लॉकडाऊनविरोधातल्या रस्त्यावरच्या आंदोलनांना ट्रम्प पाठिंबा का देताहेत?

१५ मे २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


कोरोनाच्या संकटामुळे जगाला एका वेगळ्याच अमेरिकेचं दर्शन घडतंय. साऱ्या जगात कोरोनाला भिऊन घरात थांबायला लोक प्राधान्य देत असताना अमेरिकेत मात्र वेगळंच सुरू आहे. लोक लॉकडाऊन म्हणजे स्टे ऍट होम मागं घेण्याची मागणी करत रस्त्यावर उतरलेत. आंदोलनं करत आहेत. आणि या सगळ्या वेडेपणाला खुद्द राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पाठिंबा आहे. ट्विट करून आंदोलकांना प्रोत्साहन देताहेत. ट्रम्प यांच्या या वेडेपणामागं का पॉलिटिक्स आहे?

अमेरिका एक मजेशीर देश आहे. गेल्या काही आठवड्यांपासून देशातल्या अनेक राज्यांमधे आंदोलनं सुरू झालीत. ही आंदोलनं थांबायचं नाव घेईनात. हे आंदोलक उद्योगधंदे सुरू करण्यासाठी लॉकडाऊन म्हणजेच स्टे ऍट होमचा निर्णय मागं घेण्याची मागणी करत आहेत. या सगळ्या आंदोलनांना ज्यांच्यावर देश वाचवण्याच्या जबाबदारी आहे, त्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचाही पाठिंबा आहे.

१४ मेपर्यंत जगभरात ४३ लाखाहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली. तर हीच संख्या एकट्या अमेरिकेतच १४ लाखाहून जास्त आहे. जगभरात कोरोनानं जवळपास ३ लाख लोकांचा जीव घेतला. यापैकी ८५ हजार लोक अमेरिकेतले आहेत. अमेरिकेतला कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतोय.

एवढी बिकट परिस्थिती असतानाही अमेरिकेत अनेक मजेशीर गोष्टी घडत आहेत. या सगळ्या प्रकारावर अमेरिकेत राहत असलेले ज्येष्ठ पत्रकार जे सुशील यांनी एक लेखवजा फेसबूक पोस्ट लिहिलीय. त्या पोस्टचा सदानंद घायाळ यांनी केलेला अनुवाद इथे देत आहोत.

कोरोनाचा जोरदार तडाखा बसलेली अमेरिका आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एकाचवेळी अनेक आघाड्यांवर लढत आहेत. एकीकडे चीनला गोत्यात आणण्याच्या प्रयत्नातून त्यांनी डब्ल्यूएचओला टार्गेट केलंय. दुसरीकडे घरच्या आघाडीवर ट्रम्प अत्यंत आक्रमक पवित्रा घेऊन वावरताहेत.

हेही वाचा : अमेरिकेला कोरोनानं ताब्यात घेतलं, सेंट लुईस शहर वेगळं राहिलं, कारण

मिशिगनमधे लोक रस्त्यावर

ट्रम्प अगदी इथवर बोललेत, की कोरोना संकटामुळे देशातल्या साठ हजार ते एक लाख इतक्या लोकांचे जीव जाऊ शकतात. त्यामुळे या आकड्याला गृहीत धरून आता अर्थव्यवस्थेची गाडी पुन्हा रुळावर आणायच्या कामाला लागलं पाहिजे. नोकरीधंदे लवकरात लवकर सुरू झाले पाहिजेत हा त्यांचा आग्रह आहे. जवळपास ४० दिवसांच्या स्टे ऍट होम नंतर आता लोकांची बेचैनी वाढताना दिसतेय. धंदापाणी सुरू करण्याची परवानगी द्या अशी मागणी अनेक राज्यांमधे होताना दिसतेय. 
  
मिशिगन शहरात तर लोकांनी गेल्याच आठवड्यात हत्यारं वगैरे घेऊन निदर्शनं केली. त्यावर बरीच टीकाही झाली. मात्र अर्थव्यवस्थेची कुलुपं उघडण्यावरून लोकांमधे राग स्पष्ट दिसतोय. अनेक राज्यांमधे सिनेमा हॉल, पब अशा उद्योगांच्या मालकांनी 'स्टे ऍट होम'च्या विरुद्ध कोर्टात जाण्याची धमकी दिलीय. एका वीकएंडला थोडीशी सूट मिळाल्यावर कॅलिफोर्नियामधे हजारो लोक समुद्र किनाऱ्यावर जमले. त्यानंतर लगेच निर्बंध कडक लादण्यात आले.

हेही वाचा : कोलंबसने नेलेल्या साथरोगांनीच संपवली मूळ अमेरिकी संस्कृती

लिबरेट मिशिगन ट्रम्प

याआधीही लोकांनी मिशिगनमधे रस्त्यावर निदर्शनं केलीत. पुढं ही निदर्शनं मिनेसोटा आणि मिशिगन राज्यांमधेही झाली. या निदर्शनांच्या काही तासानंतर ट्रम्प यांनी ट्विट केलं, 'लिबरेट मिनेसोटा, लिबरेट मिशिगन, लिबरेट वर्जिनिया'. या तिन्ही राज्यांचे गवर्नर डेमोक्रॅटिक पार्टीचे म्हणजे ट्रम्प यांचे विरोधक आहेत. अजून काही काळ स्टे ऍट होमचे निर्बंध लागू ठेवा, नाहीतर कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका असल्याची भूमिका या तिघांनी घेतलीय.

ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेतही निदर्शकांना आपलं समर्थन असल्याचं जाहीर केलंय. ही निदर्शनं ट्रम्प समर्थकांनी आयोजित केली असल्याचं सांगितलं जात असलं तरी निदर्शकांची संख्या वाढतेच आहे. यामागे अजूनही काही कारणं आहेत. अर्थव्यवस्थेची गंभीर अवस्था आणि वाढती बेरोजगारी ही ठळक कारणं. अमेरिकेत लाखो लोक कॉन्ट्रॅक्टवर काम करतात. उद्योगधंदे बंद झाल्यामुळे त्यांच्या उत्पन्नाचा स्रोतच आटलाय.

उदाहरण सांगायचं तर, बरेचसे विद्यार्थी ग्रॅज्युएशन सुरू असताना किंवा झाल्यावर रेस्टॉरंट्समधे कामाला लागतात. दरम्यान पुढं काय करायचं याचा विचार ते करतात. हे सगळे लोक आपलं जेवणखान आणि घरभाड्यासाठी दर आठवड्याला याच मेहनतान्यावर अवलंबून असतात. किराणा मालाची दुकानं सोडली तर इतर स्टोअर्स, तिथं काम करणारे लोक, थिएटर्स, पब्स, म्युजियम, विद्यापीठं अशा जागी कामाला असणारे पूर्णतः बेरोजगार झालेत. सरकार त्यांना मदत करत असलं तरी ती पुरेसी नाहीय. लवकरात लवकर पुन्हा कामावर जाता यावं यासाठी हे सगळेजण अस्वस्थ आहेत.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?

कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?

बाहेरून आणलेलं सामानं वायरस फ्री कसं करावं?

कोरोनाचा पेशंट वेंटिलेटरवर किती काळ जिवंत राहतो?

ग्लोव्ज घातल्याने कोरोनापासून आपलं संपूर्ण संरक्षण होतं?

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

निवडणूक हरण्याचा धोका

ट्रम्प यांच्यासाठी अर्थव्यवस्था हा कळीचा मुद्दा आहे. कारण त्यांना ऑक्टोबरमधे निवडणूक लढवायचीय. बेरोजगारी वाढली तर यावेळी सत्ता हातून निसटून जाईल अशी भीती त्यांना वाटतेय. काहीही करून ही निवडणूक त्यांना हातची जाऊ द्यायची नाहीय. त्यांचं रेटिंगही घसरलंय. शिवाय या कोरोना काळात मनमर्जी करण्याऐवजी तज्ञ डॉक्टरांचं म्हणणं ऐकावं लागत असल्यानं ट्रम्प वैतागलेत. सगळ्या डॉक्टरांनी जूनआधी अर्थव्यवस्था सुरू करायला स्पष्ट विरोध दर्शवलाय.

साहजिकच ट्रम्प बेचैन आहेत. वाढती बेरोजगारी आणि रुळावरून घसरलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यात आलेलं अपयश यांचं खापर त्यांनी डेमोक्रॅटिक पक्षावर फोडण्याचे प्रयत्न चालवलेत. त्यांचे ट्विट्स आणि आंदोलकांना त्यांच्याकडून मिळणारं समर्थन यातून तरी तेच सिद्ध होतं.

यात एक पैलू अमेरिकी नागरिकांच्या स्वातंत्र्याबाबतच्या कल्पनांचाही आहे. एका टीवी चॅनलवर कुणीतरी आंदोलक म्हणत होता, 'माझ्या शरीरावर माझा हक्क आहे आणि मी कुठं जावं, काय करावं हे सरकार ठरवू शकत नाही.' अमेरिकन नागरिक स्वातंत्र्याचे अर्थ त्यांच्या पद्धतीने लावतात. अशी वक्तव्यं करणाऱ्यांनी आजवर अशा संसर्गजन्य रोगाचा सामना केला नाहीय.

हेही वाचा : अमेरिकेला हवं असणारं मलेरियाचं औषधं भारतात कसं आलं, त्याची गोष्ट

ट्रम्पचा पाठिराखा वर्ग

कुठलीच गोष्ट आपल्याला रोखू शकत नाही असं त्यांना वाटतं. त्यांच्यासाठी सगळ्या गोष्टींचं उत्तर पैसा आणि बंदूक हेच असतं. बऱ्याच निदर्शकांच्या हातात रायफल्स दिसण्याचं कारण हेच आहे. शत्रू तर कुठंच दिसत नाहीय तर मग आपल्याला काम करू दिलं जावं, कोरोना आपलं काहीच वाकडं करू शकणार नाही अशी त्यांची ठाम समजूत झालीय.

अमेरिकेत घडणाऱ्या अशा घटनांनी जगभरातले लोक तोंडात बोटं घालतील कारण इथं हरेकजण सुशिक्षित आणि समजदार आहे, असं लोकांना वाटतं. मात्र अमेरिकेत बहुसंख्य लोकांना इतर जगाशी खूप काही देणंघेणं नसतं. किमान शिक्षण घेतलं की मग दुनियेतल्या इतर देशांत काय चाललंय यात त्याला फारसा रस नसतो.

मात्र अमेरिकन समाजाचा एक छोटा हिस्सा सुशिक्षित आणि जागरूक आहे. त्याला जगाची खबर असते, तो तार्किक पद्धतीने वाद घालतो. हा तोच वर्ग आहे जो ट्रम्पला मतं देत नाही. उरलेला मोठा वर्ग मात्र आपली बंदूक, पैसा आणि गर्व यांना जपत ट्रम्पचा मतदार बनून राहिलाय. याच वर्गाच्या जीवावर ट्रम्प आपला वेडेपणा सगळ्या अमेरिकेवर लादण्याच्या प्रयत्नात आहेत.

हेही वाचा : 

लठ्ठ माणसांपेक्षाही कोरोना जास्त वजनदार आहे?

युद्धात जिंकणाऱ्या अमेरिकेला कोरोना का हरवतोय?

टू डेज वन नाईट: बेरोजगार कुटुंबाची जागतिक गोष्ट

जीवघेणा लॉकडाऊन संपवण्याचे चार साधेसरळ मार्ग

सुपर स्प्रेडर म्हणजे काय? ते मुद्दाम कोरोना पसरवतात का?

अधिक चांगल्या जगाच्या निर्मितीसाठी क्रिकेटने मदत केली तेव्हा,

अमेरिकेत ट्रम्प निवडून येणं हीच असेल जगासाठी मोठी दुःखद बातमी

राजकारणातल्या पूर्वग्रहांच्या नजरेनंच साथीच्या रोगांकडेही बघणार का?

मॅकडोनल्ड खाऊच्या ठेल्यापासून फास्टफूड इंडस्ट्रीचा बादशाह कसा बनला?

कोरोना संकटाशी तुलना होत असलेली १९३०ची जागतिक महामंदी कशी होती?