलनाचं काळंगोरं वास्तव
आफ्रिकन अमेरिकन लोकांना भोगाव्या लागणाऱ्या छुप्या आणि उघड हिंसेची यादी मैलभर लांब होऊ शकते. पण ‘आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आफ्रिकन अमेरिकन कधी आले होते? आज आम्हाला आदर मिळतोय पण तो कमावण्यासाठी आम्ही अतिशय मेहनत केलीय’, असा युक्तिवाद ऐकायला मिळतो. अमेरिकेत राहणाऱ्या या आत्ममग्न आशियाई लोकांकडून आणखी अपेक्षा तरी काय करणार? पण या संवादातून एक गोष्ट पुढे आलीय – वर्णद्वेष. रूढीवादासंबंधीच्या चुकीच्या समजूतींसोबत आशियाई लोकांना आपण आदर्श अल्पसंख्यांक आहोत, असाही भ्रम आहे.
दक्षिण आशियाई महिला म्हणून मला जो वर्णद्वेष सहन करावा लागतो तो आफ्रिकन महिलेवर होणाऱ्या हिंसेपेक्षा फारच वेगळा असतो. वर्णद्वेषाचे वेगवेगळे आयाम असतात हे लक्षात न घेता कृष्णवर्णीयांवर व्यवस्थेने केलेल्या अतीव हिंसेकडे दुर्लक्ष केलं जातं.
खरंतर ही हिंसा जागोजगी होत असते. आपल्या समोरही ती होते. त्यांना जे सहन करावं लागतं तशी हिंसा माझ्यावर किंवा माझ्या कुटुंबाच्या बाबतीत घडत नाही. आफ्रिकन अमेरिकन लोकांवर झालेल्या अत्याचाराच्या कहाण्या माझ्या कुटुंबियांनी कधी थेट ऐकलेल्याही नसतात. त्यांना त्याची काही कल्पनाही नसते आणि पर्वाही नसते.
तरीही याप्रश्नी सार्वजनिक चर्चा व्हायलाच हवी असं मला वाटतं. ब्लॅक लाईव्स मॅटर ही चळवळ अनेक कारणांनी अत्यंत गरजेची आहे. कृष्णवर्णीयांचं खणखणीत सांगणं संपूर्ण अमेरिका ऐकत आहे. गोऱ्यांच्या वर्णभेदी राजकारणामुळे देशाची ‘गोरी आणि काळी’ अशी फाळणी झाली होती. राजकारणाच्या या अलिखित नियमांना पाळायला नागरिकांनी नकार दिलाय.
ब्लॅक लाईव मॅटर चळवळीमुळे अनेक शतकांच्या शोषणातून मुक्ती मिळण्याचा मार्ग दिसू लागलाय. त्यांच्यावर होणाऱ्या पोलिसी अत्याचारांचं निर्मूलन करण्यासाठी चळवळीचा दबाव आणणं गरजेचं झालंय. एक इंडियन-अमेरिकन महिला म्हणून मला या देशाचा भूतकाळ जाणून घ्यायला हवा. त्यातली आफ्रिकन-अमेरिकन प्रकरणही या देशाच्या इतिहासाचा अविभाज्य भाग आहे. त्यातली अत्याचार आणि मानवी हक्कांची पायमल्ली हादरवून टाकणारी आहे. पण अमेरिकन गौरवर्णीयांमधे नव्या निर्माण झालेली जागरुकताही वाखाणण्यासारखी आहे. रस्त्यावरच्या निदर्शनांसोबत गुलामगिरीच्या इतिहासाचाही ते अभ्यास आणि विश्लेषण करतायत.
हे कोरोना स्पेशलही वाचा :
हात धुण्यासाठी साबण वापरायचा की सॅनिटायझर?
कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?
कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?
सुपर स्प्रेडर म्हणजे काय? ते मुद्दाम कोरोना पसरवतात का?
कोरोनाच्या R0 नंबरवर आपलं, लॉकडाऊनचं भवितव्य अवलंबून आहे?
हर्ड इम्युनिटी ठरू शकते का कोरोनाच्या युद्धातलं भारताकडचं ब्रम्हास्त्र?
मिनियापोलिस या शहरात आंदोलक हिंसक झालं होतं. तिथलं ‘गांधी महल’ हे भारतीय रेस्टॉरंट काही दंगलखोरांनी जाळून टाकलं. पण मालकांनी धीर सोडला नाही. 'आम्ही दोन दिवसात रेस्टॉरंट सुरू करतोय', असं सांगत हफसा इस्लाम रेस्टॉरंट मालकांच्या तरुण मुलीने लोकांना आश्वस्त केलं. ‘माझी इमारतही जळतेय पण आम्ही ठीक आहोत. न्याय मिळालाच पाहिजे. दोषी अधिकाऱ्यांना अटक करा’ असं हफसाचे वडील सांगत होते. या समजुतदारपणामुळेच सगळे समाज उन्नत होतात. एकत्र पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. शोषितांच्या आंदोलनाला पाठबळाची गरज असते.
पण या नाण्याच्या दुसऱ्या बाजूला एशियन अमेरिकन आहेत. ब्लॅक लाईव्स मॅटरमधे आपला अंतर्भाव गरजेचा नाही, असं त्यांना वाटतं. आशियाई अमेरिकन लोकांना रोजच्या जगण्यातली थट्टा-टवाळी आणि संरचनात्मक अन्यायांना तोंड द्यावं लागतं. पण वंचितांना मिळणाऱ्या आरक्षणामुळे आपल्या मुलांवर आणि नातवंडांवर अन्याय होतो. कारण या समाजाने आमच्याएवढे परिश्रम घेतलेलेच नाहीत, असं त्यांचं सततचं रडणं असतं. आपल्या कृष्णवर्णीय विरोधी संवेदनांना दूर करण्याऐवजी त्यांच्यापुढचं मोठं ध्येय आहे आपणच गोरं होणं!
३१ मेला कॅलिफोर्नियातल्या सानहोजे इथं निदर्शनं चालू असताना जारेड वेन या अधिकाऱ्यानं छोटं क्षेपणास्त्र निदर्शकांवर रोखलं. त्यामुळे तिथल्या जमावामधे एकच खळबळ उडाली. तरीही हा अधिकारी बधला नाही, उलट तो अधिकच एक्साईट झाला आणि आंदोलकांना शिव्या देऊ लागला. व्हेनसारख्या शोषकाच्या शब्दांची आणि कृतीची नक्कल करण्याचा प्रयत्न आशियाई अमेरिकन लोकांनी सुरू ठेवलाय. तसंच आपल्या शोषकांच्या पसंतीचा अल्पसंख्यांक गट होण्याची त्यांची धडपड सुरू आहे.
आशियाई लोकांनी अमेरिकेत स्थानिक व्हायला सुरवात केली तेव्हापासून ‘आदर्श अल्पसंख्यांक’ गट हे मिथक पसरवलं जातंय. खरंतर इथल्या नागरी हक्क चळवळींमुळेच स्थलांतर शक्य झालं होतं. उच्चशिक्षित आणि उच्च उत्पन्न कमावणाऱ्या दक्षिण आशियाई गटाने वांशिक असमानतेची रेषा ओलांडलीय ही संकल्पना इतर वंचित आणि आफ्रिकन गटांना आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी वापरली जाते.
खरंतर आशियाई अमेरिकन समूह एकजिनसी असल्याचा भ्रम पसरवला जातो. तसा तो नाही याचे पुरावे अनेक अभ्यासातून पुढे आलेत. या भ्रमामुळेच अमेरिकेतल्या अल्पसंख्यांक गटांच्या उच्चस्थानी आशियाई अमेरिकेन समूह विराजमान झालाय.
हेही वाचा : अमेरिकेत ट्रम्प निवडून येणं हीच असेल जगासाठी मोठी दुःखद बातमी
युरोपियन गोरेपणाच्या जवळ जाण्यासाठी आशियाई अमेरिकन आटापिटा करतात. दिशाभूल करणाऱ्या या नादामुळे अनेक आशियाई अमेरिकन लोकांनी कृष्णवर्णीयांबद्दलचा द्वेष जोपासलाय. गोऱ्या अमेरिकनांनी आशियाई लोकांच्या खांद्यावर आदर्श अल्पसंख्यांक होण्याचा क्रूस ठेवलाय. पण काही झालं तरी आपल्याला गोरं म्हटलं जाणार नाही आणि त्यांच्या कंपूमधे आपल्याला स्थान मिळणार नाही. तरीही आपण तो क्रूस वाहतोहोत.
आपली कमाई कितीही मोठी असली किंवा आपली मुलं ‘आयवी लीग’मधे शिक्षण घेत असली तरी आपल्या कातडीचा रंग बदलणार नाही. स्थलांतरीत असल्याची ओळख पुसली जाणार नाही आणि स्थलांतरित लोकांबद्दलचा अवांछित तिरस्कार थांबणार नाही किंवा अगदी वरच्या स्थानावर आपण पोचणार नाही. कारण ही व्यवस्थाच वंश, वर्ण आणि साम्राज्यशाहीच्या द्वेषमुलक आधारावर उभी आहे.
एक कृष्णवर्णीय म्हणून आपण आपली ओळख विसरता कामा नये. या गोष्टीची आपण स्वतःच जाणीव करून घ्यायला हवी. कारण आपण ती केली नाही तर ती करून द्यायला दुसरं कुणी येणार नाहीय. तसंच आफ्रिकन अमेरिकन लोकांसोबत आपण उभं राहिलं पाहिजे आणि त्यांच्या मुक्तीच्या लढ्यामधे आपण सामील झालं पाहिजे. कुटुंबातल्या सदस्यांशी बोलण्याचं धाडस दाखवलं पाहिजे. वंशवाद उद्ध्वस्त करण्याचं काम घरापासून सुरू झालं पाहिजे. अस्वस्थतेतूनच नवीन संकल्पना शिकण्याची तळमळ मनात उत्पन्न होते.
तुम्ही ‘ब्लॅक लाईव्स मॅटर’ चळवळीचे सदस्य असलात तरी नवनवीन संकल्पना शिकणं थांबवता कामा नये. तसंच कृष्णवर्णीयांना येतात तसे अनुभव तुम्हाला येणार नाहीत. त्यांचे अमानुष अनुभव अमेरिकन जाणीवांमधे कोरले गेलेत. ब्लॅक लेखकांची पुस्तकं वाचायला हवीत. त्यांचा क्रोध न्याय्य का आहे हे समजून घ्यायला हवं. तेव्हाच आपला विकास झाला असं म्हणता येईल.
हेही वाचा :
डब्ल्यूएचओनं आधीचं कोरोनाचा इशारा दिला, तरीही ब्लेमगेम का सुरूय?
राजकारणातल्या पूर्वग्रहांच्या नजरेनंच साथीच्या रोगांकडेही बघणार का?
अमेरिकेला हवं असणारं मलेरियाचं औषधं भारतात कसं आलं, त्याची गोष्ट
ट्रम्प यांच्या धमकीला घाबरून भारतानं औषधावरची निर्यातबंदी उठवली?
अमेरिकेला कोरोनानं ताब्यात घेतलं, सेंट लुईस शहर वेगळं राहिलं, कारण
लॉकडाऊनविरोधातल्या रस्त्यावरच्या आंदोलनांना ट्रम्प पाठिंबा का देताहेत?
(मूळ इंग्रजीत असलेल्या या लेखाचा अलका गाडगीळ यांनी अनुवाद केला. मूळ लेख medium.com या बेवसाईटवर प्रकाशित झालाय.)