सोन्याचांदीच्या किंमती वरखाली का होत आहेत?

१२ सप्टेंबर २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


शेअर मार्केट गडगडलाय. रियल इस्टेटमधे मंदी आहे. त्यामुळे सोन्यात इन्वेस्टमेंट करण्याचा सल्ला सर्रास दिला जात होता. सोनं पन्नास हजारांवर जाईल, असं सांगितलं जात होतं. पण तेवढ्यात अचानक सोन्याच्या किमती मागील आठवड्याच्या तुलनेत घसरल्या. चांदी तर पांढरी पडावी इतकी कोसळलीय.

गोष्ट ऑगस्ट महिन्यातली आहे. सोन्याच्या भावाने मोठी उसळी घेतली. आणि एका तोळ्याचा दर ४० हजारांना काही शे रुपये कमी होता. त्याचबरोबर चांदीचा भाव प्रतिकिलो ५० हजारांवर पोचला. पण गेल्या काही दिवसांपासून दर कमी होताना दिसतोय.

मार्केट हालचालींनुसार आजचा सोन्याचा दर प्रति तोळा ३८ हजार १३८ रुपयांवर आलाय. मागच्या आठवड्यात सोन्याचा दर ३९ हजार ८८५ वर होता. आता तो १ हजार ७४७ रुपयांनी खाली गेलाय. ही आकडेवारी लाईव एमसीएक्स म्हणजे मल्टी कमॉडीटी एक्सचेंज ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर प्रकाशित होते.  

एमसीएक्स वेबसाईटवर आजचा चांदीचा भाव प्रतिकिलो ४७ हजार ६०१ रुपयांवर पोचल्याचं दिसतंय. मागच्या आठवड्यातला भाव ५१ हजार ४९८ होता. याचा अर्थ ३ हजार ८६८ ने भाव खाली आलाय. मागच्या दीड महिन्यापासून शेअर बाजार खालावत होता. तर सोन्या-चांदीचे भाव आकाशाला पोचत होते. पण शेअर बाजार थोडा स्थिरस्थावर होतोय तर सोन्याचांदीचे भाव गडगडू लागले.

दागिने खरेदीत वाढ होईल

सोन्याचांदीचे भाव वधारत असतानाच कडकी असल्यामुळे बऱ्याच जणांनी दागिने खरेदीकडे पाठ फिरवली. सोनं कितीही महाग असलं तरी भारतात परंपरेने थोडंतरी सोनं घेतलं जातं. पण यंदा सराफा बाजारातला लोकांचा ओघ कमी झाल्याच्या बातम्या येत आहेत.

आता मात्र सोन्याचांदीचा भाव वेगाने कमी होतोय. सोन्याचा भाव भरभर वाढतो आणि भरभर कमी होतो, असं चित्र खूप कमी वेळा बघायला मिळतं. त्यामुळे सराफांना त्यांचा व्यवसाय वाढवण्याची नामी संधी मिळालीय. भाव कमी असल्याने ग्राहक सोन्याचांदीची खरेदी करतील. कारण पुन्हा सोन्याचांदीचे भाव कधी वाढतील आणि कधी कमी होतील, हे सांगता येत नाही.

सोन्याचांदीचे भाव जुलैपासून तेजीत वाढत होते. पण ५ जुलैला सादर झालेल्या बजेटमधे सोन्याच्या आयातीवरचे कर १० टक्क्यांवरुन १२.५ टक्के केले. म्हणजेच कर २.३ टक्क्यांनी वाढवला. त्यामुळे १० टक्के कर असतानाच्या काळात सोनं आयात करण्यासाठी सगळेजण सरसावले. दुसरं कारण म्हणजे आर्थिक मंदीची चाहूल लागल्यामुळे सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी लोक सरसावत होते, अशी तेजीची कारणं द मिंट या इंग्रजी वर्तमानपत्राने आपल्या बातमीत दिलीत. भाव चढे असताना अचानक उतरण्यामागची कारणं काय असतील?

हेही वाचा: गणेशोत्सवात 'पर्यावरण' नाटक देतंय निसर्ग संवर्धनाचे धडे

सोन्याचांदीचे भाव का घटतायत?

सोन्या-चांदीचे भाव कमी होण्यामागे अनेक कारणं आहेत. किट्को मीडिया या वेबसाईटवर जगभरातल्या मेटल इंडस्ट्रीची सर्व माहिती दिली जाते. या वेबसाईटचे संपादक जॉन विकॉकफ यांनी आपल्या लेखात भारतात सोन्याचे भाव कमी होण्यामागची तीन महत्त्वाची कारणं सांगितलीत.

त्यातलं पहिलं कारणं म्हणजे काही दिवसांपूर्वी प्रकाशित झालेल्या अहवालानुसार अमेरिकतल्या सोन्याचा भावात एका महिन्याभरात १ हजार ४९४.३० यूएस डॉलरची घसरण झाली. अमेरिकेतल्या घटत्या भावाचा परिणाम आशियात विशेषत: भारतात दिसला. कारण लगेचच पुढच्या दोन आठवड्यात सोन्याचे भाव कमी होऊ लागलेत.

तसंच आणखी महत्त्वाचं कारण म्हणजे चीन आणि अमेरिकेतलं ट्रेड वॉर. फाय जी, आखाती देशांशी असलेला तेलाचा व्यवसाय, आयात-निर्यातीच्या करांमधे बदल करणं इत्यादी वादाचा परिणाम इतर देशांवर होतोय. यामुळेसुद्धा सोन्याचांदीच्या दरांमधे घट झालीय.

हेही वाचा:  रेडीचा गणपतीः महाराष्ट्रातल्या एकमेव द्विभुज गणेशाचा 'स्वयंभू' महिमा

युरोपियन सेंट्रल बँकेचा दे धक्का

यातलं तिसरं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे युरोपियन सेंट्रल बँकेने व्याजदरात कपात केली. ही कपात तिथल्या आर्थिक उलाढालीला चालना देण्यासाठी केली. येत्या आर्थिक मंदीला तोंड देण्यासाठी हा निर्णय घेतला जाणार असं जगभरातले अर्थतज्ञ सांगत होते. शेवटी हा निर्णय झाला.

व्याजदरातली कपात ०.२५ ते १ टक्क्यापेक्षा जास्त आहे. ही कपात बँक आणि नॉन बँकिंग संस्थांसाठीसुद्धा केलीय, असं रिपोर्ट अँड पॉलिसिज या आर्थिक विषयांवर बातम्या देणाऱ्या आयरीश वेबसाईटने आपल्या बातमीत लिहिलंय. लवकरच अमेरिकेची फेडरल बँकसुद्धा हा निर्णय घेईल अशा बातम्या येतायत.

या निर्णयामुळे वाढत असलेला सोन्याचांदीचा भाव कमी होऊ लागला. म्हणूनच लगोलग युरोपियन सेंट्रल बँकेने बाँड खरेदीसंबंधी नवीन योजना आणणार असल्याची घोषणा केली.

हेही वाचा: देश का नेता कैसा हो, गणपती बाप्पा जैसा हो!

चांदीच्या दरात का घट झाली?

चांदीच्या दरात झालेली घट मोठी आहे. चांदीचं मार्केट हे सोन्याच्या तुलनेत लहान आहे. चांदीचे दर कमी होण्यामागे आणखी काही घटक कारणीभूत आहेत. पॉलिसी बाझारने त्यांच्या वेबसाईटमधे देण्यात आलेल्या कारणानुसार पहिलं कारण म्हणजे चांदीचं ट्रेडिंग कमी प्रमाणात सुरू आहे.  त्यातच सोन्याच्या ट्रेडवर परिणाम झाल्यामुळे चांदीच्या ट्रेडवरही झाला.

तसंच चांदीच्या खाणकाम प्रक्रियेत तेलाचा वापर होतो. खनिज तेलाच्या भावानुसारही चांदीचे दर ठरतात. मेपासून तेलाचे दर ५.५८ यूएस डॉलरने घटलेत. त्यानंतर अगदी सप्टेंबरपर्यंत तेलाचे स्थिरावलेत. तसंच चांदीचा वापर इंडस्ट्रील प्रोडक्शनसाठी मोठ्या प्रमाणात वापरतात. पण सध्या प्रोडक्शनमधे घट झाल्याचे अनेक अहवाल आलेत इत्यादी कारणांमुळे चांदीचे दर घटलेत.

सोन्याचा दर ५० हजारांवर जाईल?

भारतात भाव कमी झाल्यामुळे सोन्याच्या खरेदीत वाढ झालीय. पण सध्या जागतिक बाजारपेठेत असं नाहीय. अमेरिकेतलं सोन्याचांदीचं ट्रेडिंग कमी झालंय. पण हे चित्र बदलू शकतं. कारण तिथे शेअर बाजारात सातत्याने चढ-उतार सुरू आहे. येत्या काळात मंदीला तोंड देण्यासाठी शेअरशिवाय गुंतवणूक करण्याकडे कल वाढलाय. त्यात सोन्याला पसंती दिली जाईल. 

अमेरिका, रशिया आणि चीन यांच्यात सोने खरेदीवरून चढाओढ सुरू आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या खरेदीला वेग आलाय. सप्टेंबर महिन्यात अमेरिकेतल्या सोन्याचे भाव स्थिरावू लागलेत. एप्रिल ते ऑगस्टपर्यंत सोन्याच्या भावात वेगाने घट होत होती. पण सध्या भाव १ हजार ४९२ यूएस डॉलर आहे.

सोन्यातली उलाढाल बघता वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलने सोन्याचा अमेरिकेतला दर २ हजार युएस डॉलरवर जाईल. त्या आधारावर भारतात हा आकडा प्रतितोळा ५० हजारांवर जाण्याची शक्यता वर्तवली जातेय.

हेही वाचा: 

भारताला मोहालीच्या खेळपट्टीची देणगी देणारे दलजित सिंग

आपल्या मुलांना वाचायला आवडतील अशा गणपतीच्या पाच गोष्टी

आवाजाइतकीच रसरशीत आशा भोसलेंची जग गाजवणारी रेस्टॉरंटआ