कोरोनाच्या दोन लसीत काही दिवसांचं अंतर कशाला हवं?

२५ मार्च २०२१

वाचन वेळ : ४ मिनिटं


कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम जोरदार सुरू आहे. अशातच कोरोनाच्या दोन डोसमधे २८ दिवसांऐवजी ६ आठवड्यांचं अंतर असावं अशा सुचना केंद्र सरकारने राज्याला दिल्यात. यामुळे लस लाभार्थींमधे गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय. दोन लसींमधे नेमकं किती दिवसांचं अंतर ठेवायचं आणि अंतर ठेवण्याची गरज काय असे अनेक प्रश्न नागरिकांना पडतायत.

कोरोनाचे पेशंट दिवसेंदिवस वाढतायत तशी कोरोना लसीकरणाची मोहिमही जोरदार सुरूय. आरोग्य खात्यातल्या सगळ्याच कर्मचाऱ्यांची लस घेऊन झालीय. ६० वर्षाच्या पुढच्या नागरिकांना कोरोना लसीचा पहिला डोस देणं सुरूय. आता तर १ एप्रिलपासून ४५ वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या सगळ्या नागरिकांना कोरोनाची लस घेता येणार आहे. सरकारी आकडेवारीनुसार ७० लाख लोकांनी कोरोनाचे दोन डोस घेतलेत. तर ४ कोटी लोकांना कोरोनाचा पहिला डोस मिळालाय.

अगदी परवापर्यंत कोरोना लसीचा डोस घेतल्या तारखेपासून २८ दिवस उलटल्यावर १० दिवसांच्या आत कधीही लसीचा डोस घ्यावा, असं सांगण्यात येतं होतं. पण सोमवार २२ मार्चला लसीचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांनी दुसऱ्या डोससाठी २८ दिवसांऐवजी सहा ते आठ आठवडे थांबायचंय, अशा सुचना केंद्राने राज्याला दिल्यात.

सरकारच्या या सुचनेनंतर लस घेतलेल्या लोकांमधे गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय. दोन लसींमधे नेमकं किती दिवसांचं अंतर ठेवायचं आणि अंतर ठेवण्याची गरज काय असे अनेक प्रश्न नागरिकांना पडतायत. त्याची उत्तर शोधायला हवीत.

एका डोसचीही लस उपलब्ध

खरंतर, जगात उपलब्ध असलेल्या कोरोना वायरसविरोधातल्या बहुतांश लसींचे दोन डोस घ्यावे लागतात. मॉडर्ना आणि पिफझर-बायोएनटेक या दोन युरोप आणि अमेरिकेत दिल्या जाणाऱ्या लसींचेही दोन डोस आवश्यक आहेत. तर अमेरिकन कंपनीकडून बनवल्या गेलेल्या जॉन्सन्स अँड जॉन्सन्स यासारख्या काही लसींचा एकच डोस पुरेसा असतो. 

भारतात पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूटकडून उत्पादन केली जाणारी कोविशिल्ड आणि हैदराबादमधल्या भारत बायोटेक कंपनीकडून तयार केली जाणारी कोवॅक्सिन अशा दोन लसी उपलब्ध आहेत. प्रत्येक लसीकरण केंद्रावर यापैकी कोणतीही एक लस उपलब्ध असते. या दोन्ही लसींना दोन डोस घेण्याची आवश्यकता असते.

हेही वाचा : लस असतानाही आपल्याला वायरसवरच्या औषधांची गरज पडेल?

दोन डोस कशासाठी?

कोरोनाची लस दिल्यानंतर प्रतिपिंड म्हणजेच अँटीबॉडी तयार होतात. लस तयार करताना झालेल्या संशोधनात असं लक्षात आलंय की लसीचा पहिला डोस दिल्यानंतर काही दिवसांत शरीराला वायरसची ओळख होते आणि काही प्रमाणात अँटीबॉडी तयार होतात. पण दुसरा डोस मिळाला की ही अँटीबॉडी तयार करण्याची प्रक्रिया एकदम जोरात होऊ लागते. म्हणूनच या दुसऱ्या मात्रेला ‘बुस्टर शॉट’ असं म्हणतात. दोन्ही डोस घेतल्यामुळे चांगली आणि दिर्घकाळ टिकणारी रोगप्रतिकारक शक्ती तयार होते.

हेल्थलाईन या वेबसाईटवर यासाठी फार सोपी उपमा वापरण्यात आलीय. समजा, तुम्हाला आणि तुमच्या मित्राला एक जडच्या जड टेबल घराच्या बाहेर हलवायचंय. तुम्ही ते उचलायला सुरवात केली आणि भरपूर जोर लावून जवळपास निम्म्यापर्यंत आणलं. तोपर्यंत तुमचा मित्र तुमच्या मदतीला आला आणि तुम्ही दोघांनी मिळून, ताकद लावून सहजपणे जड टेबल घराबाहेर काढलं.

वेगवेगळे दोन डोस चालतील का?

कोरोना लसीचा दुसरा डोसही वायरस नावाचं टेबल बाहेर काढायला अशीच मदत करतो. त्यामुळे लसींचे दोन डोस घ्यायची गरज असते. महत्त्वाचं म्हणजे, दोन डोस घ्यावे लागणारी कोरोना ही एकमेव लस नाही. गोवर, रूबेला, हिपाटायटीस बी, कांजण्या याही आजारांसाठी लसीचे दोन डोस घ्यावे लागत होते.

पहिला डोस ज्या लसीचा घेतलाय त्याच लसीचा दुसरा डोस घेणं बंधनकारक आहे. पहिला डोस कोविशिल्डचा आणि दुसरा कोवॅक्सिनचा असं करता येणार नाही. युकेमधे लसीचे दोन वेगवेगळे डोस घेतले तर काय होईल याबाबत संशोधन सुरू आहे. पण आतातरी सगळ्या जगात एकाच लसीचे दोन्ही डोस घ्यावे लागतात.

हेही वाचा : कोरोनाची लस बनवणाऱ्या भारतातल्या तीन संस्था जग गाजवतात

दोन महिन्यांचं अंतर योग्यच

प्रत्येक लसीत असणारे घटक वेगळे असल्याने दोन डोसमधे किती अंतर असावं हे लसीनुसार बदलत जातं. या ठरलेल्या वेळेच्या आधीच कोरोनाचा डोस घेतला तर लसीची परीणामकारकता पुरेशी होत नाही, असं सेंटर फॉर डिसीज कंट्रोल या अमेरिकेतल्या संस्थेनं सांगितलंय. लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर शरीरात अँटीबॉडी तयार व्हायला काही दिवसांचा वेळ लागतो.  त्यामुळे दोन लसींमधे काही काळाचं अंतर असायला हवं.

मॉडर्ना या लसीसाठी २८ दिवसांचं तर पिफझरच्या लसीसाठी कमीतकमी २१ दिवसांचं अंतर ठेवायला लागतं. भारतात आता कोविशिल्डसाठी साधारण ४२ दिवसांचं अंतर ठेवण्याच्या सूचना दिल्यात.

भारतात कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लसींसाठी २८ दिवसांचा काळ निश्चित केला होता. पण ‘नॅशनल टेक्निकल ऍडवायजरी ऑन इम्युनेशन’ या संस्थेनं दिलेल्या अहवालात कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस सहा आठवड्यानंतर दिल्यास जास्त परिणामकारक ठरतो, असं सांगण्यात आलंय. हा डोस घ्यायला आठ आठवड्यांपेक्षा जास्त उशीर करू नये, असंही या अहवालात सांगितलंय.

लॅन्सेट या जनरलच्या फेब्रुवारीच्या अंकातही कोव्हिशिल्ड लसीच्या दोन डोसमधे ६ आठवड्यांपेक्षा कमी अंतर असेल तर ती ५५.१ टक्के परिणामकारक ठरते, असं सांगण्यात आलं होतं. हेच जर १२ आठवड्यांच्या अंतराने दोन डोस दिले तर लशीची परिणामकारकता ८१.३% इतकी जास्त असल्याचं आढळून आलं असल्याचं यात म्हटलं होतं. अनेक युरोपातल्या देशांनीही दोन लसींमधे दोन ते तीन महिन्यांचं अंतर ठेवलंय.

अनमास्क नकोच

कोरोनाचे वाढते पेशंट पाहता लवकर लसीकरणाचा कार्यक्रम उरकून टाकावा, आहे तो वेळ वाढवण्याचं कारण काय असं कुणाला वाटेल. पण लसीची परिणामकारकताच होणार नसेल तर त्यावर खर्च करून उपयोग काय हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे ४ आठवड्यांचा कालावधी केंद्राने वाढवला ते बरंच केलं, असं म्हणता येईल.

यात लसीचा पहिला डोस घेतल्यानंतरही कोरोना होण्याची शक्यता कायम आहे. शिवाय, दुसरा डोस घेतल्यानंतरही काही दिवसांनी संपूर्ण प्रतिकारकशक्ती तयार होते. त्यामुळे लस घेतली तरी आपल्याला मास्क, सॅनिटायझर आणि शारिरीक अंतर पाळायचंच आहे, हे लक्षात ठेवायला हवं.

हेही वाचा : 

 लसीचे साईड इफेक्ट अच्छे हैं

आजारी पडण्यापूर्वी कुठे कुठे जातात कोविड १९ चे पेशंट?

ईबोलापासून नायजेरियाला वाचवणाऱ्या डॉक्टरच्या सन्मानाबद्दल अबोला

या आजींनी आत्ता कोरोनाला आणि १०० वर्षांपूर्वी स्पॅनिश फ्लूलाही हरवलंय