साताऱ्यातला जरंडेश्वर साखर कारखान्याची जागा ईडीनं जप्त केलीय. या कारखान्याचे मालक हे अजित पवार यांचे मामा आहे. त्यांचा अप्रत्यक्ष संबंध असल्याने बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात ही जागा ताब्यात घेत असल्याचं ईडीनं स्पष्ट केलंय. पण खरंतर, अजित पवार ’पहाटेचा खेळ’ पुन्हा खेळायला तयार नाहीत, याची पक्की खात्री झाल्यामुळेच जप्तीसाठी ’जरंडेश्वर’ची निवड करण्यात आलीय.
कोरेगाव-सातारा इथल्या 'जरंडेश्वर साखर कारखान्या’ची जागा, इमारत आणि इतर मालमत्ता ’ईडी’ने ’महाराष्ट्र राज्य को ऑपरेटीव बँक’ घोटाळा प्रकरणात जप्त केलीय. या कारखान्याची मालकी सध्या खाजगी आहे. त्याचा ताबा राजेंद्र कुमार घाडगे यांच्याकडे आहे. ते अजित पवार यांचे मामा आहेत. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे जरंडेश्वर कारखान्याशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा संबंध असल्याने बेहिशोबी मालमत्ता प्रकरणाच्या तपासानुसार, ही जप्तीची कारवाई झाली, असं ईडीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणंय.
या कारवाईला मूळच्या ‘श्री जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना’च्या मुख्य प्रवर्तक आणि चेअरमन डॉ. शालिनीताई पाटील यांनी ’देवाची काठी वाजली’, अशी प्रतिक्रिया दिलीय. ९० वर्षांच्या शालिनीताई या देवभोळ्या नाहीत. त्यांचे वडील ज्योत्याजीराव फाळके हे महात्मा फुले यांच्या ‘सत्यशोधक’ विचारांचे प्रसारक आणि ’जलसा’कार होते. त्यांचे भाऊ वसंतराव फाळके हेही ’सत्यशोधक संस्था’ चालक आहेत.
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि थोर स्वातंत्र्यसेनानी वसंतदादा पाटील यांच्या शालिनीताई पत्नी आहेत. १९८० ते ८३ या काळात त्या ’इंदिरा काँगेस’च्या ए. आर. अंतुले आणि बाबासाहेब भोसले यांच्या मंत्रिमंडळात महसूलमंत्री होत्या. ’अॅडवोकेट’ असलेल्या ताईंनी वयाच्या पासष्टीत ’डॉक्टरेट’ची पदवी मिळवलीय आणि ’राजमाता जिजाबाई भोसले’ यांच्यावर सर्वात प्रथम संशोधनात्मक ग्रंथ लिहिलाय.
अलीकडच्या काळात हुकमी गाजणारा ’मराठा आरक्षण’चा विषय राज्यव्यापी करण्याचं काम ताईंच्याच २०१३-१४ मधल्या भाषणांच्या मोहिमेनं केलंय. या सर्वात वरताण म्हणजे, सत्तेच्या राजकारणात पुरुषांच्या तोडीस तोड ठराव्यात, अशा त्या महाराष्ट्रातल्या सरस महिला धाडसी-धोरणी राजकारणी आहेत.
इतका लौकिक असूनही २०१० मधे ’जरंडेश्वर’चा लिलाव झाला, तेव्हा तो व्यवहार शालिनीताईंनी मनाला लावून घेतला नाही. कारण कारखाना लिलावापर्यंत येण्याची वेळ त्यांच्याच कारभारामुळे आली होती. त्यापूर्वी सहकारातल्या अनेक महारथींच्या कारखान्यांचे लिलाव झाले होते किंवा होणार होते. त्या रांगेत’राष्ट्रपती’ असलेल्या प्रतिभाताई पाटील यांचा जळगावचा ’संत मुक्ताबाई सहकारी साखर कारखाना’ही होता. त्यामुळे ’जरंडेश्वर’चा लिलाव शालिनीताईंनी फारसा मनाला लावून घेतला नसावा.
हेही वाचा : महाविकासआघाडीचं नवं सरकार पाच वर्षं चालेल की नाही?
हा कारखाना २०१० मधल्या लिलावात ’गुरु कमोडीटी सर्विसेस प्रा.लि.’ने ६५ कोटी ७५ लाख रुपयांत खरेदी केला. तो ’बीवीजी कंपनी’ने भाड्याने चालवायला घेतला. ’बीवीजी’ म्हणजे हणमंत गायकवाड यांचा ’भारत विकास ग्रुप’! पण तोटा येत असल्याने त्यांनी एक वर्षातच कारखान्यातून अंग काढून घेतलं. म्हणून हा कारखाना ’गुरु’ने ’जरंडेश्वर शुगर मिल प्रा.लि.’ला भाड्याने चालवायला दिला. या ’शुगर मिल’मधे ’स्पार्कलिंग ऑईल प्रा.लि.’ या कंपनीची भागीदारी आहे.
’स्पार्कलिंग’मधे अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा मोठा हिस्सा आहे. ’जरंडेश्वर शुगर मिल’ला कारखाना चालवण्यासाठी ’पुणे जिल्हा सहकारी बँक’ने ४०० कोटी रुपयांचं कर्ज दिलं. त्यासाठी ’गुरु कमोडिटी सर्विसेस’च्या मालकीची कारखान्यासह २१४ एकर जमीन तारण ठेवली. त्यावेळीही अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री होते आणि जिल्हा सहकारी बँकांची शिखर संस्था असलेल्या ’महाराष्ट्र राज्य सहकारी बँक’चे संचालकही होते. त्या संचालक मंडळात ‘भाजप’चे माजी मंत्री, ’शिवसेना’चे माजी खासदार आणि ’काँग्रेस’चे बडे नेतेही होते. यातून ’मोडस ऑपरेंडी’ स्पष्ट होते.
आधी कारखाना कर्जबाजारी करायचा. मग तो लिलावात काढायचा. त्याचं ’वॅल्यूएशन’ कवडी किंमतीचं करायचं आणि ते आपल्याच लोकांना पुढे करून, विकत घेऊन ताब्यात आणायचं! २०१४ मधे देशात ’मोदी सरकार’ आणि राज्यात 'फडणवीस सरकार' आल्यावर २००५ ते २०१५ या वर्षांत ’जरंडेश्वर’ पद्धतीने ४३ सहकारी साखर कारखाने विकण्यात आले,’ असा आरोप करत शालिनीताई पाटील, कॉम्रेड माणिकराव जाधव आणि अण्णा हजारे हे एकत्रितपणे कोर्टापासून ’सीबीआय- ईडी’पर्यंत १० हजार पानांच्या पुराव्यांसह चकरा मारू लागले. पण त्यातून फारसं काही निष्पन्न झालं नाही.
शेवटी अण्णा हजारे केंद्र आणि राज्य सरकारच्या नाकदुर्या काढायला लागले. तेव्हा मुख्यमंत्री पदावर असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेनुसार, ‘महाराष्ट्र राज्य सहकारी बँक’मधे २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा’ झाल्याचा गुन्हा ’मुंबई आर्थिक गुन्हा शाखा’ने २२ ऑगस्ट २०१९ ला दाखल केला. त्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याची १३ १ ब आणि १३ १ क ही कलमंही लावण्यात आली होती.
या कलमांची तरतूद चौकशी-तपास ’ईडी’कडे जाण्यासाठी करण्यात आली होती. त्यामुळे अजित पवार यांच्यासह ६९ जणांना ’राज्य सहकारी बँक’ कथित गैरव्यवहाराबाबत ’आर्थिक गुन्हे शाखा’ने ’क्लीन चीट’ देऊन, ७२हजार पानांचा तपास बंद करण्याचा अहवाल दिला. लगेचच ’ईडी’ने अतिदक्षतेनं ’जरंडेश्वर’च्या मालमत्तेवर जप्ती आणली आणि ‘महाराष्ट्र राज्य बँक घोटाळा’ प्रकरण पुन्हा उघडलं.
या कारवाईला शालिनीताई ’देवाची काठी’ म्हणत ’ईडी’ला विरोधकांसाठी वापरणारा सत्तेचा हात दडवतायत. कारण एव्हाना, त्यांच्यासह जाधव-हजारे हे ’महाविकास आघाडी’ला सत्तेवरून उतरवण्यासाठी उतावीळ झालेल्या नरेंद्र-देवेंद्र जोडीचे हत्यार झालेत.
२०१५ पासून ताई, अण्णा आणि कॉम्रेड हे तळेकर वकिलांच्या माध्यमातून कोर्टाप्रमाणे ’ईडी’च्याही वाऱ्या करत होते. तेव्हापासून गेली सात वर्षं ’ईडी’वाले या घोटाळ्याचा अभ्यास करत होते का? ’आर्थिक गुन्हा शाखेने तपास बंदचा अहवाल देताच, ’ईडी’चा अभ्यास पूर्ण झाला आणि कारवाई झाली. याला ’देवाची काठी वाजणं’ म्हणायचं तर देवाची काठीही ’ईडी’सारखीच मोदी-शहांच्या हुकुमात आहे, असंच म्हटलं पाहिजे.
हेही वाचा : महाराष्ट्र सरकारच्या अपयशाबदद्ल आता बोलायला हवं
या वादाच्या निमित्ताने ‘भाजप’चे राज्य प्रदेशाध्यक्ष आणि नेते चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिलंय. त्या पत्रात चंद्रकांतदादांनी संशयास्पद किंवा कथित गैरपद्धतीने विकलेल्या सहकारी साखर कारखान्यांची यादी दिलीय. ती अपूर्ण आहे. ’जरंडेश्वर’ कारखान्याच्या बाबतीत घडलंय तसंच सगळ्याच कारखान्यांच्या लिलाव आणि हस्तांतरणाबाबत घडलंय.
याला नितीन गडकरी यांचे वर्धा इथला 'महात्मा' आणि भंडारा इथला 'वैनगंगा' हे साखर कारखानेही अपवाद नाही. जळगावचा ’संत मुक्ताबाई’ हा खाजगी साखर कारखाना शिवाजी जाधव यांनी ४९ कोटी रुपयांना विकत घेतला होता. नंतर त्यात एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे भागीदार झाल्या. या कारखान्याला जिल्हा बँकेने ५१ कोटी रुपये कर्ज दिलं. म्हणून ’मुक्ताईनगर’चे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी जानेवारी २०२० मधे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली.
’हमामखाने मे सब नंगे’ असाच प्रकार सहकारी कारखाने लिलावात घेणार्या खाजगी व्यक्ती आणि संस्थांनी केलाय. म्हणूनच ’जरंडेश्वर’ची जप्ती हा गैरव्यवहारावर टाकलेला घाव नाही. तर तो ‘महाविकास आघाडी’च्या सत्तेला हादरा देणारा डाव ठरलाय. कारण तो पवारांशी संबंधित आहे. राणे, नाईक, मोहिते ’भाजप’वासी झाले नसते, तर त्यांच्यावर ’ईडी’ने कशाप्रकारे झडप घातली असती, याचा अंदाज ’जरंडेश्वर’ जप्तीने करता येऊ शकतो.
अजित पवार हे ’पहाटेचा खेळ’ पुन्हा खेळायला तयार नाहीत, याची पक्की खात्री झाल्यामुळेच जप्तीसाठी ’जरंडेश्वर’ची निवड करण्यात आलीय. ती सहकारातल्या बाकीच्या घोटाळेश्वरांना हादरवून ’भाजप’वासी करण्याच्या शुद्धीकरण मोहिमेसाठी योग्यच आहे. ‘जरंडेश्वर’च्या प्रकरणात ’ईडी’ नेमकी कोणत्या कारणांनी आली, त्याची ’स्टोरी’ही गमतीशीर आहे.
राज्यातल्या ४३ सहकारी साखर कारखान्यांचा लिलाव हा त्यांनी ’राज्य सहकारी बँक’चं कर्ज थकवल्याने झाला होता. उच्च न्यायालयाने आदेश दिल्याने हे कारखाने लिलावात काढले. रीतसर निविदा मागवून कारखान्यांचे लिलाव झाले. ही लिलावाची प्रक्रिया आताही आणि ’फडणवीस सरकार’च्या कार्यकाळातही सुरू होती.
कायद्याची परिभाषा आणि पद्धतीनुसार विश्लेषण करायचं तर ’जरंडेश्वर’ लिलाव आणि पुढच्या मालकी-चालकी व्यवहारात काहीही अयोग्य झालेलं नाही. जे झालं ते कायद्याच्या अधीन राहूनच झालंय. स्पष्टच सांगायचं तर, ती सहकाराच्या खाजगीकरणाची खुलेआम प्रक्रिया होती. त्याविरोधात ताई, अण्णा, कॉम्रेडची रड नाही की, फडणवीस-चंद्रकांतदादांची ओरड नाही. कारण ’मोदी सरकार’ नफ्यात चालणार्या सरकारी कंपन्या उद्योगपती मित्रांसाठी मोडीत काढतायत.
अशा परिस्थितीत ‘राजकारण्यांनी कवडीमोल किंमतीत कारखाने विकत घेतले,’ असा दावा करत उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली. पोलिसांत फिर्याद झाली. यातल्या काही प्रकरणांचा निकाल लागायचा असताना ’ईडी’ने ’जरंडेश्वर’ जप्तीची कारवाई केली. त्यासाठी ’भाजप’ने एकीकडे अजित पवार यांच्याविरोधात ’सीबीआय- ईडी’ चौकशी करण्याची मागणी केली. दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीला जाऊन गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आणि त्यानंतर लगेच ’जरंडेश्वर कारखाना’ जप्तीची कारवाई होते, हे एखाद्या सिनेमाच्या ’स्क्रिप्ट’प्रमाणे झाल्यासारखं दिसतं.
हेही वाचा : बाळासाहेब ठाकरेंनी सेक्युलर पक्षांबरोबर २२ वेळा केली होती दोस्ती
मुळात ज्या कंपनीने ’जरंडेश्वर’ कारखाना चालवायला घेतला होता, तिच्याकडून दुसर्याच कंपनीने तो चालवायला घेतला आणि तिलाही तो चालवता न आल्याने तिसर्या कंपनीने तो चालवायला घेतला. लिलाव प्रक्रियेत तो कारखाना ज्यांनी चालवायला घेतला, त्यांचा आता या कारखान्याशी दुरान्वयानेही संबंध नाही, हे सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट आहे. ‘ईडी’ला कारवाईच करायची होती, तर ती संबंधित कंपन्यांची मालमत्ता जप्त करून करायला हवी होती. ते न करता ज्या कारखान्यांचा व्यवहाराशी संबंध नाही, तो कारखाना जप्त केल्यामुळे आता अनेक प्रश्न निर्माण झालेत.
‘हा कारखाना ’मेसर्स गुरु कमोडीटी सर्विसेस प्रा.लि.’ यांनी चालवायला घेतला होता. या कंपनीशी आपला काहीही संबंध नाही,’ हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. त्यांनी आपली चौकशी करण्याचं खुलं आव्हान दिलंय. ‘गुरु कमोडीटी’ला कारखाना चालवता आला नाही. त्यामुळे हा कारखाना ’बीवीजी’ ग्रुपच्या हणमंतराव गायकवाड यांनी चालवायला घेतला. ते अजित पवार यांचे जवळचे असले, तरी व्यवसायात ते राजकारण आणत नाहीत.
त्यांनाही हा कारखाना चालवता आला नाही. व्यवसायात तोटा सहन करण्यात उद्योजकता नसते, हे बाळकडू त्यांनी अनेक उद्योगांतून सिद्ध केलंय. त्यामुळे तोटा झाल्याने त्यांनी कारखान्यांतून अंग काढून घेतलं. त्यानंतर हा कारखाना ’जरंडेश्वर शुगर मिल प्रा. लिमिटेड’ला भाड्याने देण्यात आलाय. या कंपनीत ’स्पार्कलिंग सॉईल प्रा. लिमिटेड कंपनी’ भागीदार कंपनी आहे.
’ईडी’च्या तपासानुसार, ’स्पार्कलिंग कंपनी’ ही अजित पवार आणि त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित आहे. राजेंद्र घाडगे हे अजित पवार यांचे मामा आहेत. त्यांनी कारखाना चालवायला घेतल्यानंतर त्यात ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक करून 'इथेनॉल'सह अन्य प्रकल्पांची उभारणी केलीय. साखर कारखान्यामुळे शेतकर्यांचा ऊस गाळप होत होता. आता कारखानाच जप्त केल्याने कोरेगाव तालुक्यातलं अर्थचक्र ठप्प होणार आहे. हे सगळं ’ईडी’च्या कारवाईमुळे घडलंय.
‘जरंडेश्वर’च्या लिलावाची प्रक्रिया सुरू असताना तेव्हा साताऱ्याचे खासदार असलेल्या उदयनराजे भोसले यांनी कडक भूमिका घेतली होती. ‘हा कारखाना शेतकऱ्यांचा असून तो शेतकऱ्यांकडेच राहिला पाहिजे, दुसऱ्या कुणाला तो मी घेऊ देणार नाही. अजितदादा हा कारखाना घेणार असून त्याला आपला विरोध राहील,’ असं ते बोलायचे. अजितदादांशी त्यांचं पूर्ण वैर होतं आणि त्या वैराचं मुख्य कारण काय, हेही जगजाहीर होतं.
हा कारखाना अजित पवार यांनी घेत नाहीत, हे स्पष्ट होताच, ’गुरु कमोडिटीज’चं नाव घेऊन, 'त्यांनाही ’जरंडेश्वर’चा ताबा घेऊ देणार नाही,' असं बोलू लागले. या कंपनीचे मालक कोण, हे न पाहाताच वक्तव्य केल्याने ‘छत्रपतींचा वारस दलितांना विरोध कसा करू शकतो?’ अशी टीका उदयनराजे यांच्यावर होऊ लागली होती.
’गुरु कमोडीटीज’चे मालक गँगस्टर छोटा राजनचा धाकटा भाऊ दीपक निकाळजे हे होते. आताही उदयनराजे ’भाजप’चे राज्यसभा खासदार असल्याने ताई,अण्णांच्या सुरात सूर मिसळवतील. पण त्यापलिकडे काही करणार नाहीत. ते छत्रपतींचे ’तेरावे’ वंशज आहेत ना!
हेही वाचा :
महापोर्टलचा महाव्यापम घोटाळा सुनियोजित होता?
उद्धव ठाकरेः मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वीमोलाची
शेतकऱ्यांच्या शिवारातलं पाणी पळवणाऱ्यांवर कारवाई कधी?
राजेश टोपेः आईच्या आजारपणातही महाराष्ट्र बरा होण्यासाठी लढणारा आरोग्यमंत्री
(लेखक साप्ताहिक चित्रलेखाचे संपादक असून १९ जुलै २०२१च्या अंकातल्या संपादकीयचा काही भाग इथं दिलाय.)